अजित पवारांचा गट शरद पवारांना सतत का भेटतोय? या भेटींचा राजकीय अर्थ काय आहे?

    • Author, दीपाली जगताप
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

अधिवेशन सुरू होताच राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली ती राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन गट एकमेकांसमोर उभे ठाकणार अशी, शिवाय अजित पवार यांच्यासोबत किती आमदार आहेत हे चित्र सुद्धा विधानसभेत स्पष्ट होईल अशी दाट शक्यता होती. परंतु प्रत्यक्षात असं काहीच घडलं नाही, याउलट अजित पवार आपल्या आमदारांसह थेट शरद पवार यांच्या भेटीला गेले.

सलग दुसऱ्या दिवशी अजित पवार आणि शरद पवार यांच्यात सर्व ज्येष्ठ नेते आणि आमदारांच्या उपस्थितीत झालेल्या भेटीमुळे आता अनेक प्रश्न उपस्थित होतात.

पक्षात फूट पडल्यानंतरही दोन्ही गटाचे नेते विशेषत: नेतृत्व यांची एकमेकांत काय चर्चा सुरू आहे? पक्षावर दावा करणारे अजित पवार शरद पवार यांची वारंवार का भेट घेत आहेत? आणि शरद पवार आपल्यावर वैयक्तिक टिप्पणी केलेल्या नेत्यांना भेटण्यासाठी वेळ का देत आहेत? या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्याचा प्रयत्न आपण या लेखात करत आहोत.

घटनाक्रम - नेमकं काय घडलं?

17 जुलैची सकाळ शरद पवारांच्या एका मोठ्या बातमीनेच उजाडली. कारण या दिवशी सकाळी 9 वाजता शरद पवार बंगळुरू या ठिकाणी राष्ट्रीय विरोधकांच्या बैठकीला जाणार होते पण पवारांनी हा दौरा रद्द केला अशी बातमी समोर आली.

या बातमीने एकच खळबळ उडाली. याचं कारण म्हणजे आदल्यादिवशी (16 जुलै) अजित पवार यांच्यासह 9 मंत्र्यांनी शरद पवार यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर शरद पवारांनी विरोधी पक्षांच्या बैठकीला जाणं टाळलं का? अशी चर्चा सुरू झाली.

परंतु काही तासात पक्षाचे प्रवक्ते महेश तपासे यांनी स्पष्ट केलं की, शरद पवार 18 जुलै रोजी विरोधी पक्षांच्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.

दरम्यान, पावसाळी अधिवेशनाला विधिमंडळात सुरुवात (17 जुलै) झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत अजित पवार आपल्या मंत्र्यांसह सत्ताधारी पक्षाच्या बाजूला बसले.

यावेळी विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार मोठ्या संख्येने गैरहजर होते. यामुळे कोणाच्या गटात किती आमदार हे अद्यापही स्पष्ट नसून याबाबतचा संभ्रम कायम आहे.

तर दुस-याबाजूला राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे मुख्य प्रतोद जितेंद्र आव्हाड हे सुद्धा अनुपस्थित राहीले. अधिवेशनाच्या काळात व्हिपकडून (प्रतोद) आपल्या आमदारांना सभागृहात उपस्थित राहण्याच्या सूचना केल्या जातात परंतु जितेंद्र आव्हाड स्वतःच गैरहजर राहिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या.

इतकच नाही तर विरोधकांनी विविध मुद्यांवर विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन सुरू केलं. पण या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार दिसले नाहीत. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या भूमिकेबाबत पुन्हा प्रश्न उपस्थित करण्यात आले.

यानंतर काही तासातच अजित पवार आपल्या समर्थनात असलेल्या आमदारांना घेऊन वाय. बी. चव्हाण सेंटर येथे शरद पवार यांना भेटण्यासाठी पोहचले.

सलग दुसऱ्या दिवशी अजित पवार गट आणि शरद पवार यांच्यात चर्चा झाल्याने दोन गट एकत्र येणार का? अशी चर्चा सुरू झाली.

शिवाय, मंत्र्यांनंतर आमदारही शरद पवार यांना भेटल्याने शरद पवार नेमके कोणाच्या बाजूने आहेत? असाही प्रश्न विचारला जाऊ लागला.

एका आमदाराने खासगीत नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितलं की, अजित पवारांसोबत मंत्री भेटून आल्यानंतर अधिवेशनादरम्यान आमदारांनीही अजित पवार यांच्याकडे शरद पवार यांना भेटण्याची इच्छा असल्याचा आग्रह धरला.

