बिग बॉस सिझन 19 : शो चा दर्जा घसरतोय की समाजच ढासळतोय? कसा बदलत गेला हा रियालिटी शो?

    • Author, वंदना
    • Role, वरिष्ठ वृत्त संपादक, एशिया डिजिटल

बिग बॉसच्या सीझन 19 ची सुरुवात झाली आहे. यंदा बिग बॉसची थीम आहे 'घरवालों की सरकार'.

बिग बॉसच्या या सीझनमध्ये स्टँडअप कॉमेडियन प्रणित मोरे, यूट्यूबर मृदुल तिवारी आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर तान्या मित्तल आणि नगमा मिराजकर स्पर्धक म्हणून सहभागी झाले आहेत.

त्याचबरोबर टीव्ही स्टार गौरव खन्ना, चित्रपटांमध्ये आणि टीव्हीवर अभिनय केलेल्या कुनिका, 21 वर्षांची अशनूर कौर आणि भोजपुरी चित्रपटांतील स्टार नीलम गिरी हेदेखील या शोमध्ये सहभागी झाले आहेत.

शो सुरू झाल्याबरोबरच भांडणंदेखील सुरू झाली आहेत.

बसील अलीनं तान्याला ब्रेनलेस म्हटलं. तर डाळीच्या वाटीवरून झालेल्या भांडणात जीशान कादरीनं गौरव खन्नाला सर्वात मोठा मूर्ख म्हटलं होतं.

इन्फ्लुएन्सर, कॉन्टेन्ट क्रिएटरचा प्रभाव

भारतात बिग बॉसची सुरुवात 2006 मध्ये झाली होती. गेल्या 19 वर्षांमध्ये या रियालिटी शोची शैली, पद्धत, वातावरण बरंच बदललं आहे.

बिग बॉसच्या गेल्या काही सीझनमध्ये भाग घेणारे स्पर्धक किंवा विजेत्यांमध्ये सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर, डिजिटल कॉन्टेन्ट क्रिएटर, युट्युबर, रॅप आर्टिस्ट यांचा समावेश आहे.

2023 चा विजेता ठरलेल्या एमसी स्टॅनचंच उदाहरण घ्या. चाळीत वाढलेला 23 वर्षांचा एका रॅपर भारतातील सर्वात प्रसिद्ध रियालिटी शोचा विजेता ठरला होता.

2006 मध्ये चित्रपट अभिनेता राहुल रॉय बिग बॉस-1 चा विजेता ठरला होता. राहुल रॉयची प्रतिमा लव्हर बॉयची होती आणि स्वच्छ होती. तर एमसी स्टॅन मात्र त्यापेक्षा अगदी वेगळा आहे.

या शो मधून भारताचं बदलतं चित्र दिसतं. गेल्या काही वर्षात डिजिटल इंडियातील प्रसिद्धी, लोकप्रियतेचे निकष वेगानं बदलले आहेत.

राहुल रॉयच्या आशिकीपासून एमएसी स्टॅनच्या 'गन'पर्यंत

राहुल रॉयला प्रेक्षकांनी चित्रपटात 'मैं दुनिया भुला दूँगा तेरी चाहत में' हे गाणं गाताना पाहिलं होतं.

तर रॅपर असलेल्या एमसी स्टॅनची शैली मात्र अगदीच वेगळी आहे. तो गाणं गातो, 'तूने सुबह उठके सन देखा, मैंने सुबह उठके गन देखा.'

एमसी स्टॅन त्याच्या गाण्यांमधील सेक्सिस्ट शब्दांबाबत वादग्रस्तदेखील ठरला आहे. मात्र, बिग बॉसमध्ये वाद आणि लोकप्रियतेचं कॉकटेल चांगलं जुळून येतं.

काहीसा असाच प्रवास बिग बॉस ओटीटीचा विजेता ठरलेल्या यूट्यूबर एल्विश यादवचा आहे.

एल्विशनं बिग बॉसमध्ये अनेक असभ्य वक्तव्यं केली होती. बिग बॉसचा सूत्रधार असलेल्या सलमानकडून एल्विशला ओरडादेखील खावा लागला होता.

एल्विशनं माफी मागितली. एल्विशच्या चाहत्यांनी सलमानला जबरदस्त ट्रोल केलं. तरीदेखील एल्विश या शोचा विजेता ठरला.

बिग बॉस ओटीटीच्या त्या सीझनमध्ये टॉप-3 पोहोचणारे तिन्ही स्पर्धक सोशल मीडिया एन्फ्लुएन्सरच होते..

राहुल रॉय, श्वेता तिवारी...

वरिष्ठ चित्रपट आणि टीव्ही समीक्षक रामाचंद्रन श्रीनिवासन म्हणतात, "छोट्या शहरांमध्ये राहणाऱ्या तरुणाईला आता माहित झालं आहे की डिजिटल स्टार बनून ते त्यांच्या पर्सनल ब्रँडचा वापर लोकप्रियता आणि पैसे मिळवण्यासाठी करू शकतात."

