तरुणांच्या मेंदूसाठी मद्यपान इतकं धोकादायक का आहे?

फोटो स्रोत, Javier Hirschfeld/BBC/Getty Images
- Author, डेव्हिड रॉबसन
- Role, बीबीसी प्रतिनिधी
घरातच करायच्या नियंत्रित मद्यपानाच्या युरोपियन कल्पनेपासून ते काही सर्वत्र प्रचलित कौटुंबिक परंपरापर्यत, मद्यपान आणि तरुणासंदर्भातील अनेक जुन्या धारणा विज्ञानामुळे मोडीत निघत आहेत.
मी विद्यापीठातील शिक्षण घेण्यासाठी घर सोडण्यापूर्वी एक दिवस आधीच 18 वर्षांचा झालो होतो. मद्य विकत घेणे, विद्यार्थ्यांसाठी असणाऱ्या पब्ज आणि बारची दुनिया पाहणे यासाठी इंग्लंडमध्ये असणाऱ्या निकषाच्या योग्य वयात मी आलो होतो.
मी जेव्हा माझ्या नव्या घराजवळच्या डॉक्टरकडे गेलो तेव्हा तिने मला विचारलं की, मी दर आठवड्याला किती दारू पितो आहे. म्हणजेच नेमकी किती युनिट दारू पितो आहे. सर्वसाधारणपणे इंग्लंडमध्ये मद्यपान मोजण्याचे एकक म्हणजे म्हणजे युनिट.
साधारणपणे 1.5 युनिट म्हणजे वाईनचा एक छोटा ग्लास. तिच्या प्रश्नावर मी उत्तरलो, ''जवळपास सात.'' मी लगेच आदल्याच रात्री माझ्या वर्गमित्रांबरोबरच घेतलेल्या मद्याचा हिशोब लावला. मला वाटलं की हे प्रमाण खूपच कमी आहे. सहसा मी शिस्तीचे पालन करणारा होतो.
माझ्या उत्तरावर डॉक्टर अतिशय निर्विकारपणे म्हणाल्या, ''आता तू इथं आल्यामुळं त्यामध्ये वाढ होणार आहे.''
त्यांचं म्हणणं चुकीचं नव्हतं. काही आठवड्यांच्या कालावधीतच विद्यार्थ्यांसाठीच्या बारमध्ये रांगेत उभा राहण्यापूर्वी मी वाईनची बाटली रिकामी केलेली होती. मला याची कल्पना होती की अती मद्यपानाचा आयुर्मानावर विपरीत परिणाम होतो. मात्र जे तिशीत, चाळीशीत किंवा पन्नाशीत आहेत त्यांच्या तुलनेत माझ्या तारुण्यामुळे माझ्या आयुष्यात याचा धोका अधिक वाढेल याची मात्र मला जाणीव नव्हती.
मद्यपानामुळे तरुणांच्या मेंदूवर काय विपरीत परिणाम होतो याबद्दल आज जी माहिती मला आहे ती जर मला आधीच असती तर मी वयाच्या 18 व्या वर्षी अधिक सावध राहिलो असतो.
माझ्या मेंदूची अजूनही वाढ होत होती आणि तो अजून पूर्ण विकसित होण्यासाठी त्याला किमान सात वर्षे लागणार होती. या माहितीमुळे आपला मद्यपानाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलून जातो. आयुष्याच्या या महत्त्वाच्या टप्प्यावर मद्यपान केल्यामुळे आपल्या संज्ञात्मक विकासावर दीर्घकालीन परिणाम होऊ शकतात.
तरुणांवर मद्यपानामुळे होणाऱ्या परिणामांबद्दल संशोधकांशी चर्चा केल्यानंतर मला जेव्हा इतरही काही बाबी कळल्या तेव्हा मला धक्काच बसला. जगभरातील संशोधनातून काही महत्त्वाचे मुद्दे समोर येत आहेत. यामुळे सर्वसाधारणपणे मद्यापानाचे वय, मद्यापानाचे प्रमाण यासंदर्भातील सर्वसाधारण धारणा चुकीच्या ठरण्यास सुरूवात झाली आहे.