फक्त तुम्ही सगळे भेटून आलात आम्हालाही मतदारसंघात जायचं आहे तेव्हा आमचीही भेट घडवून आणा अशी विनंती केल्याने या कारणास्तव ही भेट घडल्याची माहिती आहे.

ही भेट जवळपास पाऊण तास चालली. सुरुवातीला काही कारणास्तव आमदारांना शरद पवार यांच्या दालनात आतमध्ये घेण्यात आलं नाही. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आल्यानंतर शरद पवार आमदारांना भेटले.

यापूर्वी 2 जुलै रोजी अजित पवारांसह राष्ट्रवादीतील 9 मंत्र्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.

5 जुलै रोजी शक्तिप्रदर्शन करत दोन्ही गटांकडून जाहीर बैठकांचा कार्यक्रम करण्यात आला.

13 जुलै रोजी खाते वाटपासंदर्भात अजित पवार यांना थेट दिल्ली गाठावी लागली. त्यांच्यावर यावरून टीकाही झाली.

14 जुलै रोजी अजित पवार यांना अर्थ खातं आणि इतर मंत्र्यांनाही मोठी खाती देण्यात आली.

याच दिवशी अजित पवार आपल्या काकींची भेट घेण्यासाठी सिल्व्हर ओक या शरद पवार यांच्या निवासस्थानी गेले.

यानंतर 16 जुलै रोजी आपल्या मंत्र्यांसह त्यांनी पुन्हा एकदा शरद पवार यांची भेट घेतली. तर 17 जुलै रोजी आपल्या आमदारांसह ते पुन्हा वाय. बी. चव्हाण सेंटरला शरद पवार यांची भेट घेण्यासाठी पोहोचले.

मार्ग काढण्याची विनंती

शरद पवार आणि अजित पवार यांच्यात आणि नंतर आमदारांसोबत नेमकी काय चर्चा झाली हा महत्त्वाचा मुद्दा आहे.

या संदर्भात बोलताना अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते, खासदार प्रफुल्ल पटेल म्हणाले, "शरद पवारांचे आशीर्वाद घेण्यासाठी आम्ही यशवंतराव चव्हाण सेंटरला आलो होतो. पक्ष एकसंध राहावा या दिशेनं शरद पवारांनी प्रयत्न करावा, अशी विनंती केली आहे."

तर दुसऱ्या बाजूला शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शरद पवार यांची भूमिका स्पष्ट असल्याचं म्हटलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष विरोधी पक्षातच आहे असंही ते म्हणाले.

“आलेल्या आमदारांनी शरद पवारांना यातून मार्ग काढण्याची विनंती केली,” असं जयंत पाटील यांनी सांगितलं.

“या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी तुम्हीच उपाय सुचवा,” असं शरद पवार या आमदारांना म्हणाल्याचं पाटील यांनी सांगितलं आहे.

"रविवारी विरोधी पक्षाची बैठक झाली त्यानंतर मी वाय. बी. चव्हाण येथे होतो. दुसऱ्या दिवशीच्या आंदोलनाबाबत आम्हाला नेमकी कल्पना नव्हती. त्यावेळी मी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची बैठक घेत होतो यामुळे खाली पाय-यांवर आंदोलन सुरू आहे हे माहिती नव्हतं."

"आम्ही विरोधी पक्षच आहोत. विरोधी पक्षाची भूमिकाच आमची भूमिका आहे," असंही त्यांनी स्पष्ट केलं.

संवाद बंद केल्यानं नुकसान होतं त्यामुळे संवाद चालू ठेवणं आवश्यक आहे, असं जयंत पाटील यांनी म्हटलंय.

तसंच मंत्रिपदाची शपथ घेतलेले आमदार सोडून सर्वजण राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार यांच्याबरोबरच असल्याचा दावा जयंत पाटील यांनी केला आहे.

“जे पवारांना घरी बसा बोलले तेच त्यांना भेटायला आले यातच सर्व आलं,” असा टोलासुद्धा यावेळी पाटील यांनी हाणला आहे.

"रविवारी विरोधी पक्षाची बैठक झाली त्यानंतर मी वाय बी चव्हाण येथे होते. दुसऱ्या दिवशीच्या आंदोलनाबाबत आम्हाला नेमकी कल्पना नव्हती. त्यावेळी मी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची बैठक घेत होतो यामुळे खाली पाय-यांवर आंदोलन सुरू आहे हे माहिती नव्हतं," असंही त्यांनी स्पष्ट केलं.

राजकीय अर्थ काय?

