You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कांदा फक्त 900 रुपये किलो, सोशल मीडियावर मीम्सचा पूर आणि बोंगबोंग व्यवस्थापन
- Author, कॅमिला वेरास मोता
- Role, बीबीसी प्रतिनिधी
- Reporting from, ब्राझील
जगाच्या अनेक भागात कांदा हा अन्नपदार्थातील अविभाज्य घटक आहे. मांसाहार ही एक प्रकारची श्रीमंती मानली जाते. मात्र फिलीपीन्स मध्ये अशी परिस्थिती उद्भवली आहे की मांसापेक्षा कांदा तिथे जास्त महाग आहे.
कोणत्याही पदार्थात कांदा लसूण टाकणं हा फिलीपिन्सच्या खाद्यसंस्कृतीचा महत्त्वाचा आणि पारंपरिक भाग आहे.
स्पेनने जेव्हा या देशावर ताबा मिळवला होता तेव्हापासून खरंतर कांदा मोठ्या प्रमाणात वापरण्यास सुरुवात झाली. फिलीपिन्समध्ये 1521 ते 1898 पर्यंत स्पेनची सत्ता होती. त्यामुळे स्पेनच्या खाद्यसंस्कृतीचा फिलीपिन्सवर मोठा परिणाम झाला.
मात्र गेल्या महिन्यापासून इथल्या सामान्य नागरिकांसाठी कांदा खरेदी करणं श्रीमंती शौक झाला आहे. भाववाढीनंतर आता कांदा मांसापेक्षा सुद्धा महाग झाला आहे.
फिलीपीन्समध्ये कांद्याची किंमत या आठवड्यात 900 रुपये किलो झाली आहे. तर चिकनची किंमत सव्वा तीनशे रुपये किलो आहे.
कांद्याची ही किंमत तिथल्या मजुरांच्या एक दिवसाच्या सरासरी मजुरीपेक्षाही जास्त आहे.
कांद्याच्या किमतीत वाढ झाल्यानंतर फिलिपीन्सच्या अधिकाऱ्यांनी अवैधरित्या आणल्या जाणाऱ्या कांद्याचा माल जप्त केला आहे. जानेवारी महिन्याच्या सुरुवातीला 3 लाख 10 हजार डॉलरचा कांदा पकडण्यात आला होता. कापडाच्या नावाखाली कांदा चीनमधून आणण्यात येत होता.
सोशल मीडियावर यासंबंधी लोक मीम्स आणि जोक्स पोस्ट करत सरकारवर टीका करत आहेत. कांद्याची भाववाढ होण्यात सरकारचाही वाटा आहे असं अनेकांचं मत आहे.
अमेरिकेत राहणाऱ्या फिलिपीन्सचा एक नागरिक ट्विटरवर लिहितो, “अलविदा चॉकलेट, कांद्याचं स्वागत. आता कांदाच लोकांना भेट म्हणून द्यावा लागेल कदाचित.”
आणखी एक नागरिक लिहितो, “आम्ही सौदी अरेबियाच्या दौऱ्यावरून परत येताना आता चॉकलेट ऐवजी कांदा घेऊन येत आहोत.”
अमेरिकेच्या दौऱ्यावर गेलेल्या एका फिलिपीन्सच्या नागरिकाने चूर्णाच्या बाटलीचा एक फोटो शेअर केला आहे आणि लिहिलं,
“आता फिलिपीन्समध्ये कांद्याची किंमत सोन्यासारखी झाली आहे. मी घरी येताना कांदा घेणार होतो, जेणेकरून लोकांना भेट देता याईल. मात्र मी सुपरमार्केटमध्ये गेलो तेव्हा तिथला स्टॉक संपला होता. मी एका सेल्सगर्लला विचारलं की नक्की काय झालं आहे. तेव्हा ती म्हणाली की फिलिपीन्समधून आलेल्या सगळ्या पर्यटकांनी कांदा खरेदी केला आहे.”
ING बँकेचे एक ज्येष्ठ अधिकारी निकोलस मापा फिलिपीन्सची राजधानी मनीला येथे राहतात. निकोलस म्हणाले की अनेक हॉटेल्सने कांदा असलेले अन्नपदार्थ विकणं बंद केलं आहे. उदा. आधी बर्गर तयार करण्यासाठी कांदा कापला जायचा. आता अनेक हॉटेल्सच्या मेन्यूमधूनच तो गायब करण्यात आला आहे.”