फोटो स्रोत, Javier Hirschfeld/BBC/Getty Images
यातील एक समज म्हणजे युरोपात केले जात असलेले मद्यपान. इंग्लंड किंवा अमेरिकेच्या तुलनेत युरोपातील इतर देशात जी मद्यपानाची पद्धत आहे त्याचाही समावेश आहे. यात तरुणांना घरी जेवल्यानंतर मद्यपान करू दिल्याने ते अधिक जबाबदारीने मद्यपान करू लागतात या धारणेचाही समावेश आहे.
नव्या संशोधनातून समोर आलेल्या निष्कर्षांमुळे आज प्रचलित असलेल्या मद्यपानाच्या पद्धती बदलाव्यात की नाहीत हा एक गुंतागुंतीचा मुद्दा आहे. मात्र यासंदर्भात मोठ्या प्रमाणावर केलेल्या जनजागृतीमुळे किमान पुढील पिढ्यांना योग्य माहिती आधारे योग्य निर्णय घेता येतील. ते पार्टी करताना, आनंद साजरा करताना याचा अधिक योग्यरित्या विचार करू शकतील. यातून घरात मद्यपानासंदर्भात पालकांनादेखील अधिक योग्य निर्णय घेता येणार आहे.
छोटे शरीर, मोठे मेंदू
हे स्पष्ट आहे की मद्यपान हे घातक आहे. यातून निर्माण होणाऱ्या धोक्यांमध्ये गंभीर अपघात, यकृताचे आजार आणि विविध प्रकारचे कॅन्सर यांचा समावेश आहे. अगदी थोड्या प्रमाणात केलेले मद्यपानादेखील घातक असते. यामुळेच जागतिक आरोग्य संघटनेला हे जाहीर करावे लागले की, ''कितीही कमी प्रमाणात मद्यपान केले तरी त्याचा आरोग्यावर परिणाम होतोच.''
मद्यपानाचा आनंद त्याच्यासोबत काही धोकेही घेऊन येतो. त्यामुळेच आपल्या आरोग्यविषयक धोरणांमधील मार्गदर्शक तत्वांमध्ये नुकसान कमी करण्यासाठी सौम्य प्रमाणात मद्यपान करण्यासंदर्भात सांगण्यात आलं आहे. अमेरिकेत यासंदर्भातील निकष स्पष्ट करण्यात आले आहेत. त्यानुसार पुरुषांनी एका दिवसात दोनपेक्षा अधिक ड्रिंक्स घेऊ नयेत आणि महिलांनी एका दिवसात एकापेक्षा अधिक ड्रिंक घेऊ नये.
इतर असंख्य देशांनीदेखील जवळपास अशीच मार्गदर्शक तत्वे लागू केली आहेत. सर्वसाधारणपणे बिअर आणि वाईन ही मद्ये तुलनेने कमी नुकसानकारक मानली जात असली अमेरिकेतील मार्गदर्शक तत्वांनुसार कोणत्या प्रकारचं मद्य घेतलं जातं आहे हे महत्त्वाचं नसून ते किती प्रमाणात घेतलं जातं आहे ही बाब महत्त्वाची आहे. '
"12 औंसच्या एका बिअरमध्ये पाच औंस वाईनएवढं किंवा 1.5 औंस मद्याएवढं अल्कोहोल असतं.''
याविषयीचे कायदे करतानादेखील होणारे नुकसान कमी करण्याचाच मुद्दा लक्षात घेतला जातो. या कायद्यांमुळे लहान मुलांचे मद्यपानापासून संरक्षण केलं जातं तर तरुणांना किंवा वयस्कांना योग्यरितीने त्यांचा निर्णय घेता येतो. युरोपातील बहुतांश देशांमध्ये मद्यपानासाठीचे किमान वय 18 वर्षे असून अमेरिकेत ते 21 वर्षे आहे.

फोटो स्रोत, Javier Hirschfeld/BBC/Getty Images
अर्थात कायद्याने जरी तरुणांना मद्यपानाचे किमान वय आखून दिलं असलं तरी त्यांच्यासाठी मद्यपान घातक असण्यामागे विविध असंख्य कारणं आहेत. यातील एक कारण म्हणजे शरीराचा आकार आणि रचना. किशोरवयीन युवक 21 वर्षांचे झाल्यावरच तरुण किंवा वयस्क माणसाएवढे उंच होतात आणि त्याच्यानंतर जरी त्यांच्या उंचीची वाढ थांबली तरी त्यांचं शरीर वयाच्या तिशीत किंवा चाळीशीतील माणसाएवढं चांगलं भरलेलं नसतं.
