लॉर्ड आयर्विनला मारण्यासाठी बॉम्ब तयार करणाऱ्या हंसराज 'वायरलेस'ची गोष्ट

रेल्वे गाडी

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, 23 डिसेंबर 1929 च्या सकाळी दिल्लीपासून साधारण 6 मैल आधी एका विशेष रेल्वेवर बॉम्बहल्ला झाला.
    • Author, वकार मुस्तफा
    • Role, पत्रकार आणि संशोधक

23 डिसेंबर 1929 ची ती सकाळ. हिवाळ्यातील दिवसांप्रमाणेच त्या दिवशीही सगळीकडे दाट धुकं पसरलं होतं. दिल्लीपासून साधारण 6 मैल अंतरावर एका विशेष रेल्वेवर बॉम्बहल्ला झाला. त्या रेल्वेत होते ब्रिटिश भारताचे व्हाइसरॉय लॉर्ड आयर्विन आणि त्यांच्या पत्नी.

दुसऱ्या दिवशी 'द स्टेट्समन' या वृत्तपत्रानं याची बातमी दिली. त्यात लिहिलं होतं की, दक्षिण भारतातून येत असलेल्या आयर्विन यांचा खास सलून (विशेष बोगी) थोडक्यात बचावला होता.

काही खास रेल्वेंमध्ये शाही कुटुंबातील सदस्य किंवा खास व्यक्तींसाठी एखाद्या हॉटेलसारखी व्यवस्था असते. त्याला अगदी चालतं फिरतं घरं म्हणता येईल. त्याता 'सलून' म्हटलं जातं.

त्यावेळी स्फोटाचा मोठा आवाज आला होता. आयर्विन यांना हा आवाज रेल्वेमध्ये धुक्याच्यावेळी दिल्या जाणाऱ्या 'फॉग सिग्नल'चा वाटला. तर रेल्वेतील सामान्य प्रवाशांना तो आयर्विन यांच्या स्वागतासाठी डागलेल्या तोफेच्या गोळ्यांचा आवाज वाटला.

अमेरिकेच्या 'द न्यूयॉर्क टाईम्स'ने या धुक्याचं वर्णन 'ईश्वरी व्यवस्था' असं केलं. कारण हेच धुकं आयर्विन दाम्पत्याचं बचावाचं कारण बनलं.

'द स्टेट्समन'ने लिहिलं होतं की, पायलट इंजिन हजरत निजामुद्दीन स्थानकातून सुरक्षितपणे पुढे निघून गेलं होतं.

"13 डब्यांच्या या विशेष रेल्वेमध्ये तिसरा डबा डायनिंग कार होता. स्फोटाचा सर्वाधिक फटका तिसऱ्या आणि चौथ्या डब्यांना बसला. आयर्विन यांचा खास 'सलून' याच्या दोन डबे मागे होता.

सकाळच्या दाट धुक्यात हल्लेखोरांना तो खास 'सलून' दिसलाच नाही. त्यावेळी डब्यात व्हाइसरॉय आणि लेडी आयर्विन नव्या व्हाइसरॉय लॉजबद्दल चर्चा करत होते. ते लवकरच तिथं राहायला जाणार होते. "

'टाइम्स'ने आपल्या वृत्तात लिहिलं होतं की, दाट धुक्यामुळं व्हाइसरॉय यांची रेल्वे हळू चालली होती. त्यामुळं 30 फूट उंचींच्या भिंतीवरून खाली कोसळून पूर्णपणे उद्ध्वस्त होण्यापासून ही रेल्वे थोडक्यात वाचली होती.

"रुळांमध्ये तयार झालेल्या दोन फूटांच्या फटीवरून डबे एकामागून एक पुढे गेले. त्याखालील लाकडी स्लीपर आगपेटीच्या काड्यांसारखे तुटून विखुरले गेले."

'द स्टेट्समन'ने लिहिलं की, या दाट धुक्यामुळेच ट्रॅकवर बॉम्ब ठेवणाऱ्या लोकांना नेमका अंदाज आला नव्हता. त्यांनी बॉम्ब जमिनीखालच्या तारेद्वारे 200 यार्ड दूर असलेल्या बॅटरीशी जोडला होता.

