शरीराच्या वासावरून तुमच्या आरोग्याबद्दल आणि आजाराबद्दल काय कळू शकतं?

    • Author, जास्मिन फॉक्स-स्केली
    • Role, बीबीसी फ्युचर

आपल्या शरीराच्या सच्छिद्र त्वचेतून आणि आपल्या श्वासांवाटे आपण गंधयुक्त रसायनांचा मोठा प्रवाह बाहेर सोडतो. यातील काही गंध म्हणजे आपण आजारी पडण्याची शक्यता असल्याचं लक्षण असतो. याचा वापर काही वर्षे आधीच आजारांचं निदान करण्यासाठी केला जाऊ शकतो.

हे मूर्खपणाचं वाटणं स्वाभाविकच आहे. ॲनालिटिकल केमिस्ट असलेल्या पेर्डिता बॅरन यांनीदेखील अशीच प्रतिक्रिया दिली होती.

त्यांच्या सहकाऱ्यानं एका स्कॉटिश महिलेशी विषयी त्यांना सांगितलं होतं. त्या महिलेचा दावा होता की तिला पार्किन्सन आजाराचा वास येऊ शकतो. या दाव्याबद्दल ऐकल्यानंतर पेर्डिता यांनादेखील ते विचित्र वाटलं होतं.

"ती महिला कदाचित फक्त वृद्ध लोकांचा वास घेत होती आणि पार्किन्सन आजाराची लक्षणं ओळखत होती आणि त्या दोन्हींमधील संबंध जोडत होती," असं बॅरन यांनी सांगितलं.

परिचारिकेची वासाद्वारे आजार ओळखण्याची अद्भूत क्षमता

त्या महिला म्हणजे 74 वर्षांच्या जॉय मिल्ने होत्या आणि त्या निवृत्त परिचारिका होत्या. त्या 2012 मध्ये बॅरन यांचे सहकारी टिलो कुनथ एका कार्यक्रमात भाषण देत होते. त्या कार्यक्रमात जॉय टिलो यांना भेटल्या होत्या. टिलो एडिनबर्ग विद्यापीठात न्युरोसायन्टिस्ट आहेत.

मिल्ने यांनी कुनथ यांना सांगितलं होतं की त्यांना त्यांच्या या क्षमतेची ओळख पहिल्यांदा त्यांच्या पतीच्या संदर्भात पटली होती. त्यांचे पती लेस यांचा काही वर्षांपासून तीव्र गोडसर वास येत होता.

त्याच्याकडे लक्ष दिल्यानंतर मिल्ने यांना त्यांच्यातील ही क्षमता लक्षात आली होती. लेस यांना नंतर पार्किन्सन आजार असल्याचं निदान झालं होतं. हा एक वाढत जाणारा न्युरोडिजनरेटिव्ह आजार आहे. त्यामध्ये थरथरणं आणि हालचाली, तोल सांभाळण्यात अडचण येणं यासारखी इतर लक्षणं दिसतात.

मिल्ने जेव्हा स्कॉटलंडमधील पर्थ या शहरातील त्यांच्या घरात जेव्हा पार्किन्सन झालेल्या रुग्णांच्या बैठकीत सहभागी झाल्या, तेव्हाच त्यांना हा विशिष्ट वास आणि पार्किन्सन आजार यातील संबंध लक्षात आला. कारण पार्किन्सनचा त्या सर्व रुग्णांना तोच विशिष्ट तीव्र, गोडसर वास येत होता.

"म्हणून मग आम्ही, मिल्ने यांना वाटतं तसं खरंच आहे का, याची तपासणी करण्याचा निर्णय घेतला," असं बॅरन म्हणाल्या. त्यावेळेस बॅरन एडिनबर्ग विद्यापीठात काम करत होत्या. आता त्या मँचेस्टर विद्यापीठात आहेत.

