ब्रेस्ट कॅन्सरचा तरुण मुलींपासून ते ज्येष्ठ महिलांपर्यंत विळखा; जाणून घ्या 'या' 13 प्रश्नांची उत्तरे

स्तनाचा कर्करोग- कारणे, उपचार आणि पुन्हा होण्याचा धोका; जाणून घ्या प्रत्येक महत्त्वाच्या प्रश्नाचे उत्तर

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, प्रियंका धीमान
    • Role, बीबीसी प्रतिनिधी
  • वाचन वेळ: 6 मिनिटे

सध्या जगभरातील असंख्य महिला स्तनाच्या कर्करोगाशी (Breast Cancer) लढा देत आहेत. तरुण मुलींपासून ते ज्येष्ठ महिलांपर्यंत ही व्याधी सर्वांनाच मोठ्या प्रमाणावर विळखा घालत आहे.

दुर्दैवाने आजही या आजाराबद्दल आणि त्यावरील उपचारांबाबत समाजात अनेक गैरसमज आणि भीती पसरलेली आहे.

स्तनाच्या कर्करोगाला प्रतिबंध करणे आणि त्यावर यशस्वी उपचार करणे शक्य आहे. मात्र त्यासाठी वेळेवर लक्षणं ओळखणं आणि अचूक माहिती असणं अत्यंत गरजेचं आहे.

या रिपोर्टमध्ये आम्ही स्तनाच्या कर्करोगाशी संबंधित तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करणार आहोत.

या विषयावर अधिक सखोल चर्चा करण्यासाठी आम्ही डॉ. राजिंदर कौर यांच्याशी संवाद साधला आहे.

वैशाली (गाझियाबाद) येथील मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये ब्रेस्ट कॅन्सर सर्जन आणि डायरेक्टर म्हणून त्या कार्यरत आहेत.

प्रश्न: एखाद्या महिलेला स्तनाचा कर्करोग झाला असेल तर प्रत्येक वेळी पूर्ण स्तन काढून टाकणे गरजेचे असते का? की स्तन न काढताही उपचार शक्य आहेत?

डॉ. राजिंदर कौर: स्तनाचा कर्करोग झाला म्हणजे पूर्ण स्तन काढून टाकावा लागेल असं मुळीच नाही. आजच्या काळात आम्ही 'ऑन्कोप्लास्टिक ब्रेस्ट कंजर्विंग सर्जरी' (Oncoplastic Breast Conserving Surgery) नावाचं एक आधुनिक तंत्रज्ञान वापरतो.

रुग्ण सुरुवातीच्या टप्प्यात उपचारासाठी आला तर आम्ही फक्त कर्करोगाची गाठ काढून टाकतो. त्यानंतर स्तनाची उर्वरित जागा आणि त्याचा मूळ आकार पुन्हा व्यवस्थित करण्यासाठी प्लास्टिक सर्जरीच्या तंत्राचा वापर केला जातो जेणेकरून स्तनाचे सौंदर्य आणि आकार कायम राखता येतो.

एखाद्या महिलेच्या स्तनांचा आकार मोठा असेल तरीही शस्त्रक्रियेदरम्यान आम्ही तो आकार कमी करून त्यांना योग्य आणि नैसर्गिक रूप देण्याचा प्रयत्न करतो. हे वैद्यकीयदृष्ट्या पूर्णपणे शक्य आहे.

बीबीसीच्या 'हेल्थ सिक्रेट्स' पॉडकास्टमध्ये डॉ. राजिंदर कौर
फोटो कॅप्शन, बीबीसीच्या 'हेल्थ सिक्रेट्स' पॉडकास्टमध्ये डॉ. राजिंदर कौर

प्रश्न : पुरुषांनाही स्तनाचा कर्करोग होऊ शकतो का?

डॉ. राजिंदर कौर: स्तनाचा कर्करोग केवळ महिलांनाच नाही तर पुरुषांनाही होऊ शकतो. जरी याची शक्यता महिलांच्या तुलनेत खूपच कमी असली तरी ती नाकारता येत नाही.

साधारणपणे महिलांमध्ये कर्करोगाची 100 प्रकरणं आढळली तर पुरुषांमध्ये मात्र एखादं प्रकरण समोर येतं.

याचं मुख्य कारण असं की, पुरुषांमध्येही निप्पलच्या खाली 'ब्रेस्ट टिश्यू' (स्तन ऊती) असतात जिथे हा कर्करोग उद्भवू शकतो.

