कोहलीच्या आरसीबीचं पॅकअप; हिटमन रोहितचा मुंबई संघ प्लेऑफमध्ये

फोटो स्रोत, Getty Images
सुपर संडे ठरलेल्या दोन मुकाबल्यांमध्ये मुंबई इंडियन्सने प्लेऑफ अर्थात बादफेरीसाठी पात्र ठरण्याचा मान मिळवला. रविवारी दुपारी झालेल्या लढतीत मुंबईने कॅमेरुन ग्रीनच्या शतकाच्या जोरावर हैदराबादला नमवलं. मात्र त्यानंतरही त्यांचं प्लेऑफमधलं स्थान पक्कं झालं नाही.
रात्री झालेल्या बंगळुरू-गुजरात लढतीवर ते ठरणार होतं. विराट कोहलीच्या शतकाच्या बळावर बंगळुरूने 197 धावांचा डोंगर उभारला. पण गतविजेत्या गुजरातने शुबमन गिलच्या शतकाच्या आधारे हे लक्ष्य पेललं.
गुजरातच्या विजयासह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचं प्लेऑफमध्ये आगेकूच करण्याचं स्वप्न भंगलं. गुजरात टायटन्स, चेन्नई सुपर किंग्स, लखनौ सुपरजायंट्स आणि मुंबई इंडियन्स या चार संघांनी प्लेऑफमध्ये जागा पटकावली. मंगळवारी चेन्नईत क्वालिफायर1 मध्ये चेन्नईसमोर गुजरातचं आव्हान असेल.
बुधवारी लखनौ आणि मुंबई एलिमिनेटरच्या लढतीत आमनेसामने असतील. हार्दिक पंड्या, महेंद्रसिंग धोनी, कृणाल पंड्या आणि रोहित शर्मा या चार कर्णधारांपैकी कोण जेतेपदाचा करंडक उचलतो हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.
आयपीएलच्या इतिहासात मुंबई इंडियन्सने आतापर्यंत पाचवेळा जेतेपदावर नाव कोरलं आहे. चेन्नई सुपर किंग्सने चारवेळा तर कोलकाता नाईट रायडर्सने दोनदा जेतेपदाची कमाई केली आहे. गुजरात, हैदराबाद, डेक्कन चार्जर्स आणि राजस्थान यांनी प्रत्येकी एकेक वेळा जेतेपद पटकावलं आहे.
गिलचा तडाखा
शुबमन गिलच्या वादळी शतकी खेळाच्या जोरावर गुजरात टायटन्स संघाने गुणतालिकेत अव्वल का आहोत याचं उत्तर दिलं. 198 धावांचा पाठलाग करताना गुजरातने वृद्धिमान साहाला झटपट गमावलं. पण यानंतर शुबमन गिल आणि विजय शंकर यांनी दुसऱ्या विकेटसाठी 71 चेंडूत 123 धावांची भागीदारी करत विजयाचा पाया रचला.
शंकर 35 चेंडूत 53 धावा करुन बाद झाला. यानंतर गुजरातने दासून शनकाला पाठवण्याचा प्रयोग केला, तो फसला. शनका भोपळाही फोडू शकला नाही. भरवशाचा डेव्हिड मिलरही तंबूत परतला. पण खेळपट्टीवर ठाण मांडून चौकार-षटकारांची बरसात करणाऱ्या गिलने शतकासह गुजरातच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. गिलने 52 चेंडूत 5 चौकार आणि 8 षटकारांसह नाबाद 104 धावांची खेळी साकारली. गिललाच सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आलं.
कोहली जेतेपदाविनाच
विराट कोहली आयपीएलच्या पहिल्या वर्षापासून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा भाग आहे. प्रदीर्घ काळ तो संघाचा कर्णधारही होता. 2008 ते 2023 या 16 वर्षात कोहली आणि बंगळुरूला एकदाही जेतेपद पटकावता आलेलं नाही. आयपीएल स्पर्धेत सर्वाधिक धावा आणि सर्वाधिक शतकं नावावर असणाऱ्या कोहलीने एकदा ऑरेंज कॅपही पटकावली आहे पण जेतेपदाने त्याला दूरच ठेवलं आहे.
तत्पूर्वी आयपीएल स्पर्धेत सर्वाधिक शतकांचा विक्रम विराट कोहलीने रचला. करो या मरो लढतीत विराट कोहलीने चिन्नास्वामी स्टेडियम या घरच्या मैदानावर खेळताना शानदार शतकी खेळी साकारली. विराट कोहलीच्या नावावर आता आयपीएल स्पर्धेत 7 शतकं आहेत. याआधी 6 शतकांसह ख्रिस गेल अव्वलस्थानी होता. कोहलीने या शतकासह गेलचा विक्रम मोडत अग्रस्थान पटकावलं.

फोटो स्रोत, Getty Images
पावसामुळे तासभर उशिराने सुरू झालेल्या सामन्यात गुजरात टायटन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. विराटच्या शतकी खेळीच्या बळावर बंगळुरूने 197 धावांची मजल मारली. कोहलीने 61 चेंडूत नाबाद 101 धावांची खेळी केली. यामध्ये 13 चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता.
फाफ डू प्लेसिसने 28 तर मायकेल ब्रेसवेलने 26 धावांची खेळी केली. अनुज रावतने 23 धावा करत कोहलीला चांगली साथ दिली. बंगळुरूने हा सामना जिंकला तर त्यांचा प्लेऑफचा प्रवेश पक्का होईल. गुजरात, लखनौ आणि चेन्नई या संघांनी आधीच प्लेऑफमध्ये प्रवेश केला आहे.
ग्रीनच्या शतकासह मुंबईची बाजी