त्यातून असं दिसून आलं की मिल्ने यांच्या बोलण्यात तथ्य होतं. कुनथ, बॅरन आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मिल्ने यांना 12 टी-शर्टचा वास घेण्यास सांगितला. त्यातील 6 टी-शर्ट पार्किन्सनच्या रुग्णांनी अलीकडेच घातले होते. तर उर्वरित 6 टी-शर्ट पार्किन्सन नसलेल्या लोकांनी घातलेले होते.

या 12 मधून मिल्ने यांनी 6 रुग्ण अचूक ओळखले. त्याशिवाय त्यांनी आणखी एक व्यक्तीची ओळख पटवली होती. ज्याला नंतर एक वर्षाहून कमी कालावधीत पार्किन्सन झाल्याचं निदान झालं.

"हे आश्चर्यकारक होतं. त्यांच्या पतीप्रमाणेच त्यांनी या आजाराचं आधीच निदान केलं होतं," असं बॅरन म्हणाल्या.

2015 मध्ये, त्यांच्या आश्चर्यकारक क्षमतेबद्दलच्या बातम्या जगभरात प्रसिद्ध झाल्या.

आजारांचा आणि शरीरातून येणाऱ्या वासाचा जवळचा संबंध

मिल्ने यांची कहाणी तुम्हाला कदाचित वाटेल तितकी अती विचित्र नाही. लोकांच्या शरीरातून वेगवेगळे गंध किंवा वास येतात. मात्र शरीरातून जर एखादा नवीन वास येऊ लागला, तर त्याचा अर्थ शरीरात काहीतरी बदल झाला आहेत किंवा काहीतरी गडबड आहे, असं त्यातून सूचित होऊ शकतं.

आता वैज्ञानिक अशा तंत्रांवर काम करत आहेत, जे पद्धतशीरपणे दुर्गंधीशी संबंधित बायोमार्कर म्हणजे शरीरातील रेणू किंवा स्त्राव शोधू शकतात.

ज्याचा वापर करून पार्किन्सनचा आजार आणि मेंदूच्या दुखापतींपासून ते कर्करोगापर्यंतच्या विविध आजारांचं निदान लवकर करू शकतात. त्यांना शोधण्याची चावी कदाचित आपल्या नाकाखालीच लपलेली असेल.

"लोक मरण पावत आहेत आणि त्यांना प्रोस्टेट कर्करोग आहे की नाही हे शोधण्यासाठी आपण त्यांच्या नितंबावर सुया टोचत असतो, हे पाहून मी अतिशय अस्वस्थ होतो. वास्तविक यासाठीची लक्षणं त्यांच्या शरीराबाहेरच असतात आणि ती कुत्र्यांकडून शोधली जाऊ शकतात," असं अँड्रिआस मेर्शिन म्हणतात. ते भौतिकशास्त्रज्ञ आणि रिअलनोज डॉट एआयचे सहसंस्थापक आहेत.

ही कंपनी वासांच्या आधारे रोगांचं निदान करण्यासाठी रोबोटिक नाक विकसित करते आहे. याप्रकारच्या तंत्रज्ञानाच्या खरोखरंच आवश्यकता आहे.

कारण तुलनेनं फार थोड्या लोकांकडे अशी क्षमता असते की ज्यांच्याकडे आजाराच्या सुरुवातीच्या टप्प्यात निर्माण होणारे हे जैवरासायनिक घटक नाकानं वास घेऊन शोधू शकतात.

जॉय मिल्ने या अशाच थोड्या लोकांपैकी एक होत्या. त्यांना आनुवंशिक हायपरसोम्निया आहे. याचा अर्थ त्यांची वास घेण्याची क्षमता सरासरी माणसापेक्षा खूपच अधिक आहे. त्या एकप्रकारच्या सुपर-स्मेलर म्हणजे तीव्र घ्राणेंद्रिय असलेल्या व्यक्ती आहेत.

आजारांचा शरीरातून येणाऱ्या वासावर नेमका कसा परिणाम होतो?

