लोखंडी फुप्फुसांसह हा माणूस 70 वर्षं जगला, पण अशी फुप्फुसं का तयार करण्यात आली? वाचा

पॉल अलेक्झांडर

फोटो स्रोत, GOFUNDME

फोटो कॅप्शन, पॉल अलेक्झांडर

पॉल अलेक्झांडर तेव्हा सहा वर्षांचे होते...एक दिवस त्यांना जेव्हा जाग आली, तेव्हा ते प्रचंड घाबरले.

ते एका मेटल ट्यूबमध्ये होते. त्यांचं सर्व शरीर त्या ट्यूबमध्ये होतं आणि केवळ डोकं बाहेर होतं.

आपल्याला नेमकं कोणत्या गोष्टीनं जखडून ठेवलं आहे, हे समजून घेण्यासाठीही त्यांना शरीर हलवता येत नव्हतं.

मदतीसाठी त्यांनी हाक मारण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की, आपल्याला बोलताही येत नाहीये.

पॉल यांना पोलिओ झाला होता. त्यातून ते वाचले, पण त्यांचे दोन्ही हात आणि पाय निकामी झाले होते. ट्रेकियोस्टोमी नावाचं एक इमर्जन्सी ऑपरेशन केल्यानंतर त्यांना श्वास घेता येत होता. पण त्यासाठी त्यांना आयर्न लंग मशिन म्हणजेच लोखंडी फुफ्फुसांची गरज लागत होती. ही तीच मेटल ट्यूब होती, ज्यामुळे त्यांचं शरीर जखडलं गेलं होतं.

काही दिवसांपूर्वी वयाच्या 78 व्या वर्षी पॉल यांचं निधन झालं. पॉल हे मशिनच्या फुप्फुसांचा वापर करून दीर्घ काळ जिवंत राहिलेले व्यक्ती होते. 70 वर्षं त्यांनी लोखंडी फुप्फुसांच्या मदतीनेच श्वास घेतला.

जगण्यासाठी त्यांनी सुरू ठेवलेली ही लढाई हीच त्यांना इतरांपासून वेगळं करत होती.

19 ते 20 व्या शतकाच्या दरम्यान पोलिओ आरोग्य संकट बनला होता. या काळात पोलिओने शेकडो मुलांचे प्राण घेतले होते, अनेकांना अपंगत्व आलं होतं.

1952 मध्ये पॉल टेक्सासमधल्या एका हॉस्पिटलमध्ये भरती झाले होते. त्यांच्याप्रमाणेच अनेक मुलं होती, ज्यांना पोलिओमुळे भरती व्हावं लागलं होतं.

जागतिक आरोग्य संघटनेनुसार पोलिओचा संसर्ग झालेल्या 200 पैकी एका व्यक्तीला अर्धांगवायू होतो, जो नंतर पूर्णपणे बरा होत नाही. यांपैकी 5 ते 10 टक्के व्यक्तींमध्ये श्वासोच्छवासाशी संबंधित स्नायूंच्या कार्यक्षमतेत अडथळे निर्माण होतात आणि त्यामुळे मृत्यूही होऊ शकतो.

दोन वर्षं हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर पॉल यांच्या भवितव्याबद्दल डॉक्टरांच्याही मनात शंका निर्माण व्हायला लागल्या. अशावेळी त्यांच्या आई-वडिलांनी अतिशय कठीण निर्णय घेतला. ते त्या लोखंडी फुप्फुसांसह पॉलला घरी घेऊन आले, जेणेकरून त्याला आयुष्यातले शेवटचे क्षण शांततेने व्यतीत करता येतील.

पॉल त्यांचे भाऊ फिलिप अलेक्झांडर यांच्यासोबत

फोटो स्रोत, PHILIP ALEXANDER

फोटो कॅप्शन, पॉल त्यांचे भाऊ फिलिप अलेक्झांडर यांच्यासोबत
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

पॉल दिवसेंदिवस ते स्वतःला मजबूत करत गेले.

पॉल ज्या यांत्रिक फुफ्फुसांचा वापर करत होते, ते निगेटिव्ह प्रेशर सिस्टीमवर काम करायचे. यामध्ये एक मोटार लावलेली असते, जी ट्यूबमधील हवा बाहेर काढते. त्यामुळे ट्यूबमध्ये पोकळी तयार होते, जी व्यक्तीला फुफ्फुसांत हवा भरून घ्यायला भाग पाडते.

