आजपासून GST चे नवे दर लागू; काय स्वस्त, काय महाग? जाणून घ्या

फोटो स्रोत, Getty Images
देशभरात आजपासून (22 सप्टेंबर) जीएसटी कराचे नवे दर लागू झाले आहेत. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 3 सप्टेंबरला रात्री वस्तू आणि सेवा कर म्हणजे जीएसटीसंदर्भात अनेक मोठ्या घोषणा केल्या होत्या. आता त्या प्रत्यक्षात येणार आहेत.
जीएसटी कौन्सिलच्या 56 व्या बैठकीनंतर अर्थमंत्री सीतारामन यांनी काय काय बदल झाले हेही सांगितले होते.
जीएसटी कौन्सिलच्या बैठकीत दोन दरांच्या जीएसटी व्यवस्थेबाबत एकमत झाल्यानंतर हा निर्णय घेतल्याचंही सीतारमन यांनी सांगितलं होतं.
जीएसटीमधील 12 टक्के आणि 28 टक्के करांचा स्लॅब आता काढून टाकण्यात आलाय. यापुढे जीएसटी व्यवस्थेत 5 टक्के आणि 18 टक्के कर आकारण्यात येईल.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही रविवारी (21 सप्टेंबर) देशाला संबोधित करत 'नेक्स्ट जनरेशन जीएसटी रिफॉर्म्स'च्या घोषणेचा पुनरुच्चार केला. तसेच 22 सप्टेंबरपासून नेक्स्ट जनरेशन जीएसटी रिफॉर्म्स लागू होतील. एकप्रकारे देशात जीएसटी बचत उत्सव सुरू होतो आहे, असंही नमूद केलं होतं.
त्यांनी म्हटलं होतं, "या जीएसटी बचव उत्सवामुळे आपली बचत वाढेल आणि तुम्ही आपल्या पसंतीच्या गोष्टी अधिक सोयीस्करपणे खरेदी करु शकाल."
नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून लागू होणाऱ्या या बदलांमुळे बचत उत्सव सुरू होईल, असं म्हणत पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले, "देशातील गरीब, मध्यमवर्गीय, नव मध्यमवर्गीय, युवा, शेतकरी, महिला, दुकानदार, व्यापारी, उद्योजक सगळ्यांनाच या बचत उत्सवाचा खूप फायदा होईल."
या नव्या सुधारणांमुळे छोटे दुकानदान देखील उत्साहात आहेत, हे सांगताना ते म्हणाले, "आम्ही 'नागरिक देवो भव:' या मंत्रासोबत पुढे जात आहोत. नेक्स्ट जनरेशन जीएसटी रिफॉर्म्समध्ये याची स्पष्ट झलक दिसून येते."
'मेड इन इंडिया'चा नारा
पंतप्रधान मोदी म्हणाले, "रिफॉर्मस सतत सुरुच असतात. वेळेनुसार नवे बदल येत राहतात. म्हणून सध्याची गरज आणि भविष्यातील स्वप्न पाहता, जीएसटीचे हे नव्या सुधारणा लागू होत आहेत."
नव्या सुधारणांबाबत बोलताना ते म्हणाले, "आता फक्त पाच टक्के आणि अठरा टक्केच टॅक्स स्लॅब्सच राहतील. म्हणजे दररोजच्या वापरातील वस्तू आणखी स्वस्त होतील. खाद्यपदार्थ, औषधं, साबणं, विमा अशा अनेक गोष्टी आणि सेवा एकतर टॅक्स फ्री असतील वा त्यांच्यावर फक्त पाच टक्के टॅक्स द्यावा लागेल."