विशेष म्हणजे पुरुषांमधील याची लक्षणंही महिलांसारखीच असतात. जसे की स्तनामध्ये गाठ येणे, निप्पल मधून पाणी येणे किंवा त्या भागात काही बदल जाणवणे.

डॉ. राजिंदर यांच्या मते, भारतात स्तन कर्करोगाचे सर्व प्रकारचे आधुनिक उपचार उपलब्ध आहेत

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, डॉ. राजिंदर यांच्या मते, भारतात स्तन कर्करोगाचे सर्व प्रकारचे आधुनिक उपचार उपलब्ध आहेत

प्रश्न: स्तनाच्या कर्करोगाची नेमकी लक्षणं काय आहेत?

स्तनाच्या कर्करोगाची लक्षणं वेळेत ओळखणं खूप महत्त्वाचं आहे. डॉ. राजिंदर कौर यांच्या म्हणण्यानुसार, जर छातीत एखादी अशी गाठ जाणवली ज्यामध्ये वेदना होत नसतील पण त्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका.

यासोबतच निप्पल मधून कोणताही द्रव पदार्थ बाहेर येणे, निप्पल आतल्या बाजूला दबले जाणे, तिथली त्वचा कडक किंवा लाल होणे आणि छातीच्या नैसर्गिक आकारात बदल होणे ही सर्व सुरुवातीची लक्षणं आहेत. असं काहीही जाणवल्यास लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

डॉ. राजिंदर यांच्या मते, स्टेज-1 आणि स्टेज-2 स्तन कर्करोगामध्ये 90 ते 95 टक्के रुग्णांचे प्राण वाचवता येऊ शकतात

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, डॉ. राजिंदर यांच्या मते, स्टेज-1 आणि स्टेज-2 स्तन कर्करोगामध्ये 90 ते 95 टक्के रुग्णांचे प्राण वाचवता येऊ शकतात
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

प्रश्न: स्तनाचा कर्करोग होण्याची कारणे काय आहेत?

स्तनाचा कर्करोग होण्यामागे काही सवयी आणि शारीरिक बदल कारणीभूत ठरू शकतात. डॉ. राजिंदर कौर यांच्या मते, कमी वयात मासिक पाळी येणे, लठ्ठपणा, उशिरा मासिक पाळी बंद होणे, अपत्य नसणे किंवा बाळाला अंगावर पाजले नसल्यास याचा धोका वाढतो.

याव्यतिरिक्त व्यायामाचा अभाव, मद्यपान आणि तंबाखूचे सेवन ही धोक्याची लक्षणं आहेत. तसेच, जर कुटुंबात कोणाला आधी स्तनाचा कर्करोग झाला असेल (Genetic factor) तर याचा धोका अधिक असतो. जेव्हा ही सर्व कारणं एकत्र येतात तेव्हा स्तन कर्करोग होण्याची शक्यता खूप जास्त वाढते.

प्रश्न: स्तनाच्या कर्करोगाचा धोका टाळण्यासाठी जीवनशैलीत कोणते महत्त्वाचे बदल करणे गरजेचे आहे ?

डॉ. राजिंदर कौर यांच्या मते, जर शरीरात लठ्ठपणा असेल तर तो कमी करण्याचा प्रयत्न करा. विशेषतः मासिक पाळी बंद झाल्यानंतर पोटाभोवती चरबी जमा होऊ देऊ नका.

तज्ज्ञांच्या मते, वयाच्या 30 वर्षांच्या आत मूल होणे फायदेशीर ठरते आणि बाळाला किमान एक वर्ष स्तनपान नक्की करावे. यासोबतच सकस आहार आणि रोज नियमित व्यायाम केल्यास स्तनाच्या कर्करोगाचा धोका मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकतो.

कॅन्सर कसा ओळखावा?

प्रश्न: वेळेवर निदान करण्यासाठी कोणत्या चाचण्या कराव्यात?

डॉ. राजिंदर कौर : 20 वर्षांवरील प्रत्येक महिलेने दर महिन्याला स्वतःची तपासणी करायला हवी. जेव्हा तुम्ही नियमितपणे स्वतःची तपासणी करता तेव्हा तुम्हाला तुमच्या शरीरातील बदलांची चांगली माहिती असते.

अशा वेळी जर काही असामान्य बदल किंवा गाठ जाणवली तर तुम्ही ती तातडीने ओळखू शकता आणि वेळीच उपचार घेऊ शकता.

