बांगलादेश निवडणुकीतील भारताच्या वाढत्या महत्त्वाचा अर्थ काय?

    • Author, अनबरासन एथिराजन
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

बांगलादेश निवडणुकीच्या मतदानाची म्हणजे सात जानेवारी ही तारीख जसजशी जवळ येत आहे, तशी त्याठिकाणी शेजारी देश भारताच्या भूमिकेबाबतच्या चर्चेलाही वेग आला आहे.

विद्यमान पंतप्रधान शेख हसिना सलग चौथ्या वेळी पंतप्रधानपदासाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. तर प्रमुख विरोधी पक्षांनी या निवडणुकांवर बहिष्कार टाकला आहे. त्यामुळं शेख हसिना यांचा विजय जवळपास निश्चित मानला जात आहे.

बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी (बीएनपी) आणि त्यांच्या समर्थकांना शेख हसिना यांच्या नेतृत्वातील सरकार निष्पक्षपणे निवडणुका घेईल यावर विश्वासच नाही.

शेख हसिना यांनी राजीनामा द्यावा आणि अंतरिम सरकारच्या निगराणीत निवडणुका व्हाव्यात अशी त्यांची मागणी आहे. पण शेख हसिना यांनी त्यांची मागणी मान्य करण्यास नकार दिला आहे.

मुस्लीमबहुल बांगलादेशची लोकसंख्या सुमारे 17 कोटी आहे. बांगलादेश जवळपास तिन्ही बाजुंनी भारतीय सीमांनी घेरलेला आहे. तसंच त्याची 271 किलोमीटर (168 मैल) लांबीची सीमा म्यानमारला लागूनही आहे.

भारतासाठी बांगलादेश हा काही त्यांचा सर्वसामान्य शेजारी देशच नाही, तर राजनैतिक दृष्टीनं महत्त्वाचा भागीदार आणि जवळचा मित्रही आहे. ईशान्येकडील राज्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं भारताचं बांगलादेशबरोबरचं नातं अत्यंत महत्त्वाचं आहे.

अशा परिस्थितीत भारतीय धोरणकर्त्यांच्या मते, भारतानं बांगलादेशबरोबर असेच चांगले संबंध ठेवायला हवे.

1996 मध्ये शेख हसिना पहिल्यांदा पंतप्रधान बनल्या तेव्हापासून यांनी भारताबरोबर चांगले संबंध ठेवले आहेत. त्यामुळं पुन्हा एकदा शेख हसिना यांचीच सत्ता यावी अशी भारताचीही इच्छा असणार यात काहीही लपून राहिलेलं नाही.

बांगलादेशमधील विरोधकांचा आरोप

आवामी लीग पार्टीच्या नेत्या शेख हसिना यांनीही कायम भारताबरोबर जवळीक ठेवण्यास पाठिंबा दिलाय.

2022 मध्ये भारत दौऱ्यादरम्यान त्या म्हणाल्या होत्या की, बांगलादेशनं भारत, येथील सरकार, येथील लोक आणि सशस्त्र दलांना विसरता कामा नये. कारण 1971 च्या स्वातंत्र्य लढ्यात त्यांनी बांगलादेशला मदत केली होती.

विरोधी बीएनपीनं त्यांच्या या वक्तव्यावर जोरदार टीकाही केली होती.

पक्षाचे ज्येष्ठ नेते रुहुल कबीर रिजवी यांनी बीबीसीबरोबर बोलताना म्हटलं की, "भारतानं एखाद्या विशिष्ट पक्षाला नव्हे तर बांगलादेशला पाठिंबा द्यायला हवा. पण दुर्दैवानं भारतासाठी धोरणं ठरवणाऱ्यांना बांगलादेशात लोकशाही नको आहे."

त्यांनी बांगलादेशात होणाऱ्या निवडणुका "डमी" म्हणजे बनावट असल्याचं म्हटलं आहे. तसंच शेख हसिना यांना थेट पाठिंबा देऊन भारत बांगलादेशच्या लोकांमध्ये फूट पाडत असल्याचंही ते म्हणाले.

भारतीय परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी बांगलादेश निवडणुकीत भारताच्या तथाकथित हस्तक्षेपाबाबत बीएनपी नेत्यांच्या आरोपांवर उत्तर देण्यास नकार दिला आहे.

बीबीसीच्या एका प्रश्नाच्या उत्तरात प्रवक्ते म्हणाले की, "बांगलादेशच्या सार्वत्रिक निवडणुका हा त्यांचा अंतर्गत मुद्दा आहे. बांगलादेशच्या लोकांना त्यांचं भवितव्य ठरवायचं आहे. बांगलादेशचा जवळचा मित्र आणि सहकारी असल्यामुळे भारताची अशी इच्छा आहे की, त्याठिकाणी शांततापूर्ण वातावरणात निवडणुका व्हाव्यात."

