चंगेझ खान मोहिमेवर जाताना अळ्यांनी भरलेली गाडी घेऊनच जायचा, कारण...

    • Author, डॉ. एरिका मॅकअॅलिस्टर
    • Role, बीबीसी रील्ससाठी

चंगेझ खान, अमेरिकन गृहयुद्ध आणि ब्रिटनच्या आरोग्य खात्यात काय साम्य आहे?

 तुमचा विश्वास नाही बसणार, पण याचं उत्तर आहे…अळ्या.

 होय...अळ्या!

 बऱ्याच कीटकांची वाढ होत असताना ते वेगवेगळ्या टप्प्यातून जात असतात. अंड्यातून बाहेर पडून उडायला लागेपर्यंत माश्यांच्या अनेक प्रजाती वेगवेगळ्या शारीरिक टप्प्यातून जात असतात.

 आधी अंडी, नंतर असते लार्व्हल स्टेज. या अवस्थेत ते अळीसारखे दिसतात. या अळ्यांना वैज्ञानिक भाषेत ‘मॅगॉट्स’ असंही म्हणतात. 

या ‘मॅगॉट्स’ना कोणतेही अवयव नसतात. त्यांचं मुख्य काम म्हणजे, जितकं शक्य असेल तितकं खाऊन आहे त्यापेक्षा 100 पटींनी मोठं होणं.

इथं आपण ज्या ‘मॅगॉट्स’ किंवा अळ्यांबद्दल बोलतोय त्या माश्यांच्या ब्लो फ्लाय, फ्लेश ब्लो फ्लाय, ब्लू फ्लाय, ग्रीन फ्लाय या प्रजातींशी संबंधित आहेत.

यातल्या बऱ्याच माश्यांच्या प्रजाती या कुजणारं मांस आणि प्राण्यांच्या मलमूत्रावर रेंगाळताना दिसतात.

पण या सगळ्याच माश्या हानिकारक असतात असं नाही. यातल्या बहुतेक प्रजातींचा औषधोपचारात खूप उपयोग होतो.

युद्धातील जखमा साफ करण्यासाठी अळ्यांची मदत

जर या माश्या आपल्या जखमेवर घोंगावत असतील तर ते चांगलं नाही असं म्हटलं जातं. मात्र ही माशी जन्माला येण्याआधी असलेल्या अळीचा वापर जखमा साफ करण्यासाठी तसेच त्या भरून येण्यासाठी केला जायचा. ही उपचारपद्धती अनेको वर्षांपासून वापरली जायची.

असं म्हणतात की इतिहासातील सर्वात मोठ्या साम्राज्याचा सर्वेसर्वा असलेला चंगेज खान युद्धात जखमी झालेल्या आपल्या सैनिकांना मदत करण्यासाठी अळ्यांची गाडी घेऊनच जगभर प्रवास करायचा.

या अळ्या सैनिकांच्या जखमेवर सोडल्या जायच्या. या अळ्या जखमेच्या आजूबाजूचं मांस खायच्या. पण हे मांस खराब झालेलं असायचं.

तज्ज्ञांच्या मते चंगेज खान आणि त्याच्या सैन्याला माहित होतं की, या अळ्या फक्त खराब कोशिकाच खात नाहीत, तर संसर्ग झालेल्या कोशिका खाऊन जखमाही साफ करतात.

बरं, ही बाब केवळ मंगोल लोकांनाच माहिती होती असंही नाही.

ऑस्ट्रेलियाच्या न्यू साउथ वेल्समध्ये राहणारी नगियमपास ही प्राचीन आदिवासी जमात, उत्तर म्यानमारच्या जमाती आणि मध्य अमेरिकेतील माया संस्कृतीतील लोकांनादेखील या अळ्यांच्या वापराबाबत माहिती असल्याचे पुरावे आहेत.

या अळ्या फायदेशीर का?

अळ्यांच्या मदतीने जखमेभोवती कुजलेलं मांस काढण्याचे प्रकार जगभर पाहायला मिळतात.

पण मुख्य प्रवाहातील वैद्यकीय शास्त्राने याकडे कायम दुर्लक्ष केलेलं. पण एका मोठ्या युद्धामुळे पुन्हा या उपचारपद्धतीकडे लक्ष गेलं.

अमेरिकन गृहयुद्धाच्या काळात डॅनव्हिल रुग्णालयात काम करणारे शल्यचिकित्सक जॉन फोर्नी झकारियास यांनी या विषयावर लक्ष केंद्रित करण्यास सुरुवात केली.

ते पहिले असे शल्यचिकित्सक होते ज्यांनी माणसांच्या जखमांमधील कुजलेलं मांस काढून टाकण्यासाठी अळ्यांचा वापर केला होता. विशेष म्हणजे त्याचे चांगले परिणाम दिसून आले.

शिवाय या अळ्यांनी जखमांवरील जंतू सुद्धा स्वच्छ केल्याचं जॉन यांना आढळून आलं.

पण रॉबर्ट कोच आणि लुई पाश्चर सारख्या शास्त्रज्ञांमुळे जॉन फोर्नीचे प्रयत्न थांबले.

जखमांच्या स्वच्छतेचा मुद्दा पुढे करून त्यांनी जखमांवर अळ्यांचा वापर करणं कसं अयोग्य आहे हे दाखवून दिलं.

त्याच दरम्यान अलेक्झांडर फ्लेमिंगने पेनिसिलीनचा शोध लावला. जर एक लहानशी गोळी तुमची जखम बरी करू शकत असेल तर त्या जखमेवर अळ्या घालणं कोणाला आवडलं असतं?

पण 1980 च्या दशकात ही लहानशी गोळी सुद्धा मागे पडायला लागली. मेथिसिलिन-रेजिस्टंट स्टॅफिलोकोकस ऑरियस (MRSA) या जीवाणूवर या गोळीचा परिणाम होत नव्हता.

त्यामुळे या सुपर बॅक्टेरियाशी लढण्यासाठी नव्या हत्याराची गरज होती.

त्यावेळी पुन्हा एकदा मदतीसाठी अळ्या पुढे आल्या. या अळ्या केवळ जखमेवरील कुजलेलं मांसच खायच्या नाहीत, तर जखमेत असलेल्या मेथिसिलिन-रेजिस्टंट स्टॅफिलोकोकस ऑरियस (MRSA) जीवाणूंचा नायनाट करायच्या.

त्या खूप वेगाने आणि प्रभावीपणे काम करायच्या.

त्यामुळे ब्रिटन सारख्या देशांमध्ये ‘या’ अळ्यांचा वापर केला जातो. राष्ट्रीय आरोग्य सेवेसारख्या आरोग्य विभागांद्वारे या अळ्यांच्या सेवा पुरविल्या जातात.

पण आपल्या जखमेवर अळ्या फिरत असलेलं पाहणं कोणाला आवडतं? तर कोणालाच नाही. त्यामुळे ज्यांना हे बघणं सहन होत नाही त्यांच्यासाठी सोयीस्कर म्हणून छोट्याश्या टी बॅग मध्ये या अळ्या पॅक करून जखमेवर लावल्या जातात.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)