पत्नी आणि मुलीची हत्या करून घरातच मृतदेह पुरले; 7 महिने तिथेच राहिला

फोटो स्रोत, Jiya Chaudhari
- Author, भार्गव पारीख
- Role, बीबीसी गुजरातीसाठी
- Published
- वाचन वेळ: 6 मिनिटे
(या बातमीतील काही तपशील तुम्हाला विचलित करू शकतील)
मेहसाणा जिल्ह्यातील (गुजरात) वडनगर येथे 4 मे रोजी एका तरुणाने सिव्हिल हॉस्पिटलमधून उडी मारून आत्महत्या केली.
याप्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला तेव्हा धक्कादायक माहिती समोर आली. त्या मृत तरुणाने सुमारे 7 महिन्यांपूर्वी आपल्या पत्नीची आणि दोन वर्षांच्या मुलीची हत्या केली होती आणि त्यांचे मृतदेह घरातच पुरले होते.
पोलिसांनी अधिक तपास केला असता मृत तरुणाच्या घरात कपड्यात गुंडाळून पुरलेले दोन मृतदेह आढळून आले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धक्कादायक बाब म्हणजे हत्या केल्यानंतर तो तरुण सात महिने त्याच घरात राहत होता. ज्या ठिकाणी मृतदेह पुरले होते त्याच ठिकाणी तो जेवण करत होता.
संपूर्ण प्रकरण काय आहे?
गिरीश परमार नावाच्या तरूणाने 4 मे रोजी वडनगरच्या सिव्हिल हॉस्पिटलच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली.
30 वर्षीय गिरीशच्या खिशात एक सुसाईड नोट मिळाली. त्यात त्याने आपली पत्नी प्रियंका (29) आणि मुलगी परी यांची हत्या केल्याची 'कबुली' दिली.
"पत्नी आणि मुलीची हत्या केल्यानंतर त्यांचे मृतदेह शाहपूर वड परिसरातील घरात पुरल्याचा" उल्लेखही त्याने आपल्या सुसाईड नोटमध्ये केला होता.
दुसऱ्या दिवशी पोलिसांनी कार्यकारी दंडाधिकारी यांच्यासह गिरीशच्या घरी जाऊन बंद घराचं कुलूप तोडलं आणि सुमारे 2 तास खोदकाम केल्यानंतर त्यांना दोन्ही मृतदेह आढळून आले.
पत्नी आणि मुलीचे मृतदेह जमिनीत पुरल्यानंतर गिरीशने त्यावर सिमेंटचे प्लास्टर केले होते, अशी माहिती पोलिसांनी दिली.

फोटो स्रोत, Jiya Chaudhari
गिरीश वडनगरपासून 12 किमी दूर असलेल्या शाहपूर गावात राहत होता. त्याच्या घराच्या आजूबाजूला एकही घर नव्हतं. तो लहान असतानाच त्याच्या वडिलांचं निधन झालं होतं, त्यामुळे तो आईसोबत राहत होता.
गिरीशने एमएसडब्ल्यूचं शिक्षण घेत असताना त्याच्यासोबतच शिकणाऱ्या प्रियंकाशी चार वर्षांपूर्वी न्यायालयात प्रेमविवाह केला होता. सुरुवातीला त्याच्या कुटुंबीयांचा या लग्नाला विरोध होता. पण नंतर त्यांनी लग्न मान्य केलं होतं.
गिरीश विसनगर रोडवरील मातेल गावात डायमंड पॉलिशरचं काम करत होता, तर प्रियंका एका रुग्णालयात नोकरी करत होती.
लग्नाच्या एक वर्षानंतर गिरीशच्या आईचं निधन झाल. त्याच्या दुसऱ्या वर्षी प्रियंकाने जुळ्या मुलींना जन्म दिला.
पती-पत्नीमध्ये सतत वाद
प्रियंकाचे आजोबा रमणभाई योगी बीबीसी गुजरातीशी बोलताना म्हणाले की, "प्रियंका लहानपणापासून माझ्याकडे होती. तिने गिरीशशी लग्न केलं, तेव्हा मी नाराज झालो होतो. पण नंतर आम्ही हे लग्न स्वीकारलं."
रमणभाई म्हणाले की, "गिरीशची आई जिवंत असेपर्यंत कोणतीही अडचण नव्हती, पण दोन मुलींच्या जन्मानंतर मात्र अडचणी सुरू झाल्या."
"जुळ्या मुलींच्या जन्मानंतर प्रियंकाने नोकरी सोडली. त्यामुळे घरखर्च वाढला आणि गिरीश तिच्याशी भांडू लागला. मी आणि गिरीशच्या बहिणींनी मध्यस्थी करून त्याला मुली मोठ्या झाल्यावर प्रियंका पुन्हा नोकरी सुरू करेल, असं समजावून सांगितलं."
"या दरम्यान आम्ही गिरीश आणि प्रियंकाला किराणा सामानासह इतर मदत करत होतो. पण मुलींच्या जन्मानंतर गिरीश प्रियंकाला टोमणे मारायचा आणि कधी कधी मारहाणही करायचा, त्यामुळे प्रियंका खूप दुखावली होती."
"डॉक्टरांनी तिला धक्क्यातून सावरण्यासाठी औषधं दिली होती, पण गिरीश ती औषधंही आणून देत नव्हता, म्हणून मी स्वतः ती औषधे तिला खरेदी करून देत होतो," असं रमणभाई यांनी सांगितलं.
ते म्हणाले की, "माझी नात (प्रियंका) नाराज झाली की मला फोन करायची. शेवटचा फोन तिने 18 सप्टेंबरला दुपारी केला होता. त्यानंतर तिचा फोन लागत नव्हता."

