'मानवत मर्डर्स'मध्ये आशुतोष गोवारीकरांनी साकारलेले रमाकांत कुलकर्णी प्रत्यक्षात कसे होते?

    • Author, तुषार कुलकर्णी
    • Role, बीबीसी मराठी

'अनेक जणांची हत्या केल्याचा आरोप असलेल्या इसमाला पोलीस कस्टडीत चिकन करी मिळाली.' अशी बातमी ऐकली तर तुमची काय प्रतिक्रिया असेल?

तुम्ही नक्कीच म्हणाल, अरे आरोपी हे काय सरकारी पाहुणे आहेत का? त्यांची इतकी बडदास्त ठेवली जातेय. पण अर्थातच हे पाहुणचारासाठी नाहीये तर आरोपीने आपल्या गुन्ह्याची माहिती द्यावी यासाठी ते आहे. पण ही पद्धत खरंच उपयोगी पडली असेल का?

या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला माजी पोलीस अधिकारी आणि 'भारताचे शेरलॉक होम्स' अशी ओळख असलेल्या रमाकांत कुलकर्णी यांच्या व्यक्तिमत्त्वात सापडू शकतं.

सध्या 'सोनी लिव्ह' वर प्रसारित झालेल्या 'मानवत मर्डर्स' या वेब सीरिजमुळे पुन्हा 'मानवत खून खटला' पुन्हा चर्चेत आला आहे.

या वेब सीरिजमध्ये आशुतोष गोवारीकर हे प्रमुख भूमिकेत आहेत. आशुतोष यांनी तत्कालीन डीसीपी रमाकांत कुलकर्णी यांची भूमिका साकारली आहे. या वेब सीरिजच्या निमित्ताने पुन्हा एकदा रमाकांत कुलकर्णी कोण होते याची चर्चा सुरू झाली आहे. त्यांचे व्यक्तिमत्त्व कसे होते आणि त्यांना 'भारताचे शेरलॉक होम्स' का म्हटले गेले हे आपण पाहू.

त्याचबरोबर ज्या आशुतोष गोवारीकर यांनी ही भूमिका साकारली त्यांना रमाकांत कुलकर्णी यांच्या व्यक्तिमत्त्वाचे कोणते पैलू आवडले हे देखील आपण या लेखात पाहू.

'गावात कधी कुणी पोलीस देखील पाहिला नव्हता'

'फुटप्रिंट्स ऑन द सँड्स ऑफ क्राइम' या आत्मचरित्रात रमाकांत कुलकर्णी यांनी आपल्या सुरुवातीच्या काळाबद्दल लिहिले आहे. कोकणातील अवेरसा या गावचे ते रहिवासी होते. (हे गाव तेव्हाच्या बॉम्बे प्रांतात होते. सध्या अवेरसा हे गाव कर्नाटकच्या उत्तर कन्नड जिल्ह्यात आहे.)

त्यांच्या घरात धार्मिक वातावरण होते. त्यामुळे प्रत्येक महत्त्वाच्या कामाची सुरुवात मंगेशीच्या प्रार्थनेनेच केली जात असे. जेव्हा ते शिकायला बाहेर पडले तेव्हा असेल किंवा मानवत खुनाच्या तपासाचे काम त्यांनी हाती घेतले असेल त्या कामाआधी आपण मंगेशीला प्रार्थना केली असा उल्लेख त्यांच्या पुस्तकात आढळतो.

रमाकांत यांना लहानपणापासूनच अभ्यासाची आवड होती. पण आपण अशा गावात वाढलो जिथे कुणी पोलीसच पाहिला नव्हता असं ते सांगतात.

लहानपणी त्यांच्या आईचा सोन्याचा हार हरवला होता. तर, तो परत मिळण्यासाठी त्यांच्या घरचे पोलिसांकडे गेले नव्हते तर देवाची प्रार्थना करत होते. 'देवाने ही प्रार्थना ऐकली पण त्याला सात वर्षं लागली.'