'टाईम्स'च्या मते, ही कारवाई अत्यंत सावधपणे वैज्ञानिक कौशल्य असलेल्या लोकांनीच आखली होती, असं पोलिसांना वाटत होतं.

'सरकारला संशय येईल'

डॉ. दार मोहम्मद पठाण म्हणतात, 1922 च्या सुरुवातीला जेव्हा महात्मा गांधींनी 'असहकार आंदोलन' अचानक थांबवलं, तेव्हा काँग्रेसमध्ये एका क्रांतिकारक गटाचा उदय झाला, त्याचं नाव होतं 'हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशन'.

1928 मध्ये या नावापुढं 'सोशलिस्ट' हा शब्द जोडण्यात आला. त्यानंतर त्याला एचएसआरए म्हणून ओळखलं जाऊ लागलं.

या संघटनेचं घोषणापत्र 'द फिलॉसॉफी ऑफ बॉम्ब' हे भगवती चरण वोहरा यांनी लिहिलं होतं. तर चंद्रशेखर आझाद, भगतसिंग, सुखदेव, बिस्मिल, अशफाक उल्ला खान आणि इतर महत्त्वाचे प्रमुख क्रांतिकारक या संघटनेशी संबंधित होते.

एका सायंकाळी भगवती म्हणाले की, आमचे सहकारी कारागृहात आहेत, अनेक योजना अयशस्वी ठरल्या आहेत आणि न्यायव्यवस्थेच्या नावाखाली अत्याचार सुरू आहेत.

त्यामुळे एक असं पाऊल उचलणं गरजेचं आहे, जे ब्रिटिशांना ते आगीशी खेळत आहेत याची जाणीव करून देईल.

अभिजीत भालेराव यांनी त्यांच्या 'द मॅन हू अव्हेंजड भगतसिंग' या पुस्तकात याबाबत सविस्तर लिहिलं आहे.

ब्रिटिश भारताचे व्हाइसरॉय लॉर्ड आयर्विन

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, ब्रिटिश भारताचे व्हाइसरॉय लॉर्ड आयर्विन.
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

यशपाल यांनी 'पुढे काय करावं?' असं विचारलं. भगवती म्हणाले, 'सापाचं डोकं कापायचं.' म्हणजेच, व्हाइसरॉय लॉर्ड आयर्विनची हत्या करायची, असं आझाद यांनी स्पष्ट केलं.

त्यावेळी हंसराज उर्फ 'वायरलेस' यांना बोलावण्यात आलं. लांब अंतरावरून फोडता येणारा बॉम्ब बनवू शकत असल्याचं त्यांचं म्हणणं होतं.

यशपाल यांचं आत्मचरित्र 'यशपाल लूक्स बॅक' नुसार, धर्मपाल यांनी यशपाल यांना त्यांचा बालपणीचा मित्र आणि इलेक्ट्रिशियन हंसराज 'वायरलेस'ची मदत घेण्याचा सल्ला दिला.

"हंसराज मदतीसाठी तयार होतेच, शिवाय त्यांनी असा दावा केला की, ते एक असं छोटं उपकरण तयार करू शकतात, जे बॉम्बच्या आत बसवलं जाईल. तर दुसरं एक छोटं उपकरण बॉम्बपासून दूर असेल आणि संपूर्ण यंत्रणा त्याच्या माध्यमातून नियंत्रित केली जाईल. पण बॉम्ब आणि ते उपकरण जोडलेलं नसेल."

"परंतु, नंतर हंसराज यांनी विचार बदलला. अशाप्रकारचं उपकरण फक्त तेच बनवू शकतात, हे सरकारला माहीती होतं. त्यामुळं सरकारला त्यांच्यावर संशय येईल असं त्यांना वाटत होतं. पण हंसराज उत्साही आणि आशावादी होते आणि विजेच्या माध्यमातून ते अद्भुत काम करू शकत होते."

'हंसराज वायरलेस'

हंसराज 'वायरलेस' हे दक्षिण पंजाबमधील लैया या शहरातून मध्य पंजाबमधील ल्यालपूर (आताचे फैसलाबाद) येथे गेले. त्यानंतर शिक्षणासाठी ते पंजाबची राजधानी लाहोर येथे गेले.