निकोलस मापा यांनी बीबीसीने पाठवलेल्या इमेल ला उत्तर देताना सांगितलं, “हॉटेलवाले पदार्थाच्या किमती वाढवू शकत नाही म्हणून त्यांनी कांदा असलेले पदार्थ विकणंच बंद केलं आहे.”
खाद्यपदार्थ विकणाऱ्या काही व्यापाऱ्यांनी तर आता कांद्याला पर्याय शोधणं सुरू केलं आहे. शेफ जॅम मेलचोर हे फिलिपीन्सचा खाद्य वारसा जतन करणाऱ्या चळवळीचे संस्थापक आहेत. त्यांनी कांद्याला पर्याय शोधायला सुरुवात केली आहे.
मॅलचोर यांनी कांद्याच्या जागी फिलिपीन्समध्ये तयार होणाऱ्या कांद्याचा प्रकार लसोनाचा वापर करायला सुरुवात केली आहे. लसोना छोट्या आकाराचा असतो. तो द्राक्षांच्या आकाराचा असतो. त्याची चव पारंपरिक कांद्यापेक्षा थोडी वेगळी असते.
बीबीसीशी बोलताना ते म्हणाले, “सध्या हॉटेल आणि सामान्य जनता दोघांनाही अडचणींचा सामना करत आहेत. सध्या कांद्याचे जे भाव आहेत, ते लोकांच्या क्रयशक्तीच्या बाहेर आहेत. आम्ही सध्या उपलब्ध असलेल्या पर्यांयांचा जास्तीत जास्त वापर करण्याच्या विचारात आहोत.”
जॅम सांगतात, “कांदा फिलिपीन्ससाठी अतिशय महत्त्वाचा आहे. आम्ही जे पदार्थ तयार करतो त्यात बहुतांश वेळी कांदा असतोच. कांदा आमच्या खाद्य संस्कृतीचा महत्त्वाचा भाग आहे.”
फिलीपिन्समध्ये कांदा का महाग झाला आहे?
निकोलस मापा यांच्या मते कांद्याचे भाव वाढण्याची दोन महत्त्वाची कारणं आहेत. ऑगस्ट महिन्यात कृषी विभागाने कांद्याचं उत्पादन कमी होण्याचा इशारा दिला होता. मात्र त्याच महिन्यात समुद्रात मोठं वादळ आलं आणि कांद्याचं पीक अपेक्षेपेक्षा आणखीच कमी आलं.
ते म्हणाले, “दुर्दैवाने दुसऱ्या देशातून कांदा आयात करण्याचं काम उशिराने सुरू झालं. जेव्हा आयात सुरू झाली तेव्हा देशात हाहाकार माजला होता. खरी परिस्थिती अशी आहे की नवं पीक आल्यावरच कांद्याचे भाव वाढले होते.”
जानेवारी महिन्यात कांद्याच्या किंमतीवर नियंत्रण आणण्यासाठी सरकारने 2.2 कोटी टन कांद्याच्या आयातीला मंजुरी दिली होती.
फर्मिन एड्रियानो सारख्या काही तज्ज्ञांच्या मते हे सरकारचं सगळ्यात मोठं अपयश आहे. एड्रियानो याआधी कृषी विभागाचे सल्लागार होते. कांद्याचं उत्पादन कमी झालं आहे हे माहिती असूनसुद्धा परदेशातून आधीच कांदा मागवायला हवा होता.
बोंगबोंग व्यवस्थापन
सोशल मीडियावर व्यक्त होताना काही लोकांनी कृषी क्षेत्रातला भोंगळ कारभार आणि वादग्रस्त राष्ट्रपती फर्डिनेंड मार्कोस ज्युनिअर यांच्यात असलेल्या संगनमतामुळे आजची परिस्थिती उद्भवली आहे असा एक मतप्रवाह आहे.