त्यानंतर ट्यूबमध्ये हीच प्रक्रिया उलटीही होते. म्हणजे त्यात हवा भरली जाऊ लागते, ज्यामुळे व्यक्तीची फुप्फुसं आकुंचन पावतात आणि श्वास सोडला जातो.

अशापद्धतीने व्यक्ती श्वासोच्छवास करते. हे मशीन सुरू ठेवण्यासाठी बाहेरून ऊर्जा आवश्यक असते. समजा वीज गेली, तर हाताने हवा भरण्यासाठी आणि बाहेर काढण्यासाठी ट्यूबमध्ये एक पंप असतो. अशावेळी मदतीसाठी पॉल यांचे शेजारीपाजारी यायचे.

पॉल यांच्या वडिलांनी एक अलार्म बनवला होता. आणीबाणीच्या प्रसंगी पॉल तो आपल्या तोंडाने वाजवू शकत होते.

हळूहळू पॉल आपल्या गळ्यातील स्नायूंचा वापर करायला शिकले. ज्यामुळे ते थोडंसं आचके दिल्याप्रमाणे श्वसन करू शकायचे. याला 'फॉग ब्रीदिंग' असं म्हणतात.

पॉलचे छोटे भाऊ फिलिप यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं की, एक छोटं पिल्लू आणण्याच्या आश्वासनाने पॉलला या फॉग ब्रीदिंगचा सराव करण्यासाठी प्रोत्साहन मिळालं.

फिलिप सांगतात, “पॉल यांना मरणाची भीती वाटायची. पण मी त्याला सांगितलं की, तीन मिनिटांपर्यंत असा श्वास घेतला, तर एक पिल्लू आणून देईन.”

या आश्वासनामुळे पॉल यांनी अशक्य अशी गोष्ट करून दाखवली.

यानंतर पॉलचा आत्मविश्वास वाढला आणि ते अधिक काळ लोखंडाच्या फुप्फुसांमधून बाहेर येऊ लागले. अशाप्रकारे त्यांनी स्वतःला जगण्याची एक संधी दिली. ते व्हीलचेअरवर बसून शेजारच्या मित्रांना भेटायला जायचे आणि दमल्यानंतर आपल्या या फुप्फुसांमध्ये परत यायचे.

फिलिप सांगतात, “माझ्यासाठी आमचं नातं इतर भावाभावांप्रमाणेच होतं. आम्ही एकत्र खेळायचो, भांडायचो, पार्टी करायचो आणि कॉन्सर्टलाही जायचो.”

शिक्षण आणि नंतरचं आयुष्य

पॉलने आपलं शालेय शिक्षण आणि कॉलेजचा अभ्यास घरीच पूर्ण केला. त्यानंतर त्यांना लॉ स्कूलमध्ये प्रवेश घ्यायचा होता.

फिलिप सांगतात की, ऑस्टिनमध्ये टेक्सास युनिव्हर्सिटीमध्ये पॉलने ज्या पद्धतीने शिक्षण घेतलं ते केवळ ‘अविश्वसनीय’ होतं.

पॉल यांच्या आई-वडिलांनी सर्वांत आधी त्यांची यांत्रिक फुफ्फुसं विद्यापीठात पोहोचवली. पॉलसाठी एक परिचारक (केअरगिव्हर) ठेवण्यात आला होता. एक दिवस त्याला यायला जमलं नाही, त्यावेळी पॉलने मर्यादित मदतीसह कसं जगता येईल हे शिकायला सुरूवात केली.

युनिव्हर्सिटी ऑफ टेक्सास

फोटो स्रोत, UNIVERSITY OF TEXAS

फोटो कॅप्शन, टेक्सास युनिव्हर्सिटी

फिलिप सांगतात, “त्याच्याकडे खऱ्या अर्थाने केअर गिव्हर नव्हते. तो डॉर्मिटरीमध्ये राहायचा आणि तिथले बाकीचे लोक त्याची काळजी घ्यायचे. तेच त्याला व्हीलचेअरवरून कँपसमध्ये फिरायलाही घेऊन जायचे.

त्यानंतर पॉल यांनी डलासमध्ये वकिली केली. अनेकदा जेव्हा त्यांचे क्लायंट त्यांना भेटायला यायचे, तेव्हा लोखंडी फुप्फुसं पाहून आश्चर्यचकित व्हायचे.