"त्यासाठी त्यांना टीव्ही किंवा चित्रपटांची आवश्यकता नाही. बिग बॉसनं हे बदलतं वास्तव लक्षात घेत त्यानुसार स्वत:मध्ये बदल केला आहे."

त्याउलट बिग बॉसच्या सुरुवातीच्या सीझनमध्ये राहुल रॉय, श्वेता तिवारी, कश्मीरा शाह, राखी सावंत, रवी किशन यांच्यासारख्या चित्रपट आणि टीव्ही स्टार्सचंच वर्चस्व असायचं.

बिग बॉसमध्ये वादग्रस्त चेहऱ्यांचा ट्रेंड

2010 साल येईपर्यंत बिग बॉसचं स्वरुप, वातावरण बदलण्यास सुरुवात झाली. शोमध्ये फक्त प्रसिद्ध व्यक्तीच नव्हत्या, तर कमाल आर खान आणि डॉली ब्रिंदासारखे वादग्रस्त चेहरेदेखील दिसू लागले.

सीझन-15 मध्ये बिग बॉस मराठीचा स्पर्धक राहिलेल्या अभिजीत बिचुकलेनं महिलांवर केलेली असभ्य वक्तव्यं चर्चेत राहिली.

आता बिग बॉसमध्ये फक्त मनोरंजन पुरेसं राहिलं नव्हतं. तिथे थोडा सनसनाटीपणा आणि स्कँडलची देखील आवश्यकता होती.

रामाचंद्रन श्रीनिवासन म्हणतात, "सोशल मीडियावर लोकांनी दिलेल्या घाणेरड्या शिव्या, ट्रोलिंग आणि वैयक्तिक स्वरुपाच्या हल्ल्यांचा खच पडलेला आहे. बिग बॉसमध्ये आता आपल्याला जी शिवीगाळ आणि असभ्य भाषा दिसते, ती याच बदलत्या समाजाचं प्रतिबिंब आहे."

"अशी वर्तणूक करणारे स्पर्धकदेखील बिग बॉसचे विजेते ठरतात. कारण आता या प्रकारच्या वर्तणूक प्रेक्षकांसाठी आक्षेपार्ह किंवा गैर राहिलेली नाही."

"राहुल रॉयच्या काळाबद्दल बोलायचं तर तेव्हा सेलिब्रिटींकडून एका विशिष्ट प्रकारच्या मवाळ, सभ्य वर्तणुकीची अपेक्षा केली जायची. मात्र आजचं वातावरण 'वास्तविक' किंवा 'रिअल' होण्यावर केंद्रीत आहे."

"कोणतंही भान न ठेवता, मर्यादा न ठेवता वापरण्यात आलेल्या असभ्य भाषेला इथे अनेकदा रिअल मानलं जातं."

बिग बॉस आणि हॅशटॅगच्या दुनियेचे बादशाह

सीझन 13 नंतर बिग बॉसमध्ये जबरदस्त बदल झाला आहे. याच काळात डिजिटल विश्वातील लोक सेलिब्रिटी होऊ लागले होते.

बिग बॉसमध्ये भाग घेणारे शहनाज गिल, मुनव्वर फारुखी, एल्विश हॅशटॅगच्या विश्वाचे बादशाह होते.

प्रेक्षकांना एमसी स्टॅनचा जशास तसं वागण्याची, बोलण्याची शैली आवडली. हक से, फील यू ब्रो सारखे त्याचे शब्दप्रयोग लोकांना आवडले.

हे शब्द डिजिटल जगात रात्रीतून व्हायरल होण्यास जास्त वेळ लागला नाही.

बिग बॉसमधून मिळणाऱ्या प्रचंड लोकप्रियतेबाबत बिग बॉसची माजी स्पर्धक चुम हिच्याशी बीबीसीनं संवाद साधला होता.

तिचं म्हणणं होतं, "बधाई दो आणि गंगूबाई काठियावाडीसारख्या हिट चित्रपटांमध्ये मी काम केलं होतं. मला वाटलं होतं की यानंतर लोक मला ओळखू लागतील. मात्र तसं झालं नाही."

"बिग बॉसनं मात्र सर्वकाही बदलून टाकलं. आता मी कुठेही गेले तरी लोक मला ओळखतात. कारण बिग बॉस हा शो घराघरात पाहिला जातो."

बिग बॉससारखे शो हिट का होतात?

डॉक्टर निशा खन्ना मानसशास्त्रज्ञ आहेत आणि रियालिटी शोमध्ये त्यांनी थेरेपिस्ट म्हणून काम केलं आहे.

त्या म्हणतात, "आजच्या तरुणाईवर वादग्रस्त आणि आक्रमक स्वरुपाच्या अनफिल्टर्ड कॉन्टेन्टचा प्रभाव आहे. त्यांना व्हायरल व्हायचं आहे, लगेच प्रसिद्ध व्हायचं आहे. जुन्या धारणांना त्यांना आव्हान देखील द्यायचं आहे."