फोटो स्रोत, Jiya Chaudhari
ते पुढे म्हणाले, "19 सप्टेंबरला गिरीशचा फोन आला आणि त्याने प्रियंका मुलगी परीला घेऊन पळून गेली आहे, तर दुसरी मुलगी चाहत त्याच्याकडे आहे."
ते गिरीशच्या घरी गेले तेव्हा त्यांना प्रियंका सापडली नाही. त्यांनी गिरीशला पोलिसांत तक्रार करायला सांगितलं, पण त्याने तसं केलं नाही, असं रमणभाई यांनी सांगितलं.
ते सांगतात की, "गिरीश सतत बहाणा करायचा आणि प्रियंका काही दिवसांत परत येईल, असं सांगायचा. हे अनेकदा घडलं. या काळात गिरीशचं वागणं बदललं होतं, तो स्वतःच्या धुंदीत राहत होता. त्यामुळे काहीतरी चुकीचे घडल्याची मला शंका आली."
शेवटी 28 एप्रिलला प्रियंकाच्या आजोबांनी पोलिसांत तक्रार दाखल केली.
त्यानंतर पोलिसांनी गिरीशला दोनदा चौकशीसाठी बोलावलं. गिरीश कामाला जाताना आपली मुलगी चाहतला बहिणीच्या घरी ठेवायचा. त्यामुळे पोलिसांनी त्याच्या बहिणीला बोलावण्यास सांगितलं.
पोलिसांनी त्याच्या बहिणीला चौकशीसाठी बोलावल्यानंतर गिरीशने वडनगरच्या रुग्णालयाच्या छतावरून उडी मारून आत्महत्या केली. त्याच्या खिशात सुसाईड नोट सापडली, ज्यामध्ये त्याने केलेल्या गुन्ह्याची माहितीही लिहिली होती.
पोलीस काय म्हणतात?
वडनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक (पीआय) एम.एन. दवे यांनी बीबीसी गुजरातीला सांगितलं की, "प्रियंका हरवल्यानंतर सुमारे सात महिन्यांनी तिचे आजोबा रमणभाई तक्रार देण्यासाठी आले. 75 वर्षीय रमणभाईंची तक्रार आम्हाला विश्वासार्ह वाटली, त्यामुळे आम्ही तक्रार नोंदवून तपास सुरू केला.
तपासात आम्ही गिरीशची चौकशी केली. तेव्हा त्याने सांगितलं की, तो रोज हिरा घासण्याचे काम करतो आणि दुसरी मुलगी चाहतला आपल्या बहिणीकडे सोडून येतो. त्याची बहीण त्या मुलीची काळजी घेते."
पीआय दवे म्हणाले की, "आम्हाला हे प्रकरण संशयास्पद वाटलं, त्यामुळे आम्ही त्याला त्याच्या बहिणीसह चौकशीसाठी बोलावलं."
पण पीआय दवे म्हणाले की, "तो आपल्या बहिणीला घेऊन पोलीस ठाण्यात येण्याआधीच त्याने आत्महत्या केली."

