अचानक बिबट्या समोर आला तर हे करा…

फोटो स्रोत, Getty Images
- Author, प्रवीण शुभम्
- Role, बीबीसीसाठी
अहमदनगर जिल्ह्यातल्या संगमनेर तालुक्यात वडदरा (बोटा) नावाचं गाव आहे. या गावात राहणारे उत्तम बाळाजी कुऱ्हाडे 22 एप्रिलच्या रात्री त्यांच्या घरी टीव्ही बघत होते. ते टीव्ही पाहण्यात मग्न होते त्यामुळं त्यांच्या घराचं दार उघडंच राहिलं आणि तिथेच घात झाला.
रात्री आठच्या सुमारास त्यांच्या घरात एक बिबट्या शिरला आणि काही कळायच्या आत बिबट्याने उत्तम कुऱ्हाडेंवर हल्ला चढवला.
बिबट्याने त्यांच्या मानेवर हल्ला केल्याने ते जागीच ठार झाले आणि त्यानंतर, तो बिबट्या त्यांना फरपटत शेतात नेत असतांना त्यांच्या आईने पाहिलं.
त्यानंतर, एकच गोंधळ उडाला. त्या गोंधळामुळे भेदरलेल्या बिबट्याने 62 वर्षांच्या उत्तम कुऱ्हाडेंचा मृतदेह तिथेच टाकून पळ काढला.
फ्री प्रेस जर्नलने दिलेल्या वृत्तानुसार, मागील दोन दशकांमध्ये महाराष्ट्रातील बिबट्यांच्या हल्ल्यांमध्ये वाढ झाली आहे.
महाराष्ट्रातल्या शहरी भागांमध्ये, विशेषतः मुंबई, पुणे, नाशिक आणि काही निमशहरी भागात सुद्धा जंगली प्राणी त्यांचा नैसर्गिक अधिवास सोडून, लोकवस्तीत घुसल्याच्या घटना वाढल्या आहेत.
राज्यातील शहरांमध्ये सिमेंटची जंगलं वाढत चालली असल्यामुळे मानव-प्राणी संघर्षाच्या घटना घडत आहेत.
जंगली श्वापदांनी माणसावर केलेल्या हल्ल्यांची मागच्या वर्षाची आकडेवारी पहिली तर असं दिसून येईल की, जानेवारी ते डिसेंबर 2022 मध्ये वन्यप्राण्यांनी केलेल्या हल्ल्यात तब्बल 105 लोकांचा मृत्यू झालेला आहे.
मुख्यतः वाघ आणि बिबट्यांनी केलेल्या हल्ल्यांची संख्या यामध्ये जास्त आहे.

फोटो स्रोत, telangana forest department
वनसंरक्षक महीप गुप्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार, 2022मध्ये वाघांनी केलेल्या हल्ल्यामध्ये तब्बल 77 लोकांचा तर बिबट्याने केलेल्या हल्ल्यांमध्ये 17 लोकांचा मृत्यू झालेला आहे.
मुंबईचं संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, त्याशेजारी असणारी आरे कॉलनी आणि आयआयटी कॅम्पस या परिसरांमध्ये बिबट्यांचे हल्ले झाले आहेत.
त्यामुळे जर बिबट्या अचानक तुमच्या समोर आला तर नेमकं काय केलं पाहिजे? आणि काय करणं टाळलं पाहिजे?, बिबट्याने हल्ला करू नये म्हणून कोणती खबरदारी घेतली पाहिजे यांसारखे प्रश्न सतत विचारले जातात.
तेलंगणा राज्य वनविभागातील वरिष्ठ अधिकारी सिरीपुरापू माधवराव यांनी या प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न केलाय. तेलंगणातल्या कव्वाल व्याघ्र प्रकल्पात ते विभागीय वन अधिकारी म्हणून काम करतात.
माधव राव यांनी बीबीसीला बिबट्याचा हल्ला झाल्यावर नेमकं काय करावं आणि बिबट्याची वैशिष्ट्ये नेमकी कोणती असतात हे सांगितलं आहे.
"बिबट्या हा एक अत्यंत लाजाळू प्राणी आहे. त्याला लोकांपासून दूरच रहायला आवडतं. लोकांचा आवाज आला तर बिबटे दूर पळून जातात.
जंगल सफारीवर गेलेल्या लोकांनाही क्वचितच बिबट्याचे दर्शन होत असतं. त्यामुळे बिबटे एकटं राहणंच पसंद करतात. फक्त विणीच्या काळातच बिबटे समूहात आढळून येतात. मादी बिबट्या किमान एक वर्ष पिल्लांची काळजी घेते."