अवेरसामध्ये शाळा नव्हती म्हणून त्यांना आपल्या आजोळी अंकोल्यात राहावे लागले. तिथे त्यांचे शालेय शिक्षण झाले.

'शाळेत चांगला अभ्यास केला तर तुला गाईचे वासरू देईल,' असे त्यांच्या आजोबांनी सांगितले होते. त्याप्रमाणे त्यांनी मन लावून अभ्यास केल्यावर त्यांना एक काळ्या रंगाचे गोंडस वासरू (कालवड) त्यांच्या आजोबांनी घेऊन दिले. त्या कालवडीचे नाव त्यांनी 'सरस्वती' ठेवले.

'मी गावात जिथेही भटकत असे तिथे ते वासरू माझ्यासोबत येई.'

यातूनच मला प्राण्यांविषयी प्रेम निर्माण झाले. माझी निरीक्षण शक्ती वाढली आणि सर्वांसोबत सहानुभूतीने कसे वागावे याची ती सुरुवात ठरली,' या दोन्ही गोष्टींचा फायदा एक तपास अधिकारी म्हणून आपल्या करिअरला झाल्याचे ते पुस्तकात नमूद करतात.

काही काळानंतर त्यांच्या गावी अवेरसात शाळा सुरू झाली आणि ते काही काळासाठी गावी आले. प्राथमिक शिक्षण संपल्यानंतर ते पुन्हा अंकोल्यात गेले. तिथे त्यांनी शालेय शिक्षण पूर्ण केले. मग ते मुंबईला गेले. तिथे कॉलेजात असतानाच त्यांनी 'सेंट्रल बँक ऑफ इंडियाची' नोकरी सुरू केली. त्यावेळी त्यांना 60 रुपये पगार होता.

नोकरी सांभाळून ते कॉलेजमध्ये क्लासेस करायचे आणि नंतर अभ्यास करत असत. होतकरू मुलांसाठी दुपारी दोन ते रात्री 10 पर्यंत काम करता यावे अशी सोय सेंट्रल बँकेने केली होती.

सकाळी क्लासेसला जाणे आणि नंतर बँकेत काम, असा त्यांचा दिनक्रम होता. कॉलेजात असताना ते भाषणाच्या, काव्यवाचनाच्या स्पर्धेतही ते भाग घेत आणि त्यात त्यांना अनेक बक्षीसं मिळाली होती.

पहिल्याच प्रयत्नात आयपीएस

पदवीत असताना त्यांनी तत्त्वज्ञान आणि मानसशास्त्र या विषयाचा अभ्यास केला होता. मानसशास्त्राच्या अभ्यासाच्या बैठकीचा फायदा त्यांना पुढे करिअरमध्येही झाल्याचे दिसते. गुन्हेगारांचे मानसशास्त्र ओळखून तपास करण्यात त्यांचा हातखंडा होता.

पदवीनंतर त्यांनी पदव्युत्तर शिक्षण घेतले आणि त्याच वेळी भारतीय प्रशासकीय सेवेची परीक्षा द्यायचे त्यांनी ठरवले. पहिल्याच प्रयत्नात त्यांना यश मिळाले आणि त्यांची 1954मध्ये भारतीय पोलीस सेवेत (IPS) निवड झाली. त्यावेळी माउंट अबू येथे पोलीस अधिकारी प्रशिक्षण केंद्र होते तिथे त्यांचे प्रशिक्षण पूर्ण झाले. त्यानंतर त्यांची पोस्टिंग अहमदाबादमध्ये झाली. त्यावेळी अहमदाबाद हे मुंबई प्रांतातच होते.

त्यानंतर त्यांनी मुंबई, पुणे या ठिकाणीही नोकरी केली. मोठ्या शहरातच पोस्टिंग मिळत असताना त्यांची बदली बीड येथे झाली. बीड आणि आजूबाजूच्या परिसरात दरोड्याव्यतिरिक्त फारसे गुन्हे नव्हते. त्यावेळी तेच सर्वांत मोठे आव्हान होते.

