शाहरुख खानच्या 'मन्नत'ची गोष्ट : मंडीच्या राजानं बांधलेला महाल बॉलिवूडच्या 'किंग'कडे कसा आला?

फोटो स्रोत, ANI
- Author, यासिर उस्मान
- Role, चित्रपट अभ्यासक, बीबीसी हिंदीसाठी
हिंदी चित्रपटाच्या इतिहासाचा महत्त्वाचा भाग असलेल्या सिनेताऱ्यांच्या बंगल्याच्या मालिकेत आतापर्यंत आपण अशा बंगल्यांबद्दल जाणून घेतलं आहे जे सध्या अस्तित्वात नाहीत.
मात्र, आज आपण अशा बंगल्याबद्दल जाणून घेणार आहोत जो आजच्या काळात देशातील पॉप्युलर कल्चरचं प्रतिक आहे. सर्वात लोकप्रिय आणि सर्वात प्रसिद्ध बंगल्यापैकी हा एक आहे.
हा बंगला म्हणजे सुपरस्टार शाहरुख खान यांचा आलिशान 'मन्नत' बंगला. तब्बल 27,000 चौरस फुटांमध्ये पसरलेला हा सहा मजली बंगला शाहरुख खानच्या यशाचं आणि स्टारडमचं प्रतिकच आहे.
याच मन्नतच्या गॅलरीत उभं राहून शाहरुख खान अनेकदा हजारो चाहत्यांना अभिवादन करत असतो. मुंबईतील वांद्र्यात असलेल्या या बंगल्याची गोष्ट काय आहे?
जवळपास दीडशे वर्षांपूर्वी मुंबईतील बँडस्टँडवर समुद्राच्या अगदी समोरच मंडीचे सोळावे महाराज राजा विजय सेन यांनी त्यांच्या पत्नीसाठी एक आलिशान बंगला बांधला होता.
या बंगल्याचं नाव त्यांनी विला व्हिएन्ना ठेवलं होतं. त्या काळी हा बंगला मुंबईतील सर्वात सुंदर बंगल्यांपैकी एक होता.
राजा विजय सेन यांच्या निधनानंतर हा बंगला मुंबईतील श्रीमंत पारसी व्यापारी मानेकजी बाटलीवाला यांनी विकत घेतला. काही वर्षांनी मानेकजी बाटलीवाला यांच्या कुटुंबानं विला व्हिएन्नाच्या शेजारी रिकामी असलेली जमीन विकत घेतली आणि तिथे आणखी एक बंगला बांधला.
त्यांनी या नव्या बंगल्याचं नाव ठेवलं, कीकी मंजिल. मानेकजी बाटलीवाला यांचा नातू कीकू गांधी यांच्या नावावर बंगल्याचं नाव ठेवण्यात आलं होतं.
आता कीकू गांधी कोण होते? मुंबईच्या कला जगतात किंवा कला क्षेत्रात रस असणाऱ्यांसाठी कीकू गांधी हे खूप मोठं नाव आहे.
सुरुवातीच्या काळात कीकू यांनी पेंटिंग्ससाठी फ्रेम बनवणारी एक कंपनी स्थापन केली होती. त्या व्यवसायात ही कंपनी अत्यंत यशस्वी झाली होती.
इतकंच नाही तर नंतर कीकू यांनी बॉम्बे आर्ट सोसायटी, मुंबईतील प्रसिद्ध जहांगीर आर्ट गॅलरी, नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट आणि ललित कला अकॅडमी स्थापन करण्यातही महत्त्वाचं योगदान दिलं होतं.

फोटो स्रोत, Getty Images
पेंटिग किंवा कला क्षेत्रातील रसिक असोत, की एम. एफ. हुसैन, तय्यब मेहता, एस. एच. रझा यांच्यासारखे प्रसिद्ध कलाकार त्यांच्यासाठी तेव्हा मुंबईतील दोन ठिकाणं महत्त्वाची होती. ते म्हणजे कीकी मंजिल आणि विला व्हिएन्ना हे जुळे बंगले.
अनेक वर्षांनंतर विला व्हिएन्ना हा बंगला कीकू यांच्या बहिणीच्या वाट्याला आला. नंतर त्याचे मालक बदलत गेले. अखेर राजा विजय सेन यांनी बनवलेला हा विला व्हिएन्ना सुपरस्टार शाहरुख खान यांच्या स्वप्नांचं घर बनला.
मात्र, शाहरुख खानपूर्वी हा बंगला अनेक बड्या स्टारचं घर बनला होता.


