‘कालिका मातेच्या' आक्षेपार्ह पोस्टरवरून वाद, युक्रेनच्या परराष्ट्र मंत्रालयाने मागितली माफी

    • Author, झुबैर अहमद
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

हिंदू देवता कालिकेचं आक्षेपार्ह चित्रण असलेला एक फोटो युक्रेनच्या संरक्षण मंत्रालयाने पोस्ट केला होता.

पण या पोस्टवरून वाद निर्माण झाल्यानंतर युक्रेनने तत्काळ तो फोटो डिलीट केला.

शिवाय, याबाबत त्यांनी भारताची माफीही मागितली आहे.

मंगळवारी (4 मे) युक्रेनच्या परराष्ट्र उप-मंत्री एमीन दझेपर यांनी एक ट्विट करून यासंदर्भात खेद व्यक्त केला.

त्या म्हणाल्या, “आम्हाला खेद वाटतो. @DefenceU #हिंदू देवी #काली चं चित्रण आक्षेपार्ह पद्धतीने करण्यात आलं. युक्रेन आणि युक्रेनचे नागरीक हे अद्वितीय अशा भारतीय संस्कृतीचा सन्मान करतात. ही पोस्ट हटवण्यात आली आहे. परस्पर सन्मान आणि मित्रत्वाच्या भावनेने सहकार्य कायम राखण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.”

भारतीय नागरिकांनी युक्रेनने केलेल्या या कृत्याचा निषेध केला असून हा प्रकार म्हणजे अपमानजनक आणि हिंदूफोबिया असल्याचा आरोप ते करत आहेत.

भारताच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या सल्लागार कंचन गुप्ता यांनी म्हटलं, “हा जगभरातील हिंदू भावनांवर करण्यात आलेला हल्ला आहे.”

युक्रेनच्या परराष्ट्र उप-मंत्री एमीन दझेपर या नुकत्याच भारताच्या दौऱ्यावर आलेल्या होत्या. गेल्या वर्षी युक्रेनमध्ये युद्ध सुरू झाल्यानंतर त्यांच्या एखाद्या मंत्र्याचा हा पहिलाच दौरा होता.

कंचन गुप्ता यांनी ट्विट करून त्याची आठवण दझेपर यांना करून दिली.

पुढे त्या म्हणाल्या, “या बनवाबनवीमागे युक्रेन सरकारचा खरा चेहरा दडलेला आहे. कालिका मातेला एका प्रपोगंडा पोस्टरवर चित्रात दाखवण्यात आलं आहे. हा जगभरातील हिंदूंच्या भावनेवरचा आघात आहे.”

पूर्वीही वाद झाले

राजकीय आणि परराष्ट्र विषयांचे जाणकार डॉ. सुव्रोकमल दत्ता म्हणतात, “युक्रनेच्या अपमानाने आश्चर्य वाटण्याचं कारण नाही. ज्या प्रकारे युक्रेनने भारताची संस्कृती आणि कालिका मातेबाबत आक्षेपार्ह बाबी पसरवण्याचा प्रयत्न केला. ज्या प्रकारे त्यांनी हिंदू संस्कृतीला कमी लेखण्याचा प्रयत्न केला, हे त्यांनी यापूर्वीही केलेलं आहे. आजही ते केलं, पुढेही करत राहतील.”

“ज्या प्रकारे त्यांनी कालिका मातेला अश्लील स्वरुपात दाखवलं, असे प्रकार त्यांनी पूर्वीही केलेले आहेत. युक्रेन नेहमीच भारतविरोधी राहिलेला आहे. 1998 मध्ये जेव्हा अटल बिहारी वाजपेयींच्या नेतृत्वाखाली भारताने आण्विक चाचणी केली, त्यावेळी युक्रेनने संयुक्त राष्ट्र संघटनेत भारताच्या विरोधात मतदान केलं. युक्रेन नेहमीच पाकिस्तानच्या बाजूने होता. त्यामुळे या प्रकरणातून युक्रेनची भारतविरोधी मानसिकताच दिसून येते.”

डॉ. सुव्रोकमल दत्ता म्हणतात, “गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात रशियाने युक्रेनवर हल्ला केला, तेव्हापासून भारत यासंदर्भात तटस्थ भूमिकेत आहे. भारताने युक्रेनची बाजू घ्यावी, असं त्यांना वाटत होतं. पण भारत तटस्थ राहिला. ही गोष्ट युक्रेनच्या पचनी पडलेली नाही.”

माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या सल्लागार कंचन गुप्ता यांनी एका ट्विटमध्ये युक्रेनच्या या कृत्याचा निषेध केला आहे.

त्या म्हणाल्या, “तुम्ही संयुक्त राष्ट्र संघात सातत्याने भारतविरोधी भूमिका घेता. तुम्ही 1998 च्या आण्विक चाचणीनंतर भारताविरोधात मतदान केलं. कलम 370 हटवल्यानंतर संयुक्त राष्ट्राने हस्तक्षेप करण्याची मागणी तुम्ही करता. भारताविरोधात वापरण्यासाठी तुम्ही पाकिस्तानला शस्त्रास्त्र विकता. तरीही तुम्हाला भारताची मदत हवी आहे.”