फिलिप सांगतात, “एखाद्या व्यक्तीचं केवळ डोकंच ट्यूबच्या बाहेर आहे, हे पाहणं तसं त्रासदायकच होतं. त्यांना पाहिल्यावर अनेकांना धक्काच बसायचा. मी खूपदा हे पाहिलंही होतं.”

केअरगिव्हरच्या मृत्यूने बसला होता धक्का

आयुष्याच्या उत्तरार्धात पॉल बहुतांशी एकटेच होते. पाणी पिणं, बाथरुमला जाणं यांसारख्या आपल्या सामान्य गरजांसाठीही जी व्यक्ती दुसऱ्यांवर अवलंबून असेल, तिच्यासाठी हा एकटेपणा किती असह्य होत असेल.

पण फिलिप सांगतात की, हळूहळू पॉल आपली काळजी घ्यायचं शिकत गेले आणि मदत घेण्यासाठी लोकांची मदत करायलाही शिकले.

ते सांगतात, “त्यांना एका वेगळ्या पद्धतीच्या मदतीची आवश्यकता होती. व्यावसायिकांनाही लोखंडी फुफ्फुसांच्या आत राहणाऱ्या, अर्धांगवायूग्रस्त व्यक्तीच्या काळजीसाठी खास ट्रेनिंग दिलं जातं.”

“त्यांना दाढी करणं, जेवण यांसारख्या छोट्या-छोट्या मदतीची गरज होती. त्याशिवाय त्यांना व्हीलचेअरमध्ये बसवतानाही विशेष काळजी घ्यावी लागायची. त्यांच्या बोटांची हालचाल थांबणार नाही, हे पाहावं लागायचं.”

पॉलसाठी केअरगिव्हरची आवश्यकता होती, मात्र त्यासाठी जी जाहिरात दिली जायची त्यामध्ये कोणत्याही विशेष सूचना नमूद केलेल्या नसायच्या.

पॉल त्यांची केअरगिव्हर आणि मैत्रीण कॅथीसोबत

फोटो स्रोत, ROTARY CLUB OF PARK CITIES DALLAS

फोटो कॅप्शन, पॉल त्यांची केअरगिव्हर आणि मैत्रीण कॅथीसोबत

फिलिप सांगतात, “ते काम करता करता शिकायचे. अनेक जण तर एक-दोन दिवसांतच काम सोडून निघून गेले. मी एकदा असिस्टेड लिव्हिंग सेंटर्सबद्दलही खूप चौकशी केली होती. जेव्हा मी त्यांना पॉलबद्दल सांगून त्याची काळजी घेऊ शकता का हे विचारायचो, तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर जे भाव उमटायचे ते मी शब्दांत सांगूही शकत नाही.

त्यानंतर पॉलला कॅथी गेन्स नावाची एक केअरगिव्हर मिळाली. ती मात्र अनेक वर्षं त्यांच्यासोबत राहिली. कॅथीच्या मृत्यूनेच त्यांना खूप मोठा धक्का बसला.

फिलिप सांगतात की, ते नेहमीच स्वतःला आपल्या भावाचा बॅक-अप केअरगिव्हर म्हणून पाहात होतो. मात्र, पॉलने स्वतःसाठी जी व्यवस्था बनवली होती, त्याचंही त्यांना कौतुक होतं.

ते सांगतात की, पॉल यांनी आपल्या आयुष्यात खूप चांगले आणि दिलदार मित्र कमावले होते.

मदतीची आवश्यकता

पॉलच्या याच मित्रमंडळींपैकी एकाने त्यांची त्यावेळी मदत केली, जेव्हा त्यांना त्याची प्रचंड गरज होती.

ही गोष्ट 2015 सालातली होती. जेव्हा पॉलची लोखंडी फुप्फुसं अचानक लीक व्हायला लागली. या पद्धतीच्या मशीन दुर्मिळ होत्या आणि मशीन रिपेअर करण्यासाठी एखाद्या व्यक्तीला शोधणं हे एखादं युद्ध लढण्याप्रमाणे होतं.

त्यामुळे त्यांनी सोशल मीडियावर मदतीसाठी आवाहन केलं. जगभरातून अनेक लोक पॉलच्या मदतीसाठी समोर आले आणि विशेष म्हणजे त्यांना मदत त्यांच्या घराजवळच मिळाली.

