सुशांत सिंह राजपूत प्रकरणात CBI चा क्लोजर रिपोर्ट सादर, रिया चक्रवर्तीचे वकील काय म्हणाले?

    • Author, आशय येडगे
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणात केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागानं (CBI) क्लोजर रिपोर्ट सादर केला आहे.

पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर सुमारे साडेचार वर्षांनी सीबीआयने या प्रकरणाचा क्लोजर रिपोर्ट सादर केला आहे.

सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर मुंबई पोलिसांच्या प्राथमिक तपासात सुशांतने आत्महत्या केल्याचं समोर आलं होतं. सीबीआयने देखील आता ही आत्महत्याच असल्याचं म्हटलेलं आहे.

सुशांत सिंह राजपूतच्या प्रकरणात अभिनेत्री रिया चक्रवर्तीवर संशय होता. त्यामुळे तिला अटक देखील करण्यात आलेली होती.

मात्र, सीबीआयच्या क्लोजर रिपोर्टमध्ये रिया चक्रवर्तीला क्लीन चिट दिल्याची माहिती रिया चक्रवर्तीचे वकील सतीश मानेशिंदे यांनी दिलेली आहे.

सुरुवातीला सुशांत सिंह राजपूत प्रकरणाचा तपास मुंबई पोलीस करत होते. त्यानंतर सुशांतच्या कुटुंबीयांनी बिहारच्या पाटणा येथे तक्रार दाखल केली.

त्यामुळे बिहार पोलीस आणि मुंबई पोलीस यांच्यामध्ये अधिकार क्षेत्रावरून वाद झाल्यानंतर बिहार सरकारच्या शिफारशीवरून हा तपास केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडे देण्यास केंद्र सरकारने मान्यता दिली होती.

त्यानुसार 19 ऑगस्ट 2020 रोजी हा तपास सीबीआयकडे वर्ग करण्यात आला होता.

सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरण काय आहे?

14 जून 2020 रोजी अभिनेता सुशांत सिंह राजपूत याचा मृतदेह त्याच्या निवासस्थानी आढळून आला होता. मुंबई पोलिसांनी ही आत्महत्याच असल्याचं सांगितलं होतं मात्र, याप्रकरणी काही संशय असल्याने सुशांतच्या मृत्यूचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आलेला होता.

आता अखेर साडेचार वर्षानंतर सीबीआयने या प्रकरणाचा अंतिम अहवाल सादर केला आहे. यामध्ये सुशांतने आत्महत्याच केली असल्याचं म्हटलं आहे.

सुशांत सिंह राजपूतच्या शवविच्छेदनाचा प्राथमिक अहवाल पोलिसांना मिळाला होता. त्यात फास घेतल्यामुळे श्वास कोंडल्याने सुशांतचा मृत्यू झाल्याचं म्हटलं होतं. त्यावेळी तीन डॉक्टरांच्या टीमनं सुशांतच्या मृतदेहाची ऑटोप्सी केली होती.

सीबीआयच्या क्लोजर रिपोर्टमध्ये नेमकं काय म्हटलं आहे?

पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणी सीबीआयने दोन क्लोजर रिपोर्ट सादर केले आहेत. सुशांत सिंह राजपूतच्या वडिलांनी आत्महत्येला प्रवृत्त केल्याबाबत तक्रार दाखल केली होती, सीबीआयचा पहिला रिपोर्ट याबाबत आहे. तर दुसरा रिपोर्ट याप्रकरणी रिया चक्रवर्तीने सुशांत सिंह राजपूतच्या बहिणींविरोधात केलेल्या तक्रारीबाबतचा आहे.

मुंबई आणि पाटणा येथे हे दोन रिपोर्ट सादर करण्यात आलेले आहेत. सुशांतच्या वडिलांनी दाखल केलेल्या तक्रारीबाबतचा अहवाल पाटण्यातील विशेष न्यायालयात सादर केला गेला. तर रिया चक्रवर्ती प्रकरणातील रिपोर्ट मुंबईच्या विशेष न्यायालयात सीबीआयने सादर केल्याची माहिती आहे.

पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, आता न्यायालय हे अहवाल स्वीकारायचे की आणखीन चौकशीचे आदेश द्यायचे हे ठरवणार आहे.

दरम्यान, याआधी सुशांतच्या मृत्यूची तपासणी करणाऱ्या फॉरेन्सिक टीमने देखील ही हत्या नसून आत्महत्याच असल्याचं स्पष्ट केलं होतं.

सुशांतच्या मृत्यूनंतर त्याचे वडील के. के. सिंह यांनी पाटणा येथे तक्रार दाखल केली होती. या तक्रारीत सुशांतच्या कुटुंबीयांनी असा आरोप केला होता की, अभिनेत्री रिया चक्रवर्तीनेच सुशांतच्या मानसिक छळ केला आणि त्याच्याकडे पैश्यांची मागणी केली. यालाच कंटाळून सुशांतने आत्महत्या केल्याचा आरोपही करण्यात आला होता.

सीबीआयच्या क्लोजर रिपोर्टमध्ये रिया चक्रवर्तीला क्लीन चिट मिळाल्याची माहिती तिचे वकील सतीश मानेशिंदे यांनी दिली आहे.

सुशांत सिंह राजपूत प्रकरणात आरोप असलेल्या रिया चक्रवर्तीचे वकील काय म्हणाले?

रिया चक्रवर्तीचे वकील सतीश मानेशिंदे यांच्याशी बीबीसी मराठीने बातचित केली.

सतीश मानेशिंदे बीबीसी मराठीला सांगितलं की, "सीबीआयने सुमारे साडेचार वर्ष चौकशी करून अखेर या प्रकरणाचा क्लोजर रिपोर्ट सादर केला आहे. या प्रकरणाच्या प्रत्येक पैलूची सर्व बाजूंनी सखोल चौकशी करून प्रकरण बंद केल्याबद्दल आम्ही सीबीआयचे आभारी आहोत. या प्रकरणी कसलाही दोष नसताना रिया चक्रवर्तीला 27 दिवस तुरुंगात राहावं लागलं. अखेर न्यायाधीश सारंग कोतवाल यांनी तिला जामीन मंजूर केला."

सतीश मानेशिंदे पुढे म्हणाले, "जर पीडित कुटुंबाने क्लोजर रिपोर्ट स्वीकारला नाही, तर त्यांना न्यायालयात निषेध याचिका दाखल करण्याचा अधिकार आहे, न्यायाधीश त्यांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर आणि क्लोजर रिपोर्ट विचारात घेतल्यानंतर तो स्वीकारू शकतात किंवा तो नाकारू देखील शकतात, तसेच न्यायालय पुढील तपासाचा आदेश देखील देऊ शकतं."

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन )