G20 म्हणजे काय? नरेंद्र मोदींनी जाहीर केलेल्या लोगोतलं कमळ भारताचं की भाजपचं?

फोटो स्रोत, Getty Images
G20 राष्ट्रगटाचं अध्यक्षपद आता भारताकडे येणार आहे. त्यानिमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी G20 अध्यक्षपदाच्या नव्या लोगोचं 8 नोव्हेंबरला अनावरण केलं आणि चर्चेला उधाण आलं.
या लोगोतल्या कमळावर विरोधी पक्षातील नेत्यांनी टीका केली आहे.
या लोगोवर आक्षेप का घेतला जातो आहे? सरकारची या लोगोमागची भूमिका काय आहे? याविषयी जाणून घेऊयात.
मुळात G20 आणि G20चं अध्यक्षपद म्हणजे नेमकं काय असतं, हेही पाहुयात.
G20 राष्ट्रगट म्हणजे काय?
तर G20 म्हणजे ग्रुप ऑफ ट्वेन्टी. हा जगातल्या प्रमुख विकसित आणि विकसनशील देशांचा राष्ट्रगट आहे.
1999 साली या राष्ट्रगटाची स्थापना करण्यात आली होती.
पूर्व आशिया आणि आग्नेय आशियात 1997 साली आलेल्या आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर G20 गट उदयास आला. अशा एखाद्या जागतिक आर्थिक संकटाचा सामना करण्यासाठी प्रमुख देशांनी एकत्र येऊन प्रयत्न करावेत हा त्यामागचा हेतू होता.
सुरुवातीला केवळ या देशांचे अर्थमंत्री आणि तिथल्या केंद्रीय बँकांचे गव्हर्नर एकत्र येऊन आर्थिक प्रश्नांवर चर्चा करायचे.
2008 च्या आर्थिक संकटानंतर या देशांचे राष्ट्रप्रमुख दरवर्षातून एकदा G20 लीडर्स समिट म्हणजे राष्ट्रप्रमुखांच्या परिषदेत सहभागी होऊ लागले.

G20 राष्ट्रगटात भारताशिवाय अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया, ब्राझील, कॅनडा, चीन, फ्रांस, जर्मनी, इंडोनेशिया, इटली, जपान, दक्षिण कोरिया, मेक्सिको, रशिया, सौदी अरेबिया, दक्षिण आफ्रिका, तुर्की, ब्रिटन, अमेरिका अशा 19 देशांचा समावेश आहे.
युरोपियन युनियन ही संघटना या राष्ट्रगटातला विसावा सदस्य आहे.
त्याशिवाय संयुक्त राष्ट्रे, जागतिक आरोग्य संघटना, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, वर्ल्ड बँक अशा आंततराष्ट्रीय संघटनांचे प्रमुख तसंच काही देश पाहुणे म्हणून शिखर परिषदेत सहभागी होतात.
G20 राष्ट्रगट महत्त्वाचा का आहे?
- जगातली 60 टक्के लोकसंख्या G20 राष्ट्रांमध्ये राहते.
- जागाच्या एकूण जीडीपीच्या 85 टक्के जीडीपी या देशांतून येतं
- जागतिक व्यापारातील 75 टक्क्यांहून अधिक व्यापार G20 देशांत एकवटला आहे.
साहजिकच या राष्ट्रगटाचं काम अतिशय महत्त्वाचं ठरतं.
G20 हे जी-7 या औद्योगिक देशांच्या राष्ट्रगटाचं विस्तारीत रूप मानलं जातं.
विकसनशील आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांना सामावून घेऊन जगाच्या अर्थव्यवस्थेला स्थिरता देणं हा या गटाचा उद्देश आहे.

फोटो स्रोत, Getty Images
G20 अध्यक्षपद म्हणजे काय?
संयुक्त राष्ट्रांचं जसं न्यूयॉर्कमध्ये एक कार्यालय आहे, तसं G20 देशांचं कायमस्वरूपी कार्यालय किंवा सचिवालय नाही.
अजेंडा आणि समन्वय साधण्याचं काम G20 देशांचे प्रतिनिधी करतात ज्यांना शेरपा म्हणून ओळखलं जातं.
दरवर्षी एका देशाकडे G20चं अध्यक्षपद येतं. यालाच G20 प्रेसिडंसी म्हणतात.
प्रत्येक प्रेसिडंसीच्या शेवटी G20 राष्ट्रगटाची बैठक होते आणि कारभार पुढच्या अध्यक्षांवर सोपवला जातो.
G20 चे विद्यमान अध्यक्ष आधीचे आणि पुढचे अध्यक्ष राष्ट्र यांच्या मदतीनं कारभार चालवातात.
भारत इंडोनेशिया आणि ब्राझीलच्या मदतीनं G20चा कारभार पाहील. मग 2023 सालची G20 शिखर परिषद भारतात होईल.
G20 अध्यक्षपदाच्या लोगोवरून वाद का झाला?
G20चं अध्यक्षपद भारताला मिळत असल्याच्या निमित्तानं वर्षभरासाठीच्या नव्या G20 वेबसाईटचं आणि लोगोचं अनावरण 8 नोव्हेंबरला करण्यात आलं.
त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वसुधैव कुटुंबकम हे ब्रीदवाक्य आणि या लोगोतलं कमळ भारताचा प्राचीन वारसा, आपली आस्था, बौद्धिकता यांचं चित्रण करत असल्याचं म्हटलं आहे.
पण या कमळावरून अनेकांनी भुवया उंचावल्या. काँग्रेस पक्षाचे महासचिव जयराम रमेश यांनी ट्वीट केलंय की.
“70 वर्षांपूर्वी नेहरूंनी काँग्रेसचा झेंडा भारताचा ध्वज बनवण्याचा प्रस्ताव नाकारला होता. आज बीजेपीचं निवडणूक चिन्ह भारताच्या जी-२० अध्यक्षतेचा अधिकृत लोगो बनलं आहे. हे धक्कादायक तर आहेच पण आता हेही कळून चुकलंय की पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप निर्लज्जपणे स्वतःचा प्रचार करण्याची संधी गमावणार नाहीत.”
दुसरीकडे विरोधकांच्या टीकेला उत्तर देताना भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ता शहजाद पूनावालांनी प्रश्न विचारलाय की "पंतप्रधान मोदींना विरोध करण्यासाटी राष्ट्रीय प्रतीक आणि फुलांचा विरोध कशासाठी होतोय? कमलनाथ मधून कमल आणि राजीव शुक्लांमधून राजीवही हटवणार का?"
भारतातल्या G20 परिषदेवरून वाद का झाला?
भारत इंडोनेशिया आणि ब्राझीलच्या मदतीनं G20चा कारभार पाहील. मग 2023 सालची G20 शिखर परिषद भारतात होईल.
ही शिखर परिषद काश्मिरमध्ये करण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारनं मांडला होता, पण पाकिस्तान, चीन, तुर्की, सौदी अरेबियानं विरोध दर्शवल्यामुळे दिल्लीत ही परिषद होणार आहे.
ज्या देशाकडे ही प्रेसिडंसी असते, त्यांना वर्षभरासाठीचा अजेंडाही ठरवता येतो. तसंच अध्यक्ष या नात्यानं तो देश इतर काही देशांना पाहुणे म्हणून बोलवू शकतो.
भारतानं बांगलदेश, इजिप्त, मॉरिशस, नेदरलँड्स, नायजेरिया ओमान, सिंगापूर, स्पेन आणि युएई या देशांना हे निमंत्रण दिलंय.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