फोटो स्रोत, Getty Images
कॅमेरुन ग्रीनच्या झंझावाती शतकाच्या बळावर मुंबई इंडियन्सने हैदराबादने दिलेलं 201 धावांचं आव्हान 2 षटकं राखून पार केलं. पण या विजयानंतरही मुंबईचा प्लेऑफ प्रवेश पक्का झालेला नाही. मुंबईचे 14 सामन्यात 8 विजयांसह 16 गुण झाले आहेत. त्यांचा नेटरनरेट आहे -0.044. गुजरात, चेन्नई आणि लखनौ हे 3 संघ प्लेऑसाठी पात्र ठरले आहेत.
बंगळुरूत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात मुकाबला होत आहे. पावसामुळे ही लढत वेळेवर सुरू होऊ शकलेली नाही. बंगळुरूचा संघ गुणतालिकेत 13 सामन्यात 7 विजयांसह 14 गुण झाले आहेत. त्यांचा नेटरनरेट आहे 0.180. बंगळुरूने हा सामना जिंकला तर त्यांचेही 16 गुण होतील. चांगल्या रनरेटच्या बळावर ते प्लेऑफसाठी पात्र होतील.
यंदाच्या हंगामातलं हे नववं शतक आहे. एका हंगामात सर्वाधिक शतकांचा विक्रम ग्रीनच्या शतकाने झाला आहे. आयपीएल स्पर्धेत शतक झळकावणारा ग्रीन हा मुंबईचा सहावा फलंदाज ठरला आहे. याआधी सचिन तेंडुलकर, सनथ जयसूर्या, लेंडल सिमन्स, रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव यांनी शतक झळकावलं होतं. 201 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबईने इशान किशनला झटपट गमावलं. पण त्यानंतर रोहित शर्मा आणि कॅमेरुन ग्रीन जोडीने तिसऱ्या विकेटसाठी 65 चेंडूत 128 धावांची दमदार भागीदारी रचली. ग्रीनने पहिल्या चेंडूपासून हैदराबादच्या गोलंदाजांवर आक्रमण केलं. रोहितने 37 चेंडूत 56 धावांची खेळी केली.
रोहित बाद झाल्यावर ग्रीनने सूत्रं हाती घेत फटकेबाजी सुरुच ठेवली. भुवनेश्वर कुमारच्या गोलंदाजीवर एकेरी धाव घेत ग्रीनने आयपीएल स्पर्धेतल्या पहिल्यावहिल्या शतकाला गवसणी घातली. ग्रीनने 47 चेंडूत 8 चौकार आणि 8 षटकारांसह नाबाद 100 धावांची खेळी केली. सूर्यकुमार यादवने 16 चेंडूत 25 धावा करत त्याला चांगली साथ दिली.
गुजरात टायटन्स, चेन्नई सुपर किंग्स आणि लखनौ सुपरजायंट्स संघांनी याआधीच प्लेऑफमध्ये प्रवेश केला आहे. चौथ्या स्थानासाठी मुंबई, बंगळुरू आणि राजस्थान या संघांमध्ये चुरस आहे. संध्याकाळी बंगळुरूचा मुकाबला गुजरातशी होणार आहे. मुंबई इंडियन्सने 5 वेळा आयपीएलचं जेतेपद पटकावलं आहे. हैदराबाद संघाचं आव्हान संपुष्टात आलं आहे. 13 सामन्यात त्यांना केवळ 4मध्येच विजय मिळवता आल्याने त्यांना बादफेरीचा मार्ग बंद झाला. पण आजच्या लढतीत विजय मिळवत ते मुंबईला स्पर्धेबाहेर काढू शकतात.

फोटो स्रोत, Getty Images
दरम्यान संध्याकाळच्या लढतीत बंगळुरूला गतविजेत्या गुजरातविरुद्ध विजय अनिवार्य आहे. पण बंगळुरूत सध्या पाऊस पडतो आहे. काही भागांमध्ये गाराही पडल्या. अशा परिस्थितीत हा सामना होईल का याबाबत साशंकता आहे. मुंबईने हैदराबादविरुद्ध विजय मिळवल्यास बंगळुरू, राजस्थानचं स्पर्धेतलं आव्हान संपुष्टात येईल. पण मुंबई पराभूत झाल्यास बंगळुरू आणि राजस्थान यांच्यापैकी एकाला प्लेऑफचं तिकीट मिळू शकतं.
करो या मरो लढतीत मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. या हंगामात हैदराबादला सलामीच्या समस्येने भेडसावलं होतं. या लढतीत मात्र विवरांत शर्मा आणि मयांक अगरवाल यांनी 140 धावांची खणखणीत सलामी दिली. विवरांतने 47 चेंडूत 9 चौकार आणि 2 षटकारांसह 69 धावांची तडाखेबंद खेळी केली. विवरांत बाद झाल्यावर मयांकने सूत्रं हाती घेतली. शतकाकडे वाटचाल करणाऱ्या मयांकला आकाश मढवालने बाद केलं. मयांकने 8 चौकार आणि 4 षटकारांसह 46 चेंडूत 83 धावांची दिमाखदार खेळी साकारली.

फोटो स्रोत, Getty Images
मयांक बाद झाल्यानंतर मात्र हैदराबादची घसरण झाली. ग्लेन फिलीप्स, हेनरिच लासेन, हॅरी ब्रूक हे मोठी खेळी करु शकले नाहीत. एकाक्षणी हैदराबादचा संघ 225 धावांचा टप्पा सहज गाठेल असं चित्र होतं. पण मुंबईने शेवटच्या षटकांमध्ये शिस्तबद्ध गोलंदाजी करत हैदराबादला रोखलं. हैदराबादने 200 धावा केल्या. मुंबईतर्फे आकाश मढवालने 37 धावांत 4 विकेट्स पटकावल्या.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