फोटो स्रोत, Jiya Chaudhari
पीआय दवे यांनी सांगितलं की, "त्याच्या खिशात सापडलेल्या सुसाईड नोटमध्ये त्याने प्रियंका आणि परीची हत्या केल्याचे कबूल केले होते. त्यानंतर त्याने दोघींचे मृतदेह घरातच पुरले होते."
ते म्हणाले की, "आम्ही कार्यकारी दंडाधिकारी आणि मजुरांना घेऊन गिरीशच्या घरी गेलो. बंद घराचे कुलूप तोडून आत गेलो. एका खोलीत जमिनीवर टाइल्स नव्हत्या, फक्त सिमेंटचे प्लास्टर होते. मजुरांनी ते प्लास्टर तोडले तेव्हा सुमारे चार फूट खोलवर महिला आणि लहान मुलीचे अवशेष आढळले."
पोलिसांनी हाडांची डीएनए चाचणी केली आणि ते गिरीशची पत्नी प्रियंका आणि मुलगी परी यांचेच अवशेष असल्याचे सिद्ध झाले.
पोलिसांनी हे अवशेष अंतिम संस्कारासाठी रमणभाईंकडे सोपवले.
ग्रामस्थ आणि कुटुंबीय काय सांगतात?
बीबीसीने वडनगर आणि खेरालू दरम्यान असलेल्या मोलीपूर गावात राहणाऱ्या गिरीशच्या बहीण ममता परमार यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी या हत्येबाबत आपल्याला काहीच माहिती नसल्याचे सांगितले.
त्या म्हणाल्या की, "माझ्या भावाने मला सांगितलं होतं की, त्याची पत्नी प्रियंका त्यांच्या एका मुलीला घेऊन पळून गेली आहे आणि तो तिला शोधत आहे. यापलीकडे आम्हाला काहीच माहिती नाही."
"गिरीशचं घर गावाच्या सीमेवर आहे आणि त्याच्या घराच्या जवळपास इतर घरं नाहीत," असं शाहपूर गावचा रहिवासी आणि गिरीशचे मित्र सुबोध यांनी बीबीसीला सांगितलं. वडनगरजवळ असलेल्या या गावाची लोकसंख्या 3 हजार 500 इतकी आहे.

फोटो स्रोत, Jiya Chaudhari
ते म्हणाले की, "गावात सणांच्या वेळी गिरीश भेटायचा. तेव्हा तो सांगायचा की मुलींच्या जन्मानंतर पत्नीशी भांडणे वाढली आहेत. दिवाळीत आम्ही त्याला पत्नीबद्दल विचारलं तेव्हा त्यानं सांगितलं की, प्रियंका भांडण करून एका मुलीला घेऊन पळून गेली आहे आणि तो दोन खोल्यांच्या घरात एका मुलीसोबतच राहतो."
"आम्ही पोलिसांसोबत त्याच्या घरी गेलो तेव्हा एका ठिकाणी नवीन प्लास्टर केलेलं दिसलं. तिथे गाद्या, भांडी, बिस्किटे आणि नाश्त्याचे पॅकेट्स पडलेले होते. ज्या ठिकाणी मृतदेह पुरले होते, त्याच्या जवळच स्वयंपाकघर होते. त्यामुळे तो तिथेच जेवत आणि झोपत असावा."
पोलीस निरीक्षक दवे म्हणाले की, "पत्नी आणि मुलीची हत्या केल्यानंतर सात महिने आरामात जगत असलेल्या गिरीशला कदाचित त्याचं बिंग फुटेल असं वाटलं असेल, म्हणून त्याने आत्महत्या केली असावी, असं आम्हाला वाटतं."
महत्त्वाची सूचना :
औषधोपचार आणि थेरपीच्या मदतीने मानसिक आजारांवर उपचार शक्य आहेत. यासाठी तुम्ही मानसोपचारतज्ज्ञांची मदत घेणं गरजेचं आहे. तुम्हाला किंवा एखाद्या परिचित व्यक्तीमध्ये अशा प्रकारच्या मानसिक आजारांची लक्षणं दिसल्यास या हेल्पलाईन नंबरवर संपर्क साधून मदत मिळवू शकता.
हितगुज हेल्पलाईन, मुंबई - 022- 24131212
सामाजिक न्याय आणि सशक्तीकरण मंत्रालय -1800-599-0019 (13 भाषांमध्ये उपलब्ध)
इंस्टिट्यूट ऑफ ह्यूमन बिहेवियर अँड एलाइड सायन्सेस - 9868396824, 9868396841, 011-22574820
नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड न्यूरोसायन्स - 080 - 26995000
विद्यासागर इंस्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड एलाइड सायन्सेस, 24X7 हेल्पलाइन-011 2980 2980
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)


























