पंतप्रधान विश्वकर्मा योजना : एक लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज कसं मिळवायचं, जाणून घ्या

नरेंद्र मोदी

फोटो स्रोत, ANI

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या स्वातंत्र्यदिनी जाहीर केलेल्या विश्वकर्मा योजनेला आज (17 सप्टेंबर) सुरुवात झाली आहे.

नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आजच्या दिवशी ही योजना सुरू करण्यात आली आहे.

पारंपारिक कौशल्य असलेल्या लोकांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.

15 ऑगस्ट 2023 रोजी लाल किल्ल्यावरुन केलेल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते की, "विश्वकर्मा जयंतीच्या दिवशी 13-15 हजार कोटी रुपयाच्या तरतुदीसह 'विश्वकर्मा योजना' सुरू केली जाणार आहे. या योजनेद्वारे येत्या काळात पारंपारिक कौशल्य असलेल्या लोकांना सरकार मदत करेल."

दरम्यान या योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाने 16 ऑगस्ट 2023 रोजी मंजुरी दिली असून योजनेसाठी 13,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

ही योजना 2023-2024 ते 2027-2028 या पाच वर्षांसाठी असेल.

या योजनेचा उद्देश काय आहे?

या योजनेसंबंधी असं म्हटलं जातंय की, गुरु-शिष्य परंपरेला चालना देणे आणि कारागिरांच्या कौटुंबिक-आधारित पारंपारिक व्यवसायाला बळ मिळेल हा यामागचा उद्देश आहे.

शिवाय कारागिरांची उत्पादने आणि सेवांची गुणवत्ता सुधारणे. तसेच या कारागिरांना देशांतर्गत आणि जागतिक विक्री साखळीशी जोडणे ही या योजनेची इतर उद्दिष्टे आहेत.

या योजनेअंतर्गत लोकांना काय मिळणार?

पंतप्रधान विश्वकर्मा योजनेंतर्गत कारागीर आणि हस्तकला कामगारांना विश्वकर्मा प्रमाणपत्र आणि ओळखपत्र मिळेल.

तसेच, पहिल्या टप्प्यात 1 लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज मिळेल. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात 2 लाख रुपये 5% व्याजासह मिळतील.

कोणते व्यवसायिक लाभ मिळू शकतात?

संपूर्ण भारतातील ग्रामीण आणि शहरी भागातील कारागीरांना या योजनेत सामावून घेतले जाईल.

सुरुवातीला खालील अठरा पारंपरिक व्यवसायांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.

  • सुतार
  • सोनार
  • कुंभार
  • शिल्पकार/मूर्तिकार
  • चांभार
  • गवंडी
  • विणकर/चटई/झाडू बनविणारे, दोऱ्या वळणारे /बेलदार
  • पारंपारिक खेळणी बनविणारे
  • नाभिक
  • हार-तुरे तयार करणारे
  • धोबी
  • शिंपी
  • मासेमारीचे जाळे बनवणारा
  • होड्या बांधणारे
  • चिलखत तयार करणारा
  • लोहार
  • कुलूप तयार करणारे
  • कुऱ्हाड आणि इतर लोखंडी हत्यार बनविणारे
प्रातिनिधिक फोटो

फोटो स्रोत, getty images

प्रमाणपत्र, कर्ज याशिवाय या योजनेत आणखी कोणती वैशिष्ट्ये आहेत?

पंतप्रधान विश्वकर्मा योजनेविषयी आणखीन माहिती देताना केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की, या योजनेअंतर्गत कारागिरांना प्रशिक्षण दिले जाई.

ही प्रशिक्षणे मूलभूत प्रशिक्षण आणि प्रगत प्रशिक्षण अशा दोन स्वरूपात दिली जातील.

प्रातिनिधिक फोटो

फोटो स्रोत, getty images

प्रशिक्षणार्थींना दररोज 500 रुपये आर्थिक मदत म्हणून दिली जाईल. तसेच, औद्योगिक उपकरणे खरेदी करण्यासाठी 15,000 रुपये आर्थिक मदत दिली जाईल.

या योजनेअंतर्गत पहिल्या वर्षी पाच लाख कुटुंबांना लाभ मिळणार असून पाच वर्षांत एकूण 30 लाख कुटुंब या योजनेचा लाभ घेतील.

प्रातिनिधिक फोटो

फोटो स्रोत, getty images

कोणती कागदपत्रांची आवश्यकता आणि त्यासाठी अर्ज कसा करायचा?

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

17 सप्टेंबरला विश्वकर्मा जयंतीच्या दिनी 'पंतप्रधान विश्वकर्मा योजने'ची सुरुवात होईल. या योजनेची माहिती https://pmvishwakarma.gov.in/ या वेबसाईटवर देण्यात आलीय.

आतापर्यंत 11 हजार 321 अर्ज दाखल झाले असून, अर्जांच्या पडताळणीची प्रक्रियाही अजून सुरू झाली नाहीय.

या योजनेच्या लाभासाठी चार पातळ्यांवर नोंदणीची आवश्यकता असेल.

स्टेप 1 - मोबाईल आणि आधार पडताळणी : या योजनेचा लाभ घेऊ इच्छित असलेल्या कारागिरानं मोबाईल ऑथिंटिकेशन आणि आधार कार्ड EKYC करावं लागेल.

स्टेप 2 - रजिस्ट्रेशन फॉर्म : रजिस्ट्रेशन फॉर्म भरून कारागिरांना या योजनेसाठी अर्ज करावा लागेल. लाभार्थ्यांची नोंदणी ग्रामपंचायत आणि शहरातील स्थानिक स्वराज्य संस्था स्तरावरील सामायिक सेवा केंद्रांद्वारे, तसंच ऑनलाईन पोर्टलद्वारेही अर्ज करता येईल.

स्टेप 3 - पंतप्रधान विश्वकर्मा प्रमाणपत्र : अर्जदार कारागिरानं पंतप्रधान विश्वकर्मा डिजिटल ओळखपत्र आणि प्रमाणपत्र डाऊनलोड करावा.

स्टेप 4 - शेवटी अर्जदार कारागिरानं आपापल्या व्यवसायानुसार, कौशल्यानुसार योजनेसाठी अर्ज करावा. अर्जाची प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी तीन पातळ्यांवरील पडताळणी करावी लागेल. ही पडताळणी पूर्ण झाल्यावर अर्जाची प्रक्रिया यशस्वी होईल.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)