शिवसेना आमदार अपात्रता : राहुल नार्वेकरांनी दिलेल्या निकालातले 5 महत्त्वाचे मुद्दे

फोटो स्रोत, ANI
एकनाथ शिंदे गटालाच मूळ शिवसेना म्हणून मान्यता देत असल्याचा निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिला आहे.
21 जून 2022 ला शिवसेनेमध्ये फूट पडली. त्यामुळे त्या तारखेनंतर सुनील प्रभूंचा व्हीप लागू होत नाही आणि त्यामुळेच भरत गोगावले यांची व्हीप म्हणून केलेली नियुक्ती योग्य असल्याचंही नार्वेकर यांनी स्पष्ट केलं.
या निकालामुळे एकनाथ शिंदे गटाच्या 16 आमदारांना दिलासा मिळाला आहे.
शिवसेनेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांचे 40 आमदार अपात्र ठरणार की उद्धव ठाकरे यांच्या गटातील 14 आमदार अपात्र ठरणार यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज (10 जानेवारी) निकाल दिला.
शिवसेनेत झालेल्या ऐतिहासिक बंडानंतर पक्षाच्या दोन्ही गटांनी म्हणजेच शिंदे आणि ठाकरे गटाकडून एकमेकांच्या आमदारांना अपात्र ठरवण्यासाठी याचिका दाखल केल्या होत्या.
विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर सप्टेंबर 2023 ते डिसेंबर 2023 या कालावधीत शिवसेनेच्या आमदारांची सुनावणी पूर्ण झाली. त्याचा निकाल राहुल नार्वेकर यांनी वाचून दाखवला.
या निकालातले पाच प्रमुख मुद्दे कोणते होते?
1. शिवसेनेची 2018 घटना अमान्य
सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्देशांनुसार खरी शिवसेना कोणती हा महत्त्वाचा मुद्दा असल्याचं राहुल नार्वेकर यांनी म्हटलं. पक्षाची घटना, नेतृत्व आणि विधीमंडळ बहुमत यांचा विचार करून निर्णय घेतला जाईल, असं त्यांनी म्हटलं.
पक्षाच्या घटनेबद्दल बोलताना राहुल नार्वेकर यांनी म्हटलं की, “दोन्ही गटांकडून घटना मागवल्या गेल्या होत्या. उद्धव ठाकरेंकडून 2018 सालातील घटना सादर केली होती. मात्र ही घटना निवडणूक आयोगाच्या रेकॉर्डवर नाही."
2018 साली पक्षाच्या घटनेत केलेले बदल ग्राह्य धरले जाणार नसून 1999 साली निवडणूक आयोगाला सादर केलेली घटनाच स्वीकारली जाईल, असं राहुल नार्वेकरांनी स्पष्ट केलं.
2018 सालातील घटना मान्य केली जावी अशी मागणी ठाकरे गटाची होती, तर 1999 ची घटना ग्राह्य धरली जावी, अशी मागणी एकनाथ शिंदे गटाची होती.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
2. एकनाथ शिंदेंना काढण्याचा अधिकार ठाकरेंना नाही
21 जून 2022 पासून शिवसेनेत दोन गट पडले. 22 जूनलाच ही गोष्ट समोर आली. आता माझ्यासमोर कोणता गट हा खरी शिवसेना आहे, हा प्रश्न आहे. नेतृत्वाची रचना समजून घेण्यासाठी पक्षघटनेचा आधार घेतला जाईल, असं राहुल नार्वेकरांनी म्हटलं.
2018 मध्ये घटनेत अध्यक्षांचा उल्लेख 'शिवसेना पक्षप्रमुख' असा करण्यात आला. 1999 मध्ये अध्यक्षांना 'शिवसेनाप्रमुख' असे म्हटले आहे. 2018 ची नेतृत्व रचना शिवसेनेच्या घटनेशी सुसंगत नव्हती. 2018 ची नेतृत्वरचना पदाधिकाऱ्यांच्या तीन श्रेणींना प्रदान करते. घटनेत पदाधिकार्यांच्या तीन श्रेणींचीही तरतूद आहे पण या श्रेणी वेगळ्या आहेत.
शिवसेना प्रमुख हे शिवसेनेतलं सर्वोच्च पद आहे. पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत 19 सदस्य आहेत. 2018 च्या बदलानुसार शिवसेनेत 13 सदस्य आहेत. पक्षप्रमुख हे सर्वोच्च पद आहे. मात्र ते ग्राह्य धरता येणार नाही कारण ते शिवसेनेच्या घटनेत ते नाही. उद्धव ठाकरे गटाने केलेल्या दाव्याला सिद्ध करणारे पुरावे नाहीत.