तेव्हा ज्या प्रमाणे एम. केनेडी या इंग्रज पोलीस अधिकाऱ्याने लिहिलेल्या 'द क्रिमिनल ट्राइब्स इन बॉम्बे प्रोव्हिन्स' हे पुस्तकावरुन प्रेरणा घेऊन त्यांनी स्वतंत्र अभ्यास सुरू केला आणि त्या भागातील माहिती गोळा करण्यास सुरुवात केली, असं ते सांगतात.

मराठवाड्यातील गुन्ह्यांची उकल कसे करायचे?

रमाकांत आपल्या पुस्तकात नमूद करतात की, 'बहुतेक गुन्हेगार हे वारंवार तोच तोच गुन्हा करायचे. त्यांची पद्धत एकच असायची. त्याचा पॅटर्न लक्षात घेऊन त्याची नोंद घेऊन त्या गुन्ह्याची उकल करता येत असे. ते सांगतात, की ही गोष्ट मोठी विस्मयकारक आहे की अजूनही त्यांनी घेतलेल्या रेकॉर्डमधील काही गुन्हेगार तोच गुन्हा करत आहेत.'

काहींनी आपली पद्धत बदलली आहे पण गुन्हा तोच असायचा. रमाकांत यांनी पोलिसांच्या नोंदी, पोलीस पाटलाकडे असलेल्या नोंदी यांचा बारकाईने अभ्यास केला. मग विविध लोकांच्या मुलाखती घेतल्या.

त्यातून त्यांनी गुन्हेगारांचे हे प्रोफाइलिंग केले होते आणि त्यावरुन त्यांनी अॅक्शन प्लान तयार केला.

'या नियोजनामुळे अनेक गुन्ह्यांची उकल झाली ते रोखता आले आणि माझे यामुळे फार कौतुक झाले,' असे रमाकांत आपल्या आत्मचरित्रात सांगतात.

आंतरराष्ट्रीय स्मगलर्सची केस

बीडहून मुंबईत परतल्यावर त्यांनी दोन अत्यंत महत्त्वाच्या केसेसवर काम केलं. यातली पहिली म्हणजे डोनझे आणि वॉलकॉट या स्मगलर्सची केस आणि दुसरी केस होती रमण राघवची.

हे डोनझे-वॉलकॉट हे आंतरराष्ट्रीय स्मगलर्स होते आणि वेगवेगळ्या पासपोर्टवर जगभरात ते स्मगलिंग करत असत. त्यांच्याकडे स्वतःचे खासगी छोटे विमान होते. त्यातून पाहिजे तेव्हा आपल्या बनावट पासपोर्टने ते दोघे उड्डाण घेत असत. त्यामुळे त्यांना पकडणे अवघड होते.

आंतरराष्ट्रीय ख्यातीचे स्मगलर्स असून त्यांच्या अंगावर कधी एक ग्रॅम सोनं सुद्धा सापडलं नव्हतं. आपल्या स्मगलिंगमधील नावाचा वापर करुन बनावट सोनं ते काही इतर छोट्या स्मगलर्सला विकत. त्यांनी त्यासाठी डोनझेनी एक खास जॅकेट तयार केले होते. ज्यात 26 किलो वजनाची बनावट सोन्याची बिस्किटे ते ठेवत.

आणि जिथे कुठे सौदा करायचा असेल तिथे ते आपल्या जॅकेटमधून ती बिस्किटे काढून समोरच्या व्यक्तीकडून रोकड घेत आणि पुन्हा त्या व्यक्तीला परत कधीच भेटत नसत. त्यांना पकडणे हा देशाच्या आणि राज्याच्या प्रतिष्ठेचा प्रश्न बनला होता. रमाकांत आणि त्यांच्या टीमने त्यांना आपल्या जाळ्यात ओढले आणि कोर्टात सादर केले.