भारताच्या चिंता

भारताला आणखी एक चिंता आहे, ती म्हणजे जर बीएनपी आणि जमात-ए-इस्लामी पुन्हा सत्तेत आले तर त्यामुळं बांगलादेशात मुस्लीम कट्टरतावाद्यांना प्रोत्साहन मिळू शकतं. आधी 2001 आणि 2006 मध्ये त्याठिकाणी आघाडीची सरकारं आली तेव्हा असंच चित्र पाहायला मिळालं होतं.

बांगलादेशातील भारताचे राजदूत राहिलेले पिनाक रंजन चक्रवर्ती यांनी बीबीसीबरोबर बोलताना सांगितलं की, "त्यांनी तिथं अनेक जिहादी गटांना जन्म दिला आणि त्यांचा वापर वेगवेगळी कामं पूर्ण करण्यासाठी करण्यात आला. त्यात 2004 मध्ये शेख हसिना यांच्या हत्येचा प्रयत्न आणि पाकिस्तानातून आलेल्या शस्त्रांचा ट्रक पकडणं याचाही समावेश होता."

2009 मध्ये शेख हसिना सत्तेत आल्या तेव्हा त्यांनी भारताच्या ईशान्य भागात काम करणाऱ्या बंडखोर गटांच्या विरोधात कारवाई केली. हे बंडखोर सीमेपलिकडं म्हणजे बांगलादेशात राहायचे आणि भारतात कृत्यं करायचे. या कारवाईतून हसिना यांनी भारताचा विश्वास जिंकला.

भारत आणि बांगलादेश यांच्यात सांस्कृतिक, वांशिक आणि भाषेच्या पातळीवर जवळचं नातं आहे.

1971 च्या बांगलादेश स्वातंत्र्य संग्रामात भारतानं महत्त्वाची भूमिका बजावली होती. तिथल्या 'मुक्तीबाहिनी' या स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या लष्कराला भारतानं आपलं सैन्य पाठवत मदत केली होती.

तांदूळ, डाळी आणि भाजीपाला अशा महत्त्वाच्या गोष्टींसाठी बांगलादेश भारतावर अवलंबून आहे. एका दृष्टीनं विचार करता बांगलादेशात किचनपासून निवडणुकांपर्यंत भारताचा प्रभाव आहे.

2010 पासून आतापर्यंत भारतानं बांगलादेशात पायाभूत सोयीसुविधा आणि विकास प्रकल्पासाठी सात अब्ज डॉलरपेक्षा जास्त लाइन ऑफ क्रेडिटही देऊ केली आहे.

पण गेल्या दशकामध्ये दोन्ही देशांमध्ये वादही झाला आहे. नदीच्या पाण्याच्या वाटपावरून आरोप प्रत्यारोपापासून ते एकमेकांच्या अंतर्गत मुद्द्यांमध्ये हस्तक्षेपाचे आरोपही करण्यात आले आहेत. त्यामुळं नात्यात काहीशी कटुता आल्याचं दिसलं.

ढाकामध्ये सेंटर फॉर पॉलिसी डायलॉगमध्ये फेलो असलेले देबप्रिय भट्टाचार्य यांनी याबाबत बीबीसीला माहिती दिली.

"बांगलादेशात भारताच्या प्रतिमेबाबत अडचण आहे. त्याचं कारण म्हणजे, भारतानं त्यांच्या सरकारसाठी पाठिंबा दिलाय, ज्या सरकारच्या लोकशाही वैधतेवर कदाचित अनेकांना शंका आहे तसंच बांगलादेशला समसमान भागीदारीची अपेक्षा असलेले करार असो, चांगला शेजारी म्हणून बांगलादेशला भारताकडून जेवढं मिळायला पाहिजे तेवढं मिळत नसल्याचा त्यांचा समज आहे." असं ते म्हणाले.

शेख हसिना जानेवारी 2009 मध्ये दुसऱ्यांदा सत्तेवर आल्या होत्या. पुढच्या दोन निवडणुकाही त्यांच्या पक्षानं जिंकल्या. या दरम्यान विरोधी पक्षांनी भ्रष्टाचाराचे आरोपही केले. पण आवामी लीग पार्टीनं कायम हे आरोप फेटाळले आहेत.

भारत बांगलादेशबरोबर रस्ता, नदी आणि रेल्वे मार्गानं जोडलेला आहे. त्या माध्यमातून भारत ईशान्येतील राज्यांपर्यंत महत्त्वाचं साहित्य पोहोचवतो. पण ते पुरेसं नाही.

अभ्यासकांच्या मते, बांगलादेशला आतापर्यंत चारही बाजुंनी जमीन असलेल्या नेपाळ आणि भूतान बरोबर पूर्णपणे रस्ते मार्गानं व्यापार करण्यात यश आलेलं नाही.

बांगलादेशमध्ये एक मैत्रीपूर्ण सरकार असल्यास भारताला त्याचे राजनैतिक दृष्टाही काही फायदे होतात.

