You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
तेलंगणमधील बीआरएस पक्षाच्या के. कविता यांना ईडीने केली अटक
बीआरएस नेत्या के कविता यांना ईडीच्या पथकाने आज (15 मार्च) अटक केली आहे.
कविता यांच्या घरावरही ईडीने छापे टाकले.
या छाप्याविरोधात बीआरएस कार्यकर्त्यांनी के कविता यांच्या घराबाहेर निदर्शने केली. दिल्लीतील कथित दारू घोटाळ्याप्रकरणी ही अटक करण्यात आली आहे.
या प्रकरणी सीबीआयने डिसेंबर 2022 मध्ये के कविता यांची चौकशी केली होती. के कविता यांचेही नाव सीबीआयच्या आरोपपत्रात होते.
मार्च 2023 मध्ये ईडीने के कविता यांची सुमारे नऊ तास चौकशी केली होती. 2023 मध्ये ईडीने के कविता यांची तीनदा चौकशी केली होती. के कविता या तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री केसीआर राव यांच्या कन्या आहेत.
गेल्या वर्षी ईडीनं केली होती चौकशी
तेलंगणचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांची कन्या, भारत राष्ट्र समिती (बीआरएस)दलाच्या नेत्या के.कविता यांची मार्च 2023 मध्ये दिल्ली मद्य धोरणासंदर्भात दिल्लीत ईडीसमोर चौकशी सुरू झाली.
दिल्ली मद्य धोरणाशी संबंधित मनी लॉन्ड्रिंगप्रकरणी कविता यांची ही चौकशी करण्यात येत असल्याचे सांगण्यात आलं.
या कथित घोटाळ्यासंदर्भात आरोपी आणि कविता यांना समोरासमोर आणणे तसंच कविता यांचं जवाब घेणे यासाठी ईडीने त्यांना पाचारण केलं.
44वर्षीय कविता सकाळी 11वाजता अब्दुल कलाम मार्गावरील ईडीच्या कार्यालयात पोहोचल्या. यावेळी ईडीच्या कार्यालयाबाहेर मोठ्या प्रमाणावर दिल्ली पोलीस आणि केंद्रीय अर्धसैनिक दलाच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या होत्या.
कविता ईडी कार्यालयात पोहोचण्यापूर्वी बीआरएसच्या नेत्यांनी अब्दुल कलाम मार्गावर जोरदार घोषणाबाजी केली होती.
ईडीने कविता यांना 9 मार्च 2023 ला सादर होण्यास सांगितलं होतं. मात्र संसदेच्या सत्रात प्रदीर्घ काळ प्रलंबित महिला आरक्षण विधेयकाच्या मागणीसाठी शुक्रवारी दिल्लीत त्यांनी उपोषण केलं होतं. त्यामुळे त्यांनी नवी तारीख मागितली होती.
कविता यांना हैदराबादमधील उद्योग अरुण रामचंद्रन यांच्यासमोर आणायचं होतं. ईडीने या आठवड्याच्या सुरुवातीला अरुण रामचंद्रन पिल्लई यांना अटक केली होती.
ईडीचा आरोप आहे की दक्षिणेतील एका उद्योगसमूहाने दिल्लीतल्या आप सरकारला 100 कोटी रुपयांची लाच दिली होती. जेणेकरुन दिल्लीतल्या मद्य कारभारापैकी मोठा वाटा हाती लागेल.
केसीआर यांनी राज्यात पक्षाची जबाबदारी मुलगा केटीआर यांच्याकडे तर राष्ट्रीय स्तरावर कविता काम करणार असं नियोजन केलं.
के कविता कोण आहेत?
2014 मध्ये त्यांनी पहिल्यांदा निवडणूक लढवली. निझामाबाद मतदारसंघातून लोकसभा खासदार झाल्या. 2019 मध्ये भाजप उमेदवाराविरुद्ध त्यांचा पराभव झाला. पराभवानंतर कविता राजकारणात आणखी सक्रिय झाल्या. 2024 निवडणूही त्या लढतील अशी चिन्हं आहेत.
आक्रमक पद्धतीने राजकारणासाठी प्रसिद्ध कविता यांचे सर्व पक्षातील नेत्यांशी चांगले संबंध आहेत. 2006 मध्ये त्यांनी तेलंगणा जागृती संघटना तयार केली होती.
तेलंगण राज्य निर्मितीसाठी त्यांनी वडिलांच्या बरोबरीने भूमिका निभावली. युवकांना राज्यनिर्मितीच्या आंदोलनात आणण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. या युवा संघटनेतील मंडळींना त्यांनी रोजगारही मिळवून दिला. या चळवळीमुळे त्या तरुण वर्गात लोकप्रिय आहेत.
केसीआर यांनी मांडलेल्या कल्याणकारी योजना प्रत्यक्ष राबवण्यात कविता यांचा वाटा आहे. तेलंगणतल्य पुष्प उत्सव बथुकम्मा त्यांनी मोठ्य़ा पातळीवर आयोजित केला.
कविता यांनी कॉम्प्युटर सायन्स विषयात इंजिनियरिंगचं शिक्षण घेतलं आहे. अमेरिकेत मास्टर्सचं शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी तिथे काही काळ नोकरीही केली. तिथून परतल्यानंतर तेलंगणमध्ये राजकीय कारकीर्द सुरू केली. 2003 मध्ये त्यांचं अनिल कुमार यांच्याशी लग्न झालं. त्यांना दोन मुलंही आहेत.
के. चंद्रशेखर राव कोण आहेत?
चंद्रशेखर राव हे दिवंगत नेते एन. टी. रामाराव यांचे खूप मोठे चाहते आहेत. इतकं की त्यांनी आपल्या मुलाचं नावही त्यांच्याच नावावरून ठेवलं.
राव यांनी आपली राजकीय कारकिर्द तेलुगू देसम पक्षातून सुरू केली. ते पक्षाचे मधल्या फळीतील नेते म्हणून ओळखले जात. याच भूमिकेत त्यांनी कित्येक वर्षे पक्षात घालवली. हाच त्यांचा पहिला डाव होता, असं आपण म्हणू शकतो.
आता दुसऱ्या डावाबाबत बोलू. पुढे स्वतंत्र तेलंगण राज्याच्या मुद्द्यावरून के. चंद्रशेखर राव यांनी स्वतःचा तेलंगण राष्ट्र समिती (TRS) हा पक्ष स्थापन केला. या माध्यमातून त्यांनी सुमारे 20 वर्ष संघर्ष करत विविध प्रकारच्या आव्हानांशी दोन हात केले. आता या पक्षाचं नाव बीआरएस असं झालं आहे.
तेलंगण राज्य स्थापन झालं, त्यावेळी राव हे केवळ मुख्यमंत्रीच बनले नाहीत, तर राज्याच्या राजकारणात धक्का लागू शकणार नाही, असं सर्वोच्च स्थानही त्यांनी काबीज केलं.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)