कार विमा घेण्यापूर्वी हे मुद्दे नक्की लक्षात घ्या, क्लेम मंजूर होण्यास येणार नाही अडचणी

कार विमा घेण्यापूर्वी हे मुद्दे नक्की लक्षात घ्या, क्लेम मंजूर होण्यास येणार नाही अडचणी

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, अजित गढवी
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

अलीकडच्या काळात, आयुर्विमा आणि आरोग्यविम्याबरोबरच कार विमा हादेखील आपल्या आर्थिक नियोजनाचा एक महत्त्वाचा भाग झाला आहे.

अनेकांकडे कदाचित आयुर्विमा किंवा आरोग्यविमा नसेल, मात्र त्यांच्याकडे त्यांच्या कार किंवा वाहनाचा विमा नक्कीच असतो.

भारत ही सध्या जगातील ऑटोमोबाईलच्या सर्वात मोठ्या बाजारपेठांपैकी एक आहे. त्यामुळे वाहन विम्याच्या क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक कंपन्या आहेत.

तुमची कार चोरीला गेल्यास, वाहनाचा अपघात झाल्यास किंवा इतर कोणत्याही कारणामुळे जर वाहनाचं काही नुकसान झालं, तर तुम्हाला पोलीस आणि विमा कंपनी दोघांनाही याची माहिती द्यावी लागते.

वाहन विमा हा बंधनकारक असतो आणि विम्याशिवाय वाहन चालवणं बेकायदेशीर आहे. तरीदेखील भारतातील जवळपास 48 टक्के वाहनांसाठी अजूनही विमा घेण्यात आलेला नाही.

वाहन विमा घेताना कोणते मुद्दे लक्षात घेतले पाहिजेत यासंदर्भात बीबीसीनं तज्ज्ञांशी चर्चा केली.

भारतात कार विम्याचे किती प्रकार आहेत?

कार विम्याचे मुख्यत: तीन प्रकार आहेत - कॉम्प्रीहेन्सिव्ह कार इन्शुरन्स म्हणजे व्यापक कार विमा, ऑन डॅमेज कार इन्शुरन्स म्हणजे कारचं नुकसान झाल्यावरचा विमा आणि थर्ड पार्टी विमा.

कॉम्प्रेहेन्सिव्ह कार विम्यामध्ये कारच्या मालकाला सर्वाधिक विमा संरक्षण मिळतं. या विम्यात तुमच्या वाहनाचं अपघातामुळे झालेलं नुकसान, नैसर्गिक आपत्तीमुळे झालेलं नुकसान, चोरी किंवा आगीमुळे वाहनाचं झालेलं नुकसान आणि थर्ड पार्टीमुळे झालेलं नुकसान यांना विम्याचं संरक्षण मिळतं.

कारसाठी कोणत्या प्रकारचा विमा घ्यावा?

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

चारचाकी वाहनासाठी शून्य घसारा (झिरो डेप्रीशिएशन पॉलिसी) किंवा झिरो डिपॉझिट पॉलिसी घेण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात. व्यापक कार विम्यावरील तो अतिरिक्त भाग किंवा अतिरिक्त विमा संरक्षण असतं.

तुम्ही कार विकत घेतल्यानंतर जेव्हा शोरूममधून बाहेर पडता, तेव्हाच त्या कारचं मूल्य कमी होण्यास सुरूवात होते. कारण कारचा घसारा कारच्या किमतीला लागू होतो.

अशा परिस्थितीत, जर कारला विम्याचं संरक्षण असेल, तर विमा कंपनी घसाऱ्याचा खर्च कमी करते. मात्र जर तुम्ही झिरो डेप्रीशिएशन पॉलिसी घेतली असेल, तर तुम्हाला घसारा लक्षात न घेता पूर्ण रक्कम मिळते.

मिथून जाथल विमा सल्लागार आहेत. ते म्हणतात, "काहीजण कारसाठी विमा पॉलिसी घेताना सर्वात कमी प्रीमियम असलेली पॉलिसी घेण्याचा प्रयत्न करतात. मात्र शेवटी ती पॉलिसी महाग पडते.

"झिरो डिपॉझिट पॉलिसी कदाचित महाग असू शकते, मात्र तुमच्या वाहनाला विम्याचं संरक्षण देण्याच्या दृष्टीनं तीच अधिक योग्य ठरते."

