आपल्यामुळे मूल होत नाही हे कळल्यावर पुरुषांच्या मानसिक आरोग्यावर काय परिणाम होतो?

    • Author, रोहन नामजोशी
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
    • Reporting from, नवी दिल्ली

‘मला प्रचंड धक्का बसला, ही बातमी किती वाईट होती हे मी सांगू शकत नाही.’

राजेश (नाव बदललं आहे) ला त्याच्या डॉक्टरांनी सांगितलं की त्याला मूल होऊ शकत नाही. ही बातमी त्यांच्यासाठी भीषण होती.

पाच वर्षं प्रयत्न केल्यावरही जेव्हा त्यांना मूल झालं नाही तेव्हा त्याने स्पर्म अनालिसीस करण्यासाठी डॉक्टरांची भेट घेतली.

जेव्हा चाचणीचे निकाल आले तेव्हा असं लक्षात आलं की त्याच्या सँपलमध्ये एकही स्पर्म नाही.

“हा माझ्यासाठी जोरदार धक्का होता,” त्यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं.

“जेव्हा ही बातमी आली तेव्हा दिवसदिवस मी नुसता बसून असायचो. मला उद्धवस्त झाल्यासारखं वाटायचं, मला प्रचंड रडू यायचं.”

“मी अगदी शोकमग्न होतो,” ते पुढे म्हणाले.

वंध्यत्व आल्याचा धक्का स्त्रियांइतकाही पुरुषांनाही बसतो याचंच हे बोलकं उदाहरण आहे.

“हे थोडंसं लाजिरवाणं सुद्धा आहे,” ते पुढे म्हणाले.

“ज्यांना या गोष्टीची जाण आहे, त्यांना हेही माहिती आहे की लोक याबाबत अतिशय विचित्र बोलतात. हा खूप मोठा भावनिक मुद्दा आहे,” ते पुढे सांगतात.

'लोकांनी याबाबत बोलायला हवं'

राजेशला त्यांच्याबाबतीत असं झाल्यावर त्यांना अनेक प्रश्न पडले.

ते म्हणाले, “मला कोणीही काही सांगितलं नाही, कोणीही मला सल्ला दिला नाही. काहीच नाही.”

त्यांना आणखी एक चाचणी करायला लावली. त्याचा निकाल यायला सहा महिने लागले.

आपलं दु:ख शेअर करण्यासाठी राजेश यांना फक्त त्यांच्या बायकोचाच आधार होता. मात्र तरीही समुपदेशनासाठी त्यांनी एका समुपदेशकाला गाठलं.

त्याच्या असं लक्षात आलं की स्त्रियांमध्ये असलेल्या वंध्यत्वाच्या समस्यांसाठी अनेक गट आहे. मात्र राजेश त्यांच्यात अर्थातच जाऊ शकले नाही.

ते म्हणतात, “पुरुषांनाही याची काळजी असते. फक्त त्याबद्दल फारसं बोललं जात नाही. लोकांनी याबद्दल खुलेपणाने बोलायला हवं, त्याबद्दल चर्चा व्हायला हवी.”

पुरुषांमध्ये वंध्यत्व का येतं?

अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या (AIIMS) च्या आकडेवारीनुसार भारतात 10-15 टक्के जोडप्यांमध्ये वंध्यत्वाची समस्या असते. त्यापैकी पन्नास टक्के जोडप्यांमध्ये समस्य ही पुरुषामुळे उद्भवते.

पुरुषांमध्ये वंध्यत्व येण्याची अनेक कारणं असतात.

वीर्याचा दर्जा हे वंध्यत्व येण्याचं सगळ्यांत महत्त्वाचं कारण आहे. वीर्यात स्पर्म असतात. अनेकदा ते संख्येने कमी असतात, कधी स्पर्मची मोटिलिटी (हालचाल करण्याची क्षमता) कमी असते किंवा स्पर्ममध्ये काहीतरी बिघाड झालेला असतो.

Varicoceles या अवस्थेमुळे सुद्धा पुरुषांमध्ये वंध्यत्वाची समस्या निर्माण होते, Varicoceles मध्ये वृषणावर काही अतिरिक्त रक्तवाहिन्यांचं जाळं निर्माण होतं. मूत्रविकार तज्ज्ञ ऑपरेशन करून ते जाळं काढतात.

वृषणांमध्ये दोष, वीर्य बाहेर पडण्याच्या प्रक्रियेत दोष किंवा टेस्टोस्टिरॉन या पुरुषांच्या सेक्स हार्मोनमध्ये काही बिघाड झाल्यास वंध्यत्व येतं.

Azospermia या रोगात पुरुषांच्या वीर्यात एकही स्पर्म नसतो. राजेश यांना हाच आजार झाला होता.

पुरुषांमध्ये वंध्यत्व येण्याची काही कारणं अद्यापही समजलेली नाही.