जेव्हा वॉलकॉटची शिक्षा पूर्ण झाली तेव्हा तो देश सोडून जाण्यापूर्वी रमाकांत यांना भेटायला गेला. त्यावेळी रमाकांत यांच्या केबिनमध्ये शिवसेना नेते प्रमोद नवलकर देखील होते. 'आपण देश सोडून चाललो आहोत. तुम्ही माझ्याशी न्यायाने वागलात, तुम्ही तुमचं कर्तव्य बजावत होता' ( you were fair, you were doing your duty), असं त्याने म्हटलं.

हा किस्सा प्रमोद नवलकर यांनी आपल्या एका लेखातही दिला होता, असं रमाकांत यांनी आपल्या पुस्तकात नमूद केलं आहे.

मुंबईला हादरवणारा रमण राघव

रमाकांत यांच्या गाजलेल्या केसेसपैकी रम राघवची (सिंधी दलवाई) ची केस ही अतिशय महत्त्वपूर्ण आहे. 1965 ते 1966 या काळात एकूण 19 जणांवर हल्ले झाले होते. या खुन्याची दहशत मुंबई उपनगरात पसरलेली होती. त्यातल्या काही जणांची हत्या झाली आणि जे वाचले त्यांना काही आठवत नव्हते.

हत्येचा कुठलाच पॅटर्न नव्हता आणि कुणी साक्षीदारही नव्हता की जो या व्यक्तीबाबत काही माहिती देईल अनेक अफवा होत्या. त्यातली एक अफवा अशी होती की 'खुनीला एका साधू किंवा फकिराकडून एक वर मिळाला आहे त्यामुळे तो खुनी पोपट किंवा मांजर बनू शकतो. तेव्हा तो कधीच सापडू शकत नाही.'

रमाकांत कुलकर्णी आणि त्यांच्या टीमने सर्व धागेदोरे एकत्र करायला सुरुवात केली. त्यातून रमण राघवबाबत एक महत्त्वाची माहिती हाती आली की तो याआधी अनेक छोट्या मोठ्या गुन्ह्यांमध्ये तुरुंगात होता आणि जेव्हा तो तुरुंगात होता तेव्हा मात्र याप्रकारचे खून झाले नव्हते. त्या विवरणावरुन त्यांच्या टीमने त्याला शोधायचे ठरवले.

मुंबई आणि उपनगरातील सर्व पोलीस स्टेशनमध्ये त्याच्या तपशील पाठवले. आणि एकेदिवशी तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक अलेक्स फिआल्हो या तरुण पोलिसाच्या सतर्कतेमुळे रमण राघवला जेरबंद करण्यात यश आलं.

त्याला पोलीस कोठडीत घेतल्यानंतर त्याने तोंडच उघडले नाही. अनेक तास वाट पाहिल्यानंतर तपास करणाऱ्या एका अधिकाऱ्याने विचारले तुला काही खायला पाहिजे का? त्यावर तो म्हणाला 'मुर्गी'. मग त्याच्यासाठी चिकन करीचा बंदोबस्त करण्यात आला. त्यानंतर त्याला पुन्हा विचारलं आणखी काही हवंय का? तो परत म्हणाला 'मुर्गी'.

मग त्याला पुन्हा चिकन देण्यात आलं. त्यानंतर त्याला विचारलं अजून काही पाहिजे का? त्यानंतर त्याने खोबरेल तेल मागितलं. ते दिल्यानंतर त्याने त्या तेलाने मालिश केली आणि मग म्हणाला आता विचारा काय विचारायचं ते. त्यावर त्याने सर्व हकीकत सांगितलं. इतकंच नाही तर हत्यार कुठे आहे कुठे काय लपवून ठेवलंय याचा कबुलीजबाबही त्याने सविस्तर दिला.