हंसराज यांचे शाळेतील वर्गमित्र मेहर अब्दुल हक यांनी त्यांचं पुस्तक 'जो हम पे गुजरी' मध्ये लिहिलं आहे की, सहाव्या इयत्तेत असताना हंसराज यांनी अशी एक टॉर्च बनवली होती, ज्याच्या प्रकाशामुळे लोक बघता बघता झोपून जात असत.

ते पुढे लिहितात की, "त्या काळात वायरलेसचा शोध अजून प्रचलित झाला नव्हता. पंचम जॉर्ज आणि भारताचे व्हाइसरॉय यांच्यात महत्त्वाची चर्चा सुरू होती. माझ्या या मित्राने आपल्या वायरलेस शोधाच्या मदतीने ती चर्चा हवेतूनच परस्पर समजून घेतली आणि दुसऱ्या दिवशी ते वर्तमानपत्रांत प्रसिद्ध झाले."

"त्या दिवसापासून 'वायरलेस' हा शब्द त्यांच्या नावाचा भाग झाला आणि ते 'हंसराज वायरलेस' म्हणून प्रसिद्ध झाले. माझा हा मित्र परीक्षा पास झाल्यानंतर आई-वडीलांबरोबर लायलपूरला गेला. तीन वर्षांनंतर तो पुन्हा एकदा लैया येथे आला. तिथे त्याने आपले काही शोध दाखवले आणि नंतर तो निघून गेला."

आयशा सईद यांनी 2016 मध्ये ऐतिहासिक विषयांवरील एका वेबसाइटसाठी मिर्झा नसीम चंगेझी यांची मुलाखत घेतली होती. मिर्झा नसीम चंगेझी हे भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढणारे क्रांतिकारक होते.

त्या वेळी ते 106 वर्षांचे होते आणि जुनी दिल्ली येथे राहत होते. चंगेझींनी सांगितलं की, त्यांनी आपले सहकारी सलाहुद्दीन आणि हंसराज 'वायरलेस' यांच्यासोबत मिळून लॉर्ड आयर्विनच्या रेल्वेखाली बॉम्बस्फोट केला होता.

"आम्ही हार्डिंग ब्रिजजवळ रेल्वे रुळांवर बॉम्ब लावला आणि जंगलात लपून बसलो. त्या काळात प्रगती मैदान हे जंगलच होतं. लॉर्ड आयर्विनची रेल्वे तिथून जाताच बॉम्बचा स्फोट झाला. नंतर आम्हाला कळलं की, या हल्ल्यातून ते वाचले होते."

मात्र, कमलेश मोहन यांनी त्यांच्या 'मिलिटंट नॅशनलिझम इन द पंजाब' या पुस्तकात लिहिलं आहे की, इंद्रपाल आणि भागराम हे यशपालसोबत जुना किल्ला परिसरात गेले होते. 22 आणि 23 डिसेंबर 1929 च्या मध्यरात्री त्यांनी तिथे बॉम्ब आणि वायर्स पेरले.

"दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर यशपाल आणि भागराम घटनास्थळी पोहोचले. मात्र दाट धुक्यामुळे व्हाइसरॉयची बोगी येण्याची योग्य वेळ साधता आली नाही. तरीही रेल्वे जात असताना एक स्फोट झाला."

यशपाल सांगतात की, "रेल्वे एका ठराविक ठिकाणी पोहोचताच इंजिनच्या अगदी समोर बॉम्बचा स्फोट होईल, अशी आमची योजना होती. स्फोटामुळे इंजिन रुळांवरून घसरून उलटेल. दाट धुक्यामुळे मला फक्त आवाजावरूनच बॅटरीचा स्विच नेमका कधी दाबायचा याचा अंदाज घ्यायचा होता."

"मी श्वास रोखून धरला होता. सगळे लक्ष कानांकडे केंद्रित केलं होतं. हात स्विचवर ठेवले होते आणि फक्त आवाजावरून रेल्वे कुठं आहे याचा अंदाज घेत होतो. मग मी स्विच दाबला. क्षणात एक भयंकर स्फोट झाला. पण अपेक्षेप्रमाणे रेल्वे थांबली नाही, ती वेगाने नवी दिल्लीच्या दिशेने निघून गेली."