या प्रकरणावर सोशल मीडियावरही भारतीयांची तिखट प्रतिक्रिया पाहायला मिळत आहे. अनेकांनी युक्रेनच्या या कृत्यावर नाराजी दर्शवली आहे.

धर्मा नामक एका ट्विटर अकाऊंटवरून म्हटलं, “असं एक काम होतं, जे तुम्ही करायला नको होतं, ते बिलकुल हेच आहे. नवा भारत हे सहन करणार नाही. आम्ही हे लक्षात ठेवू. भारताच्या स्वतंत्र परराष्ट्र धोरणाची तुम्ही थट्टा कराल, असं तुम्हाला वाटत असेल, तर मोदी सरकारच्या वेगळ्या भूमिकेचीही तुम्ही वाट पाहिली पाहिजे.”

युक्रेनविरुद्ध कठोर भूमिका घेण्याची मागणी

युक्रेनच्या परराष्ट्र उप-मंत्री नुकत्याच भारत दौऱ्यावर येऊन गेल्या. भारताला रशियाविरोधात भूमिका घेण्यासाठी तयार करावं, असा त्यांचा प्रयत्न होता. पण त्यात त्या यशस्वी झाल्या नाहीत.

डॉ. सुव्रोकमल दत्ता यांच्या मते, युक्रनेच्या परराष्ट्र उप-मंत्र्यांनी एकदा नव्हे तर अनेकवेळा भारतावर प्रतिबंध घालण्याची मागणी केलेली आहे.

मात्र, दुसरीकडे भारताचं म्हणणं असं आहे की हे संपूर्ण प्रकरण शांततेने सोडवायला हवं.

युक्रेनला वाटतं की रशियाला वेगळं पाडलं जावं, भारताने यामध्ये त्यांची साथ द्यावी. भारताने असं केलं नाही. हेच त्यांच्या पचनी पडलं नाही. त्यानंतर त्यांनी भारतविरोधी भूमिका घेतलेली आहे.

काश्मीरच्या मुद्द्यावर नेहमीच युक्रेनने पाकिस्तानची साथ दिली. काश्मीर किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवर कट्टरवादाचाही त्यांनी निषेध केलेला नाही.

दत्ता म्हणतात, “युक्रेनची विचारसरणी अशी राहिलेली आहे. त्यामुळे ते आता भारताबाबत चांगलं बोलतील, किंवा इतिहास आणि संस्कृतीबाबत चांगला दृष्टीकोन ठेवतील, अशी अपेक्षा बाळगणं चुकीचंच आहे.”

डॉ. दत्ता यांच्या मते, भारत सरकारनेही युक्रेनविरोधात कठोर भूमिका घेतली पाहिजे.

ते पुढे म्हणतात, “युक्रेन चालवत असलेला भारतविरोधी अजेंडा पाहता भारत सरकारनेही त्यांच्याविरोधात कठोर भूमिका घ्यावी. आंतरराष्ट्रीय पातळीवर त्यांच्या या कृत्याचा निषेध केला पाहिजे.”

भारत सरकारकडून मात्र अद्याप या प्रकरणावर कोणतीच प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र, अनेक तज्ज्ञांच्या मते, युक्रेनच्या या चुकीमागे कोणता हेतू होता की नाही, हे शोधणं योग्य ठरणार नाही.”

हा प्रकार चुकीने झाला?

युक्रेन भारत विरोधी आहे हे ठामपणे सांगता येऊ शकणार नाही. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या मते, ही चूक हिंदू संस्कृतीबाबत अज्ञानामुळे होऊ शकते. युक्रेनने ट्विट डिलीट केलं, माफी मागितली. भारत सरकारसाठी इतकंच पुरेसं आहे.

कालिका देवी ही शक्ती, विनाश, निर्माण यांच्या चक्राशी संबंधित हिंदू देवी आहे. विशेषतः भारताबाहेरील हिंदू पौराणिक कथांमध्ये कालिका देवीबाबत काही प्रमाणात अज्ञान असू शकतं. हिंदू संस्कृतीबाबत अज्ञानामुळे समोर आलेल्या प्रकरणांमध्ये हे समाविष्ट केलं जाऊ शकतं.

नुकतेच ऑस्ट्रेलियासह काही पाश्चिमात्य देशांमध्ये हिंदू मंदिरांवर हल्ले झाले, त्याचा भारताने निषेध नोंदवला.

दरम्यान, हिंदू संघटनांनी मात्र हा प्रकार चिंताजनक असल्याचं म्हटलं आहे. हिंदू फोबियाच्या घटना वाढत असल्याचा दावा त्यांनी केला.

कदाचित यामुळेच, गेल्या महिन्यात जॉर्जियाने आपल्या संकल्पात हिंदू-विरोधी कट्टरतेचा निषेध केला आणि असं करणारं अमेरिकेतील पहिलं राज्य ते बनलं आहे.

या संकल्पात त्यांनी दावा केला होता की 100 पेक्षा जास्त देशांमध्ये 1.2 अब्जांहून अधिक अनुयायी असलेला हिंदू धर्म हा विविध परंपरा आणि विश्वास यांचा संगम आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)