You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
इस्रोच्या 'बाहुबली'चे अवकाशात यशस्वीरीत्या प्रक्षेपण, जाणून घ्या 'या' मोहिमेबाबत
- Author, अमृता दुर्वे
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
2 नोव्हेंबर रोजी श्रीहरीकोटा येथून इस्रोचं LVM3-M5 हे शक्तिशाली रॉकेट अवकाशाकडे झेपावलं.
CMS-03 communication satellite घेऊन या रॉकेटनं अवकाशात झेप घेतली आणि इस्रोने एका दमदार नव्या कामगिरीची नोंद केली.
इस्रोची ही मोहीम काय आहे आणि या रॉकेटची इतकी चर्चा का होतेय, जाणून घेऊयात.
इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन ( ISRO ) ने रविवारी 2 नोव्हेंबरला GSAT-7R (CMS-03) लाँच केला. हा भारतीय नौदलाचा अत्याधुनिक कम्युनिकेशन सॅटलाईट आहे. श्रीहरीकोटामधल्या सतीश धवन स्पेस सेंटरमधून हे रॉकेट प्रक्षेपित करण्यात आलं.
LVM3 या शक्तिशाली लाँच व्हेईकलद्वारे हे मिशन लाँच करण्यात आलंय. हा भारताचा आजवरचा सर्वात अवजड दळणवळण उपग्रह आहे.
भारतामध्येच डिझाईन आणि विकसित करण्यात आलेल्या या उपग्रहाचं वजन तब्बल 4400 किलो तर उंची साधारण 14 मजली इमारतीएवढी आहे. आणि म्हणूनच याला 'बाहुबली' म्हटलं जातंय.
'बाहुबली' असं नाव देण्यात आलेलं हे अभियान भारताच्या जड-प्रक्षेपण क्षमतेमध्ये स्वावलंबी होण्याच्या दिशेने एक महत्त्वाचं पाऊल मानलं जातंय.
या उपग्रहामुळे भारतीय नौदलाला हिंदी महासागराच्या भागातही सुरक्षित टेलिकॉम कव्हरेज मिळेल. नौदलाचे space based communication अधिक मजबूत होईल.
या LVM3 चं पूर्वीचं नाव - Geosynchronous Launch Vehicle Mark 3 (GSLV Mk 3). यापूर्वी याच LVM3 ने Chandrayaan-3 मोहीम लाँच केली होती. आणि 2 नोव्हेंबरचं मिशन या रॉकेटची पाचवी झेप म्हणून नावात पुढे M5 उल्लेख आहे.
हे रॉकेट Low Earth Orbit म्हणजे पृथ्वीच्या खालच्या कक्षेपर्यंत 8000 किलो सामान वाहू नेऊ शकतं... आणि बहुतांश उपग्रह ज्या आणखीन वरच्या कक्षेत असतात तिथपर्यंत 4000 किलो वाहून नेऊ शकतं.
या पेलोड - म्हणजे मिशनसाठी पाठवण्यात आलेल्या उपकरणांमध्ये वेगवेगळ्या कम्युनिकेशन बँड्समध्ये, व्हॉईस, डेटा आणि व्हीडिओ लिंक्स सपोर्ट करू शकणारे ट्रान्सपाँडर्स आहेत. यामुळे नौदलाच्या नौका, पाणबुड्या, विमानं आणि मेरीटाईम ऑपरेशन सेंटर्स यांच्यामध्ये कोणत्याही अडथळ्याविना संपर्क कायम राहू शकेल.
या लाँचबद्दल इस्रोचे अध्यक्ष व्ही. नारायणन यांनी एक्सवर (पूर्वीचं ट्विटर) म्हटलंय, "इस्रोने भारताच्या भूमीवरून सर्वाधिक वजनाचा GEO कम्युनिकेशन सॅटलाईट यशस्वीपणे लाँच केला. भारताचं अवकाश तंत्रज्ञान मोठी भरारी घेत असून यामुळे भारत आणि भारताजवळच्या युजर कम्युनिटीला महत्त्वाच्या सेवा मिळू शकतील."
पण मग हे मिशन भारताच्या अवकाश मोहीमांसाठी महत्त्वाचं का आहे? कारण यामुळे भारताचं अवकाश तंत्रज्ञानातलं स्वावलंबन वाढलंय.
इतक्या अवजड उपग्रहाचा लाँच यशस्वी झाल्याने LVM3 रॉकेटची क्षमता सिद्ध झाली. आणि GTO - Geo-synchronous Transfer Orbit म्हणजे पृथ्वीच्या कक्षेत जिथे उपग्रह असतात तिथपर्यंत अवजड उपग्रह नेण्यासाठी यापुढेही या रॉकेटचा वापर करता येईल आणि 400 टनांपेक्षा जास्त वजनाचे उपग्रह लाँच करण्यासाठी परदेशी लाँचर्सवर अवलंबून राहावं लागणार नाही.
यापूर्वी इस्रोने अशा अवजड लाँचसाठी French Ariane Space आणि इलॉन मस्क यांच्या SpaceX चा वापर केला होता.
भविष्यात कदाचित इस्रो या LVM3 चा व्यावसायिक वापर करून, इतर देशांना त्यांच्या मोहिमा राबवण्यात मदत करू शकेल.
इस्रोच्या या मोहिमेच्या यशाचा - अनुभवाचा फायदा भविष्यातल्या गगनयान मोहीमच्या तयारीसाठीही होणार आहे. या गगनयानद्वारे पहिल्यांदा भारतीय अंतराळवीर अंतराळात जातील आणि त्यासाठी LVM3 वर आधारित रॉकेटचाच वापर केला जाणार आहे.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.