मर्यादित समज

डॉ.टॉमी टँग Reproductive Medicine क्षेत्रात तज्ज्ञ आहेत. त्यांच्या मते स्त्रियांच्या तुलनेत पुरुषांच्या बाबतीत मर्यादित माहिती आपल्या समाजात आहे. त्यांच्या वंध्यत्वाची कारणं लक्षात घेतली जात नाहीत.

“पुरुषांनाही समस्या असतात हा मेसेज जायला हवा. वंध्यत्वाच्या समस्या 50 टक्के आजारांमुळे होतात इतर पन्नास टक्के कारणं आहेत ते अद्याप कळलं नाही.” ते म्हणतात.

“स्पर्मची संख्या कमी होणं यासाठी जीवनशैलीसुद्धा मोठ्या प्रमाणात जबाबदार आहे. वाढलेलं वजन, योग्य आहाराचा अभाव, धुम्रपान, दारू पिणं यामुळेही वंध्यत्व येतं, ” टँग पुढे सांगतात.

पुरुषांमध्ये वंध्यत्व निवारणासाठीच्या उपायांमध्ये गेल्या 25 वर्षांमध्ये मोठी सुधारणा झाली आहे.

Intracytoplasmic sperm injection (ICSI) या तंत्रज्ञानामुळे स्पर्म थेट स्त्री बीजात टाकण्याची सोय झाली आहे. स्पर्म काऊंट कमी असेल तर या तंत्रज्ञानाचा उपयोग होतो.

पुरुषांमधलं वंध्यत्व कमी करण्यासाठी या तंत्रज्ञानाचा मोठा फायदा झाला आहे.

जर एखाद्या कारणाने स्पर्म ब्लॉक झाले असतील तर टेस्टिक्युलकर बायोप्सी या तंत्रज्ञानाचा वापर करून थेट वृषणातून स्पर्म काढता येतात.

याचाच अर्थ असा की ज्या पुरुषांना वंध्यत्वाची समस्या आहे त्यांच्यासाठी अनेक उपाय सध्या उपलब्ध आहेत.

डॉ. डेबोराह लुटन हे एम्ब्रियॉलॉजिस्ट आहेत. ते म्हणाले, “गेल्या काही वर्षांत अनेक पर्याय उपलब्ध झाले आहेत. याआधी आम्ही उपचार करू शकायचो नाही किंवा डोनरचा शोध घ्यायचो.”

याच तंत्रज्ञानामुळे राजेश यांना दिलासा मिळाला. पण त्यासाठी त्यांना मोठी किंमत मोजावी लागली.

सहा महिन्याची वाट पाहिल्यानंतर या बायोप्सीसाठी त्यांना मोठी रक्कम मोजावी लागली. बायोप्सीमध्ये त्यांचे स्पर्म ब्लॉक झाल्याचं कळलं. त्यानंतर डॉक्टरांनी स्पर्म काढले आणि त्यांना IVF करण्याचा सल्ला दिला.

“आमच्याकडे हे सगळं करण्यासाठी पैसा होता हे नशीब. ज्यांच्याकडे पैसा नाही, ते माहिती नाही काय करत असावेत. कारण खूप जास्त वाट पहावी लागते,” ते पुढे म्हणाले.

राजेश आणि त्यांची बायको आता वेगवेगळे पर्याय धुंडाळत आहेत.

वंध्यत्वाचा पुरुषांच्या मानसिक आरोग्यावरही खूप परिणाम होतो. अशी वेळ आयुष्यात कधीही आली नाही असं राजेश सांगतात.

या सगळ्या परिस्थितीचा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावरही खूप परिणाम होतो, असं ते पुढे म्हणाले.

ही परिस्थिती टाळण्यासाठी काय करता येईल?

एखाद्या जोडप्याला मूल हवं असेल आणि त्या परिस्थितीत जर अशी काही बातमी कळली तर त्याचा मानसिक आणि शारीरिक त्रास होतो.

जागतिक आरोग्य संघटनेच्या व्याख्येनुसार एखादं जोडपं कोणत्या गर्भनिरोधक साधनाशिवाय वर्षभर सेक्स करत असतील आणि तरीही गर्भधारणा झाली नाही तर त्याला वंध्यत्व म्हणतात.

अशी शंका आल्यास जोडप्याने एकत्र चाचणी करावी. पुरुषांची चाचणी ही तुलनेने सोपी असते.

मूत्रविकार तज्ज्ञ या चाचण्या करू शकतात. पुरुषांच्या बाबतीत किमान तीनदा तरी सिमेन अनालिसीस करावा.

योग्य औषधोपचार डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यावे. काही तज्ज्ञांच्या मते नुसतेच औषधोपचार तितकेसे प्रभावी ठरत नाहीत.

हार्मोन्समध्ये काही बिघाड झाल्यासच औषधोपचार प्रभावी ठरतात. Assisted reproduction techniques (ART) या तंत्रज्ञानामुळेही या समस्येवर उपाय निघू शकतात.

पुरुषांनी या समस्यांची मोकळेपणी चर्चा केली तरी बऱ्याच समस्यांमधून मार्ग निघू शकतो.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)