हंसराज वायरलेस यांचे सहकारी मिर्झा नसीम चंगेझी

फोटो स्रोत, makeheritagefun

फोटो कॅप्शन, हंसराज वायरलेस यांचे सहकारी मिर्झा नसीम चंगेझी

मोहन यांनी लिहिलं आहे की, लष्करी गणवेशामुळे यशपाल पोलिसांच्या तावडीतून वाचले. भागराम ऑर्डरली म्हणून त्यांच्यासोबतच होते.

यशपाल म्हणतात की, "इंद्रपाल, हंसराज आणि भागराम चार वाजेच्या रेल्वेने लाहोरला परततील, लेखराम रोहतकला जाईल आणि भगवती गाझियाबाद स्थानकावर माझी वाट पाहतील, असं ठरलं होतं.

"भगवती वर्तमानपत्र वाचत होते. त्यांनी डोळ्यांनीच, 'काय झालं?', असं विचारलं. मी हाताने इशारा करत, 'काही झालं नाही', असं म्हटलं. भगवतीभाईंना हंसराजची बॅटरीच खराब असावी असा संशय आला.

"स्फोट खूप जोरदार होता. पण यात रेल्वेचं काही नुकसान झालं, असं वाटत नाही," हे मी त्यांना सांगितलं.

"भगवती भाई आणि मी पॅसेंजर रेल्वेने मुरादाबादकडे निघालो. भगवती यांनी साधा सूट घातला होता आणि मी लष्करी गणवेश बदलून साधे कपडे घातले होते.

आम्ही दोघंही रेल्वेमध्ये शांतपणे आणि उदास बसलो होतो. रेल्वे मुरादाबादला पोहोचली, तेव्हा आम्हाला एका वृत्तपत्र विक्रेत्याचा आवाज ऐकू आला, "ताजी बातमी! व्हाइसरॉयच्या रेल्वेखाली बॉम्बस्फोट! रेल्वे रुळ उडाले! एक डबा उद्ध्वस्त! एका माणसाचा मृत्यू!"

डॉ. पठाणांच्या मते, नंतर एचएसआरएचा लाहोर गट वेगळा झाला आणि हंसराज 'वायरलेस' यांच्या नेतृत्वाखाली 'आतिशी चक्र' नावाने स्थापन झाला. या संघटनेने जून 1930 मध्ये संपूर्ण पंजाबमध्ये बॉम्बस्फोट घडवून आणले.

इरफान हबीब त्यांच्या 'टू मेक द डेफ हिअर: आयडॉलॉजी अँड प्रोग्राम ऑफ भगतसिंग' पुस्तकात लिहितात की, हंसराज 'वायरलेस' आणि इंद्रपाल यांनी 'एचएसआरए'शी जोडलं जाऊ नये म्हणून पंजाबमध्ये 'आतिशी चक्र' नावाची संघटना तयार केली. हंसराज यांनी अनेक ठिकाणी एकाच वेळी बॉम्बस्फोट करण्याची योजना देखील आखली.

'माझ्या कामाची कोणालाही माहिती नव्हती'

पाकिस्तानच्या निर्मितीनंतर 'वायरलेस'शी संबंधित कथा जांबाज मिर्झा यांनी संपादित केलेल्या 'मजलिस-ए-अहरार'चे मासिक 'तबसरा'मध्ये 1960च्या दशकात काही भागांमध्ये प्रकाशित होऊ लागली.

'वायरलेस' लिहितात की, लॉर्ड आयर्विनच्या विशेष रेल्वेवर बॉम्बचा हल्ला झाला होता. पंजाबमधील 7 शहरांमध्ये एकाच वेळी बॉम्बस्फोट झाले होते. पंजाबमधील अनेक शहरांमध्ये क्रांतिकारकांची अनेक केंद्रं तयार झाली होती, पण या सर्व घटनांमागे नक्की कोण आहे, याची ब्रिटिश सरकारला अजिबात कल्पना नव्हती.

'वायरलेस' पुढे लिहितात की, त्यांचा एक सहकारी अमरीक सिंग लाहोरमधील सय्यद मिठा बाजारातील एका दुकानात स्फोटकांची सुटकेस ठेवत होते. त्यावेळी लस्सी पीत असताना, आगीमुळे त्यांचा स्फोट झाला.

ते स्वतः यात जखमी झाले, त्याच अवस्थेत ते लाहोरमधील ग्वालमंडी येथील आपल्या केंद्रावर गेले. पोलीस त्यांच्या मागोमाग तिथे पोहोचले आणि सर्व साहित्य ताब्यात घेतले.

