अनिल अंबानी ग्रुपची 7500 कोटींहून अधिक संपत्ती जप्त, ईडीची मोठी कारवाई

अंमलबजावणी संचालनालयानं (ईडी) रिलायन्स अनिल अंबानी समूहाची 7,500 कोटी रुपयांहून अधिक मालमत्ता जप्त केली आहे. ईडीनं सोमवारी (3 नोव्हेंबर) दोन स्वतंत्र निवेदनं जारी करून ही माहिती दिली.

ईडीनं पीएमएलए 2002 च्या तरतुदीनुसार, रिलायन्स अनिल अंबानी समूहाच्या 3,083 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या 42 हून अधिक मालमत्ता तात्पुरत्या जप्त केल्या आहेत.

जप्त करण्यात आलेल्या मालमत्तांमध्ये रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडच्या 30 मालमत्ता, आधार प्रॉपर्टी कन्सल्टन्सी प्रायव्हेट लिमिटेडच्या 5 मालमत्ता, मोहनबीर हायटेक बिल्ड प्रायव्हेट लिमिटेडच्या 4 मालमत्तांचा समावेश आहे.

याशिवाय गेम्सा इन्व्हेस्टमेंट मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड, विहान 43 रियल्टी प्रायव्हेट लिमिटेड (पूर्वीचे कुंजबिहारी डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड) आणि कॅम्पियन प्रॉपर्टीज लिमिटेड यांची प्रत्येकी एक मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.

यामध्ये पाली हिल निवासस्थान, नवी दिल्लीतील महाराजा रणजितसिंग मार्ग येथील रिलायन्स सेंटर आणि दिल्ली, नोएडा, गाझियाबाद, मुंबई, पुणे, ठाणे, हैदराबाद, चेन्नई, कांचीपुरम आणि पूर्व गोदावरीमधील इतर मालमत्तांचा समावेश आहे.

ईडीनं म्हटलं आहे की, ही जप्ती आरकॉमच्या एसबीआय बँक फसवणूक प्रकरण, आरसीएएफएल आणि आरएचएफएलच्या येस बँक फसवणूक प्रकरणांशी संबंधित आहेत.

नवी मुंबईतील धीरूभाई अंबानी नॉलेज सिटी (डीएकेसी) मधील 132 एकरहून अधिक जमीन जप्त करण्यात आली आहे.

निवेदनानुसार, त्याचे मूल्य 4,462 कोटी रुपयांपेक्षा जास्त असल्याचं सांगितलं जात आहे आणि ही कारवाई रिलायन्स कम्युनिकेशन्स लिमिटेडच्या बँक फसवणूक प्रकरणाशी संबंधित आहे.

यासह, समूहाच्या एकूण संलग्न मालमत्तेचं मूल्य आता 7,500 कोटी रुपयांपेक्षा जास्त झालं आहे.

एकेकाळी मुकेश अंबानींपेक्षा प्रसिद्ध होते अनिल अंबानी

मुकेश आणि अनिल अंबानी यांच्यात संपत्तीची वाटणी झाल्यानंतर पुढचे दोन वर्षं म्हणजे 2007 सालापर्यंत दोन्ही भाऊ फोर्ब्ज्सच्या 'श्रीमंतांच्या यादीत' बरेच वर होते.

थोरले बंधू मुकेश अंबानी धाकट्या अनिल अंबानींपेक्षा थोडे जास्त श्रीमंत होते.

त्यावर्षीच्या यादीप्रमाणे अनिल अंबानींकडे 45 अब्ज डॉलरची संपत्ती होती, तर मुकेश अंबानींकडे 49 अब्ज डॉलर्सची संपत्ती होती.

2008 साली अनेकांना असं वाटायचं की धाकटा भाऊ अनिल थोरल्या भावापेक्षा खूप पुढे जाईल. विशेषतः रिलायन्स पॉवरचा पब्लिक इश्यू येण्यापूर्वी.

