तुम्हाला हार्ट अटॅकचा त्रास आहे की नाही, हे आता तुमचा मोबाईलच सांगेल...

हृदय, आरोग्य

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, टॉम अफ
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

रक्ताच्या गुठळ्या होणं म्हणजेच ब्लड क्लॉटिंग होणं आरोग्यासाठी गंभीर आहे. त्याचप्रमाणे जर तुमच्या शरीरात रक्त गोठण्याची प्रक्रिया देखील कमी होत असेल तर तुम्हाला ब्लड हॅमरेज होण्याची शक्यता देखील बळावते. अंतर्गत रक्तस्त्राव होऊन तुमचा मृत्यू होऊ शकतो.

तर दुसऱ्या बाजूला रक्तात जास्त गुठळ्या होत असतील तर तुम्हाला थ्रोम्बोसिसचा होण्याची शक्यता बळावते. यातून तुम्हाला हृदयविकाराचा झटका येऊ शकतो.

आता शरीरातील रक्ताच्या गुठळ्यांचं प्रमाण वाढलंय की नाही हे जाणून घेण्यासाठी तुमच्या रक्ताची तपासणी करावी लागते. यासाठी डॉक्टर सिरींजने तुमच्या शरीरातील रक्त काढून घेतात. पण आता याची गरज भासणार नाहीये, कारण तुम्ही स्वतः तुमच्या स्मार्टफोनच्या मदतीने रक्त गोठण्याची तपासणी करू शकता.

पहिला मोबाईल फोन तयार करणाऱ्या टीमचे नेतृत्व करणारे मार्टिन कूपर म्हणाले की, आपल्या आरोग्याचं मॉनिटरिंग करण्यासाठी सेलफोन महत्त्वाचं साधन ठरणार आहे.

आणि या शक्यता आता खऱ्या होताना दिसत आहे.

वॉशिंग्टन युनिव्हर्सिटीमधील काही शास्त्रज्ञांनी मार्च 2022 मध्ये, रक्ताच्या थेंबातील गुठळ्या शोधण्यासाठी आयफोनचा वापर केला होता.

यासाठी त्यांनी मोबाईल फोनमधील लाइट डिटेक्टिंग आणि रेंजिंग (लिडार) सेन्सर वापरला. हा सेन्सर फोनच्या सभोवतालची 3डी इमेज तयार करण्यासाठी प्लस्ड बीमचा वापर करतो.

हे तंत्रज्ञान तुमच्या डिव्हाइसला ऑगमेंटेड रिअॅलिटीशी जुळवून घेण्यासाठी वास्तविक आणि आभासी जगातील वस्तू किंवा अंतर अचूकपणे मोजण्याची परवानगी देते.

उदाहरण म्हणून बघायचं झाल्यास, तुमच्या खोलीत फर्निचरचा तुकडा कसा दिसतो हे दाखवण्यासाठी आपण फोटो काढतो. हा फोटो आणखीन चांगला यावा यासाठी ऑटो फोकस मोडची तुम्हाला मदत होते.

फोनचा कॅमेरा वापरून आरोग्याची तपासणी

मात्र यासाठी सेन्सर इतका अचूक असावा लागतो की त्याला रक्तातील घट्टपणा आणि दुधातील भेसळ लगेच ओळखता यायला हवी. जेव्हा द्रव पदार्थातून प्रकाश मार्गक्रमण करत असतो तेव्हा लेसरच्या कंपनांमुळे एक वैशिष्ट्यपूर्ण पॅटर्न तयार होतो.

उदाहरणार्थ, जर दुधात भेसळ असेल तर त्याचे पॅटर्न बदलतील. अगदी तसेच रक्त गोठण्याच्या बाबतीतही घडते.

संशोधकांना असं आढळून आलं की, काचेच्या स्लाइडवरील रक्ताच्या थेंबांमधील घट्टपणा आणि पातळसरपणा ओळखण्यात त्यांना यश आलं.

अलीकडील एका संशोधनात, रक्त गोठण्याची क्रिया समजून घेण्यासाठी काही प्रयोग करण्यात आले. यात रक्ताच्या थेंबातील तांब्याच्या कणांच्या हालचालीचा मागोवा घेण्यासाठी टीमने स्मार्टफोनवरील कॅमेरे आणि वायब्रेशन मोटर्सचा वापर केला.

हृदय, आरोग्य

फोटो स्रोत, Getty Images

हृदयाचे आरोग्य समजून घेण्यासाठी, तसेच ब्लड प्रेशर समजून घेण्यासाठी इतर काही संशोधक असंच काहीसं तंत्रज्ञान विकसित करत आहेत.