"मी तिथून निघून गेलो होतो, पण दुर्दैवाने एका सुटकेसमध्ये माझ्या कोटाच्या खिशात एक डायरी राहिली होती, त्यावर माझं नाव लिहिलं होतं. पंजाबमधील बॉम्बहल्ल्यांची सगळी फाइलही तिथे होती. त्याशिवाय व्हाइसरॉयच्या रेल्वेसाठी वापरलेली बॅटरीही तिथेच होती."

यशपाल यांचं आत्मचरित्र 'यशपाल लुक्स बॅक'

फोटो स्रोत, Waqar Mustafa

फोटो कॅप्शन, यशपाल यांचं आत्मचरित्र 'यशपाल लुक्स बॅक' नुसार, धर्मपाल यांनी यशपाल यांना त्यांचा बालपणीचा मित्र आणि इलेक्ट्रिशियन हंसराज 'वायरलेस'ची मदत घेण्याचा सल्ला दिला.

याबद्दल मेहर अब्दुल हक यांनी लिहिलं की, "एकदा उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये मी बहावलपूरहून येत होतो. मला शेरशाह रेल्वे स्थानकावर रेल्वे बदलावी लागत असे. त्यावेळी माझी नजर एका जाहिरातीवर गेली, त्यावर माझ्या वर्गमित्राचा फोटो छापलेला होता."

ही जाहिरात सरकारकडून होती आणि त्यावर लिहिलं होतं, "जो कोणी हंसराज वायरलेसला जिवंत किंवा मृत पकडेल, त्याला दहा हजार रुपयांचं बक्षीस दिलं जाईल."

'वायरलेस' स्वतः लिहितात की, त्यांनी एका मित्राच्या मदतीने घरच्यांकडून 100 रुपये मागवले. "माझ्या कुटुंबाला पोलिसांकडून किती त्रास सहन करावा लागत आहे, हे मित्रानं मला सांगितलं. मी लगेच स्टेशनच्या दिशेने निघालो.

माझी दाढी वाढली होती, मी खूप जुने आणि फाटलेले कपडे घालून प्लॅटफॉर्मच्या एका कोपऱ्यात बसलो होतो. एक-दोन वेळा काही पोलीस माझ्या जवळ येऊन बसले आणि माझ्याबद्दलच बोलू लागले. त्यांच्या चर्चेतून मला खूप उपयुक्त माहिती मिळाली."

लाहोरहून मुलतान आणि तिथून ते सिंधमध्ये कसे गेले हे 'वायरलेस' यांनी आत्मचरित्रात सांगितलं आहे.

हंसराज 'वायरलेस' सिंधमध्ये

डॉ. दार मोहम्मद पठाण लिहितात की, चंद्रशेखर आझाद यांनी अल्फ्रेड पार्कमध्ये पोलिसांच्या चकमकीदरम्यान आत्महत्या केली. तर भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरु यांना मार्च 1931 मध्ये फाशी देण्यात आली.

आझाद यांच्या मृत्यूनंतर कोणतंही केंद्रीय नेतृत्व राहिलं नाही. संघटना प्रादेशिक गटांमध्ये विभागली गेली आणि कोणत्याही केंद्रीय समन्वयाशिवाय कारवाया होऊ लागल्या.

अशा परिस्थितीत हंसराज 'वायरलेस' यांनी सिंधला स्वतःसाठी सुरक्षित ठिकाण तयार केलं. त्या काळी सिंधमध्ये हिंदू आणि मुस्लीम दोन्ही क्रांतिकारक सक्रिय होते. 'हुर तहरीक' चळवळ जोरात सुरू होती आणि सुभाषचंद्र बोस यांच्या भेटीमुळे हिंदू तरुणांमध्ये उत्साह संचारला होता.

हंसराज यांनी प्रामुख्याने हिंदू तरुणांना प्रशिक्षण दिलं, पण त्यांना सिंधमध्ये पकडण्यात आलं.