फोटो स्रोत, Uddhav Thackarey
1999 च्या घटनेत शिवसेनाप्रमुख हे जे पद आहे, त्याच धर्तीवर 2018 च्या घटनेतील पक्ष प्रमुख हे पद आहे. आणि पक्षप्रमुखांना निर्णयाचा एखाद्या व्यक्तिला पक्षातून काढण्याचा अंतिम आधिकार असेल असं उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून म्हटलं गेलं होतं. पण शिवसेना पक्षप्रमुखांना कोणत्याही सदस्याला पक्षातून काढण्याचा अनिर्बंध अधिकार नाही.
कारण पक्ष प्रमुखांचा हा अधिकार मान्य केला, तर ते कोणत्याही व्यक्तीला दहाव्या परिशिष्टाचा आधार घेत पक्षातून काढू शकतात. त्यामुळे उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना पक्षातून काढण्याचा अधिकार मान्य नाही, असं स्पष्ट मत राहुल नार्वेकरांनी व्यक्त केलं.
3. एकनाथ शिंदेंची शिवसेना हाच मूळ राजकीय पक्ष
कोणता गट हा खरा पक्ष आहे, हे ठरवण्यासाठी 2018 ची घटना ही मोजपट्टी मानता येणार नाही.
नेतृत्वाबद्दलही पुरेसं विवेचन केलं आहे, असं म्हणत राहुल नार्वेकरांनी म्हटलं की, विधीमंडळातील बहुमताचा विचार करून कोणता गट हा खरी शिवसेना आहे, याचा निर्णय घेत आहे.
बहुमत हे एकनाथ शिंदे गटाकडे आहे आणि त्यामुळे त्यांना मूळ राजकीय पक्ष म्हणून मान्यता देत आहे, असा निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिला आहे.
4. भरत गोगावलेंचा व्हीप वैध
21 जून 2022 ला शिवसेनेमध्ये फूट पडली. त्यामुळे त्यानंतर सुनील प्रभूंना (ठाकरे गटाचे व्हीप) आमदारांची बैठक बोलावण्याचा अधिकारच नव्हता. त्यामुळेच त्यांच्या बैठकीला आमदार गैरहजर होते हा मुद्दा विचारात घेतला जाणार नाही, असं राहुल नार्वेकरांनी स्पष्ट केलं.

फोटो स्रोत, FACEBOOK/BHARAT GOGAWALE
प्रभू यांनी तो व्हीप व्हॉट्सअॅपवर पाठवला होता. त्यामुळे तो व्हीप सर्वांना मिळाल्याचे कोणतेही पुरावे ठाकरे गटाकडे किंवा प्रभू यांच्याकडे नसल्याचा मुद्दाही नार्वेकरांनी निकाल वाचताना मांडला.
भरत गोगावले यांची व्हीप म्हणून केलेली नियुक्ती योग्य असल्याचंही नार्वेकरांनी म्हटलं.
5. कोणाचेच आमदार अपात्र नाहीत
राहुल नार्वेकर यांनी एकनाथ शिंदे आणि त्यांच्या आमदारांना दिलासा देतानाच, ठाकरे गटाच्या आमदारांनाही अपात्र ठरवलं नाही.
ठाकरे गटाच्या आमदारांनाही अपात्र ठरवलं नाहीये.
संपर्काच्या बाहेर गेले, केवळ याच कारणास्तव आमदारांना अपात्र ठरविता येणार नाही. शिवाय, ठाकरे गटाचे मिलिंद नार्वेकर, रविंद्र फाटक यांनी सुरतेत एकनाथ शिंदे यांची भेट घेतली हेही सिद्ध झालं असल्याचं राहुल नार्वेकरांनी म्हटलं.
बैठकीला गैरहजर राहणं हे पक्षातून हकालपट्टीचं कारण होऊ शकत नसल्याचं नार्वेकर यांनी स्पष्ट केलं.
दुसरीकडे नार्वेकरांनी उद्धव ठाकरे गटाच्या आमदारांनाही अपात्र ठरवलं नाही.
गोगावलेंनी पाठवलेला व्हिप व्हॉट्स अप वरुन पाठवला तो ही अनोळखी नंबरवरून तो मान्य केला जाऊ शकत नाही. त्यात अनियमितता आहेत.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