मार्कोस यांची मागच्या वर्षी राष्ट्राध्यक्षपदी नेमणूक झाली आणि जनता त्यांना बोंगबोंग असं म्हणते. राष्ट्रपतीपदी नेमणूक झाल्यावर मार्कोस यांनी स्वत:ला कृषीमंत्री म्हणून नियुक्त केलं होतं. मात्र या पदाचा त्यांना अजिबात अनुभव नाही.
मार्कोस ज्युनिअर फिलिपीन्सचे माजी राजे फर्डिनेंड मार्कोस यांचे सुपूत्र आहेत. 1970 आणि 80 च्या दशकात त्यांनी अत्यंत निर्दयीपणे फिलिपीन्सवर राज्य केलं होतं. त्यानंतर तिथल्या जनतेने निदर्शनं केली आणि त्यांना सिंहासन सोडावं लागलं.
1986 मध्ये त्यांच्या कुटुंबाला देश सोडून जावं लागलं. 1991 मध्य ते मायदेशी परतले आणि पुन्हा राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. राष्ट्रपती म्हणून निवडून येण्याआधी ते गव्हर्नर, डेप्युटी आणि सिनेटर म्हणून सुद्धा काम पाहिलं आहे.
आपल्या वडिलांच्या कार्यकाळाचा प्रचार करणं हेही मार्कोस ज्युनिअर यांच्या निवडणूक प्रचाराचा भाग होता. सोशल मीडियावर लोक त्यांच्या या प्रचाराची थट्टा करतात.
जगातल्या तिसऱ्या क्रमांकाचं उत्पादन असलेले पीक
फिलिपीन्स कांदा खरेदीत कायम अग्रेसर असल्याचं तिथले तज्ज्ञ सांगतात. तिथे कांद्याचं जितकं उत्पादन होतं, त्यापेक्षा जास्त प्रमाणात तिथे तो खाल्ला जातो.
त्यामुळे तिथे अनेकदा संघर्षाची स्थिती निर्माण होते. 2011 मध्ये फिलिपीन्सची कांद्याची मागणी फक्त 50 लाख किलो होती. 2016 मध्ये त्यात वाढ होऊन 13.2 कोटी किलो झाली.
तज्ज्ञांच्या मते उपलब्धता आणि किंमतीचा विचार केला तर फिलिपीन्स भारत, चीन आणि हॉलंड पेक्षा जास्त प्रमाणात कांदा खरेदी करतो.
कांद्याची गरज पूर्ण करण्यासाठी फिलिपीन्स दुसऱ्या देशांवरही अवलंबून आहे. कारण तिथलं वातावरणच तसं आहे. तिथे निघणारा कांदा फार काळ टिकत नाही.
फळ आणि भाज्य तज्ज्ञ सिंडी वान रिझविस्क म्हणतात की उत्तर युरोप आणि उत्तर अमेरिकेच्या काही भागांपेक्षा इथली परिस्थिती फार वेगळी आहे. या भागात कांदा एक वर्षापर्यंत टिकवून ठेवता येतो.
“जगाच्या बहुतांश भागात कांदा सगळ्यांत जास्त वापरल्या जाणाऱ्या भाज्यांमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे. जगात सगळ्यांत जास्त होणाऱ्या भाज्यांमध्ये कांद्याचा तिसरा क्रमांक आहे. कांद्यापेक्षा अधिक उत्पादन काकडी आणि टोमॅटोचं होतं असंही त्या पुढे सांगतात.
इतर देशातही हीच समस्या
फिलिपीन्स सारखं इतर देशातही कांद्याच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. मात्र इथे जितकी वाढ झाली आहे तितकी कुठेच झालेली नाही. ब्राझीलही त्याचं एक उदाहरण आहे. 2022 मध्ये कांद्याची किंमत सर्वांत जास्त आहे.
कांद्याच्या शेतीचा वाढता खर्च, तसंच कांद्याच्या शेतीला लागणारी जागा कमी होणं हेही कांद्याचा भाव वाढण्याची महत्त्वाची कारणं आहे.
कारण रशिया युक्रेन युद्धामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर रासायनिक खतांचे आणि कीटकनाशकांचे भाव वाढलेत, तसंच एकूण महागाईत वाढ झाल्यामुळे कांद्याचे भाव वाढले आहेत.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)