खायला दिल्यावर तो बोलू कसा लागला? हा प्रश्न पुढे अनेकांनी रमाकांत यांना विचारला. त्यावर त्यांनी म्हटलं की, खरं तर मला या प्रश्नाचं उत्तर अनेक वर्षं माहीत नव्हतं. पण माझ्या वाचनात 'क्रिमिनल इनवेस्टिगेशन बाय ऑबरी अँड कापुतो' हे पुस्तक आले. त्यात मनोरुग्ण संशयित व्यक्तींना बोलतं कसं करायचं याची पद्धत सांगण्यात आली होती की, अशा प्रकारच्या तपासात आरोपीच्या मताशी सहमत होतोय असं दाखवलं तर तो बोलण्यास तयार होतो, असा सिद्धांत या पुस्तकात मांडण्यात आला होता.

पुढे ही पद्धत अनेकांनी वापरल्याचे आपल्याला दिसते. मध्यप्रदेशचे माजी पोलीस महासंचालक शैलेंद्र श्रीवास्तव यांनी देखील अशाच पद्धतीचा वापर करुन छोटा राजनचा साथीदार विकी मल्होत्राकडून सर्व माहिती काढून घेतली होती.

क्रिमिनॉलॉजी अर्थात गुन्हेशास्त्राचा अभ्यास करुन रमाकांत कुलकर्णी गुन्ह्यांची उकल करण्याचा प्रयत्न करत. त्यांच्या या पद्धतीचा उपयोग त्यांना त्यांच्या कारकिर्दीत ठिकठिकाणी झाला. आपण केलेल्या अभ्यासाचा संशोधनाचा फायदा सर्व पोलीस खात्याला व्हावा म्हणून त्यांनी निवृत्ती जवळच्या काळात क्राइम, क्रिमिनल्स आणि कॉप हे पुस्तक लिहिले. रमाकांत हे 'इंडियन सोसायटी फॉर क्रिमिनॉलॉजी'चे अध्यक्ष देखील होते.

वेब सीरिजच्या सुरुवातीलाच रमाकांत हे हत्येचा गुन्हा कसा उलगडावा याचे सहा टप्पे सांगतात. यामध्ये पीडित कोण आहे, गुन्ह्याचे ठिकाण कोणते, गुन्ह्याची वेळ कोणती, हत्यार कोणते, कारण काय असू शकते आणि कुणी केला असावा या प्रश्नांची उत्तरं शोधत जायचं त्यातून गुन्ह्याची उकल करायची हे सांगितले आहे.

हीच पद्धत त्यांनी त्यांच्या 'फुटप्रिंट्स ऑन द सँड ऑफ क्राइम'मध्ये सांगितली आहे. त्यानुसार त्यांनी अनेक गुन्हे उकलले. आपण शेरलॉक होम्सची पुस्तके वाचली असतील किंवा चित्रपट पाहिले असतील तर आपल्या लक्षात येऊ शकतं की शेरलॉक होम्सची तपासाची पद्धत ही अत्यंत शास्त्रशुद्ध आणि तर्काधिष्ठित आहे. यामुळे कठीण मधील कठीण गुन्हा ही उलगडला जातो.

रमाकांत यांनी देखील अत्यंत कठीण वाटणाऱ्या केसेसचा छडा लावला त्यामुळे तेव्हाच्या वृत्तपत्रांनी 'भारताचे शेरलॉक होम्स' म्हटल्याचे आपल्या लक्षात येते.

'खून खटला मानवत'

सत्तरच्या दशकात ज्या घटना राज्यात घडल्या त्यातल्या प्रभावशाली घटनांपैकी मराठवाड्यातील परभणी जिल्ह्यात घडलेली घटना 'मानवत खून खटला' महत्त्वाची मानली जाते. मूल होण्यासाठी आणि गुप्तधन मिळावे या उद्देशाने मांत्रिकाच्या सांगण्यावरुन नरबळी देण्यात आले होते. त्यातून ही मालिका घडल्याचे नंतर उघडकीस आले.

एका पाठोपाठ होणाऱ्या खुनांच्या मालिकेमुळे परभणी जिल्ह्याची ओळखच 'खून खटला मानवतचा जिल्हा' अशी पडली होती. या घटनेला अंदाजे पन्नास वर्षं झाली असली तरी परभणी आणि त्या परिसरात राहणारे ज्येष्ठ नागरिक अजून देखील या घटनेचं वर्णन 'अंगावर काटा (शहारा) आणणारी घटना' असंच करतात.