फोटो स्रोत, Getty Images
बिबटे जंगलात खडकाळ गुहेसारख्या भागात राहतात. बिबटे बहुतांशवेळा हरीण, सांबर आणि रानडुकरांची शिकार करतात.
बिबट्यांच्या शरीरावचे डाग एकसारखेच दिसत असले तरी दोन बिबट्यांच्या शरीरावर कधीच एकसारखे डाग दिसत नाहीत. प्रत्येक बिबट्या वेगळा असतो आणि त्यांच्या शरीरावरील डिजाईन वेगवेगळं असतं.
अचानक बिबट्या समोर आला तर काय करावं? किंवा काय करू नये?
जगात वाघांची सर्वाधिक लोकसंख्या भारतात आहे. केंद्र सरकारने जारी केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार 2022 पर्यंत देशात त्यांची संख्या 3682 आहे. मात्र, भारतात बिबट्यांची संख्या वाघांच्या संख्येपेक्षा जास्त आहे.
देशातल्या जवळपास सगळ्याच भागांमध्ये बिबटे आढळून येतात. माधव राव यांनी सांगितलं की, "वाघांच्या तुलनेत भारतातील वाघांची संख्या आठपटींनी जास्त आहे. याचा सरळ सरळ असा अर्थ होतो की देशात जवळपास पंचवीस हजार बिबटे असू शकतात."
बिबट्यांचा अधिवास नष्ट झाल्याने, मोठ्या प्रमाणात त्यांची शिकार झाल्याने आणि पाण्याच्या कमतरतेमुळे बिबटे मानवी वस्तीत घुसतात आणि माणसांवर हल्ले करतात.
एकही प्राणी जाणूनबुजून जंगलाच्या बाहेर येत नाही. मात्र माणसाचा जंगलात वाढत चाललेला हस्तक्षेप आणि इतर काही बाह्य कारणांमुळं प्राण्यांना त्यांचं राहण्याचं ठिकाण सोडावं लागतं.
बिबट्या हा एक अत्यंत वेगवान प्राणी आहे. त्यामुळे बिबट्या मानवी वस्तीत घुसला तर प्रचंड धुमाकूळ घालू शकतो. "गर्दीत घुसलेल्या बिबट्याला पकडणं अजिबात सोपं नसतं," असेही ते म्हणाले.
बिबट्याने हल्ला केल्यानंतर तो किती अंतरावर आहे, यावरून तो हल्ला किती गंभीर आहे हे ठरत असतं. जे बिबट्याचं तोंड तुमच्याकडे नसेल तर तो वळून न बघता तसाच सरळ निघून जाऊ शकतो. अशा परिस्थितीत तुमच्यावर हल्ला करण्याची त्याला गरज नसते.
मात्र जर अचानक तुमची आणि बिबट्याची समोरासमोर भेट झाली तर हल्ला होण्याची शक्यता जास्त असते. माधव राव यांनी सांगितलं की अशा परिस्थितीत हल्ला होण्याची शक्यता जास्त असते.

फोटो स्रोत, Liam Austin/Facebook
"अशावेळी समोर बिबट्या आल्यास तुमचे दोन्ही हात उंचावून जोरजोरात ओरडलं पाहिजे. असं केल्याने बिबट्याला त्याच्यापेक्षा मोठा प्राणी त्याच्यासमोर आल्याचा भास होऊ शकतो.
जर तुम्ही वन्य प्राण्यांचं मानसशास्त्र अभ्यासलं तर असं दिसून येईल की जंगली प्राणी त्यांच्यापेक्षा आकाराने मोठ्या असलेल्या प्राण्यांवर सहसा हल्ला करत नाहीत. बिबट्याचा हल्ला झाला तर कोणत्याही परिस्थितीत पळून जाण्याचा किंवा झाडांमध्ये लपण्याच्या प्रयत्न करू नये. असं केल्यास बिबट्या हल्ला करण्याची शक्यता वाढते."
त्यांनी समजावलं की, "तुम्ही तिथून पळून जाण्याचा प्रयत्न केला तर बिबट्या तुमच्यावर हल्ला करेलच हे निश्चितपणे जरी सांगता येत नसलं तरी, जे बिबट्याने हल्ला करण्याचं ठरवलंच असेल तर तुम्ही कितीही वेगाने पळालात तर बिबट्यापेक्षा जास्त वेगाने तर तुम्ही पळूच शकत नाही."
माधव राव म्हणाले की, "जंगलात पळून जाणाऱ्या शिकारीचा पाठलाग करून शिकार करण्याची पद्धत सामान्य आहे. तुम्ही झाडीत लपून बसण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला चार पायांचा लहान प्राणी समजून बिबट्या तुमच्यावर हल्ला करू शकतो.
त्यामुळे बिबट्याशी सामना झाल्यास अजिबात पळून जाऊ नये. जर बिबट्या तुमच्यापासून दूर असेल, तर शांतपणे उभे रहा, दोन्ही हात वर करा आणि हळूहळू तिथून मागे हटण्याचा प्रयत्न करा.जर बिबट्या खूपच जवळ असेल तर दोन्ही हात वर करून, जोरजोरात ओरडत मागे हटण्याचा प्रयत्न केला तरी बिबट्याच्या हल्ल्याची शक्यता कमी होत असते."
झाडावर चढून बसल्यास बिबट्या तुमच्यावर हल्ला करणार नाही का?
बिबट्या झाडावर अगदी आरामात चढू शकतो. त्यामुळं तुम्ही झाडावर चढून स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न केला आणि बिबट्याने तुमच्यावर हल्ला करण्याचा निश्चय केलेलाच असेल तर तो अगदी सहज झाडावर चढून तुमच्यावर हल्ला करू शकतो.