ते म्हणतात, "कारसाठी अशी विमा पॉलिसी घ्या ज्यात सर्व काही कव्हर झालेलं असेल. नाहीतर विम्याचा क्लेम करताना तुमचं मोठं नुकसान होईल."

"वाहन विमा पॉलिसी घेताना, त्या पॉलिसीतील अटी-नियम नीट समजून घ्या तसंच अतिरिक्त जोडायच्या गोष्टींबद्दल जाणून घ्या," असं सर्व्हेयर आणि नुकसानीचं मूल्यांकन करणारे नीरज जैन यांनी बीबीसीला सांगितलं.

कार विमा

फोटो स्रोत, Getty Images

जर तुम्ही झिरो डेप्रीशिएशन पॉलिसी घेतली असेल, तर आयआरडीएनुसार (इन्श्युरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अॅथोरिटी) त्या वाहनाच्या मूल्यातील घसारा सोडून दिला जातो.

ते म्हणतात, "विमाधारकाला हे माहीत असलं पाहिजे की त्यात कोणत्या अतिरिक्त गोष्टींचा समावेश आहे. जर तुम्ही इंजिन प्रोटेक्शन कव्हर घेतलं असेल तर त्यात नेमकं कोणत्या गोष्टीला विम्याचं संरक्षण देण्यात आलं आहे हे समजून घ्या. कोणत्या अटींअंतर्गत विमा कंपनी विम्याचा क्लेम मंजूर करणार नाही हे देखील जाणून घ्या."

नीरज जैन म्हणतात, "अनेकांना वाटतं की कारसाठी विमा पॉलिसी घेतल्यानंतर जर कारला काहीही झालं तर त्यांना त्याचा मोबदला मिळेल किंवा त्या खर्चाला विमा संरक्षण मिळेल. मात्र प्रत्यक्षात तसं नसतं."

"जर तुम्ही कारचं कूलन्ट किंवा ऑईल नियमितपणे बदललं नाही आणि कारचा वापर तसाच सुरू ठेवला, तर त्यामुळे इंजिनचं नुकसान होतं. अशा परिस्थितीत विम्याचा क्लेम मंजूर होत नाही. कारण कारचं ते नुकसान वाहनाच्या वापरामुळे झालेलं असतं."

"अपघातामुळे कारचं नुकसान झाल्यावरच विमा कंपनी विम्याचा क्लेम मंजूर करते."

"याशिवाय, वैयक्तिक वस्तू, चाबीचं प्रोटेक्शन, वापरातील वस्तूंसाठी विम्याचं कव्हर असतं. तुमच्या कारचे नट, बोल्ट, वॉशर्स, कूलन्ट, ऑईल इत्यादी गोष्टींसाठी संरक्षण असतं."

"त्यामुळे कारसाठी विमा पॉलिसी घेताना काळजीपूर्वक घ्या. फक्त विम्याचा हफ्ता कमी आहे याआधारेच विमा पॉलिसी घेऊ नका. कारण बऱ्याचवेळा अशा विमा पॉलिसीतून अनेक गोष्टी वगळण्यात आलेल्या असतात," असं ते पुढे म्हणतात.

पूर्ण विमा संरक्षण कसं मिळवावं?

विमा सल्लागार मिथून जाथल म्हणतात, "आता आरटीआयसाठी देखील विमा संरक्षण आहे. आरटीआय म्हणजे कारसाठीचं रिटर्न टू इन्व्हॉईस. या प्रकारात जर तुम्ही कार चोरीला गेली किंवा अपघातामुळे कारचं पूर्ण नुकसान झालं आणि ती पुन्हा दुरुस्त करता येणं शक्य नसेल, तर आरटीओची रक्कम आणि कार विकत घेताना तुम्ही भरलेल्या इतर कराची रक्कम यांनादेखील विमा संरक्षण मिळतं."

"थोडक्यात जर तुम्ही आरटीआयसह विमा घेतला असेल, तर तुम्हाला कारचं मूळ इन्व्हॉईस आणि कारचा घसारा झालेलं मूल्य यातील फरकाची रक्कम मिळेल."

पूर्ण विमा संरक्षण कसं मिळवावं?

