You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
मंगलप्रभात लोढा : 'श्रद्धा वालकर प्रकरण पुन्हा होऊ नये म्हणून...'
आंतरधर्मीय विवाह संदर्भात महाराष्ट्र सरकारने एक समिती स्थापन केली आहे. महिला व बालकल्याण मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या अध्यक्षतेखाली 13 सदस्यांची ही समिती असणार आहे.
याविषयी माहिती देताना मंगलप्रभात लोढा यांनी सांगितलं, “आंतरधर्मीय विवाह केल्यानंतर मुलीचा संपर्क पूर्णपणे तुटतो. नंतर त्या ज्यांच्यासोबत जातात, त्यांना जेव्हा कळतं की या मुलीचं माझ्याशिवाय कुणीही नाही, त्यानंतर त्या मुलीचं काय होतं, हे आपण श्रद्धा वालकर प्रकरणात पाहिलं.
सहा महिन्यांपर्यंत श्रद्धाच्या आई-वडिलांना ती मेली हेसुद्धा माहीत नव्हतं, ही भयावह घटना आहे. त्यामुळे महाराष्ट्रात श्रद्धा वालकर प्रकरण होऊ नये, म्हणून आम्ही प्रयत्न करत आहोत. त्यासाठी समितीचा एक हेल्पलाईन नंबर देणार आहोत. त्यावर मदत मागणाऱ्या लोकांना सहाय्य करण्यात येईल."
श्रद्धा वालकर प्रकरण हे गंभीर आहे. त्याची जबाबदारी म्हणून महिला व बालकल्याण मंत्रालयाने हे पाऊल उचललं आहे, असं लोढा यांनी सांगितलं.
श्रद्धा वालकरने त्यावेळी पोलिसांत तक्रारही दिली होती. पण तिच्या तक्रारीची दखल त्यावेळी घेण्यात आली नव्हती. त्यामुळे मदत करण्यासाठी हा हेल्पलाईन नंबर कार्यरत करण्यात येणार आहे.
कोणत्याही आंतरधर्मीय विवाहानंतर मुला-मुलींचा आपल्या मूळ कुटुंबाशी संपर्क कमी झाला आहे, ज्यांचं कुणीही नाही, त्यांच्यासाठी ही समिती काम करेल.
18 वर्षांपुढील व्यक्ती सूज्ञ असतात, त्यांना स्वतःच्या मर्जीने विवाह करण्याचा अधिकार आहे, मग समितीची गरज काय, या प्रश्नाचं उत्तर देताना मंगलप्रभात लोढा म्हणाले,
“त्या अधिकारात कुणीही अडचण आणलेली नाही. तुम्ही विवाह करू शकत नाही, असं कुणीही सांगितलं नाही. मात्र, नंतर काही अडचण उद्भवली तर त्या व्यक्तीने कुठे जावं, म्हणूनच हेल्पलाईन नंबर देण्यात आला आहे. हे सकारात्मक पाऊल आहे, याच्याकडे सकारात्मक दृष्टीनेच पाहा,” असं लोढा म्हणाले.
समितीत कोण कोण?
महिला व बालकल्याण विकास विभागाकडून 13 डिसेंबर रोजी या समितीबाबत शासन निर्णय काढण्यात आला आहे.
आंतरजातीय/आंतरधर्मीय विवाह-परिवार समन्वय समिती (राज्यस्तरीय) असं या समितीचं नाव आहे.
या समितीचं अध्यक्षपद महिला व बाल विकास मंत्र्यांकडे असेल. तर त्यांच्यासोबत इतर 12 सदस्य काम करतील.
समितीवर सदस्य म्हणून महिला व बालविकास विभाग प्रधान सचिव, आयुक्त, सहसचिव, अॅड योगेश देशपांडे, संजीव जैन, सुजाता जोशी, अॅड. प्रकाश साळसिंगिकर, यदू गौडिया, मीराताई कडबे, शुभदा कामत, योगिता साळवी यांच्यासह महिला व बालविकास आयुक्तालयाचे उपायुक्त यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)