असे काही आजार असतात, ज्यांच्यामुळे अतिशय तीव्र स्वरुपाचा विशिष्ट असा गंध येतो, ज्याचा बहुतांश लोकांना वास येतो. उदाहरणार्थ, हायपोग्लायसेमिकचा त्रास असलेल्या मधुमेही लोकांचा श्वास किंवा त्वचेचा फळांसारखा किंवा 'सडलेल्या सफरचंदाचा' वास येऊ शकतो.

हा वास रक्तात कीटॉन्स नावाचं आम्लयुक्त रसायन साठल्यामुळे येतो. या रसायनाला फळांसारखा वास येतो. शरीरात जेव्हा ग्लुकोजऐवजी चरबीचं चयापचय होतं, तेव्हा कीटॉन्स तयार होतात.

ज्या लोकांना यकृताचा आजार झालेला असतो त्यांच्या श्वासातून किंव लघवीतून कुबट दुर्गंध किंवा गंधकयुक्त वास येऊ शकतो. जर तुमच्या श्वासातून अमोनियासारखा वास येत असले किंवा त्याला 'माशां'सारखा किंवा 'लघवीसारखा' वास येत असेल, तर ते मूत्रपिंडाच्या आजाराचं लक्षण असू शकतं.

काही संसर्गजन्य आजारांमध्येही विशिष्ट प्रकारचा वास येतो. विष्ठेला जर गोड वास येत असेल तर ते कॉलरा किंवा क्लोस्ट्रिडिओइड्स डिफिसिल जिवाणूचं लक्षण असू शकतं. हा जिवाणू हे अतिसाराचं एक सामान्य कारण असतं.

अर्थात एका अभ्यासातून असं आढळलं की हॉस्पिटलमधील परिचारिकांच्या एका दुर्दैवी गटाला रुग्णांच्या विष्ठेचा वास घेऊन आजाराचं अचूक निदान करता आलं नाही.

दरम्यान, क्षयरोगामुळे एखाद्या व्यक्तीच्या श्वासातून शिळ्या बियरसारखा वास येऊ शकतो आणि त्यांची त्वचा ओल्या तपकिरी पुठ्ठ्यासारखी आणि खूपच खारट पाण्यासारखी असू शकते.

आजार ओळखण्यासाठी कुत्र्यांचा वापर

इतर आजारांना ओळखण्यासाठी मात्र विशिष्ट प्रकारच्या नाकाची आवश्यकता असते.

उदाहरणार्थ, कुत्र्यांची वास घेण्याची क्षमता आपल्यापेक्षा 1,00,000 पट अधिक असते. फुफ्फुस, स्तन, अंडाशय, मूत्राशय आणि प्रोस्टेट कर्करोगासाठी वास घेण्यासाठी वैज्ञानिकांनी कुत्र्यांना प्रशिक्षण दिलं आहे.

उदाहरणार्थ, प्रोस्टेट कर्करोगावर करण्यात आलेल्या एका अभ्यासात, कुत्र्यांना लघवीच्या नमुन्यांमधून हा आजार ओळखण्यात 99 टक्के यश आलं. पार्किन्सन आजार, मधुमेह, झटके येणं किंवा शुद्ध हरपणं आणि मलेरिया यासारख्या आजारांच्या सुरुवातीच्या टप्प्यातील लक्षणं फक्त वासावरून ओळखण्यासाठी देखील कुत्र्यांना प्रशिक्षण देण्यात आलं आहे.

मात्र आजार ओळखण्याची क्षमता सर्वच कुत्र्यांमध्ये नसते. तसंच प्राण्यांना प्रशिक्षण देण्यासाठी वेळ देखील लागतो.

काही वैज्ञानिकांचं म्हणणं आहे की, आपण कुत्र्यांच्या वास घेण्याच्या आश्चर्यकारक क्षमतेची प्रतिकृती बनवू शकतो आणि मिल्नेसारख्या लोकांना प्रयोगशाळेत साधा स्वॅब घेण्याची संधी मिळते ज्यामुळे तो नमुना चाचणीसाठी न पाठवता पडताळणी होऊ शकते.