शाहरुख खाननं विकत घेण्यापूर्वी हा बंगला चित्रपटाच्या चित्रिकरणासाठी भाड्यानं दिला जायचा. इथे अनेक जाहिराती, टीव्ही मालिका आणि चित्रपटांचं चित्रिकरण करण्यात आलं होतं.
हिंदी चित्रपटांमध्ये हा बंगला जेवढा झळकला तेवढा, इतर कोणत्याही फिल्म स्टारचा बंगला झळकलेला नाही.
अनेक सुपरस्टार्सचे पाय लागले
'अनाडी' (1959) या चित्रपटात राजकपूर यांचं 'किसी की मुस्कुराहटों पे हो निसार' हे अत्यंत लोकप्रिय आणि अविस्मरणीय गीत आहे. चित्रपटात राज कपूर बांद्रा येथील बँडस्टँडच्या जवळपास फिरताना हे गीत गातात तेव्हा पार्श्वभूमीला दिसतो तो बंगला म्हणजे व्हिला विएना.
सफर (1970) या चित्रपटात अभिनेते फिरोज खान यांचा जो बंगला दाखवण्यात आला आहे, तो हाच बंगला आहे.
'राजा रानी' (1973) या चित्रपटात राजेश खन्ना यांनी एका चोराची भूमिका केली आहे. एका रात्री चोरी करण्यासाठी ते एका आलिशान बंगल्यात शिरतात, तो बंगला हाच विला व्हिएन्ना.
म्हणजेच, शाहरुख खान यांच्याआधी भारताच्या पहिल्या सुपरस्टारची पावलंही या बंगल्यात पडली होती.

फोटो स्रोत, Getty Images
'तेजाब' (1989) या चित्रपटात माधुरी दीक्षित यांचा हा बंगला दाखवण्यात आला होता. माधुरी दीक्षित यांचं मन वळवण्यासाठी अनिल कपूर त्यांच्या मित्रांसोबत 'एक दो तीन' हे लोकप्रिय गीत गात नाचतात. त्या गीताचं चित्रीकरण याच बंगल्याच्या लॉनमध्ये झालं होतं.
आमीर खानच्या 'राख' या चित्रपटातही हा बंगला आहे. दिग्दर्शक शशिलाल नायर यांच्या 'अंगार' या चित्रपटात कादर खान यांनी गॉडफादर सारखी भूमिका केली आहे. त्या चित्रपटात या बंगल्याची एक मोठी भूमिका आहे. कारण 'अंगार' चित्रपटात या बंगल्याचे सर्वाधिक शॉट्स दिसतात.
मात्र, सर्वात मोठा सुंदर योगायोग झाला स्वत: शाहरुख खानच्या बाबतीत. 'यस बॉस' (1997) हा शाहरुखचा लोकप्रिय चित्रपट आहे.
या चित्रपटात 'बस इतना सा ख्वाब है' हे शाहरुख खानवर छायाचित्रित झालेलं सुपरहिट गाणं आहे. या गाण्यात शाहरुख खानच्या मागे दिसलेला बंगला हाच आहे.
याच चित्रपटाच्या चित्रिकरणावेळी या बंगल्यावर शाहरुखची नजर पडली होती. अगदी समुद्रासमोर असलेला हा आलिशान बंगला त्याला स्वप्नातील घराप्रमाणेच वाटला होता.

