You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
रशियाने आमचा जलविद्युत प्रकल्प उडवण्याचा प्रयत्न केला- युक्रेन
रशियाने दक्षिणेकडच्या खेरसोन भागातल्या निप्रो नदीवरचा हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांटची तटबंदी बॉम्बने उडवल्याचा आरोप युक्रेनने केला आहे.
रशियाच्या ताब्यातल्या नोवा कखोव्हा शहरात हा प्रकल्प आहे. प्रकल्पाच्या बांधाचं नुकसान झाल्याने 16हजार लोकांचा जीव धोक्यात आहे.
लोकांना सुरक्षितस्थळी नेण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे असं अधिकाऱ्यांनी सांगितलं.
खेरसोनचे प्रमुख अलेक्झांडर प्रोकुडिन यांनी या घटनेसा संदर्भ देताना रशियाचं आणखी एक दहशतवादी कृत्य असा आरोप केला आहे. सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या व्हीडिओत त्यांनी निप्रो नदीची पातळी पाच तासात गंभीर स्थितीत जाईल असा इशारा दिला आहे.
उपलब्ध फोटो पाहिले तर पाण्याचा वेगवान प्रवाह युद्ध क्षेत्राच्या दिशेने जाताना दिसत आहे.
रशियाच्या म्हणण्यानुसार या विनाशासाठी युक्रेनच जबाबदार आहे. बॉम्बस्फोटांमुळे प्रकल्पाचा वरचा भाग क्षतिग्रस्त झाला आहे. बांधाचं नुकसान झालेलं नाही असं अधिकाऱ्यांनी सांगितलं.
रशियामध्ये अणूप्रकल्पाजवळच्या परिसरात भीतीचं वातावरण पसरलं असून गावं रिकामी केली जात आहेत. युक्रेनच्या अधिकाऱ्याने यासंदर्भात माहिती दिली. झापोरिआझिइया अणूप्रकल्प परिसरात हे दृश्य पाहायला मिळत आहे.
रशियाने या अणूप्रकल्प परिसरातील 18 वसाहतींमधील नागरिकांना हा भाग सोडून जाण्यास सांगितलं आहे.
मेलिटपूल या युक्रेनच्या शहराचे महापौर इव्हान फेडरोव्ह यांनी सांगितलं की, "हजारो गाड्या शहराबाहेर जात आहेत. चार ते पास तास वाहतूक कोंडी पाहायला मिळाली".
संयुक्त राष्ट्र संघटनेच्या अण्वस्त्र ठिकाणांवर निगराणी करणाऱ्या विभागाने भीषण आण्विक अपघात होऊ शकतो असं संकेत दिले आहेत.
इंटरनॅशनल अटॉमिक एनर्जी एजन्सीचे (IAEA) संचालक राफेल ग्रॉसी यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं की, "या परिसरातून नागरिकांना बाहेर काढलं जात आहे. याचा अर्थ अणूऊर्जा प्रकल्प परिसरात रशिया आणि युक्रेन यांच्यादरम्यान जोरदार संघर्ष झालेला असू शकतो".
या प्रकल्पामधून वीजनिर्मिती होत नसली तरी या केंद्रात आण्विक रसायनं आहेत.
काही आठवड्यांपूर्वी या प्रकल्पाला भेट देण्यासाठी मला खाण पार करून जावं लागलं असं ग्रॉसी यांनी सांगितलं.
या प्रकल्पाच्या ठिकाणी काहीही होऊ शकतं अशी परिस्थिती आहे आणि भविष्यात धोकादायक असं काही घडू शकतं असा इशारा या संघटनेने दिला होता.
प्रकल्पाच्या ठिकाणी मर्यादित कर्मचारी वर्ग कार्यरत आहे पण तिथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांसाठी हा काळ तणावपूर्ण, दडपणाचा आणि आव्हानात्मक आहे.
संघटनेच्या प्रकल्पात असलेल्या जाणकारांनी सांगितलं की प्रकल्पाजवळच्या एनरहोडर शहरातून नागरिकांना बाहेर काढलं जात आहे. या शहरात प्रकल्पात काम करणारे कर्मचारी राहत आहेत.
सीमेनजीकच्या भागात शत्रूने हल्ले सुरू केले आहेत असं रशियाचे प्रादेशिक प्रमुख येव्हेनजी बालिटस्की यांनी सांगितलं.
"म्हणूनच मी अशा भागातून नागरिकांना सुरक्षितस्थळी नेण्याचं पक्कं केलं आहे. लहान मुलं, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग नागरिक, रुग्णालयातील रुग्ण यांना सुरक्षितस्थळी नेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे", असं त्यांनी सांगितलं.
संघटनेने याआधीही प्रकल्पाच्या सुरक्षेसंदर्भात इशारा दिला होता. रशियाने गेल्यावर्षी या प्रकल्पावर ताबा मिळवला होता. सातत्याने हल्ले झाल्यामुळे वीजपुरवठा काही काळ खंडित करावा लागला होता.
हल्ल्यांमुळे वीजपुरवठा करणाऱ्या वाहिन्यांचं नुकसान झालं. यामुळे प्रकल्प डिझेल जनरेटरवर कार्यरत असल्याचं संघटनेनं म्हटलं होतं.
रशियाने फेब्रुवारी 2022 मध्ये या प्रकल्पावर आक्रमण केलं होतं. तेव्हापासून प्रकल्पात काम करणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे. पण प्रकल्प कार्यान्वित ठेवण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ कार्यरत आहे.
रशियाने झॅपोझिया प्रांतावर कब्जा केला आहे पण प्रादेशिक राजधानी झॅपो अजूनही त्यांच्याकडे नाही. हे शहर सीमेपासून अगदी जवळ आहे.
युक्रेनच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की बर्डयान्सक आणि प्रायमॉर्स्क या शहरांमध्ये नागरिकांना आणलं जात आहे.
मेलिटपूलचे महापौर इव्हान फेडरोव्ह यांनी टेलिग्रामवर लिहिलं आहे की, "जी गावं रिकामी केली जात आहेत तिथल्या दुकानांमध्ये दैनंदिन वस्तू आणि औषधं यांची टंचाई जाणवते आहे".
रुग्णालयातून रुग्णांना घरी सोडलं जात आहे कारण वीज तसंच पाणीपुरवठा खंडित केला जाईल अशी भीती रुग्णालय प्रशासनाला वाटते आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)