शिवसेना पक्षाची 1999ची घटना काय सांगते, ज्यामुळे एकनाथ शिंदेंना मूळ पक्ष मिळाला

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या समोर झालेल्या शिवसेनेच्या आमदार अपात्रतेच्या सुनावणीचा निकाल नार्वेकरांनी बुधवारी (10 जानेवारी) संध्याकाळी सुनावला.
सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्देशांनुसार खरी शिवसेना कोणती हा महत्त्वाचा मुद्दा असल्याचं राहुल नार्वेकर यांनी म्हटलं. पक्षाची घटना, नेतृत्व आणि विधीमंडळ बहुमत यांचा विचार करून निर्णय घेतला जाईल, असं त्यांनी म्हटलं.
पक्षाच्या घटनेबद्दल बोलताना राहुल नार्वेकर यांनी म्हटलं की, “दोन्ही गटांकडून घटना मागवल्या गेल्या होत्या. उद्धव ठाकरेंकडून 2018 सालातील घटना सादर केली होती. मात्र ही घटना निवडणूक आयोगाच्या रेकॉर्डवर नाही."
2018 साली पक्षाच्या घटनेत केलेले बदल ग्राह्य धरले जाणार नसून 1999 साली निवडणूक आयोगाला सादर केलेली घटनाच स्वीकारली जाईल, असं राहुल नार्वेकरांनी स्पष्ट केलं.
त्यावेळी 23 जानेवारी 2018 साली संघटनात्मक अंतर्गत निवडणुका झाल्याचं सुनील प्रभू यांनी म्हटलं होतं, मात्र प्रतिपक्षाकडून अशा निवडणुका झाल्या नसल्याचं पुराव्यानिशी सिद्ध केलं गेलं, असंही राहुल नार्वेकर यांनी म्हटलं.
त्यामुळे एकनाथ शिंदेंना काढण्याचा अधिकार ठाकरेंना नाही, असं नार्वेकर यांनी म्हटलं.
निवडणूक आयोगामध्ये दाखल करण्यात आलेली 1999 ची शिवसेनेची घटना हीच वैध मानता येणार असल्याचं राहुल नार्वेकर यांच्याकडून स्पष्ट करण्यात आलं.
त्याचा आधार घेत शिंदे यांनी केलेली घटनादुरुस्ती वैध ठरवण्यात आली आहे.
त्यामुळं या निकालामध्ये पक्षाची घटना आणि या घटनेनुसार पक्षाची नेतृत्वाची रचना हीच महत्त्वाची असल्याचं समोर आलं.
1999 मधील शिवसेनेच्या घटनेनुसार पक्षाची नेतृत्वाची रचना नेमकी कशी होती? त्यातील पदे, त्यांची नियुक्ती या सर्वाबाबत आपण जाणून घेणार आहोत.
21जून 2022 पासून शिवसेनेत दोन गट पडले. 22 जूनलाच ही गोष्ट समोर आली. आता माझ्यासमोर कोणता गट हा खरी शिवसेना आहे, हा प्रश्न आहे. नेतृत्वाची रचना समजून घेण्यासाठी पक्षघटनेचा आधार घेतला जाईल, असं राहुल नार्वेकरांनी म्हटलं.
'शिवसेना प्रमुख' पद सर्वोच्च
शिवसेनेच्या पक्षाच्या घटनेच्या कलम 8 मध्ये संघटनेची रचना कशी असेल हे स्पष्ट करण्यात आलं आहे. यातील परिशिष्ट A मधील रचनेनुसार पक्षातील सर्वोच्च पद हे 'शिवसेना प्रमुख' हे आहे.
शिवसेना प्रमुख पदानंतर घटनेनुसार दुसऱ्या क्रमांकावर आहे राष्ट्रीय कार्यकारिणी. म्हणजे राष्ट्रीय कार्यकारिणीतील पदाधिकारी आणि सदस्यांचा यात समावेश असेल.
त्यानंतर पक्षरचनेच्या उतरंडीमध्ये उपनेते, राज्य कार्यकारिणी नंतर राज्यप्रमुख आणि नंतर जिल्हा प्रमुख यांचा समावेश असल्याचा उल्लेख शिवसेनेच्या या घटनेमध्ये आहे.

