You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
एकाच माफिया फॅमिलीतील 39 जणांना शिक्षा, 11 जणांना मृत्यूदंड; 'हे' आहे कारण
- Author, जोनाथन हेड आणि टेसा वोंग
- Role, दक्षिण पूर्व आशिया प्रतिनिधी आणि आशिया डिजिटल रिपोर्टर
चीनच्या न्यायालयाने एक खळबळजनक निकाल दिला आहे.
म्यानमारमध्ये अवैध व्यवसाय आणि आर्थिक घोटाळ्याचे रॅकेट चालवणाऱ्या एका कुख्यात गुन्हेगार टोळीतील (मिंग माफिया फॅमिली) तब्बल 11 जणांना मृत्युदंडाची शिक्षा सुनावली आहे. ही माहिती चीनच्या सरकारी प्रसारमाध्यमांनी दिली आहे.
मिंग टोळीतील अनेक सदस्य गुन्हेगारी प्रकरणांमध्ये दोषी ठरले असून, त्यांना दीर्घकालीन तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
मिंग टोळी म्यानमार-चीन सीमेवर असलेल्या लाऊक्काईंग या छोट्या शहरात दबदबा असलेल्या चार टोळ्यांपैकी एका टोळीसाठी काम करत होती. या टोळीनं शहराला जुगार, अंमली पदार्थ आणि घोटाळ्यांचा अड्डा बनवला होता.
अखेर म्यानमारने 2023 मध्ये या टोळीतील अनेक सदस्यांना अटक केली आणि त्यांना चिनी अधिकाऱ्यांच्या ताब्यात दिलं होतं.
चीनच्या सीमेवर जुगार अड्डे, अंमली पदार्थांची तस्करी
सरकारी वाहिनी सीसीटीव्हीच्या वृत्तानुसार, सोमवारी चीनच्या पूर्वेकडील वेन्झोऊ शहरात मिंग टोळीतील एकूण 39 जणांना शिक्षा सुनावण्यात आली.
मृत्युदंड मिळालेल्या 11 सदस्यांव्यतिरिक्त, पाच जणांना दोन वर्षांच्या निलंबनासह मृत्युदंडाची शिक्षा झाली आहे. 11 जणांना जन्मठेपेची शिक्षा आणि उर्वरित सदस्यांना 5 ते 24 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
मिंग टोळी आणि इतर गुन्हेगारी टोळ्या 2015 पासून टेलिकॉम फसवणूक, बेकायदेशीर जुगारअड्डे, कॅसिनो, अंमली पदार्थांची तस्करी आणि वेश्याव्यवसायासारख्या गुन्हेगारीत गुंतल्याचे न्यायालयाला आढळून आलं.
न्यायालयानुसार, मिंग टोळीनं जुगार आणि फसवणुकीतून तब्बल 10 अब्ज युआनपेक्षा (सुमारे 1.4 अब्ज डॉलर) जास्त कमाई केली होती.
या चार टोळींच्या प्रत्येक जुगारअड्ड्यांमध्ये दरवर्षी अब्जावधी डॉलरची उलाढाल होत होती.
कामगारांची पिळवणूक आणि त्यांची हत्याही
मिंग टोळी आणि इतर गुन्हेगारी टोळ्या त्यांच्याकडे असलेल्या कामगारांच्या मृत्यूसाठीही जबाबदार असल्याचं न्यायालयाला आढळून आलं आहे. एका प्रसंगी या कामगारांना चीनमध्ये परत जाण्यापासून रोखण्यासाठी त्यांनी गोळीबार केला होता, यात काही जणांचा मृत्यू झाला होता.
चीन आणि त्याच्या शेजारी असलेल्या काही देशांमध्ये जुगार खेळणं अवैध आहे. त्यामुळे त्याचा फायदा घेण्यासाठी लाऊक्काईंगमध्ये जुगारअड्डे उभारण्यात आले होते. परंतु, हळूहळू हे जुगारअड्डे मनी लाँड्रिंग, तस्करी आणि आर्थिक घोटाळ्याचे मोठे केंद्रच बनले. इथे अनेक गैरकृत्ये होत होती.
युनायटेड नेशन्सने याला 'स्कॅमडेमिक' म्हटलं आहे. या प्रकरणात 1 लाखापेक्षा जास्त विदेशी नागरिक, यात बहुतांश चिनी नागरिकांचा समावेश आहे. त्यांना या ठिकाणी जाळ्यात ओढलं गेलं, तिथे त्यांना डांबून ठेवून अनेक तास काम करायला भाग पाडलं जात होतं. इथून जगभरात ऑनलाइन फसवणुकीचे रॅकेट चालत होतं.
म्यानमारच्या हद्दीत मिंग टोळीची दहशत
मिंग टोळी म्यानमारच्या शान राज्यातील सर्वात शक्तिशाली टोळींपैकी एक होती. त्यांनी लाऊक्काईंगमधील हे अड्डे सुरू केले होते. तिथे किमान 10 हजार कामगार काम करत होते.
सर्वात कुख्यात ठिकाण क्राऊचिंग टायगर व्हिला नावाचं कंपाउंड होतं. तिथे कामगारांना सातत्याने मारहाण होत आणि त्यांचा छळ केला जात असत.
दोन वर्षांपूर्वी, काही सशस्त्र टोळ्यांनी हल्ला केला. त्यात म्यानमारच्या सैन्याला शान राज्यातील मोठ्या भागातील आपला ताबा गमवावा लागला होता. या सशस्त्र टोळ्यांनी लाऊक्काईंगवर नियंत्रण मिळवलं. चीनचा या टोळ्यांवर मोठा प्रभाव आहे. त्यांनीच या हल्ल्याला मान्यता दिल्याचं मानलं जात होतं.
या गुन्हेगार टोळीचा प्रमुख मिंग झुएचांगने आत्महत्या केली, तर इतर कुटुंबीयांना चिनी अधिकाऱ्यांच्या ताब्यात दिलं गेलं. काहींनी आपल्या कृत्याची कबुली दिली आहे.
या अड्ड्यांवर काम करणाऱ्या हजारो लोकांनाही चीनच्या पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं आहे.
या शिक्षेच्या माध्यमातून चीनने त्यांच्या सीमेवर सुरू असलेल्या गुन्हेगारी आणि आर्थिक घोटाळे करणाऱ्या टोळ्यांबाबत कठोर असल्याचे दाखवून दिले आहे. बीजिंगच्या दबावाखाली, थायलंडनेही याचवर्षी म्यानमारसह आपली सीमा ओलांडणाऱ्या गुन्हेगारी टोळ्यांविरोधात कारवाई केली आहे.
असं असूनही या गुन्हेगारी व्यवसायानं परिस्थितीशी जुळवून घेतलं आहे. त्यांनी ठिकाण बदललं आहे. आता त्याचा मोठा भाग कंबोडियामध्ये चालतो, म्यानमारमध्येही तो मोठ्या प्रमाणावर आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)