उदाहरणार्थ, पार्किन्सनच्या रुग्णांच्या सिबमचं (त्वचेवर तयार होणारा तेलकट पदार्थ) विश्लेषण करण्यासाठी बॅरन गॅस क्रोमॅटोग्राफी-मास स्पेक्ट्रमेट्रीचा वापर करत आहेत.

गॅस क्रोमॅटग्राफीमध्ये संयुगं वेगळी केली जातात आणि मास स्पेक्ट्रोमेट्रीमध्ये त्यांचं वजन केलं जातं. त्यातून तुम्हाला शरीरात असणाऱ्या रेणूंचं अचूक स्वरुप ठरवता येतं. अन्न, पेय आणि परफ्यूम उद्योग आधीच याप्रकारे गंधाच्या विश्लेषणाचा नियमितपणे वापर करत आहेत.

मानवी त्वचेवर सामान्यपणे आढळणाऱ्या 25,000 किंवा त्याहून अधिक संयुगांपैकी जवळपास 3,000 संयुगांचं पार्किन्सन असलेल्या लोकांमध्ये वेगवेगळ्या प्रकारे नियमन केलं जातं, असं बॅरन म्हणतात.

"आता आपण अशा स्थितीत आहोत की ते प्रमाण आपण जवळपास 30 पर्यंत कमी केलं आहे, जी पार्किन्सन असलेल्या सर्व लोकांमध्ये सातत्यानं खरोखरंच वेगळी आहेत," असं बॅरन पुढे म्हणतात.

यातील बरीचशी संयुगं लिपिड किंवा चरबी आणि लांब साखळी असणारी फॅटी ॲसिड्स आहेत, असं त्या म्हणतात.

उदाहरणार्थ, हिप्प्युरिक ॲसिड, इकोसेन आणि ऑक्टाडेकॅनल हे तीन लिपिडसारख्या रेणू जे आजारामुळे निर्माण होणाऱ्या वासाशी जोडलेले असतात, त्यांच्यावर सुरुवातीच्या एका अभ्यासात लक्ष केंद्रीत करण्यात आलं होतं.

हे अर्थपूर्ण आहे, कारण आधीच्या अभ्यासातून असं दिसतं की लिपिडचं असामान्य चयापचय हे पार्किन्सन आजाराचं वैशिष्ट्य आहे.

आम्हाला असं आढळलं की "लांब साखळीचे फॅटी ॲसिड मायटोकॉन्ड्रियामध्ये वाहून नेण्याची पेशींची क्षमता (पार्किन्सन असलेल्या लोकांमध्ये) बिघडलेली आहे. म्हणूनच आम्हाला माहित आहे की शरीरात यापैकी अधिक लिपिड फिरत असतात आणि त्यातील काही लिपिड त्वचेतून बाहेर पडतात आणि आपण तेच मोजतो."

त्चचेच्या गंधाद्वारे आजाराचं निदान करणारी चाचणी

ही टीम आता एक साधी त्वचेची स्वॅब टेस्ट विकसित करते आहे. अशी चाचणी ज्याद्वारे पार्किन्सन आजाराचं निदान त्याच्या सुरुवातीच्या टप्प्यातच होऊ शकतं.

सध्या, सर्वसाधारण डॉक्टर कंपनासारखी लक्षणं असलेल्या लोकांना न्युरोलॉजिस्टकडे पाठवतात. तो न्युरोलॉजिस्ट मग निदान करतो. मात्र यासाठी अनेक वर्षे लागू शकतात.

"आपल्याला एक अतिशय वेगानं, कोणतंही उपकरण शरीरात न वापरता करता येणारी चाचणी हवी, ज्यामुळे एखाद्या व्यक्तीची प्रभावीपणे तपासणी करता येईल. जेणेकरून ते नंतर न्युरोलॉजिस्टला भेटू शकतात, जो त्यांची तपासणी करेल आणि त्यांना आजार झाला आहे की नाही हे सांगेल", असं बॅरन म्हणतात.

मात्र, आजारांचा आपल्या शरीराच्या वासावर परिणाम का होतो? यामागचं कारण म्हणजे अस्थिर सेंद्रिय संयुगं (व्हीओसी) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रेणूंचा गट.