फोटो स्रोत, LiamAustin/Facebook
बिबट्याच्या हल्ल्यापासून वाचण्यासाठी तुम्ही काय करू शकता?
जे लोक जंगलाच्या जवळ राहतात किंवा त्या भागात शेती करतात, अशा लोकांवर बिबट्याचा हल्ला होण्याची शक्यता जास्त असते. माधव राव यांचं असं मत आहे की काही नियम पाळले तर तुम्ही अशा हल्ल्यांपासून स्वतःचा बचाव करू शकतात.
त्यांनी सांगितलं की, "जर तुम्ही डोक्याच्या मागच्या भागावर मानवी मुखवटा परिधान केला तर स्वतःला बिबट्या किंवा इतर वन्यप्राण्यांच्या हल्ल्यापासून वाचवूस शकता.
सामान्यतः जंगली प्राणी मागून हल्ला करतात. त्यामुळे हा उपाय केल्यास या हल्ल्यांपासून स्वतःला वाचवता येऊ शकतं. वनविभाग नेहमी शेतकरी आणि शेतमजुरांना अशा पद्धतीने मुखवटे घालायला आणि समूहाने शेतात जायला सांगत असतं.
जंगलाजवळ राहणाऱ्या लोकांनी रात्री आग लावली तर बिबटे किंवा इतर वन्यप्राणी त्यांच्या जवळपासही फिरकणार नाहीत. जंगलात किंवा जंगलाच्या आजूबाजूला राहणारे आदिवासी लोक हीच पद्धत वापरतात."
बिबटे नरभक्षक आहेत का?

बिबट्यांची नरभक्षी होण्याची शक्यता अगदीच कमी असते. बिबट्या शिकार करत असताना, माणसांची शिकार करणं ही त्यांची प्राथमिकता नसते. पण, त्यांना धोका वाटलं तर मात्र बिबटे माणसावर हल्ला करू शकतात.
तुम्ही जंगलात भटकत असाल तर बिबट्याची नजर तुमच्यावर सगळ्यांत आधी पडण्याची शक्यता जास्त असते.
त्यामुळे तुम्ही बिबट्याला प्रत्यक्ष पाहण्याच्या कितीतरी आधीच त्याने तुम्हाला बघितलेलं असतं. वन्यप्राण्यांमध्ये माणसाचा स्पर्श आणि गंध ओळखण्याची क्षमता जास्त असते.
माणसाच्या क्षमतेपेक्षा प्राण्यांची क्षमता कितीतरी जास्त असते. त्यामुळे तुमच्या येण्याचा अंदाज आला तर प्राणी न घाबरता तिथून पळून जातात."
बिबट्याने हल्ला केलाच तर...
वाघापेक्षा बिबट्याचे वजन आणि त्याच्या पंजाची ताकद कमी असते. बिबट्याचं वजन साधारणतः 100 ते 150 किलो असतं. बिबट्याच्या हल्ला होऊनही जीव वाचल्याची काही उदाहरणं आहेत, अशी माहिती वनविभागातल्या अधिकाऱ्यांनी दिली.
आदिवासी भागांमध्ये बिबट्याचा हल्ला होऊनही माणसाचा जीव वाचल्याची अनेक उदाहरणं आहेत.
बिबट्याचा हल्ला झाल्यावर जीव वाचवायला मोठ्या मानसिक आणि शारीरिक सामर्थ्याची गरज असते.
सामान्यतः बिबट्या तो शिकार करत असलेल्या प्राण्याच्या मानेवर हल्ला करतो.
त्यानंतर शिकारीची मान तोंडात पकडतो.
माधव राव म्हणतात की, "तुमच्यावर बिबट्याने हल्ला केलाच आणि तुम्ही तुमची मान त्या हल्ल्यातून वाचवू शकलात तर काही जखमा होऊन तुम्ही त्या हल्ल्यामधून स्वतःचा जीव वाचवू शकता."
हेही पाहिलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








