Bowel Cancer : तरुण रुग्णांमध्ये का आढळत आहे आतड्यांसंबंधी कर्करोगाचे अधिक प्रमाण?

    • Author, मायकल रॉबर्ट्स
    • Role, डिजिटल हेल्थ एडिटर, बीबीसी न्यूज

तरुणांमध्ये आतड्याच्या कर्करोगाचं (Bowel-cancer) प्रमाण वाढत असल्याचं तज्ज्ञ सांगतायत. मात्र त्यामागचं नेमकं कारण अजूून स्पष्ट झालेलं नाही.

अजूनही हा आजार बहुतांश प्रमाणात वृद्ध लोकांमध्ये दिसून येतो. असं असलं तरी अनेक देशांत पन्नाशीमध्येच आतड्याचा कर्करोग झालेल्या रुग्णांची वाढ काळजीत टाकणारी आहे, असं ब्रिटनमधल्या एका संशोधनात समोर आलंय.

यात सगळ्यात जास्त वाढ होत असणाऱ्या देशांमध्ये इंग्लंडचंही नाव येतं. लॅन्सेन्ट ऑन्कोलॉजी या नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या या संशोधनात दरवर्षी साधारणपणे 3.6 टक्के रुग्ण वाढताना दिसत असल्याचं सांगण्यात आलंय.

वजनवाढ आणि सत्वहीन अन्न हे या मागचे घातक घटक असू शकतात, असं संशोधक म्हणत आहेत.

शिवाय, प्रोसेस्ड फूड (प्रक्रिया केलेलं अन्न) जास्त प्रमाणात खाणं आणि पुरेशा प्रमाणात तंतुमय पदार्थ न खाणं यानंही हा धोका वाढतोय.

जागतिक समस्या

अमेरिकन कॅन्सर सोसायटी या संस्थेकडून 2007 ते 2017 या काळात 50 देशांमध्ये हा अभ्यास करण्यात आला. त्यापैकी 27 देशांत तरूणांमध्ये आतड्याचा कर्करोग वाढत असल्याचं दिसलं.

त्यातले बहुतेक देश हे श्रीमंत होते. पण काही विकसनशील देशातही ही समस्या दिसून येते.

आतड्याच्या कर्करोगाला कोलोरेक्टल कर्करोगही म्हणतात. "कोलोरेक्टल कर्करोगात अपेक्षेपेक्षा कमी वयात वाढ होणं ही जागतिक समस्या आहे," असं संशोधकांपैकी एक डॉ. ह्युना संग म्हणाले.

"आधीच्या काही अभ्यासात ही वाढ फक्त श्रीमंत पाश्चिमात्य देशांत दिसत होती. मात्र आता जगभरातल्या अनेक वेगवेगळ्या अर्थव्यवस्थांमध्ये आणि भागांतही हे दिसून येत आहे," असं ते पुढे म्हणाले.

यामुळेच कर्करोगाच्या काही लक्षणांबद्दल लोकांनी जागरूक राहण्याची गरज आहे.

विष्ठेत रक्त दिसणे, विष्ठेच्या सवयीत सतत बदल होत राहणे, सतत पातळ अतिसार होणे, ओटीपोटात वेदना, अस्वस्थता जाणवणे किंवा तो भाग सतत फुगलेला आहे असं वाटणे, अशी या आजाराची काही सुरुवातीची लक्षणं असतात.

मात्र, आतड्याच्या कर्करोगाचं प्रमाण प्रौढ तरुणांमध्ये कमीच असल्याचं कॅन्सर रिसर्च युके या संस्थेनं अधोरेखित केलंय. इंग्लंडमध्ये 20 पैकी 1 रुग्णांमध्येच पन्नाशीच्या आत या कर्करोगाचं निदान होतं.

इंग्लंडमध्ये दरवर्षी सापडणाऱ्या 44,100 नवीन रुग्णांपैकी 2600 रुग्ण 25 ते 49 या वयोगटातले असतात.

"अपेक्षेपेक्षा कमी वयात आतड्याच्या कर्करोग होण्याचं प्रमाण इंग्लंडमध्ये स्त्री आणि पुरूष दोघांच्यातही कमी दिसून येतं. त्यामुळे अशी एकाच गटात वाढ होण्यामागचं नेमकं कारण काय ते सांगता येणं अवघड आहे," असं जॉन शेल्टन म्हणाले.

पण आहार, वजनवाढ आणि मद्यपान, धुम्रपान या घटकांची त्यात महत्त्वाची भूमिका असू शकते.

"आजाराचं निदान करण्याच्या नवनवीन पद्धती आणि उपकरणं आल्यामुळे आता कर्करोगाचं निदान लवकर होतं. त्यामुळं अपेक्षेपेक्षा कमी वयात आतड्याचा कर्करोग होण्याच्या दरात वाढ झाल्यासारखं वाटत असेल," असं शेल्टन पुढं म्हणाले.

यावर आणखी संशोधन करण्याची गरज असल्याचं डॉ. रॉबर्ट ग्रिम्स म्हणाले. आयर्लंडची राजधानी डबलिनमधल्या ट्रिनिटी कॉलेजमध्ये ते जीवसांख्यिकी तज्ज्ञ आहेत.

"हा शोध महत्त्वाचा आहे. पण अशा गोंधळात टाकणाऱ्या आणि परस्परविरोधी माहितीवरून कोणतंही अनुमान काढणं बरोबर नाही," असं ते म्हणाले.

"फक्त एकाच गोष्टीवर लक्ष दिलं तर या अभ्यासाचं शीर्षकही काळजीत टाकणारं वाटतं. पण तपासणी आणि निदान करण्याच्या पद्धतींत सुधारणा झाल्यामुळे कर्करोग लवकर लक्षात येतोय असंही असू शकतं."

आतड्याच्या कर्करोगाच्या रुग्ण असलेल्या 40 वर्षांच्या डेम डेबोराह जेम्स यांनी मरणाआधी सोशल मीडियावर त्यांचे अनुभव शेअर केले होते.

विष्ठेकडे कसं पहायचं हे त्यांनी सांगितलं होतं. काही वेगळं आढळल्यास लगेचच डॉक्टरांकडे जाण्याचा आणि तपासणी करून घेण्याचा सल्लाही त्यांनी दिला होता.

बॉवल बेब म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या डेम यांना दोन मुलंही आहेत. त्यांनी बीबीसी साऊंड्ससाठी यू, मी अँड द बीग सी हा पॉकास्ट आणि आजारासोबत जगतानाचे अनुभव शेअर करणारा एक माहितीपटही केला होता.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.