जिवंत राहण्यासाठी, आपल्या शरीराला अन्न आणि पेयाचं रुपांतर सतत ऊर्जेत करावं लागतं. ही प्रक्रिया मायटोक्रॉन्ड्रियामध्ये होणाऱ्या रासायनिक अभिक्रियांच्या मालिकेद्वारे होते.

मायटोकॉन्ट्रिया ही आपल्या शरीरातील लहान पेशींची रचना असते. ती आपण सेवन केलेल्या अन्नाचं रुपांतर ऊर्जेत करते आणि मग त्या उर्जेचा वापर आपलं शरीर करतं. या रासायनिक अभिक्रियेत मेटाबोलाइट्स म्हणून ओळखले जाणारे रेणू तयार होतात. त्यापैकी काही अस्थिर स्वरूपाचे असतात.

याचाच अर्थ त्यांचं सामान्य तापमानाला सहजपणे बाष्पीभवन होतं. त्यामुळे ते सहजपणे आपल्या घ्राणेंद्रियापर्यंत म्हणजे नाकापर्यंत पोहोचू शकतात आणि आपल्याला त्याचा वास येतो. हे व्हीओसी मग आपल्या शरीरातून उत्सर्जित होतात.

"जर तुम्हाला संसर्ग किंवा आजार किंवा दुखापत झाली असेल, तर तुमच्या चयापचयावर त्याचा परिणाम होणं स्वाभाविक आहे," असं ब्रूस किम्बॉल म्हणतात. ते अमेरिकेतील फिलाडेल्फियामधील मोनेल केमिकल सेन्सेस सेंटर या रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये रासायनिक पर्यावरणशास्त्रज्ञ आहेत.

"चयापचयातील हा बदल तुमच्या शरीरातील वेगवेगळ्या भागात मेटाबोलाइट्स पोहोचण्यात दिसून येईल," असं ते पुढे म्हणतात.

दुसऱ्या शब्दात, आजार झाल्यास व्हीओसीच्या निर्मितीत बदल होऊ शकतो, त्यामुळे आपल्या शरीरातून येणाऱ्या वासात बदल होऊ शकतात.

किम्बॉल म्हणतात, "आम्ही अनेक विषाणूजन्य आणि जिवाणूंमुळे होणाऱ्या संसर्गाचा अभ्यास केला. आम्ही स्वादुपिंडाचा कर्करोग, रेबीजचा अभ्यास केला. ही यादी तशी खूप मोठी आहे."

"मी म्हणेन की, निरोगी स्थितीशी तुलना करताना निरोगी स्थिती आणि आता ज्या स्थितीचा आपण अभ्यास करत आहोत, त्यामध्ये आपल्याला फरक करता येत नाही, ही बाब फारच दुर्मिळ असते. ते अगदी सामान्य असतं."

कीटॉन्स, व्हीओसीमधील बदल आणि निदान

मात्र, महत्त्वाची गोष्ट म्हणजे, या आजारांशी संबंधित असलेल्या अनेक व्हीओसीमधील बदल हे सूक्ष्म असतात आणि ते माणसाच्या लक्षात येणं कठीण असतं.

त्यामुळे कुत्रे किंवा वास घेणारी वैद्यकीय उपकरणं, भविष्यात गंभीर स्वरुपाच्या मात्र एरवी निदान करण्यास कठीण असलेल्या आजारांचं निदान करण्यास मदत करू शकतात.

उदाहरणार्थ, जी मुलं संपर्कात आणणारे खेळ खेळतात, त्यांच्या मेंदूतील दुखापतीचं निदान करता येईल अशी चाचणी विकसित करण्यासाठी किम्बॉल त्यांच्या सहकाऱ्यांबरोबर काम करत आहेत. ही चाचणी, त्या मुलांच्या शरीरातून बाहेर पडणाऱ्या व्हीओसीमधील बदलांवर आधारित असेल.