फोटो स्रोत, Getty Images
शाहरुख खान 1991 मध्ये मुंबईत आला, तेव्हा त्यांच्याकडे स्वत:चं घर नव्हतं. त्यावेळी तो कधी निर्माता विवेक वासवानी यांच्या घरी तर कधी दिग्दर्शक अझिझ मिर्झा यांच्या घरी राहिला.
मात्र नंतर यश मिळालं आणि तो स्टार झाला. त्यावेळी त्यानं कार्टर रोडवर श्री अमृत अपार्टमेंटच्या सातव्या मजल्यावर एक फ्लॅट विकत घेतला. मुंबईतील हे त्याचं पहिलं घर होतं.
पण हिंदी चित्रपटसृष्टीत यश मिळत गेल्यावर आणि स्टारडम वाढत गेल्यावर स्वतःचा एक आलिशान बंगला असावा हीच त्याची इच्छा होती.
नंतर जवळपास पाच वर्षांनी त्याचं हे स्वप्नं पूर्ण झालं. सी-फेसिंग विला व्हिएन्नाला एक नवा मालक मिळाला. या घराचं नाव शाहरुख खाननं आधी 'जन्नत' ठेवलं होतं. मात्र काही काळानं बंगल्याचं नाव बदलून 'मन्नत' करण्यात आलं.
"हा बंगला विकत घेण्यात आम्हाला यश तर आलं. मात्र आम्हाला हा बंगला नव्यानंच बांधावा लागला, कारण त्याची खूपच पडझड झालेली होती. त्यावेळी घराची सजावट करण्यासाठी आमच्याकडे पैसे शिल्लक नव्हते.
माझं एक महिन्याचं उत्पन्न होतं तितके पैसे इंटेरियर डिझायनरची फी होती. मग मी माझ्या पत्नीलाच सांगितलं की, गौरी तूच का घराची डिझायनर होत नाही? अशी मन्नतची सुरूवात झाली. आम्ही अनेक वर्षे जितके पैसे कमावले, त्यातून आम्ही घरासाठी लहान-मोठ्या वस्तू विकत घेत राहिलो," असं शाहरुख खाननं गेल्या वर्षी त्याच्या पत्नीचं पुस्तक 'माय लाईफ इन डिझाईन' लाँच होताना प्रसार माध्यमांना सांगितलं होतं.
त्यानंतरच्या काळात शाहरुख खाननं बंगल्याचा कायापालट करून टाकला. चित्रपटसृष्टीतील ज्या लोकांना मन्नतमध्ये जाण्याची संधी मिळाली आहे, ते या बंगल्याची भव्यता कधीच विसरत नाहीत.
विंटेज आणि समकालीन डिझाईन असलेल्या या ग्रेड थ्री हेरिटेज बंगल्यात पंधरा बेडरूम, जिम, स्विमिंग पूल, बॉक्सिंग रिंग, लायब्ररी आणि शाहरुख खानचं ऑफिस देखील आहे.
'मुंबई हेच घरं, कारण तिथे माझं सुंदर घर'
मागे वळून पाहायचं झाल्यास, या बंगल्यात शिफ्ट व्हायच्या एक वर्ष आधी शाहरुख खानला मोठा धक्का बसला होता.
निर्माता म्हणून 'फिर भी दिल है हिंदुस्तानी' हा त्याचा पहिलाच चित्रपट तिकिटबारीवर आपटला होता. त्यामुळे शाहरुख खानला मोठं आर्थिक नुकसान झालं. यानंतर जोश, वन टू का फोर आणि महत्त्वाकांक्षी 'अशोक' हे चित्रपट देखील फ्लॉप झाले.
त्याचवेळी ऋतिक रोशनचा 'कहो ना प्यार है' चित्रपट प्रदर्शित झालेला होता. पहिल्याच चित्रपटाद्वारे ऋतिक रोशन एका रात्रीत मोठा स्टार झाला होता. तेव्हा, शाहरुख खानचं करियर उतरणीला लागलं आहे, अशीच चर्चा प्रसारमाध्यांमध्ये होती.
पण विला व्हिएन्ना विकत घेतल्यानंतर शाहरूखला प्रचंड यश मिळालं, अशी चर्चा सिनेसृष्टीत आहे.

फोटो स्रोत, Getty Images
त्यानंतर शाहरुखचे चित्रपट एकापाठोपाठ एक ब्लॉकबस्टर झाले. कभी खुशी कभी गम, देवदास, चलते चलते, कल हो ना हो, मै हूं ना, वीर झारा या चित्रपटांच्या प्रचंड यशानं शाहरुखला देशातील सर्वात मोठा स्टार बनवलं.
प्रत्येक घराबरोबर बहुधा नवीन नशीबही येतं. मन्नत या बंगल्यानं अशाच अनेकांच्या मन्नत (प्रार्थना) पूर्ण केल्या.
2016 मध्ये दिल्लीतील एका मुलाखतीत मी शाहरुखला प्रश्न विचारला होता की, "आता तू दिल्लीला घर समजतो की मुंबईला? तेव्हा, दिल्लीत आलो की माझ्या आठवणींना उजाळा मिळतो. माझे डोळे पाणावतात. मात्र आता 'मुंबई हेच माझं घरं आहे. कारण तिथे माझं सुंदर घर आहे."
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.