फोटो स्रोत, Getty Images

ते म्हणतात, "तुमच्या कारच्या विमा पॉलिसीची मुदत संपायला एक किंवा दोन महिने बाकी असतानाच तुम्हाला वेगवेगळ्या विमा कंपन्यांकडून पॉलिसी नूतनीकरणासाठी फोन येऊ लागतात. कारण तुमचा डेटा सर्वत्र शेअर झालेला असतो."

"सर्वच विमा कंपन्या तुम्हाला कमीत कमी हफ्त्यात कार विमा देण्याचं आश्वासन देतात. मात्र तुम्हाला याची कल्पना नसते की त्यातून अनेक गोष्टींवरील विमा संरक्षण वगळण्यात आलेलं असतं."

ते ग्राहकांना सल्ला देतात की, "जेव्हा तुम्ही कार विकत घेता, तेव्हा कारच्या डीलरकडे विचारणा करा की कोणत्या विमा कंपनीचा क्लेम सेटलमेंट रेशो सर्वोत्तम आहे. तसंच कोणत्या कंपनीचा क्लेम मंजूर करण्यासंदर्भातील अनुभव चांगला आहे हे देखील विचारा."

क्लेम सेटलमेंट रेशो म्हणजे विमा कंपनीकडून ग्राहकांचे विम्यासाठीचे क्लेम मंजूर करण्याचं प्रमाण. हे प्रमाण जितकं अधिक तितकं ते ग्राहकांच्या फायद्याचं असतं.

विमा कंपनीला कोणत्या गोष्टींची माहिती देणं आवश्यक असतं?

विमा सर्व्हेयर आणि नुकसानीचं मूल्यांकन करणारे नीरज जैन म्हणतात की कारसाठी विमा पॉलिसी घेताना विमा कंपनीला कारशी निगडीत सर्व माहिती देणं योग्य ठरतं.

विमा कंपनीला कोणत्या गोष्टींची माहिती देणं आवश्यक असतं?

फोटो स्रोत, Getty Images

ते म्हणतात, "समजा तुमच्या कारमध्ये मुळातच म्युझिक सिस्टम नसेल, मात्र तुम्ही बाहेरून त्यात म्युझिक सिस्टम बसवून घेतली असेल, वूफर बसवलं असेल, स्वतंत्र लायटिंग केली असेल किंवा कारमध्ये इतर बदल केले असतील, तर त्याची माहिती विमा कंपनीला द्या."

"नाहीतर जर एखाद्या इलेक्ट्रिकल दोषामुळे जर कारचं नुकसान झालं, तर विमा कंपनी क्लेम नाकारू शकते."

ते पुढे म्हणतात, "जर तुम्ही टायरचा प्रकार, बंपर किंवा कार उत्पादक कंपनीनं कारमध्ये दिलेलं कोणतंही उपकरण बदललं तर त्याची माहिती विमा कंपनीला दिली पाहिजे. कारण त्यानुसारच तुमच्या विम्याचा हफ्ता ठरतो. ही माहिती आरटीओला देखील दिली पाहिजे."

"त्याचबरोबर, टोईंगसाठी किती रकमेचं कव्हर किंवा विमा संरक्षण मिळतं आहे हे देखील तपासा. जर तुमची कार कुठेही बंद पडली आणि तुम्हाला ती घेऊन जाण्यासाठी क्रेन मागवावी लागली, तर त्यासाठीच्या कव्हरसाठी मर्यादा असते. कारसाठी विमा घेताना या गोष्टीदेखील लक्षात ठेवा."

कारला अपघात झाल्यानंतर सर्वात आधी कोणती गोष्ट केली पाहिजे?

नीरज जैन म्हणतात, "आयआरडीएच्या नियमांनुसार, कारला अपघात झाल्यानंतर 24 तासांच्या आत विमा कंपनीच्या टोल फ्री नंबरवर याची माहिती दिली पाहिजे."

"असं करण्याऐवजी अनेकजण त्यांच्या एजंट किंवा डीलरला फोन करतात. मात्र जर विमा कंपनीला माहिती देण्यास उशीर झाला, तर तुम्हाला भुर्दंड बसू शकतो."