याशिवाय परिशिष्ट B मध्ये नियुक्तीनुसार काही पदांचा उल्लेख आहे. त्यात राज्य संपर्क प्रमुख, उपराज्य प्रमुख, जिल्हा संपर्क प्रमुख, उपजिल्हा प्रमुख, तालुका प्रमुख, उपतालुका प्रमुख आणि शाखा प्रमुख अशा प्रकारची यात उतरंड दिलेली आहे.
त्याशिवाय शहरांचा विचार करता शहरप्रमुख, विभाग प्रमुख आणि शाखा प्रमुख अशा पदांनुसार पक्षाची नेतृत्वाची रचना स्पष्ट करण्यात आलेली आहे.
घटनेनुसार यापैकी परिशिष्ट A मधील पदाधिकारी निवडणुकीच्या माध्यमातून निवडले जातील आणि परिशिष्ट B मधील पदाधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाऊ शकते.
राष्ट्रीय कार्यकारिणीची रचना
शिवसेनेच्या घटनेच्या कलम 10 नुसार राष्ट्रीय कार्यकारिणीचे आणि पक्षाचे अध्यक्ष शिवसेना प्रमुख असतील. त्यांची निवड ही राष्ट्रीय कार्यकारिणीतील प्रतिनिधी सभेचे सदस्य करतील असं यात म्हटलं आहे.
घटनेच्या कलम 11 B नुसार राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये एकूण 19 सदस्यांचा समावेश असेल. त्यापैकी 14 सदस्य हे प्रतिनिधी सभेने निवडलेले असतील, तसंच राष्ट्रीय कार्यकारिणीच्या सदस्यांना शिवसेना नेते असं म्हटलं जाईल असाही उल्लेख घटनेत आहे.
राष्ट्रीय कार्यकारिणीतील उर्वरित पाच सदस्यांची निवड ही शिवसेना प्रमुख राष्ट्रीय कार्यकारिणीच्या सल्ल्यानुसार करू शकतात असे यात म्हटलं आहे.

शिवसेनेच्या या घटनेच्या कलम 10 आणि 11 मध्ये राष्ट्रीय कार्यकारिणीची रचना आणि पक्षरचनेतील पदाधिकाऱ्यांचे अधिकार याबाबत सविस्तर माहिती दिली आहे.
या घटनेनुसार पक्षाची राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्यांपैकीच सरचिटणीस आणि कोषाध्यक्ष यांची निवड करू शकते, असंही घटनेत म्हटलं आहे.
त्याबरोबरच राष्ट्रीय कार्यकारिणीची किमान 3 महिन्यांमधून एकदा बैठक व्हायला हवी असा उल्लेखही घटनेमध्ये आहे.
प्रतिनिधी सभा म्हणजे कोण?
शिवसेनेच्या या घटनेमध्ये राष्ट्रीय कार्यकारिणी आणि प्रामुख्याने शिवसेना प्रमुख यांची निवड करण्यात प्रतिनिधी सभेला महत्त्वं असल्याचं स्पष्ट झालं आहे.
त्यामुळं ही प्रतिनिधी सभा म्हणजे काय? तिचे सदस्य कोण? असे प्रश्न उपस्थित होतात. त्याचं उत्तरही याच घटनेमध्ये दिलेलं आहे.
शिवसेनेच्या घटनेच्या कलम 11 G नुसार पक्षाच्या प्रतिनिधी सभेमध्ये पक्षातील अनेक प्रमुख पदाधिकाऱ्यांचा समावेश असेल. त्यात शिवसेना प्रमुख, राष्ट्रीय कार्यकारिणी, उपनेते, राज्य संपर्क प्रमुख, जिल्हा संपर्क प्रमुख, राज्य प्रमुख, जिल्हा प्रमुख आणि संसद तसेच विधिमंडळातील निवडून आलेले सदस्य यांचा समावेश असेल.
मुंबईच्या विभाग प्रमुखांना जिल्हा प्रमुखांचा दर्जा देऊन त्यांचाही समावेश या प्रतिनिधी सभेमध्ये करण्यात आल्याचा घटनेत उल्लेख आहे.
प्रतिनिधी सभेच्या सर्व बैठकांचे अध्यक्ष शिवसेना प्रमुख असतील. तसंच शिवसेना प्रमुखांच्या अनुपस्थितीमध्ये प्रतिनिधी सभेच्या सदस्यांनी निवडलेल्या नेत्याकडे बैठकांचे अध्यक्षपद असेल असाही यात उल्लेख आहे.
अशाप्रकारे शिवसेनेच्या 1999 च्या घटनेनुसार पक्षाची नेतृत्वाची रचना कशी असणार हे स्पष्ट करण्यात आलं आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