कॅनडातील टोरंटो युनिव्हर्सिटी आणि चीनमधील झेजियांग येथील होंगजू नॉर्मल युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी असा एक अल्गोरिदम विकसित केला आहे ज्यातून स्मार्टफोनच्या फ्रंट कॅमेऱ्यातून घेतलेल्या फोटोंमध्ये चेहऱ्यावर न दिसणारा रक्त प्रवाह देखील दिसू शकतो.

चिनी शास्त्रज्ञांच्या आणखी एका टीमने डीप-लर्निंग अल्गोरिदम विकसित केला आहे. यामुळे स्मार्टफोनमध्ये काढलेल्या चार फोटोंमधून तुम्हाला हृदयाचं आरोग्य समजू शकतं.

अल्गोरिदम आणि आरोग्याचे इतर काही संकेत

फोनमध्ये काढलेले फोटो, एक फ्रंट-ऑन व्ह्यू, दोन प्रोफाइल आणि एक वरून काढलेल्या फोटोंमधून असे संकेत पकडता येऊ शकतात. अल्गोरिदम गाल, कपाळ आणि नाकातील अतिशय सूक्ष्म बदलांवर लक्ष केंद्रित करतात. उदाहरणार्थ त्वचेखालील सुरकुत्या, पट्टे आणि चरबी कॅप्चर करून हे अंदाज लावले जातात. बऱ्याचदा ही कामं कठीण असतात.

हे 80 टक्के प्रकरणांमध्ये हृदयरोगाचा अचूक शोध घेता येऊ शकतो. पण 46 टक्के प्रकरणांमध्ये काही चुका घडू शकतात.

त्यामुळे जर रुग्णाने प्रोफेशनल मेडिकल डायग्नोसिसची मदत न घेता यावरच अवलंबून राहायचं ठरवलं तर अनावश्यक चिंताही निर्माण होऊ शकते.

चीनमधील नॅशनल सेंटर फॉर कार्डिओव्हस्कुलर डिसीजचे संशोधक म्हणतात की, ज्या रुग्णांना आणखीन तपासणीची आवश्यकता आहे त्या रुग्णांसाठी मोबाईल डिव्हाईस एक "स्वस्त, साधं आणि प्रभावी" उपकरण आहे असं म्हणता येईल.

हृदयाच्या स्थितीचं निदान करण्यासाठी स्मार्टफोनची मदत होऊ शकते असं देखील म्हटलं जातंय. शिवाय हे स्वस्त आणि पोर्टेबल माध्यम ठरत आहे.

आरोग्य, हृदय

फोटो स्रोत, Getty Images

पुढे काय होईल?

लॉस एंजेलिसच्या चिल्ड्रन्स हॉस्पिटलमधील कार्डिओलॉजिस्ट जेनिफर मिलर आणि युनिव्हर्सिटी ऑफ सदर्न कॅलिफोर्नियामधील इंजिनियर्सने मिळून हातात पकडता येईल असा अल्ट्रासाऊंड स्कॅनर प्रोटोटाइप तयार केला आहे. इकोकार्डियोग्राम तयार करताना स्मार्टफोनशी लिंक करण्यासाठी याचा वापर होऊ शकतो.

हृदयातून रक्ताचा प्रवाह कसा सुरू आहे हे बघण्यासाठी इकोकार्डियोग्राम महत्वाचा ठरतो.

पण अजूनही हे तंत्रज्ञान रिसर्च आणि ट्रायलच्या विविध टप्प्यात आहे. पण तुमच्या फोनमध्ये अशा काही गोष्टी आल्या आहेत, ज्याच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या आरोग्यावर लक्ष ठेवू शकता.

'द स्मार्टफोन: अॅनाटॉमी ऑफ अॅन इंडस्ट्री'च्या लेखिका एलिझाबेथ वॉयक यांनी रिवा नावाच्या अमेरिकन स्टार्ट-अपचा हवाला देत म्हटलंय की, फोनचा कॅमेरा आणि फ्लॅश वापरून तुम्ही ब्लड प्रेशर ट्रॅक करू शकता.

त्या सांगतात की, "तुम्ही तुमची बोटं स्मार्टफोनच्या कॅमेऱ्यावर ठेऊन तुमचं ब्लड प्रेशर चेक करू शकता. हा सेन्सर तुमच्या धमन्यांमधील रक्तप्रवाहाचा वेग मोजतो."

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)