नीरज जैन म्हणतात, "विमा कंपनीच्या टोल-फ्री नंबरवर अपघाताची माहिती दिल्यानंतर, पुढे काय केलं पाहिजे यासाठी विमा कंपनी तुम्हाला मार्गदर्शन करेल. जर अपघातात कोणी जखमी झालं असेल किंवा अपघातात कोणाचा मृत्यू झाला असेल, तर पोलिसांकडे एफआयआर नोंदवणं आवश्यक असतं."

कारला अपघात झाल्यानंतरची प्रक्रिया काय असते?

जर व्यावसायिक वाहनाबरोबर अपघात झाला असेल, तर आयआरडीएनं नियुक्त केलेला सर्व्हेयर किंवा निरीक्षक अपघाताच्या ठिकाणी जातो आणि तिथली पाहणी करतो.

हे निरीक्षक स्वतंत्र व्यावसायिक असतात. ते अपघातात कारचं किती नुकसान झालं आहे याची पाहणी करतात आणि कोणती गोष्ट दुरुस्त होऊ शकेल आणि कोणती गोष्ट बदलण्याची आवश्यकता आहे याचा अंदाज बांधतात.

इथे एक गोष्ट महत्त्वाची आहे. ती म्हणजे भारतात विमा कंपन्या सर्व्हेयर किंवा निरीक्षक नेमतात कारण त्यांची फी भरावी लागते. जर ग्राहक त्या निरीक्षकाच्या पाहणी किंवा मूल्यांकनावर समाधानी नसेल, तर ग्राहक स्वत: त्याचं शुल्क भरून वेगळा सर्व्हेयर नियुक्त करू शकतो.

कारला अपघात झाल्यानंतरची प्रक्रिया काय असते?

फोटो स्रोत, Getty Images

नीरज जैन म्हणतात, "जेव्हा एखाद्या खासगी कारला अपघात होतो आणि त्यासाठीचा विमा क्लेम केला जातो, तेव्हा ती कार कंपनीच्या वर्कशॉपमध्ये पाठवली जाते आणि तिची सर्व कागदपत्रं तपासली जातात. मग एक क्लेम फॉर्म भरला जातो ज्याच्या आधारे तो पूर्ण क्लेम हाताळला जातो."

"यात अपघात कसा झाला, कार कोण चालवत होतं, कारमध्ये त्यावेळेस कितीजण होते, एखादा जखमी झाला आहे का किंवा कोणाचा मृत्यू झाला आहे का इत्यादी तपशील त्या फॉर्ममध्ये भरायचे असतात."

"त्याचबरोबर ड्रायव्हिंग लायसन्स, आरसी बूक, परमीट, विम्याची कागदपत्रंदेखील सोबत जोडावी लागतात."

नीरज जैन म्हणतात, "मग त्या वर्कशॉपमध्ये कारच्या स्थितीची पाहणी करून त्या आधारे क्लेमसाठीची रक्कम ठरवली जाते. त्यानंतर त्याची माहिती विमा कंपनीला दिली जाते, तसंच विमा कंपनीच्या वाहन निरीक्षकाला पाठवली जाते."

"त्यानंतर तो निरीक्षक त्याची पाहणी करतो आणि कारमध्ये कोणत्या गोष्टी दुरुस्त केल्या पाहिजेत किंवा कोणत्या गोष्टी बदलल्या पाहिजेत हे सांगतो."

ड्रायव्हिंग लायसन्स नसताना अपघात झाल्यास विम्याची रक्कम मिळेल का?

ड्रायव्हिंग लायसन्स नसताना वाहन चालवताना अपघात होणं, ही भारतातील एक मोठी समस्या आहे.

नीरज जैन म्हणतात, "सर्वात पहिली गोष्ट म्हणजे कोणालाही ड्रायव्हिंग लायसन्स किंवा वाहन विमा नसताना वाहन चालवता येत नाही. तसंच व्यावसायिक वाहनांसाठी फिटनेस सर्टिफिकेटदेखील बंधनकारक असतं."

ते पुढे म्हणतात, "कोणतीही विमा कंपनी ड्रायव्हिंग लायसन्स नसताना विम्याचा क्लेम मंजूर करणार नाही. समजा ड्रायव्हिंग लायसन्सची मुदत काही दिवसांपूर्वीच संपली असेल आणि त्याचं नूतनीकरण झालं नसेल, तर विमा कंपनी तो क्लेम नाकारेल. मात्र न्यायालयाकडून तुम्हा विमा संरक्षण मिळू शकतं."