2016 मध्ये त्यांनी एक अभ्यास प्रकाशित केला. त्यात अभ्यासात म्हटलं होतं की उंदरांमध्ये आघात करणाऱ्या मेंदूच्या दुखापती झाल्यास एक वेगळा वास येतो. तो वास घेण्यासंदर्भात इतर उंदरांना प्रशिक्षण देणं शक्य आहे.

एका नव्या, लवकरच प्रकाशित होणाऱ्या अभ्यासात, मेंदूला आघात करणारी दुखापत झाल्यानंतरच्या काही तासांमध्ये किम्बॉल यांना मानवी लघवीमधील विशिष्ट कीटॉन्स दिसून आले.

अशा दुखापतींनंतर गंध का सोडला जातो यामागचं कारण स्पष्ट नाही. मात्र याबाबतीत एक सिद्धांत असा आहे की मेंदू त्या दुखापतीतून सावरण्याचा प्रयत्न करताना एक बाय प्रॉडक्ट म्हणून व्हीओसी सोडतो.

"आपल्याला दिसणाऱ्या, या श्रेणीतील कीटॉन्समधून असं दिसतं की, मेंदूला बहुधा दुखापतीशी सामना करण्यासाठी अधिक ऊर्जा मिळण्याशी किंवा किमान त्यातून सावरण्यासाठी आधार देण्याशी त्याचा काहीतरी संबंध आहे," असं किम्बॉल म्हणतात.

मलेरियासाठी नवी चाचणी होऊ शकते विकसित

असा विचार करण्यासाठी चांगलं कारण आहे. अभ्यासातून असं दिसून आलं आहे की मेंदूला दुखापत झाल्यानंतर कीटॉन्स हे ऊर्जेचा पर्यायी स्त्रोत म्हणून काम करू शकतात आणि ते न्युरोप्रोटेक्टिव्ह गुण पुरवतात असं मानलं जातं.

एखाद्याला मलेरिया झाल्याचं देखील शरीरातून येणाऱ्या वासातून लक्षात येऊ शकतं. 2018 मध्ये वैज्ञानिकांना आढळलं की ज्या मुलांना मलेरियाचा संसर्ग झाला आहे, त्यांच्या त्वचेतून एक विशिष्ट प्रकारचा वास येतो. त्यामुळे डास त्यांच्याकडे आकर्षिले जातात.

संशोधकांच्या एका टीमनं पश्चिम केनियातील 56 मुलांकडून घेतलेल्या नमुन्यांचा अभ्यास केला. या अभ्यासातून या टीमला एक 'फळांसारखा आणि गवतासारखा' वास आढळला. उडणाऱ्या, चावणाऱ्या कीटकांसाठी हा वास अत्यंत आकर्षक होता.

या नमुन्यांचा आणखी अभ्यास, विश्लेषण केल्यावर त्यात अल्डीहाईड्स (विशेषकरून हेप्टॅनल, ऑक्टॅनल आणि नोनॅनल) नावाचं रसायन असल्याचं आढळून आलं. या संशोधनाचा वापर मलेरियासाठी नवीन चाचणी विकसित करण्यासाठी केला जाऊ शकतो.

सध्यातरी वैज्ञानिकांना आशा वाटते आहे की या गंधाची प्रतिकृती तयार करून त्याचा वापर डासांना आमिष दाखवून अडकवण्यासाठी केला जाऊ शकतो. असं करून डासांना वस्त्या आणि गावांपासून दूर नेता येईल.

निदान करण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंगचा उपयोग

मेर्शिन एमआयटीमधील माजी संशोधक आहेत आणि आता रिअलनोज डॉट एआयमध्ये काम करत आहेत. ते म्हणतात की ते आणि त्यांच्या टीमला आशा आहे की प्रोस्टेट कर्करोगाचं निदान करू शकणारं एक गंध-शोधक उपकरण विकसित करता येईल. या कर्करोगानं 44 पैकी एका पुरुषाचा मृत्यू होण्याची शक्यता आहे.