परभणी जिल्ह्यात जेव्हा मानवतमध्ये खुनांची मालिका सुरू झाली तेव्हा नेमके कसे वातावरण होते याविषयी परभणीचे राहणारे ज्येष्ठ पत्रकार शरद देऊळगावकर यांनी बीबीसी मराठीला सांगितलं की "या घटनेनी मानवतकरांचीच काय तर सगळ्यांची झोप उडवली होती. खून का होत आहेत? कसे होत आहेत? याचा थांगपत्ताच लागत नव्हता."

शरद देऊळगावकर यांनी मानवत हत्याकांडावर पुस्तक लिहिले आहे. मानवत हत्याकांडाचे वार्तांकन आणि सुनावणीचे वार्तांकन देऊळगावकर यांनी त्यावेळी केली होती. याच विषयावर देऊळगावकरांनी मानवत हत्याकांड हे पुस्तक लिहिले आहे.

त्यावेळच्या परिस्थितीबाबत देऊळगावकर सांगतात, "जर खुनाचं हे सत्र थांबलं नाही तर पुढे काय होईल... या विचाराने सर्वांचा थरकाप उडायचा. रात्री एकट्या दुकट्याने फिरणं तर बंदच झालं होतं. वाड्या वस्त्यांवर लोक पहारा देत असत, असं वातावरण या काळात होतं. त्यामुळे या खुनापाठीमागे कोण आहे हे समजणं आणि पीडित कुटुंबांना न्याय मिळवून देणं महत्त्वाचं होतं."

त्यामुळे या खुनाचा तपास अशा व्यक्तीकडे सोपवण्यात यावा ज्या व्यक्तीला तपासाचा दीर्घ अनुभव तर आहेच पण त्याच बरोबर पोलीस खात्यातल्या विविध विभागांशी समन्वय साधून वेगवेगळ्या टीमचे नेतृत्व त्यांना कुशलपणे करता येईल.

यातूनच तत्कालीन डीसीपी (CID- क्राइम) रमाकांत कुलकर्णी यांचे नाव समोर आले. राजभवनातील चोरी, फिरोज दारूवाला केस, वॉलकॉट - डोनझे स्मगलर्स केस आणि रमण राघव सारख्या प्रकरणांचा छडा लावणाऱ्या रमाकांत कुलकर्णींची 'मानवत खून मालिके'चा तपास करण्यासाठी नियुक्ती झाली आणि ते परभणीला 'काचीगुडा एक्सप्रेस'ने पोहचले.

परभणीपासून 35 किमी अंतरावर मानवत आहे.

त्याकाळात मानवत हे तालुक्याचं ठिकाण नाही पण एक मोठं गाव आणि परिसरातील व्यापारी केंद्र अशी गावाची ख्याती. अडत म्हणजेच घाऊक धान्याची दुकानं, कपड्यांची दुकानं, शेतीसाठी लागणारे साहित्य याचं ते केंद्र होतं.

रमाकांत जेव्हा मानवत खुनांच्या तपासासाठी आले तेव्हा तेथील व्यापारी, पत्रकार आणि इतर प्रतिष्ठित लोकांनी त्यांची भेट घेऊन आपल्या समस्या मांडल्या. या खुनाच्या सत्रांमुळे भीतीचं वातावरण निर्माण झालं असून एकूणच जीवनावर काय परिणाम झाला आहे हे त्यांनी त्यांच्या कानावर घातल्याचे शरद देऊळगावकर सांगतात.