पाण्यात बुडाल्यामुळे कारचं नुकसान झालं तर विम्याची रक्कम मिळते का?

अनेकदा, मुसळधार पावसामुळे जेव्हा रस्त्यांवर पाणी साचलेलं असतं, तेव्हा लोक त्या पाण्यातून कार नेतात आणि कारचं नुकसान होतं.

अशा प्रकरणांबाबत, नीरज जैन म्हणतात, "वाहन विम्यात कारचालकाचा निष्काळजीपणा कव्हर केलेला असतो. मात्र मुद्दाम करण्यात आलेला निष्काळजीपणा कव्हर केलेला नसतो. त्यामुळे अशा प्रकरणांमध्ये विम्याचा क्लेम मंजूर होणार नाही. यासाठी लोकांनी इंजिन प्रोटेक्शन पॉलिसी घेतली पाहिजे."

"तुम्ही जर कुठे जात असाल आणि मुसळधार पावसामुळे जर रस्त्यावर पाणी तुंबलं असेल, तर अशावेळी तुम्ही एखाद्या ठिकाणी तुमची कार पार्क करता. अशा परिस्थितीत पाण्यामुळे कारचं जे नुकसान होतं, त्याला विमा संरक्षण मिळतं," जैन सांगतात.

कोणत्या परिस्थिती विम्याची रक्कम मिळत नाही?

जर तुम्ही मुद्दाम निष्काळजीपणा केल्यामुळे कारचं नुकसान झालं, तर त्या परिस्थितीत कारचा विम्याचा क्लेम फेटाळला जाऊ शकतो. सोशल मीडियावर लोक समुद्रकिनाऱ्यावर त्यांची नवीन वाहनं पाण्यात नेताना दिसतात. अशा प्रकरणांमध्ये जर कारचं काही नुकसान झालं तर त्याला विमा संरक्षण मिळत नाही.

याव्यतिरिक्त, नीरज जैन म्हणतात, "जर कारसाठी विमा पॉलिसी घेताना तुम्ही कारचं आधीच नुकसान झालेलं आहे त्याची माहिती विमा कंपनीला दिली नाही आणि नंतर विम्यासाठी क्लेम केला, तर तो फेटाळला जातो."

"उदाहरणार्थ, जर कारचा बंपर आधीच तुटला असेल आणि तो बंपर बदलण्यासाठी तुम्ही क्लेम केला, तर तो मंजूर होत नाही."

नीरज जैन म्हणतात, "याशिवाय, अनेकवेळा लोक वेगवेगळ्या झालेल्या डेंटसाठी एकत्रच क्लेम करतात. अशावेळी देखील क्लेम फेटाळला जातो. याचा अर्थ कारचं जुनं नुकसान विम्याअंतर्गत कव्हर केलं जात नाही."

विमा पॉलिसी ऑनलाईन घ्यावी की ऑफलाईन?

भारतात आता तुम्ही तुमच्या मोबाइल फोनवर विमा पॉलिसी काही मिनिटांत विकत घेऊ शकता. मात्र त्या विमा पॉलिसीमधून कोणत्या गोष्टी वगळण्यात आलेल्या आहेत हे जाणून घेणं महत्त्वाचं असतं.

नीरज जैन म्हणतात, "आज भारतात दोन डझनहून अधिक जनरल इन्श्युरन्स कंपन्या आहेत. त्यामुळे विमा पॉलिसी घेण्यापूर्वी चार-पाच कंपन्यांचे पर्याय तपासा. त्या पॉलिसींमधील फायदे लक्षात घ्या आणि त्यातून काय वगळण्यात आलं हे समजून घ्या."

मिथून जाथल यांना वाटतं की "सध्या ऑनलाईन विमा सल्लागारांचा ट्रेंड आहे. मात्र विम्याचा क्लेम करताना मार्गदर्शन कोण करेल हा मुद्दा तुम्ही लक्षात घेतला पाहिजे. जेव्हा तुम्ही विमा पॉलिसीचे पर्याय पाहता, तेव्हा विम्याच्या हफ्त्याच्या रकमेऐवजी त्या पॉलिसीमधील तपशील लक्षात घ्या."

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)