बांगलादेशच्या मार्गाने ईशान्येतील सात राज्यांपर्यंत विनाअडथळा पोहोचता यावं अशी भारताची इच्छा आहे.

सध्या भारत ईशान्येकडील राज्यांबरोबर रस्ते आणि रेल्वे मार्गाच्या माध्यमातून जोडलेला आहे. तो 20 किलोमीटरचा एक कॉरीडोर असून तो नेपाळ, बांगलादेश आणि भूतानच्या जवळून जातो. त्याला "चिकन्स नेक" म्हणतात.

भारतातील अधिकाऱ्यांना अशी चिंता आहे की, भारत आणि चीन यांच्यात कोणत्याही प्रकारचा संभाव्य तणाव निर्माण झाल्यास राजनैतिक दृष्टीनं महत्त्वाचा असलेला हा भाग धोक्यात येऊ शकतो.

चीन फॅक्टर किती मोठा

अनेक पाश्चिमात्य देशांच्या सरकारांनी तथाकथित मानवाधिकारांचं उल्लंघन आणि एक्स्ट्रा-ज्युडिशियल हत्यांच्या मुद्द्यांवरून बांगलादेशच्या अधिकाऱ्यांवर कठोर निर्बंध लावण्याची मागणी केली आहे. पण नकारात्मक पाऊल म्हणत भारत याला विरोध करत असतो.

भारतासाठी हे प्रकरण संवेदनशील असण्याचं आणखी एक कारण म्हणजे, भारताबरोबर प्रादेशिक वर्चस्वासाठी लढणारा चीन, बांगलादेशबरोबर नातं मजबूत करून त्या भागात पाय पसरण्याचा प्रयत्न करत आहे.

बांगलादेशधील भारताचे माजी राजदूत पिनाक रंजन चक्रवर्ती म्हणाले की, "आम्ही पाश्चिमात्य देशांना कायम म्हणत आलो आहोत की, बांगलादेशबरोबर संयमानं वागायला हवं. शेख हसिना यांच्यावर दबाव आणल्यास इतर देशांप्रमाणं तेही चीनबरोबर हातमिळवणी करू शकतात. राजकीयदृष्ट्या भारतासमोर समस्या निर्माण होऊ शकते.''

भारत आणि बांगलादेशच्या सरकारांमध्ये जवळचे संबंध असूनही भारताचा विषय आला की काही बांगलादेशी नागरिकांच्या मनात त्याबाबत संशय असतो.

ढाकामधील एक भाजी व्यापारी जमीरुद्दीन म्हणाले की, "भारत आणि बांगलादेश यांच्यात दृढ नातं आहे, असं मला वाटत नाही. आम्ही मुस्लिम बहुल देश आहोत. त्यामुळं भारताबरोबर कायम आमची एकप्रकारची समस्या ही असतेच. "

"आम्हाला आधी आत्मनिर्भर व्हावं लागेल. त्यानंतरच आम्हाला कुणावर अवलंबून राहता येईल. नसता आम्ही अडचणीत सापडू."

एकिकडं भारताला चिंता आहे की, शेजारी असलेल्या बांगलादेशात मुस्लीम कट्टरतावाद वाढू नये. तर बांगलादेशच्या अनेकांना सीमेच्या पलिकडं काय होत आहे, याची चिंता आहे.

मानवाधिकार क्षेत्रात काम करणाऱ्या गटांच्या मते, 2014 पासून जेव्हा भारतात हिंदू राष्ट्रवादी भारतीय जनता पार्टीं सरकार सत्तेत आली आहे, तेव्हापासून त्याठिकाणी धार्मिक अल्पसंख्याक आणि विशेषतः मुस्लिमांच्या विरोधात भेदभावाची प्रकरणं वाढली आहेत. भाजपनं मात्र हे आरोप फेटाळले आहेत.

भारताचे अनेक नेते देशात, "अवैध बांगलादेशी नागरिकांच्या" घुसखोरीबाबत बोलत असतात. त्याला आसाम आणि पश्चिम बंगाल सारख्या राज्यांमध्ये राहणाऱ्या बंगाली मुस्लिमांबाबत केलेल्या इशारा समजलं जातं.

देबप्रिय भट्टाचार्य म्हणाले की, "भारतात मुस्लिमांप्रती भेदभाव आणि गैरवर्तनाबरोबरच बांगलादेशातही हिंदू अल्पसंख्याकांबरोबर गैरव्यवहाराची शक्यता वाढते."

बांगलादेशच्या लोकसंख्येत हिंदुंचं प्रमाण सुमारे 8 टक्के आहे.

बांगलादेशात शेख हसिना सरकार असल्यास ते भारतासाठी अनुरुप असेल यात भारताला शंका नाही. पण भारतासमोर आव्हान आहे ते, बांगलादेशी नागरिकांच्या मनात स्थान मिळवण्याचं.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)