फोटो स्रोत, Facebook/Narendra Modi
"इनकम टॅक्समध्ये सूट आणि जीएसटीमधील सूट जोडली तर एका वर्षांत जे निर्णय झालेत, त्यामुळे देशातील लोकांची अडीच लाखांची बचत होईल. हा बचतीचा उत्सव म्हणूनच आहे", असंही त्यांनी म्हटलं आहे.
'तुम्ही तेच सामान खरेदी करा, जे मेड इन इंडिया असेल,' असंही त्यांनी आवाहन केलं. याबरोबरच त्यांनी देशातील लघु आणि कुटीरोद्योगांना चालना देण्याविषयीही भाष्य केलं.
ते म्हणाले, "विकसित भारतासाठी आत्मनिर्भरतेची वाट चालावीच लागेल. आत्मनिर्भर होण्यासाठी आपले लघू,मध्यम व कुटीरउद्योगांवरही भर द्यावा लागेल."
जीएसटी स्लॅब्समधील बदलांची अर्थमंत्र्यांनीही केली होती घोषणा
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 3 सप्टेंबर रोजी रात्री वस्तू आणि सेवा कर म्हणजे जीएसटीसंदर्भात अनेक मोठ्या घोषणा केल्या होत्या.
अर्थमंत्र्यांनी सांगितलं होतं की जीएसटीमधील 12 टक्के आणि 28 टक्के करांचा स्लॅब आता काढून टाकण्यात आला आहे.
यापुढे जीएसटी व्यवस्थेत 5 टक्के आणि 18 टक्के कर आकारण्याबद्दल एकमत झालं आहे.

फोटो स्रोत, Getty Images
जीएसटीच्या दरात कपात केल्यामुळे सरकारला जवळपास 93,000 कोटी रुपयांचा महसुली तोटा होणार आहे.
जीएसटी परिषदेनं दोन स्लॅबना मंजुरी दिली आहे. यापुढे जीएसटीचे 5 टक्के आणि 18 टक्के असे दोनच दर असणार आहेत.
याव्यतिरिक्त, 40 टक्के स्लॅबमधून सरकारला जवळपास 45,000 कोटी रुपयांचं अतिरिक्त उत्पन्न मिळण्याचा अंदाज आहे.
हा निर्णय सर्वसंमतीनं घेण्यात आला आहे. यासाठी मतदानाची आवश्यकता भासली नाही.
राज्यांना महसूलात होणारी तूट कशाप्रकारे भरून काढायची, यावर अद्याप निर्णय झालेला नाही.
पानमसाला, तंबाखूजन्य पदार्थांवरील GST वाढवला
जीएसटी कौन्सिलमध्ये असा निर्णय घेण्यात आला आहे की पान मसाला, गुटखा, सिगारेट, अनिर्मित तंबाखू, जर्दासारखी चघळली जाणारी तंबाखू यावर व्यवहार मूल्याऐवजी किरकोळ विक्री किंमतीवर(आरएसपी) जीएसटी कर आकारला जाईल.
तसंच राष्ट्रपती सचिवालयानं भारताच्या राष्ट्रपतींसाठी आयात केलेल्या नव्या चिलखती सेडान कारवर त्यावेळच्या आवश्यकतेनुसार आयजीएसटी आणि भरपाई उपकरावर सूट देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

काय-काय स्वस्त झालं?
दैनंदिन वापरातील स्वस्त झालेल्या वस्तू - जीएसटी 5 टक्के
- हेअल ऑईल, शॅम्पू, टूथपेस्ट, टॉयलेट शॉप बार, टूथब्रश, शेव्हिंग क्रीम, बटर, तूप, चीज, डेअरी स्प्रेड
- पॅकेज्ड नमकीन, भुजिया मिक्श्चर, भांडी, लहान बाळांची दूध प्यायची बाटली, नॅपकिन आणि डायपर
- शिलाई मशीन आणि त्याचे सुटे भाग

हेल्थकेअर सेक्टर
- आरोग्यविमा आणि आयुर्विमा (जीएसटी 18 टक्क्यांहून कमी होऊन शून्यावर)
- थर्मामीटर, मेडिकल ग्रेड ऑक्सिजन, डायग्नोन्स्टिक किट, ग्लूकोमीटर, टेस्ट स्ट्रिप्स (जीएसटी 5 टक्के)

- मेडिकल ग्रेड ऑक्सिजन (12 टक्क्यांवरून 5 टक्के)
- सर्व प्रकारचे डायग्नोन्स्टिक किट, रिएजन्ट (12 टक्क्यांवरून 5 टक्के)
- ग्लुकोमीटर, टेस्ट स्ट्रिप्स (12 टक्क्यांवरून 5 टक्के)
- करेक्टिव्ह स्पेक्टॅकल्स (12 टक्क्यांवरून 5 टक्के)