मेर्शिन म्हणाले, "मी एमआयटीमध्ये 19 वर्षे केलेल्या संशोधनातून ही कंपनी उदयाला आली आहे. तिथे डिफेन्स ॲडव्हान्स्ड रिसर्च प्रोजेक्ट एजन्सीनं मला नाकानं वास घेऊन शोध घेण्याच्या कुत्र्यावर मात करण्यास सांगितलं होतं. मुळात आम्हाला बायो-सायबोर्ग बनवण्यास सांगण्यात आलं होतं."

रिअलनोज डॉट एआयकडून विकसित केले जात असलेल्या उपकरणात मानवी घाणेंद्रियांमधील रिसेप्टर्सचा समावेश आहे. ते प्रयोगशाळेत स्टेम पेशींद्वारे विकसित केलेले आहेत.

प्रोस्टेट कर्करोगाशी निगडीत मोठ्या प्रमाणातील वासाच्या रेणूंना शोधण्यासाठी त्यांची रचना केलेली आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्सचाच एक भाग असलेलं मशीन लर्निंग मग रिसेप्टर्सच्या सक्रियतेसाठी पॅटर्न शोधतं.

मेर्शिन म्हणतात, "नमुन्यात काय घटक आहेत हे जाणून घेणं पुरेसं नाही. केकमधील घटकांमुळे आपल्याला केकची चव किंवा केकच्या वासाबद्दल थोडंसं सांगतात. तुमच्या सेन्सर्सचा या अस्थिर घटकांशी संवाद साधल्यानंतर आणि तुमच्या मेंदूनं त्या माहितीवर प्रक्रिया केल्यानंतर हे घडतं आणि त्याचं रुपांतर ज्ञानेंद्रियातून होणाऱ्या अनुभवात होतं."

"संवेदनांच्या सक्रियेत आम्ही असे पॅटर्न शोधत आहोत, जे तुमचं मन आणि मेंदूच्या कार्याजवळ आहेत," असं मेर्शिन म्हणतात.

जॉय आणि लेस यांचा वारसा

दरम्यान, जॉय आता त्यांच्या संशोधकांच्या टीममध्ये बॅरन यांच्याबरोबर काम करत आहेत. त्या पार्किन्सन आणि इतर आजारांचं निदान करण्यासाठी चाचणी विकसित करण्यासाठी बॅरन यांना मदत करत आहेत.

"आम्ही आता त्यांचा वापर वास ओळखण्याच्या कामासाठी जास्त करत नाही. त्या एका दिवसात जास्तीत जास्त 10 नमुने तपासू शकतात आणि भावनिकदृष्टया ही गोष्ट त्यांना खूप थकवणारी आहे. त्या आता 75 वर्षांच्या आहेत. त्यामुळे त्या मौल्यवान आहेत."

तरीदेखील, जर बॅरन यांच्या तंत्रामुळे जॉय यांच्या क्षमतेची प्रतिकृती तयार होऊ शकली आणि पार्किन्सन आजाराचं सुरुवातीच्या टप्प्यातच निदान करू शकली, तर जॉय आणि लेस यांचा तो एक मोठा वारसा ठरेल.

"जॉय आणि लेस हे दोघेही वैद्यकीयदृष्ट्या प्रशिक्षित होते ही गोष्ट मला उल्लेखनीय वाटते. त्यामुळे हे निरीक्षण अर्थपूर्ण आहे, ही बाब त्यांना माहित होती," असं बॅरन म्हणतात.

"मात्र मला वाटतं की मुद्दा असा आहे की प्रत्येकाला त्याच्या आरोग्याबद्दल किंवा त्यांच्या मित्रांच्या आरोग्याबद्दल किंवा कुटुंबाच्या आरोग्याबद्दल सक्षम वाटलं पाहिजे. प्रत्येकाला आरोग्याशी निगडीत निरीक्षणं करता आली पाहिजेत आणि काहीतरी चुकीचं होतं आहे असं त्यांना वाटलं तर त्याच्याशी निगडीत पावलं उचलता आली पाहिजेत," असं बॅरन पुढे म्हणतात.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)