No Cost EMI किंवा 0 % टक्के व्याजावर खरंच कर्ज मिळतं का?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, टीम बीबीसी हिंदी
नो कॉस्ट ईएमआय (No Cost EMI), झिरो इंटरेस्ट हे शब्द ई कॉमर्स वेबसाईट्स आणि मोठ्या स्टोअर्सच्या अनेक जाहिरातींमध्ये वापरले जातात. हे शब्द दिसले, की ती ऑफर अचानक आकर्षक वाटायला लागते.
पण खरंच अशा No cost EMI किंवा व्याजमुक्त ऑफर्स फायद्याच्या असतात का? की ग्राहकांना आकर्षित करण्यासाठीचा तो एक सापळा असतो?
लॅपटॉप,टीव्ही, फ्रीज, महागडे मोबाईल फोन विकत घेताना तुम्हालाही हा No Cost EMI चा ऑप्शन दिला गेला असेल.
कोणतीही गोष्ट विकत घेताना पैसे भरण्याचे साधारण तीन पर्याय असतात.
पहिला पर्याय : म्हणजे पूर्ण पैसे देऊन वस्तू विकत घेणं. यावर कधी डिस्काऊंट मिळतो - तर कधी मिळत नाही.
दुसरा पर्याय - रेग्युलर EMI : म्हणजे त्या वस्तूचे पैसे हप्त्याने भरणं आणि त्यावर काही टक्के व्याज आकारलं जातं तेही भरावं लागतं.
तिसरा पर्याय - नो कॉस्ट EMI : यावर तुम्हाला कोणतंही व्याज भरावं लागत नाही, असा दावा कंपन्या करतात. हाच सर्वोत्तम पर्याय असल्याचा दावाही केला जातो.
तुम्ही कंझ्युमर ड्युरेबल्स म्हणजे घरातली उपकरणं, इलेक्ट्रॉनिक वस्तू, फर्निचर अशा काही गोष्टी घेत असाल, तर पूर्ण पैसे भरणं चांगलं, असं अर्थ नियोजन तज्ज्ञ म्हणत आले आहेत.
दुसऱ्या पर्यायात कदाचित तुम्हाला जितका डिस्काऊंट मिळेल, त्यापेक्षा जास्त पैसे व्याजात द्यावे लागण्याची शक्यता आहे.
पण तिसऱ्या पर्यायाचं काय?
नो कॉस्ट EMI म्हणजे काय? तर वस्तू विकत घेण्याचा असा मार्ग ज्यामध्ये ग्राहकाला त्या वस्तूची किंमती दरमहा हप्त्यांमध्ये विभागून भरता येते आणि त्यावर कोणतंही व्याज आकारलं जातं नाही.
नो कॉस्ट EMI चा फायदा नेमका कुणाला?
नेहमीच्या EMI ऑप्शनमध्ये वस्तूच्या किमतीत व्याजाची भर पडत असते. पण नो कॉस्ट EMI मध्ये वस्तूची किंमत तुम्ही ठरवत असलेल्या महिन्यांमध्ये विभागली जाते.
पण, हे कसं होतं, तर जेव्हा तुम्ही हा पर्याय निवडता तेव्हा तो रिटेलर किंवा मग फायनान्सर तुमच्यातर्फे व्याजाचा भार उचलतो.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
याचे फायदे काय असू शकतात? तर मोठी वस्तू विकत घेणं परवडणारं होतं. कारण त्याचा खर्च काही महिन्यांत विभागला जातो. काही ठिकाणी क्रेडिट कार्डशिवायही हा पर्याय दिला जातो. ग्राहकांसाठी हे बजेट फ्रेंडली, सोयीचं असतं.
पण ही मार्केटिंगची एक पद्धत आहे. ग्राहक म्हणून तुम्हाला खूप चांगली डील मिळतेय असं सांगण्याची पद्धत. आणि या मार्केटिंगमुळे विक्रीही वाढते.

फोटो स्रोत, Getty Images
याप्रकारे ग्राहकांना आकर्षित केलं जातं, पण यातल्या छुप्या चार्जेसबद्दल अनेकदा ग्राहकांना सांगितलं जात नाही.
मग No Cost EMI ऑफर दिसली, तर काय करायचं? हा प्रश्न तुमच्या मनात आला असेल.