''त्यामुळंच एक ग्लास मद्य प्यायल्याने तरुणांच्या रक्तात आढळणारं अल्कोहोलचं प्रमाण वयस्क व्यक्तींपेक्षा जास्त असतं,'' असं मासट्रिश्ट विद्यापीठाचे संशोधक आणि बीयॉंड लेजिस्लेशन या पुस्तकाचे लेखक रुड रूडबीन सांगतात. या पुस्तकात मद्यपानाचे किमान वय वाढवण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली आहे.
''मद्यपानासाठी वयाची रुपरेखा आणखी एका मुद्दयाशी निगडीत आहे ती म्हणजे डोक्याचे शरीराशी असलेलं गुणोत्तर. मला निश्चितच माहिती आहे की डोक्याच्या आकाराचा मद्यपानानंतर होणाऱ्या परिणामावर प्रभाव पडतो. जेव्हा तुम्ही मद्यपान करता तेव्हा अल्कोहोल तुमच्या रक्तात जातं आणि तिथून तुमच्या शरीरात पसरतं.
"फक्त पाच मिनिटांत ते तुमच्या मेंदूत पोचतं आणि ते अगदी सहजपणे होतं. एरवी धोकादायक पदार्थ रक्तातून तुमच्या मेंदूत पोचताना जो अडथळा निर्माण होतो त्याला अल्कोहोल अगदी सहजपणे पार करतं. तरुणांच्या मेंदूमध्ये तुलनात्मकरित्या अल्कोहोलचा एक मोठा भाग पोचतो आणि त्यामुळेच तरुणांना मद्यपानातून विषबाधा होण्याची शक्यता अधिक असते,'' असं रूडबीन सांगतात.
मेंदूची वाढ होताना
डोक्याच्या कवटीमध्ये होत असलेले बदल तितकेच महत्त्वाचे असतात. याआधी मेंदूची वाढ किशोरवयाच्या सुरुवातीच्या टप्प्यावरच थांबत असल्याचं मानलं जात होतं. मात्र अलीकडच्या संशोधनातून असं आढळून आलं आहे की पौगंडावस्थेतील मेंदूत नव्याने गुंतागुंतीचे बदल होण्यास सुरूवात होते आणि ते वयाच्या किमान 25 वर्षापर्यत होत राहतात.
यातील सर्वात महत्त्वाच्या बदलांमध्ये मेंदूतील ग्रे मॅटरमध्ये होणारी घट असते. एका पेशीचा दुसऱ्या पेशीशी संपर्क घडवणाऱ्या सायनॅप्सेसची (जिथे चेतातंतू इतर चेतातंतूशी जोडले जातात) मेंदू छाटणी करतो. त्याचवेळी व्हाईट मॅटरमध्ये वाढ होण्यास सुरूवात होते. शरीरातील लांबच्या अंतरावरील पेशींशी संपर्क घडवणाऱ्या चेतातंतूच्या भोवती एक जाडसर संरक्षक थर तयार होतो, या रचनेला व्हाईट मॅटर म्हणतात.
''हे एकप्रकारे शरीरातील सुपर हायवे असतात,'' असं लिंडसे स्केग्लिया सांगतात. त्या दक्षिण कॅरोलिनाच्या वैद्यकीय विद्यापीठात न्यूरोसायकोलॉजिस्ट आहेत. मेंदूतील या बदलामुळे चेतातंतूंचे अधिक कार्यक्षम जाळे निर्माण होते आणि त्याद्वारे एका पेशीकडून दुसऱ्या पेशीपर्यंत माहितीची देवाणघेवाण करण्याची क्रिया अधिक जलद गतीने होते.

फोटो स्रोत, GETTY IMAGES
यातून मेंदूतील विविध भागांचा विकास होण्यास सुरूवात होते. यातील काही भाग पौगंडावस्थेतदेखील प्रौढ व्यक्तीप्रमाणेच असतात. यात आनंद, सुखद भावनेची जाणीव ज्यातून होते आणि उच्च प्रतीचे विचारमंथन ज्या भागाद्वारे केला जातो अशा मेंदूतील दोन भागांचा समावेश असतो. यातील मेंदूचा एक भाग भावनांची हाताळणी, निर्णय घेण्याची क्षमता आणि स्वयंनियंत्रणयासारख्या महत्त्वाच्या बाबींशी निगडीत असतो.