"त्यांना वाटतं की बिग बॉसमध्ये जी भांडणं होतात, त्यात अप्रत्यक्षपणा किंवा गोलमोलपणा नाही. तेच खरं आहे. त्यामुळे ते याच्याशी जोडले जातात. मात्र या शो मध्ये बऱ्याच गोष्टी स्क्रिप्टेड म्हणजे ठरवून केलेल्या असतात."

बिग बॉसच्या प्रॉडक्शन टीमचा भाग असणाऱ्या एका व्यक्तीनं बीबीसीचे प्रतिनिधी विकास त्रिवेदी यांना एका मुलाखतीत सांगितलं होतं की, "लोकांना तेच दाखवलं जातं, जे त्यांना पाहायचं आहे. शिवीगाळ, भांडणं, प्रेम काहीही बनावट किंवा खोटं नाही."

"स्पर्धकांना माहिती असतं की लोकांना काय आवडतं. 24 तासांच्या रेकॉर्डिंगमधून एक तासाचा शो प्रदर्शित केला जातो. त्यामुळे त्यात फक्त मसाला, नाट्य दाखवलं जातं."

बिग बॉसमुळे बदलली प्रतिमा

बिग बॉसच्या या थरारानं, वादामुळे आणि नाट्यामुळे अनेक डिजिटल स्टार्सना नव्यानं घडवलंदेखील आहे.

बिग बॉस 17 चा विजेता राहिलेल्या मुनव्वर फारुखीला एका कॉमेडी शो मुळे 2021 मध्ये तुरुंगात जावं लागलं होतं.

मात्र रियालिटी शोद्वारे मुनव्वरची प्रतिमा पूर्णपणे बदलून गेली. बिग बॉसमधून बाहेर पडल्यावर मुनव्वर धार्मिक वादात अडकलेला कॉमेडियन राहिला नव्हता.

मुनव्वरच्या विजेता ठरल्यानंतर त्याच्या स्वागतासाठी मुंबईतील डोंगरीच्या अरुंद गल्ल्यांमध्ये प्रचंड गर्दी जमा झाली होती. ती गर्दी पाहून लोक आश्चर्यचकित झाले होते.

अनेकजणांनी प्रश्नदेखील उपस्थित केले होते की एका रियालिटी शोच्या स्टारसाठी इतकी मोठी गर्दी?

मुनव्वरनं आयुष्यात अनेक चढउतार पाहिले आहेत.

त्याच्या बालपणीच त्याच्या आईनं आत्महत्या केली होती. तर वडिलांना 2002 च्या दंगलींना सामोरं जावं लागलं.

मुनव्वर बिग बॉसमध्ये विजेता ठरल्यानंतर राज्याशास्त्राचे अभ्यासक आसिम अली बीबीसीला म्हणाले होते, "मुनव्वरसारख्या सेलिब्रिटींमध्ये तरुणाई स्वत:ला पाहते आहे. त्यांच्यामध्ये तरुणांना त्यांच्या स्वत:च्या आयुष्यातील संघर्ष आणि आकांक्षा दिसतात."

लगेच मिळणारी प्रसिद्धी आणि समाज

बिग बॉसचा राहुल रॉयपासून मुनव्वर फारुखीचा प्रवास फक्त 2006 ते 2025 पर्यंतचा प्रवास नाही.

आता हा शो म्हणजे फक्त करियरच्या जोरावर इथपर्यंत पोहोचण्याची बाब राहिलेला नाही, तर चटकन प्रसिद्धी मिळवण्याचं देखील ठिकाण झाला आहे.

आता हे शो म्हणजे सोशल मीडियावरील एका पोस्टमुळे व्हायरल होणाऱ्या आणि एका व्हीडिओमुळे ट्रोल होऊन फटका बसणाऱ्या भारताचीदेखील कहाणी ठरले आहेत.

बिग बॉसच्या अनेक प्रेक्षकांसाठी हा एक अत्यंत मनोरंजक शो आहे. तर या शोचे विजेते हिरो किंवा नायक आहेत. या नायकांशी प्रेक्षक स्वत:ला जोडून पाहत आहेत.

तर काहीजणांसाठी हा शो म्हणजे धमकावणं, आक्रमकपणा आणि शिवीगाळ करणारा ढासळणारा समाज आणि एका खोल समस्येचं प्रतीक आहे. प्रेक्षकदेखील त्याचा एक भाग आहेत.

यापूर्वीचे काही बिग बॉस विजेते

सीझन 1 - राहुल रॉय

सीझन 4 - श्वेता तिवारी

सीझन 9 - प्रिन्स निरूला

सीझन 16 - एमसी स्टॅन

सीझन 17 - मुनव्वर फारुखी

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.