डलासमध्ये पॉलच्या घरापासून दहा मैल पुढेच एक एन्व्हायरमेंट टेस्टिंग लॅबोरेटरी होती, ज्याचे मालक बॅडी रिचर्ड्स होते.

एक इमारत रिकामी करण्याच्या कामामध्ये ब्रॅडीला दोन लोखंडी फुफ्फुसं मिळाली होती. ते सांगतात की, एकेदिवशी एक डॉक्टर त्यांच्याकडे आले आणि त्यांनी विचारलं की, “तुमच्याकडे मला लोखंडी फुप्फुसं मिळतील का?”

मशीन योग्य पद्धतीने काम करत नव्हती आणि पॉलला घरी ठेवणं केअरगिव्हरसाठी अवघड होत चाललं होतं. ते डॉक्टर पॉलला हॉस्पिटलमधून घरी आणि घरून हॉस्पिटलमध्ये येण्याजाण्याचं काम करत होते.

परिस्थिती हाताबाहेर जायला लागली होती. अशावेळी कोणीतरी सांगितल्यामुळे डॉक्टर ब्रॅडीकडे आले होते.

ब्रॅडी रिचर्ड्स लोखंडी फुफ्फुसांसोबत

फोटो स्रोत, BRADY RICHARDS

फोटो कॅप्शन, ब्रॅडी रिचर्ड्स लोखंडी फुप्फुसांसोबत

ब्रॅडी सांगतात की, “मला त्यावेळी पॉल अलेक्झांडरबद्दल काहीही माहीत नव्हतं.”

परिस्थिती समजून घेण्यासाठी ब्रॅडी त्याच्याजवळ ठेवलेली एक मशीन दुरुस्त करण्याच्या कामाला लागले. त्यांनी काही नवीन भाग बनवले, काही दुसऱ्या मशिनमधून घेतले किंवा मशीन ठीक करता करता त्याबद्दल शिकायला लागले.

ते सांगतात, “ही लोखंडी फुप्फुसं मजबूत मशीन होती, जी दीर्घकाळ चालण्यासाठी बनविण्यात आली होती. ही अतिशय साधी मशिन्स होती, जी दुरुस्त करणं जास्त अवघड नव्हतं. तुम्ही यामध्ये श्वास घेण्याची गती कमी किंवा जास्त करू शकत होता.”

मशीन बदलण्याचा पर्याय

मशीनचं काम पूर्ण झाल्यानंतर ब्रॅडी ते घेऊन पॉलच्या घरी गेले आणि त्याच्या जुन्या मशिनमध्ये बदल करण्यात आला. हे काम त्यांनी मोफतच केलं.

मात्र त्यांचं काम संपलंच नाही. एके रात्री पॉलच्या केअरगिव्हरने ब्रॅडीला फोन केला आणि सांगितलं की, मशीन काम करत नाहीये.

ब्रॅडी पॉलच्या घरी आले आणि त्यांनी पाहिलं की, गळ्यावर लावली जाणारी कॉलर योग्य पद्धतीने लावण्यात आली नाहीये. ती सैल झालीये.

ते सांगतात की, पॉल सातत्याने म्हणत होते की, ते ठीक आहेत. मात्र, त्यांचं शरीर निळं पडत होतं.

अशापद्धतीच्या इमर्जन्सीसाठी पॉलकडे दुसरं डिव्हाईस होतं. ते छोटं होतं, मात्र लोखंडी फुफ्फुसापेक्षा वेगळ्या पद्धतीने काम करत होतं.

जेम्स पोर्टियस त्यांच्या कारमध्ये

फोटो स्रोत, JAMES PORTEOUS

फोटो कॅप्शन, जेम्स पोर्टियस त्यांच्या कारमध्ये

लंडनमधील सेंट थॉमस हॉस्पिटलमधील लेन फॉक्स रेस्पिरेटरी युनिटचे डॉक्टर पॅट्रिक मर्फी सांगतात की, “हे पॉझिटिव्ह प्रेशर रेस्पिरेटर असतात, जे एखाद्या व्यक्तीला असा अनुभव देतात, जसा कारच्या खिडकीतून डोकं बाहेर काढल्यावर येतो.”