'त्यांच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या एका शेअरची किंमत 1000 रुपयांपर्यंत जाईल,' असं मानलं जात होतं. तसं झालं असतं तर अनिल अबांनींनी खरोखरीच मुकेश अंबानींना मागे टाकलं असतं.

या बातम्याही वाचा :

एक दशकापूर्वी अनिल अंबानी सर्वात श्रीमंत भारतीय उद्योजक होण्याच्या उंबरठ्यावर होते.

त्यांचे त्यावेळचे उद्योग आणि नवीन व्हेंचर्स यांची घोडदौड सुरू आहे आणि अनिल अंबानी त्याचा पूरेपूर फायदा उचलण्यासाठी तयार असल्याचं त्यावेळी बोललं जात होतं.

अर्थतज्ज्ञांना असं वाटायचं की, अनिल यांच्याकडे दूरदर्शीपणा आणि जोश आहे. ते 21 व्या शतकातले उद्योजक आहेत आणि त्यांच्या नेतृत्त्वात भारतातून एक आंतरराष्ट्रीय कंपनी उदयाला येईल.

अनेकांना असंही वाटत होतं की, अनिल अंबानी आपल्या टीकाकारांना आणि थोरल्या बंधूंना चूक ठरवतील. मात्र, असं काहीही झालं नाही.

धीरुभाई अंबानी हयात असताना अनिल अंबानी अर्थ बाजाराचे स्मार्ट खिलाडी मानले जायचे.

त्यांना मार्केट व्हॅल्युएनशनच्या आर्ट आणि सायन्सचे उत्तम जाणकार मानलं जायचं.

त्याकाळी थोरल्या बंधूपेक्षा धाकट्या अनिल यांना जास्त प्रसिद्धी मिळत होती.

कर्जाचं वाढतं ओझं

2002 साली अनिल अंबानी यांचे वडील धीरूभाई अंबानी यांचं निधन झालं.

त्यांच्या काळात कंपनीची घोडदौड होण्यामागे चार मुख्य कारणं होती - मोठ्या प्रकल्पांचं योग्य व्यवस्थापन, सरकारसोबत योग्य ताळमेळ, मीडिया व्यवस्थापन आणि गुंतवणूकदारांच्या आशा पूर्ण करणं.

या चार गोष्टींवर पूर्णपणे नियंत्रण असल्याने कंपनी धीरुभाई अंबानींच्या काळात आणि त्यानंतरही काही काळ वेगाने प्रगती करत होती.

मुकेश अंबानी यांनी हे चारही मुद्दे गाठ बांधून ठेवले.

मात्र, या ना त्या कारणाने अनिल अंबानींची घसरण सुरू झाली.

1980 आणि 1990 दरम्यान धीरूभाई कंपनीसाठी सातत्याने बाजारातून पैसा उचलत होते.

त्यांच्या शेअर्सच्या किंमती कायमच चांगल्या होत्या आणि गुंतवणूकदारांचा विश्वास कायम होता.

मुकेश अंबानी यांनी नफ्यातून गेल्या दशकात मोठ्या प्रमाणावर विस्तार केला.

दुसरीकडे 2010 साली गॅस प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय अनिल अंबानी यांच्या बाजूने लागला नाही. त्यानंतर रिलायन्स पॉवरच्या शेअर्सच्या किंमती गडगडल्या.

इथून पुढे अनिल यांचा मार्ग खडतर होत गेला.

अशा परिस्थितीत अनिल अंबानी यांच्याकडे देशी आणि परदेशी बँका आणि फायनान्स कंपन्यांकडून कर्ज घेण्याशिवाय पर्याय उरला नाही.

गेल्या दशकभरात मोठ्या भावाचा व्यवसाय वाढत गेला, तर छोट्या भावावर कर्ज वाढत गेलं. फोर्ब्जनुसार गेल्या जवळपास दशकभरापासून मुकेश अंबानी भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)