पक्षात मोठं बंड झाल्यानंतर आणि पक्षात उभी फूट पडल्यानंतरही शरद पवार आणि अजित पवार यांच्यात भेटीगाठी किंवा संवाद सुरू असल्याने यामागील नेमकी राजकीय खेळी काय? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

शरद पवार यांच्यावर टीका करूनही, पक्षावर दावा करूनही ते अजित पवार यांच्याशी चर्चा का करत आहेत? कुठल्या मुद्यावर दोघांमध्ये चर्चा सुरूय? अजित पवार गटातील आताच्या परिस्थितीतून मार्ग काढावा असं आमदारांना का वाटतं? असेही प्रश्न आहेत.

यासंदर्भात बोलताना सुधीर सूर्यवंशी सांगतात, "शरद पवार आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. पण अजित पवार गटाने सत्तेत सामील झाल्यावरही त्यांना वारंवार त्यांना भेटायला जाणं याचा अर्थ त्यांच्याशिवाय राजकीय भविष्य नाही हे त्यांच्या लक्षात येत असावं किंवा शरद पवार यांची साथ सोडल्यास मतदारसंघात भविष्यात अडचण येऊ शकते हे लक्षात आल्याने त्यांनी शरद पवार यांची भेट घेतली."

"मंत्रिपद मिळाल्यानंतर आणि सत्तेत सामील होऊनही अजित पवार गटाला शरद पवार यांची गरज भासते? त्यांचे आमदार अस्वस्थ आहेत हे यातून दिसतं," असंही ते सांगतात.

या भेटीमागे पर्सेप्शनची खेळी असल्याचंही म्हटलं जात आहे. म्हणजे आपली प्रतिमा जनतेसमोर नकारात्मक होऊ द्यायची नाही यासाठीही अजित पवार गटाचा हा प्रयत्न असू शकतो.

शिवसेनेत बंड झाल्यानंतर गेल्या वर्षभरात आपण पाहिलं की, शिंदे गटातील आमदारांवर तीव्र आरोप झाले, ठाकरे गटाने केलेला खोक्यांंचा आरोप अगदी कानाकोपऱ्यात पोहचला आणि दुसरीकडे ज्या पद्धतीने बंड झालं यानंतर उद्धव ठाकरे यांनाही सहानुभूती मिळत असल्याचं चित्र दिसलं.

आता यातूनच धडा घेत राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडानंतर अजित पवार गटाकडून सावध खेळी खेळली जात आहे का असाही प्रश्न आहे.

खरं तर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांची जडणघडण वेगळी आहे.

ज्येष्ठ पत्रकार विनया देशपांडे सांगतात, "राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष शिवसेनेप्रमाणे भावनिकतेच्या आधारावर घडला गेलेला नाही. तर याउलट शरद पवार हे भावनीक आणि तर्क शुद्ध राजकारण किंवा कूटनीतीचं राजकारण अधिक करतात असं मला वाटतं. यामुळे शिवसेनेतल्या बंडानंतर जे चित्र त्यांच्या दोन गटात दिसलं ते राष्ट्रवादीत दिसत नाही."

"शिवाय,शिवसेनेत बंड केलेल्या आमदारांनी किंवा दोन्ही बाजूंनी तात्काळ एकमेकांवर टोकाची टीका करण्यात आली. यामुळे संवादाचे मार्ग बंद झाले आणि प्रकरण आणखी चिघळत गेलं. यामुळे संवाद सुरू आहे असं दिसतं,"

राष्ट्रवादी हा पक्ष शरद पवार यांनी स्वत: स्थापन केला आहे.

ते निष्णात राजकारणी आहेत. आता या घडामोडींमुळे संभ्रम निर्माण होतोय की संभ्रम कायम ठेवला जातोय हा प्रश्न उपस्थित व्हायला वाव आहे.

त्या पुढे सांगतात,"अनेक आमदार भविष्याचाही विचार करत आहेत, साहेबांनी संधी दिली असली, मोठं केलं असलं तरी अजितदादांचंही यात योगदान आहे असंही आमदारांना वाटतं."

शरद पवार यांनी अद्याप या भेटीबाबत कुठलंही भाष्य केलेलं नाही. परंतु शरद पवार आपल्या भूमिकेवर ठाम आहेत असं त्यांच्या गटातले नेते सांगत आहे.

येत्या काळात याचे काय पडसाद उमटतात आणि अजित पवार यांच्याकडे किती आमदार आहेत? यावर राजकीय आणि कायदेशीर बाबी अवलंबून आहेत.

हेही वाचलंत का?

बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)