पॉलने कधीही अशा पद्धतीच्या मास्कसारख्या डिव्हाइसचा वापर केला नव्हता.

मशीन बदलण्याचा पर्याय

मात्र, उत्तर इंग्लंडमधील यॉर्कमध्ये राहणाऱ्या 78 वर्षांच्या जेम्स पोर्टियस यांनी आपलं मशीन बदलण्याचा निर्णय घेतला. जेव्हा पॉलला पोलिओ झाला होता, त्यांनाही त्याच वर्षी पोलिओ झाला होता.

जेम्स पोर्टियस यांनाही पहिल्यांदा लोखंडी फुप्फुसात ठेवण्यात आलं होतं. त्यांची प्रकृती सुधारायला लागली होती आणि एक वेळ अशी आली की, ते मशीनची कमीत कमी मदत घेऊन जगायला शिकले होते. पण पोलिओच्या इतर पेशंट्ससोबत जे होतं, तेच त्यांच्यासोबत झालं...त्यांचं मशीनवरचं अवलंबित्व वाढत गेलं.

ते दिवसातले 17 तास रेस्पिरेटर मास्क वापरत होते.

डॉक्टर मर्फी

फोटो स्रोत, NHS

फोटो कॅप्शन, डॉक्टर मर्फी

त्यांनी आपलं शिक्षण पूर्ण करून स्टॉक ब्रॉकर म्हणून काम केलं, ज्यानंतर राउनट्री नावाच्या एका कंपनीत आणि नेस्लेमध्ये काम केलं. त्यांचं लग्न झालं आहे आणि त्यांना चार मुलीही आहेत.

ते सांगतात की, “मी आयुष्यभर गुडघ्यांवर शाल पांघरुन राहात होतो. मात्र आता मी हे न करण्याचा निर्णय घेतला. आजकाल मी थकतो, पण माझं आयुष्य छान चाललंय. मी जगातून पोलिओ निर्मूलन करण्याच्या मोहिमेसाठी काम करत आहे.”

पोलिओ निर्मूलनाचं लक्ष्य

पॉलचंही लक्ष्य पोलिओ निर्मूलन करण्याचंच होतं. त्यांनी 2020 मध्ये आपल्या आत्मचरित्रात ही गोष्ट लिहिली होती. आपल्या तोंडात पेन्सिल पकडून कीबोर्ड पर्यंत पोहोचून त्यांनी स्वतःच आपलं चरित्र पूर्ण केलं होतं.

ब्रॅडी सांगतात की, पॉलला भेटल्यानंतर मी नेहमीच त्यांच्यासोबत राहिलो. घर बदलण्यात आणि लोखंडाची फुफ्फुसं दुरुस्त करण्यासाठी मदत करायचो.

ते सांगतात की, “पॉलचं सोबत असणं हा एक आनंदी करणारा अनुभव होता. त्यांची सकारात्मक वृत्ती तुम्हालाही प्रेरणा द्यायची.”

डॉक्टर मर्फी सांगतात की, “पॉल यांचे आई-वडील त्यांना लोखंडी फुप्फुसांसोबत घरी घेऊन गेले. त्याकाळात हे अत्याधुनिक तंत्रज्ञान होतं. त्यांना डॉक्टर, नर्स आणि इंजिनिअर्सच्या मदतीची आवश्यकता होती. अनेक प्रशिक्षित डॉक्टरांमध्येही अशाप्रकारच्या गंभीर आजाराच्या रुग्णांची देखभाल करण्याचा विश्वास नव्हता. पण पॉलच्या कुटुंबीयांनी ही गोष्ट केली. हे खरंच धाडसाचं काम होतं.”

गेल्या वर्षी पॉल अलेक्झांडर यांचं नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये नोंदवलं गेलं. ते सर्वाधिक काळ लोखंडी फुप्फुसांचा वापर करणारी व्यक्ती बनले होते.

फिलिप सांगतात की, पॉलने आपलं आयुष्य या लोखंडी फुप्फुसावर कसं काढलं याचं जगाला आश्चर्य वाटू शकतं. परंतु आमच्या आई-वडिलांना याचं आश्चर्य वाटलं नाही.

ते पुढे म्हणतात, “त्यांना पॉलवर विश्वास होता. त्याने त्याला भरपूर प्रेम आणि आत्मविश्वास दिला.”