कॅन्सरचे निदान जितक्या लवकर होईल तितके उपचार सोपे होतात. त्यामुळे विलंब न करता डॉक्टरांना भेटा. निदानाची दुसरी पद्धत म्हणजे वर्षातून एकदा डॉक्टरांकडून तपासणी करून घेणे याला 'क्लिनिकल ब्रेस्ट एक्झामिनेशन' (Clinical Breast Examination) म्हणतात. यामध्ये डॉक्टर स्वतः तपासणी करून सर्वकाही सामान्य आहे की नाही, हे सांगतात.

तिसरी आणि सर्वात अचूक पद्धत म्हणजे 'मॅमोग्राफी' (Mammography) म्हणजेच छातीचा एक्स-रे. ही तपासणी इतकी सूक्ष्म असते की, अगदी छोटी गाठही यात सहज पकडली जाऊ शकते.

संशोधनानुसार, वयाची 40 वर्षे पूर्ण झाल्यानंतर जर दरवर्षी मॅमोग्राम चाचणी केली तर स्तन कर्करोगाचा धोका 40 टक्क्यांपर्यंत कमी होऊ शकतो.

प्रश्न: ज्या महिलांनी कधीही स्तनपान केलेले नाही त्यांना स्तनाच्या कर्करोगाचा धोका जास्त असतो का?

डॉ. राजिंदर कौर: बाळाला अंगावर पाजणे हा स्तन कर्करोगापासून बचाव करण्याचा एक प्रभावी मार्ग आहे. ज्या महिला किमान 1 वर्ष स्तनपान करतात त्यांच्यामध्ये कर्करोगाचा धोका 2 ते 4 टक्क्यांनी कमी होतो. हा काळ जितका जास्त असेल तितका फायदा अधिक मिळतो.

उदाहरणार्थ, जर एखाद्या महिलेने 2 वर्षे स्तनपान केले तर हा धोका 8 ते 12 टक्क्यांपर्यंत घटतो. याचे मुख्य कारण असे की, स्तनपानादरम्यान शरीरातील 'इस्ट्रोजेन' (Estrogen) हार्मोन कमी सक्रिय असतो ज्यामुळे स्तनातील पेशी लवकर परिपक्व होतात आणि कर्करोगाचा धोका कमी होतो.

उपचार कोणत्या टप्प्यापर्यंत शक्य आहेत

प्रश्न : कॅन्सरच्या कोणत्या स्टेजपर्यंत उपचार करणे शक्य आहे?

डॉ. राजिंदर कौर: स्तन कर्करोगाचे उपचार जितक्या लवकर सुरू होतील तितके ते अधिक यशस्वी ठरतात. स्टेज-1 आणि स्टेज-2 मध्ये 90 ते 95 टक्के रुग्ण पूर्णपणे बरे होऊ शकतात. यामध्ये सुरुवातीला शस्त्रक्रिया त्यानंतर कीमोथेरपी आणि शेवटी रेडिएशन थेरपी दिली जाते.

स्टेज-3 मध्ये कर्करोग थोडा पसरलेला असतो. त्यामुळे अशा रुग्णांना आधी कीमोथेरपी देऊन गाठ लहान केली जाते जेणेकरून शस्त्रक्रिया करणे सोपे होईल. त्यानंतर पुढील उपचार केले जातात.

स्टेज-4 बाबत सांगायचे तर यामध्ये कर्करोग शरीराच्या इतर भागांत पोहोचलेला असतो. अशा परिस्थितीत 'टार्गेटेड थेरपी' आणि 'इम्युनोथेरपी' सारख्या आधुनिक उपचारांद्वारे रुग्णाचे आयुष्य अधिक सुसह्य आणि दीर्घमान करण्याचा प्रयत्न केला जातो. विशेष म्हणजे, भारतात आता हे सर्व जागतिक दर्जाचे उपचार उपलब्ध आहेत.

प्रश्न: कॅन्सर कोणत्याही वयात होऊ शकतो का?

डॉ. राजिंदर कौर: स्तन कर्करोग कोणत्याही वयात होऊ शकतो. माझ्याकडे एकदा 19 वर्षांची एक मुलगी तिच्या आईसोबत आली होती. तिच्या स्तनावर गाठ (Tumor) होती आणि त्यातून रक्त आणि पाणी येत होतं. तपासणी केल्यावर तिला स्तन कर्करोग असल्याचे स्पष्ट झाले.