''पौंगडावस्थेत आणि तरुण वयात माणसं प्रौढ व्यक्तींपेक्षा अधिक धोका का पत्करतात यामागे मेंदूच्या या दोन भागांतील संतुलन बिघडणे हे कारण असते. अनेक लोक पौगंडावस्थेतील मेंदूचं वर्णन पूर्ण वेग धारण करणारं मात्र ब्रेक नसणारं वाहन असं करतात,'' असे लिंडसे स्केग्लिया सांगतात.
अशावेळी आपल्या चेतातंतूंना अल्कोहोलचा डोस दिल्यास या चित्तथरारक स्थितीमध्ये वाढ होते. विशेषत: अत्यंत आवेग असणारी किशोरवयीन मुलं मद्यामुळे गैरवर्तन करणं आणि अपराधी स्वरूपाचे वर्तन करण्याच्या दुष्टचक्रात अडकू शकतात.
''मुलांमध्ये आवेग जितका जास्त असेल तितकं ते मद्यपानाकडे अधिक ओढले जातात. मद्यपान केल्यामुळं त्यांच्यात पुन्हा आवेग निर्माण होतो आणि हे दुष्टचक्र सुरू राहतं,'' असं स्केग्लिया पुढे सांगतात.
खूप वर्ष मद्यपान केल्यामुळं मेंदूची कार्यक्षमता कमी होत जाते
पौंगडावस्थेत किंवा किशोरावस्थेत वारंवार आणि अधिक प्रमाणात मद्यपान केल्यानं मेंदूच्या दीर्घकाळात होणाऱ्या वाढीवर विपरित परिणाम होतो. अभ्यासातून असं दिसून आलं आहे की खूप लहान वयात मद्यपान करण्यास सुरूवात केल्यास एका बाजूला मेंदूतील ग्रे मॅटरमध्ये झपाट्याने घट होते तर दुसऱ्या बाजूला व्हाईट मॅटरची वाढ खुंटते.
''ज्या किशोरवयीन मुलांनी मद्यपान करण्यास सुरूवात केलेली असते त्यांच्या मेंदूत चेतातंतूचे विकसित जाळे, ज्याला सुपर हायवे म्हणतात ते फारसे विकसित होत नाही,'' असं स्केग्लिया म्हणतात.
त्यांच्या म्हणण्यानुसार, ''मद्यपानाचे हे दुष्परिणाम लगेच दिसून येत नाहीत. कारण तरुण मेंदूमध्ये प्रश्नांची उकल करण्याची क्षमता अधिक असते. मात्र ही क्षमता दीर्घकाळ किंवा कायस्वरुपी राहत नाही. मात्र वर्षानुवर्षे मद्यपान केल्यामुळं त्यांच्या मेंदूची कार्यक्षमता कमी होत जाते.''
किशोरवयातच मद्यपानाची सुरूवात केल्यास त्याचा मानसिक आरोग्यावरदेखील विपरित परिणाम होऊ शकतो आणि पुढील आयुष्यात मद्याच्या आहारी जाण्याचा होण्याचा धोका वाढतो. ज्यांच्या घरात आधीच्या पिढ्यांमध्ये मद्यपानाचा इतिहास आहे, अशा घरांतील मुलांनी मद्यपानास लवकर सुरूवात केल्यास ते मद्यपानाच्या आहारी जाण्याचा धोका अधिक असतो.
''मेंदूच्या वाढीसाठी अत्यंत महत्त्वाचा टप्पा असणाऱ्या पौगंडावस्था किंवा किशोरावस्थेत मद्यपानाच्या सवयीशी निगडीत जनुकं अधिक प्रभावशाली असतात. त्यामुळे एखादी व्यक्ती जितक्या उशीरा मद्यपानास सुरूवात करेल तितक्या उशीरा ही जनुक कार्यात्नित होतात,'' असे स्केग्लिया म्हणतात.
युरोपियन मॉडेल?
नव्या संशोधनातून समोर आलेल्या बाबींचा पौगंडावस्थेतील किंवा किशोरवयीन मुलांच्या विचार करण्यावर किंवा पालकांच्या निर्णयांवर किती प्रभाव पडू शकतो आणि पालक त्यांच्या मुलांना घरी मद्यपान करण्यास परवानगी देतील का?