त्यांच्या आत्मकथेत सिंधमधील तुरुंगवास आणि छळाच्या अनुभवाची कहाणी आहे. त्यांच्या क्रांतिकारक कामांवर सिंधी भाषेत बरंचसं साहित्य उपलब्ध आहे. त्यांनी हिंसाचार न करण्याचं आश्वासन दिल्यानंतर तुरुंगातून सोडण्यावर सिंध विधानसभेत अनेकदा औपचारिक चर्चा झाली होती.

काही वर्षांनंतर ते एक 'शो-मन' म्हणून उदयास आले आणि पैसे घेऊन आपले शोध दाखवू लागले. रेडिओ उपकरणं, रिमोट कंट्रोलने चालणाऱ्या मशीन्स, ऑटोमॅटिक बूट पॉलिश करणारी मशीन, हाताच्या इशाऱ्याने चालणारा बल्ब आणि व्हाइस रेकॉर्डिंग उपकरण (जेव्हा मॅग्नेटिक टेप सामान्य नव्हती). 1944-45 मध्ये लाहोरमधील त्यांच्या शोने खूप प्रभाव टाकला.

पाकिस्तानच्या निर्मितीनंतर 'वायरलेस' जालंधरमध्ये गेले. इतिहासाच्या पुस्तकांतून भारताचे पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या 16 जानेवारी 1948 रोजी लिहिलेल्या एका पत्राची माहिती मिळते.

'द स्टेट्समॅन' वृत्तपत्रातील बातमी

फोटो स्रोत, Waqar Mustafa

फोटो कॅप्शन, 'द स्टेट्समन'ने लिहिलं होतं की, पायलट इंजिन हजरत निजामुद्दीन स्थानकातून सुरक्षितपणे पुढे निघून गेलं होतं.

या पत्रात नेहरूंनी लिहिलं होतं की, हंसराज यांच्यात प्रतिभा आणि नवनिर्मिती करण्याची क्षमता आहे. जनहितासाठी त्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे.

"सरकारने जर रिकामे वर्कशॉप सरकारी पद्धतीने चालवले आणि हंसराज यांना तज्ज्ञ म्हणून त्यात सहभागी केल्यास, फायदा होऊ शकतो. अपयश झाल्यास नुकसान कमी होईल, यश मिळाल्यास रोजगार आणि इतर संधी निर्माण होतील."

स्वातंत्र्यानंतर त्यांनी पंजाब आणि उत्तर भारतातील जत्रांमध्ये आपले शो सुरू ठेवले. 1950च्या दशकात त्यांनी दूरवर बसून गाडीचं इंजिन बंद करता येईल असं उपकरण तयार केलं होतं.

डी. एस. चीमा भारतातील वृत्तपत्र 'द ट्रिब्यून'मध्ये लिहितात की, 'वायरलेस' आपल्या सायकलवर वेगवेगळ्या पिशव्या लादून शाळांमध्ये वैज्ञानिक प्रयोग दाखवत आणि त्यातून उदरनिर्वाह करत.

"1958 मध्ये, जेव्हा मी दहावीत होतो, तेव्हा आम्हाला जवळच्या कॉलेजच्या ऑडिटोरियममध्ये त्यांच्या कार्यक्रमाबद्दल सांगितलं गेलं. तीन शाळांमधील नववी आणि दहावीतील विद्यार्थी तिथे उपस्थित होते. एक लहानशा हसऱ्या माणसाने आम्हाला हात हलवत अभिवादन केलं. काही मिनिटांत त्यांनी एक साधी- सोपी व्यवस्था तयार केली."

"एका मळकट चादरीने त्यांनी तात्पुरती खोली तयार करून दाखवली, जिथे आत-बाहेर केल्यास बल्ब चालू-बंद होत होता. नंतर गंजलेल्या नळाखाली हात धरल्यावर पाणी आपोआप यायचं आणि हात काढल्यावर ते थांबायचं. हे सगळं आमच्यासाठी खूपच आश्चर्यकारक होतं."

"त्यांच्या ऑटोमॅटिक बूट पॉलिश मशीनची सर्वाधिक प्रशंसा झाली. एका विद्यार्थ्याने बूट लाकडाच्या पेटीत ठेवले, मोटार सुरु झाली, आणि जेव्हा ती थांबली तेव्हा बूट पूर्णपणे पॉलिश झाले होते."

हंसराज 'वायरलेस' आपल्या काळापेक्षा खूप पुढचे होते, असं डी.एस.चीमा म्हणतात.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.