जेव्हा मी तिच्या आईला विचारले की, इतका उशीर का केला? तेव्हा त्या म्हणाल्या, 'आम्हाला स्वप्नातही वाटले नव्हते की 19 वर्षांच्या मुलीला झालेली छोटीशी गाठ कॅन्सर असू शकते.' याच विचारामुळे पाच-सहा महिने निघून गेले आणि त्या गाठीचे रूपांतर कर्करोगात झाले.

ती मुलगी जेव्हा माझ्याकडे पोहोचली तेव्हा कॅन्सर पूर्ण शरीरात पसरला होता. अनेक महिने उपचार करूनही तिला वाचवता आले नाही. ही कहाणी आपल्याला एकच धडा देते की, गाठ दिसताच अजिबात वेळ न घालवता त्वरित डॉक्टरांकडे जा.

प्रश्न: कॅन्सरच्या उपचारांचे काही दुष्परिणाम होतात का?

डॉ. राजिंदर कौर: कॅन्सरच्या उपचारांचे काही दुष्परिणाम नक्कीच होतात. पण चांगली गोष्ट म्हणजे उपचार संपल्यानंतर हे परिणामही हळूहळू नाहीसे होतात. महिलांच्या बाबतीत मुख्य दुष्परिणाम म्हणजे केस गळणे. यामध्ये डोक्यासोबतच भुवयांचे केसही गळू शकतात.

उपचारांदरम्यान काही वेळा स्तन काढून टाकावा लागतो, ज्यामुळे रुग्णावर मानसिक आणि शारीरिक परिणाम होऊ शकतात. मात्र, उपचार पूर्ण होताच रुग्ण पुन्हा पूर्ववत होतो.

डोक्याचे आणि भुवयांचे केस पुन्हा येतात. इतकेच नाही, तर आता आधुनिक तंत्रज्ञानामुळे आम्ही शस्त्रक्रियेद्वारे स्तन पुन्हा पहिल्यासारखे बसवू शकतो.

घरातील पुरुषांची जबाबदारी काय असते?

प्रश्न: आयुर्वेदिक उपचारांनी कॅन्सर पूर्णपणे बरा होऊ शकतो का?

डॉ. राजिंदर कौर: आयुर्वेद शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी नक्कीच उपयुक्त ठरू शकते, पण तो कर्करोगावरचा खात्रीशीर उपचार नाही. अनेकदा रुग्णांना वाटते की आयुर्वेदिक औषधांनी कर्करोग बरा होत आहे, पण प्रत्यक्षात तो आजार शरीरात आतल्या आत वाढतच असतो.

जोपर्यंत खरी परिस्थिती लक्षात येते, तोपर्यंत खूप उशीर झालेला असतो. याचे परिणाम अत्यंत गंभीर असू शकतात. त्यामुळे आयुर्वेदाचा वापर केवळ पूरक म्हणजे जोड म्हणून करा पण कर्करोगाच्या कायमस्वरूपी उपचारांसाठी तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यावरच विश्वास ठेवा."

प्रश्न: स्तनाचा कर्करोग एकदा बरा झाल्यानंतर पुन्हा होऊ शकतो का?

डॉ. राजिंदर कौर: काही प्रकरणांमध्ये स्तनाचा कर्करोग बरा झाल्यानंतर पुन्हा होण्याची शक्यता असते. विशेषतः अशा रुग्णांमध्ये हा धोका अधिक असतो ज्यांना सुरुवातीलाच गंभीर स्वरूपाचा आजार होता किंवा ज्यांनी डॉक्टरांनी सांगितलेला नियमित उपचार पूर्ण केला नाही आणि मध्येच सोडून दिला.

प्रश्न: जर कुटुंबातील एखाद्या महिलेला स्तनाचा कर्करोग झाला तर घरातील पुरुषांनी कोणती भूमिका घेतली पाहिजे?

डॉ. राजिंदर कौर: कॅन्सर ही केवळ त्या महिलेची एकटीची लढाई नाही तर ती संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी आहे. या काळात त्या महिलेला भावनिक आणि मानसिक आधाराची सर्वात जास्त गरज असते.

आजारपणामुळे महिला खूप घाबरलेली असते आणि तिच्या मनात अनेक नकारात्मक विचार येतात. अनेकदा त्यांना नीट झोप येत नाही भूक लागत नाही किंवा सतत रडू येते.

अशा कठीण प्रसंगी तिचा जोडीदार हाच तिचा सर्वात मोठा आधार बनू शकतो. पुरुषांनी तिला समजून घेणे आणि तिच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे खूप गरजेचे आहे.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)