''मद्यपान जितकं उशीरा सुरू करता येईल तितकं करा हाच आमचा सल्ला आहे. कारण या वयात मेंदूची वाढ अद्याप सुरू असते. त्यामुळे तुमच्या मेंदूची वाढ होऊ द्या आणि तुमचा मेंदू पूर्ण क्षमतेने विकसित झाल्यानंतरच आणि शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त झाल्यानंतरच मद्यपान सुरू करा.''असं स्केग्लिया
स्केग्लिया म्हणतात, ''या सल्ल्याचा वापर कायद्यात व्हावा की नाही हो वेगळा मुद्दा आहे.''
मद्यपानावर दिलेल्या भाषणाबद्दल बोलताना त्या सांगतात की, ''प्रेक्षकांमधून नेहमीच मद्यापानाच्या युरोपियन मॉडेलवर प्रश्न विचारला जातो. फ्रान्ससारख्या काही देशांमध्ये कुटुंबासोबत जेवताना किशोरवयीन मुलांना ग्लासभर वाईन किंवा बिअर पिण्याची परवानगी दिली जाते. अगदी युरोपच्या बाहेरदेखील कित्येक पालकांना असं वाटतं की, छोट्या प्रमाणात मद्य पिण्यास परवानगी दिल्यानं मर्यादित मद्यपान कसं करावं याबद्दलचे शिक्षण किशोरवयीन मुलांना किंवा तरुणांना मिळतं. यामुळे पुढील आयुष्यात अती मद्यसेवनाची शक्यता कमी होते. तर बंधनांमुळे या मुलांमध्ये मद्याबद्दलचं आकर्षण वाढतं.''
''मात्र हे चुकीचं आहे. संशोधनातून दिसून आलं आहे की, मद्यपानासंदर्भात पालक मुलांना जितकी मोकळीक देतात तितकंच त्या मुलांना नंतरच्या आयुष्यात मद्यपानाशी निगडीत समस्यांना तोंड द्यावं लागतं. मुलांवर या वयात मद्यपानासंदर्भात घातलेल्या बंधनांमुळं ती मद्यपानाच्या आहारी जाण्याचा धोका कमी होतो,'' असं स्केग्लिया सांगतात.

फोटो स्रोत, Javier Hirschfeld/BBC/Getty Images
बहुतांश पुरावे असं दाखवून देतात की मद्यपानासंदर्भात नियम जितके कडक म्हणजे मद्यपानासाठीचे किमान वय जितकं अधिक तितकंच माणसं मद्यपानाबाबत जबाबदार होतात. अॅलेक्झांडर अहॅमर यांनी ऑस्ट्रियातील जोहानस केपलर विद्यापीठ लिंझ येथे केलेल्या अभ्यासाचा विचार करूया. तिथे 16 वर्षांवरील कोणालाही बिअर किंवा वाईन विकत घेण्यास कायद्यानं परवानगी आहे.
जर कडक नियमांमुळं मद्यपानाची इच्छा वाढते असं असेल तर ऑस्ट्रियातील लवकर मद्यापानास परवानगी देण्याच्या व्यवस्थेमुळं तिथं अमेरिकेच्या तुलनेत मद्यपानासंदर्भात अतिशय शिस्तबद्ध वातावरण निर्माण झालेलं असलं पाहिजे. कारण अमेरिकेत वयाच्या 21 वर्षानंतरच मद्यपानास कायदेशीर परवानगी आहे. मात्र असं अजिबात नाही.
दोन्ही देशांमध्ये एक ठरावीक वय झाल्यानंतर मुलांमध्ये मद्यपानाची इच्छा वाढलेली दिसून येते आहे. मात्र अमेरिकेच्या तुलनेत ऑस्ट्रियात हे प्रमाण 25 टक्क्यांनी अधिक आहे. विशेष म्हणजे ऑस्ट्रियात वयाच्या 16व्या वर्षी मद्यपानास परवानगी आहे तर अमेरिकत वयाच्या 21 वर्षी परवानगी आहेत. म्हणजेच अमेरिकेपेक्षा ऑस्ट्रियातील तरुणांना लवकर मद्यपानास परवानगी असतानासुद्धा तेथील तरुणांमध्ये मद्यपानाची इच्छा अधिक दिसून आली.
म्हणजेच वेगळ्या भाषेत सांगायचं तर मद्यपान जितकं उशीरा सुरू केलं जातं तितकंच मद्यपानासंदर्भात तरुण अधिक जबाबदारीने वागतात. जसं ते ऑस्ट्रियाच्या तुलनेत अमेरिकेत होताना दिसतं आहे.

