You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
'डर्टी पिक्चरमध्ये जे दाखवलं आहे ते सिल्क स्मिताचं खरं आयुष्य नव्हतं'
- Author, विक्रम रवी शंकर आणि हेमा राकेश
- Role, बीबीसीसाठी
तमिळमधील ज्येष्ठ डबिंग आर्टिस्ट हेमा मालिनी सिल्क स्मिता बद्दल सांगतात, "तिला सावित्री आवडत होती. तिला सावित्रीसारखा अभिनय करायचा होता. तिला ग्लॅमरस भूमिका आवडत नव्हत्या."
1970 च्या दशकात भारतीय चित्रपटसृष्टीत क्लब डान्स हा ट्रेंड बनला होता. दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये अभिनेत्री जयमालिनी, अनुराधा, डिस्को शांती क्लब डान्ससाठी प्रसिद्ध झाल्या. या यादीत आणखी बरीच नावं आहेत.
जेव्हा त्या पडद्यावर यायच्या तेव्हा प्रेक्षकांच्या शिट्ट्या पडायच्या. तर काही महिला प्रेक्षक कपाळावर आठ्या पडून म्हणायच्या "हे काय.. अर्धनग्न?"
मात्र सिल्क स्मिताच्या सौंदर्य, अभिनय आणि नृत्याची भुरळ केवळ पुरुषांनाच होती असं नाही, तर महिलांनाही तिचं कौतुक वाटायचं.
सिल्क स्मिताचं खरं नाव होतं विजया लक्ष्मी. लाखो लोकांच्या हृदयाचा ठाव घेणारी ही अभिनेत्री होती.
रुपेरी पडद्यावर खास गाणी, छोट्या-मोठ्या भूमिका साकारणाऱ्या या अभिनेत्रीने संशयास्पद परिस्थितीत आत्महत्या केली.
तमिळ चित्रपटांमध्ये सिल्क स्मिताला आवाज देणाऱ्या डबिंग आर्टिस्ट हेमा मालिनी यांनी बीबीसीसोबत सिल्कच्या काही आठवणी शेअर केल्या.
सिल्क स्मिता खास होती
"डबिंग आर्टिस्ट असणं खूप खास आहे. मी स्वत: अनेक नायिकांचे आवाज डब केले आहेत. अंबिका, राधा, सुमलता, माधवीसाठी तेलगू आणि इतर भाषांमध्येही आवाज दिला आहे. पण सिल्क स्मिता या सर्वांपेक्षा खास होती."
एका चित्रपटात विजयालक्ष्मी नावाच्या मुलीला कास्ट केलं गेलं होतं. ती मुलगी मुख्य अभिनेत्रीसाठी टचअप गर्ल होती. वंदिचक्रम या छोट्याशा भूमिकेतून तिने चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं आणि ती सिल्क स्मिता या नावाने ओळखली जाऊ लागली.
सिल्क स्मिताशी झालेल्या पहिल्या भेटीचं वर्णन करताना हेमा मालिनी म्हणाल्या, "विनू चक्रवर्तीने माझा आवाज ऐकला होता, स्मितासाठी तो योग्य वाटत होता. त्याने मला भेटीसाठी बोलावलं. त्याने मला हळुवार बोलायला सांगितलं. जेव्हा मी सिल्क स्मिताला पाहिलं तेव्हा ती खूप आकर्षक दिसत होती. ती अवखळपणे बोलली तर काय होईल हे पाहण्यासाठी मी डबिंग करण्याचा प्रयत्न केला."
फॅशनची आवड
सिल्क स्मिताचे केवळ डोळेच नाही तर तिच्या आवाजानेही तमिळ प्रेक्षकांना भुरळ घातली होती. सिल्क स्मिताने साकारलेल्या भूमिकांमध्ये तिचा आवाजच पुष्कळ आहे असं दिग्दर्शकांना वाटायचं.
हेमा मालिनी सांगतात की, जेव्हा त्या डबिंगसाठी गेल्या होत्या तेव्हा त्यांना सिल्कची आधी केलेली भूमिका दाखवण्यात आली आणि त्यावरून आवाज देण्यास सांगितलं.
सिल्क स्मिताला फॅशनमध्ये खूप रस होता. तिचे कपडे इतर अभिनेत्रींपेक्षा वेगळे असायचे.
त्यावेळी कलाकारांना चित्रपटाच्या क्रूने दिलेले कपडे घालावे लागायचे. पण, सिल्क स्मिता याला अपवाद होती. ती स्वतःचे कपडे डिझाइन करायची. आणि दिग्दर्शकही तिला प्रोत्साहन द्यायचे.
डर्टी पिक्चर का डब केला नाही?
हेमा मालिनी यांनी सिल्क स्मिताचे सर्व तमिळ चित्रपट डब केले. पण सिल्क स्मिताच्या आयुष्यावर आधारित 'डर्टी पिक्चर' मध्ये त्यांनी त्यांचा आवाज दिला नाही.
या चित्रपटात विद्या बालनने सिल्क स्मिताची भूमिका साकारली होती.
हेमा मालिनी सांगतात, "डर्टी पिक्चरची टीम माझ्याकडे आली होती. पण मी त्यांना सांगितलं की मला त्यात रस नाही. त्या चित्रपटात काहीच सत्य दाखवलं नाहीये.
सिल्क स्मिताच्या आयुष्यात नेमकं काय घडलं हे मला माहिती आहे. त्यामुळे मी नकार कळवला. सिल्कच्या मृत्यूनंतर बऱ्याच नायिकांनी त्यांच्या आवाजासाठी मला विचारलं होतं."
त्या पुढे सांगतात, "सिल्क स्मिताला अभिनयाची आवड होती. तिने ग्लॅमरस भूमिका, स्पेशल गाणी आणि क्लब डान्सचा कधीच विचार केला नव्हता. तिला सावित्रीसोबत अभिनय करायचा होता. सावित्रीलाही सिल्क स्मिता सोबत चित्रपट करायचे होते. दोघांनीही दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीवर विशेष छाप सोडली आणि त्यांच्या चाहत्यांमध्ये एक स्थान मिळवलं. आपल्या इच्छा पूर्ण न करताच त्यांचा मृत्यू झाला."
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)