तर सगळ्यात आधी वेगवेगळ्या रिटेलर्स आणि वेबसाईट्सवरच्या डील्स पहा आणि त्या किंमती तपासून पाहा.
जिथे किंमत कमी असेल, तो पर्याय निवडा.
No Cost EMI चा पर्याय निवडक प्रॉडक्ट्सवर, निवडक कार्ड्सवर उपलब्ध असतो. त्यामुळे तुमच्याकडे असलेलं बँक कार्ड आणि तुम्ही घेत असलेली वस्तू या ऑफरसाठी लागू होत आहे का, ते तपासा.
प्रोसेसिंग फी आणि GST आकारला जातो का?
No Cost म्हटलेलं असलं, तरीही काही प्लान्समध्ये प्रोसेसिंग फी किंवा GST आकारला जातो. असं काही आहे का? ते तपासा.
समजा तुम्हाला एखादा 1 लाख 30 हजाराचा लॅपटॉप, क्रेडिट कार्ड वापरलं तर डिस्काऊंट आणि नो कॉस्ट EMI ला 1.20 लाखांमध्ये मिळत असेल.
पण अशावेळी तुमची क्रेडिट कार्ड कंपनी काय करण्याची शक्यता आहे? तर ही रक्कम दोन भागांमध्ये वाटली जाईल, मुद्दल (Principal ) आणि व्याज (Interest). एक लाख मुद्दल आणि व्याजाचे 20 हजार.
आता क्रेडिट कार्डच्या व्याजावर 18% GST लागतो. म्हणजे जरी बँक तुमच्याकडून व्याज घेणार नसली, तरी तुम्हाला GST भरावा लागेल.

फोटो स्रोत, Getty Images
म्हणजे व्याज म्हणून दाखवलेल्या 20,000 वर 18% जीएसटी 3600 रुपये लागतो. हा तुम्हालाच भरावा लागेल. याशिवाय प्रोसेसिंग फी पण असेल. ती 100 ते 1000 रुपयांपर्यंत असेल. यावरही 18% GST असेल.
यात जर तुम्ही नो कॉस्ट इंटरेस्ट पर्याय वापरत जास्त महिन्यांचे हप्ते निवडले असतील, तर व्याजाचा भाग जास्त दाखवला जाईल. म्हणजे GST आणखी जास्त.
अनेकदा सेलमध्ये खरेदी करताना जर तुम्ही पूर्ण पैसे देऊन खरेदी करत असाल किंवा दुसऱ्या ठराविक मार्गाने पेमेंट करत असाल. तसंच एखादं UPI अॅप वा विशिष्ट ऑनलाईन बँकिंग सेवा असेल तर अधिक चांगले डिस्काऊंट्स दिले जातात. नो कॉस्ट EMI चा पर्याय घेतला तर मग हा डिस्काऊंट मिळत नाही.
त्यामुळे ही तुलना नक्की करून पाहा.
काय काळजी घ्यावी?
व्याजमुक्त हप्त्यांचा पर्याय निवडताना तुमचं महिन्याचं बजेट लक्षात घ्या आणि त्यानुसारच प्लान घ्या. कारण हा हप्ता चुकला, तर मोठी पेनाल्टी लागू शकते आणि याचा परिणाम तुमच्या क्रेडिट स्कोअरवर होईल.
या योजनांचा हप्ता साधारण 3-12 महिन्यांचा असतो. पण तुम्ही निवडत असलेल्या कालावधीनुसार काही हिडन चार्जेस, प्री-पेमेंट पेनल्टी या गोष्टी बदलतायत का, ते पाहा.
सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, No Cost EMI चा पर्याय आहे म्हणून मोहात पडून खरेदी करणं टाळा.
कारण ई-कॉमर्स वेबसाईट्स आणि रिटेलर्सना हेच हवं असतं. तुमच्या गरजेच्या किंवा जास्त किमतीच्या वस्तू विकत घेण्यासाठी हा पर्याय वापरा.
(वरील माहिती केवळ अर्थसाक्षरतेसाठी आहे. कोणतीही गुंतवणूक करताना, खरेदी करताना तज्ज्ञांचा किंवा गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घ्या. )
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)