शिक्षणविषयक सामुग्री
- मॅप, चार्ट्स आणि ग्लोब्स (12 टक्क्यांवरून शून्य)
- पेन्सिल, शार्पनर, क्रेयॉन्स आणि पेस्टल (12 टक्क्यांवरून शून्य)
- कृती पुस्तकं आणि नोटबुक (12 टक्क्यांवरून शून्य)
- खोडरबर (5 टक्क्यांवरून शून्य)

कृषी क्षेत्र
- ट्रॅक्टरचे टायर आणि सुटे भाग (18 टक्क्यांवरून 5 टक्के)
- ट्रॅक्टर (12 टक्क्यांवरून 5 टक्के)
- स्पेसिफाईड बायो-पेस्टिसाईड्स, मायक्रो न्युट्रिएन्ट्स (12 टक्क्यांवरून 5 टक्के)
- ड्रिप सिंचन व्यवस्था आणि स्प्रिंकलर्स (12 टक्क्यांवरून 5 टक्के)
- कृषी, फलोत्पादन किंवा वनीकरणासाठी नांगरणी, पेरणी, कापणी आणि मळणीसाठीची यंत्रं (12 टक्क्यांवरून 5 टक्के)

ऑटोमोबाईल क्षेत्र
- पेट्रोल आणि पेट्रोल हायब्रीड, एपीजी, सीएनजी कार (1200 सीसी आणि 4000 एमएमच्या आतील) (28 टक्क्यांवरून 18 टक्के)
- डिझेल आणि डिझेल हायब्रीड कार (1500 सीसी आणि 4000 एमएमच्या आतील) (28 टक्क्यांवरून 18 टक्के)
- तीनचाकी वाहनं (28 टक्क्यांवरून 18 टक्के)
- मोटरसायकल (350 सीसी आणि त्याखालील) (28 टक्क्यांवरून 18 टक्के)
- मालाची वाहतूक करण्यासाठीची वाहनं (28 टक्क्यांवरून 18 टक्के)

इलेक्ट्रॉनिक्स उपकरणं
- एअर कंडिशनर (28 टक्क्यांवरून 18 टक्के)
- टीव्ही (32 इंचापेक्षा अधिक) (एलईडी आणि एलसीडी टीव्हीसह) (28 टक्क्यांवरून 18 टक्के)
- मॉनिटर्स आणि प्रोजेक्टर्स (28 टक्क्यांवरून 18 टक्के)
- डिश वॉशिंग मशीन (28 टक्क्यांवरून 18 टक्के)

दोन दरांच्या GST व्यवस्थेवर सहमती झाल्यानंतर पंतप्रधान मोदी काय म्हणाले?
जीएसटीमुळे सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, एमएसएमई, मध्यमवर्गीय, महिला आणि तरुणांना फायदा होईल, असं GST कौन्सिलच्या बैठकीत दोन-दरांच्या जीएसटी (वस्तू आणि सेवा कर) व्यवस्थेवर एकमत झाल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे, "जीएसटी सुधारणांचा उद्देश हा सर्वसामान्यांचं जीवन सुकर करणे आणि अर्थव्यवस्था बळकट करणे हा आहे. GST कौन्सिलनं जीएसटी दरकपात आणि सुधारणांशी संबंधित प्रस्तावांना सहमती दर्शविली आहे, ज्याचा फायदा सामान्य माणूस, शेतकरी, एमएसएमई, मध्यमवर्ग, महिला आणि तरुणांना होईल."

फोटो स्रोत, Getty Images
"या व्यापक सुधारणांमुळे आपल्या नागरिकांचं जीवन सुधारेल आणि सर्वांसाठी, विशेषतः लहान व्यापारी आणि व्यवसायांसाठी व्यवसाय करणं सोपं होईल", असंही पुढे ते म्हणाले आहेत.
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बुधवारी रात्री जीएसटीसंदर्भात अनेक मोठ्या घोषणा केल्या. त्या म्हणाले की, जीएसटी कौन्सिलच्या बैठकीत दोन दरांच्या जीएसटी प्रणालीवर एकमत झालं आहे.
अर्थमंत्र्यांनी सांगितलं की, 12 टक्के आणि 28 टक्के दरांचे स्लॅब रद्द करण्यात आले आहेत. 5 टक्के आणि 18 टक्के या दोन नव्या दरांवर एकमत झालं आहे
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरुमचे प्रकाशन)