फोटो स्रोत, GETTY IMAGES
अॅहेमर यांनी त्यांच्या अभ्यासात सहभागी झालेल्या तरुणांना त्यांच्या वर्तणुकीसंदर्भात विचारलं. तेव्हा त्यांना असं दिसून आलं की, ऑस्ट्रियन मुलं सोळा वर्षांची झाल्यानंतर त्यांचं मद्यपानाशी निगडीत असलेल्या धोक्याबद्दलचं मत नाट्यमयरित्या बदललं.
''मद्यपानाला जेव्हा कायद्यानं परवानगी मिळते तेव्हा तरुणांना आधीच्या तुलनेत मद्यपान कमी धोकादायक वाटू लागतं,'' असं अॅहेमर सांगतात. वयाच्या 16 वर्षी या धोक्याबद्दलचा गाफिलपणा अधिक धोकादायक ठरू शकतो. त्यातुलनेत वयाच्या 21 वर्षी या धोक्यासंदर्भात विचार करण्याची क्षमता अधिक विकसित झालेली असते. कारण तोपर्यत मेंदूचा अधिक विकास झालेला असतो.
आयुष्यभराचा विचार करता मद्यपानासंदर्भात युरोपियनांची कल्पनादेखील योग्य ठरत नाही. जागतिक आरोग्य संघटनेनुसार आकडेवारी असं दाखवते की, युरोपमध्ये मद्यपानामुळे कॅन्सर होणाऱ्या लोकांपैकी निम्मे लोक अगदी कमी किंवा मध्यम स्वरुपाचे मद्यपान करणारे आहेत.
वैज्ञानिक पुरावा समोर आल्यानंतर सरकारने मद्यपान करण्यासाठीचं किमान वय मेंदूची पूर्ण वाढ होईपर्यतचं म्हणजे 25 वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक केलं पाहिजे का?
मात्र तज्ज्ञ याकडं लक्ष वेधतात की हे तितकं सोपं नाही. कारण सार्वजनिक आरोग्याच्या फायद्यांची सांगड लोकांच्या व्यक्तीस्वातंत्र्याशी घालणं आवश्यक आहे.
''मला वाटतं मद्यपानाचं वय 25 वर्षे करण्यास फारच थोडे लोक मान्यता देतील,'' असं जेम्स मॅकिलॉप म्हणतात.

फोटो स्रोत, GETTY IMAGES
ते ऑनटारिओतील हॅमिल्टन येथील मॅकमास्टर विद्यापीठात व्यसनाधिनता शिकत आहेत. मद्यपानासाठीच्या कायदेशीर वयात वाढ केल्यास त्याकडे पालकांचे मुलांवरील असलेले नियंत्रण म्हणून पाहिले जाईल. शिवाय ते ढोंगीपणाचं ठरेल. कारण कायद्यानं मतदानासाठीचं वय किंवा लष्करात भरती होण्याचं वय 18 किंवा 19 असं आहे.
अॅहेमर यांना वाटतं की, लोकांना त्यांचे निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य आपण दिलं पाहिजे.
तर मॅकिलॉप सूचवतात की, ''पौगंडावस्थेतील किंवा किशोरवयीन मुलांना मद्यपानामुळे असणाऱ्या धोक्यांसंदर्भात शिक्षण देत सजग केलं पाहिजे. मद्यपानाचा मेंदूच्या वाढीवर विपरित परिणाम कसा होतो हे मुलांना शिकवलं पाहिजे. लोक स्वत:हून जबाबदारीने वागतील आणि तशा सवयी विकसित करतील असं मानणं हे नक्कीच योग्य आशावादी गृहितक आहे.''
मागे वळून पाहताना मी जेव्हा पौगंडावस्थेत होतो, त्यावेळेस माझ्या मेंदूतील बदलांबाबत आणि चेतातंतूवर मद्यपानाचा काय परिणाम होतो हे मी उत्साहानं जाणून घेतलं असतं. मी त्यामुळं पुरता बदलून गेलो असतो असं अजिबात नाही. मद्यपानाचे आरोग्यावर काय गंभीर परिणाम हे माहीत असूनसुद्धा मी आजदेखील मद्यपान करतो. मात्र जास्तीचं मद्यपान करण्यापूर्वी मी नक्कीच विचार केला असता.