"त्यांना मी पाहिले तेव्हा ते सिव्हिल ड्रेसमध्येच होते. ते नेहमी सिव्हिल ड्रेसमध्येच असायचे हे नंतर आम्हाला कळले. त्यांनी सर्वांची आपुलकीने चौकशी केली आणि लवकरच या खुनाचा तपास करुन गुन्हेगारांना अटक केली जाईल असं त्यांनी सर्वांना विश्वासात घेत सांगितलं. त्यांची पद्धत समोरच्या माणसाला आपलेसे करण्याची होती. त्यामुळे परभणी पोलिसांच्या टीममध्ये तर उत्साहाचं वातावरण तयार झालंच पण त्याचवेळी स्थानिकांकडूनही माहिती मिळणे आणि सहकार्य मिळण्याचे काम सोपे झाले," असं देऊळगावकर सांगतात.

असे साकारले रमाकांत....

रमाकांत यांचे व्यक्तिमत्त्व कसे होते या विषयी त्यांचीच भूमिका साकारलेल्या आशुतोष गोवारीकर यांनी बीबीसी मराठीशी बातचीत केली.

त्यांची भूमिका जास्तीत जास्त चांगली साकारता यावी यासाठी गोवारीकर यांनी त्यांचे व्यक्तिमत्त्वाची पैलू अभ्यासले आणि त्याचा उपयोग आपल्याला अभिनयावेळी झाल्याचं ते सांगतात.

रमाकांत यांची भूमिका का स्वीकारावी वाटली असे विचारल्यावर आशुतोष गोवारीकर यांनी सांगितले की, "मी रमाकांत यांचे नाव ऐकून होतो. पण त्यांचे कार्य कोणत्या स्तरावर आहे हे मला माहीत नव्हते. नंतर मी जेव्हा त्यांचे फुटप्रिंट्स ऑन द सँड्स ऑफ क्राइम वाचले त्या पुस्तकातून त्यांनी सॉल्व केलेल्या केसेस इतक्या थरारक आहेत. त्या केसेस खूप अवघड होत्या. पण त्यांनी त्या सॉल्व केल्यानंतर त्यांना भारताचे शेरलॉक होम्स म्हटले जाऊ लागले होते. जेव्हा हा रोल मला ऑफर झाला तेव्हा वाटले की या सीरिजच्या माध्यमातून संपूर्ण देशाला आपण दाखवून देऊ शकतो की एक मराठी पोलीस ऑफिसर कसे होऊन गेले. त्यामुळे मी ही भूमिका स्वीकारली."

गोवारीकर पुढे सांगतात, "कुठे ना कुठे मला पोलिसांबद्दल मला आपुलकी वाटते. एक तर ते आपल्यासाठी सारखा संघर्ष करत असतात आणि दुसरी गोष्ट माझे वडील (अशोक गोवारीकर) हे देखील एक पोलीस अधिकारी होते. त्यांच्याकडे पाहून मला कळलं की पोलिसांचा प्रत्येक दिवस हा एका मोहिमेसारखाच असतो. आणि जेव्हा आपल्याला रमाकांत कुलकर्णींची भूमिका साकारायला मिळते असं कळल्यावर मला ती भूमिका हातून जाऊ द्यायची नव्हती."

रमाकांत कुलकर्णी यांची भूमिका साकारण्यासाठी त्यांचे व्यक्तिमत्त्व तुम्ही कसे समजून घेतले आणि त्याची तयारी कशी केली या प्रश्नाचे उत्तर देताना आशुतोष गोवारीकर सांगतात की, "रमाकांत यांची भूमिका साकारण्यासाठी माझा सर्वांत मोठा रिसर्च हाच होता की मी कुलकर्णी फॅमिलीला जाऊन भेटलो. त्यांच्याकडून मला भरपूर पर्सनल डिटेल्स मिळाल्या. जसं की ते घरी कसे राहायचे, त्यांचं काम ते घरी घेऊन यायचे का, ते स्ट्रेस कसा हँडल करायचे, या सर्व गोष्टी मी समजून घेतल्या."

"रमाकांत कुलकर्णी यांच्या पत्नी लीली कुलकर्णी आणि त्यांची मुलगी अनिता कुलकर्णी-भोगले यांनी मला बऱ्याच गोष्टी सांगितल्या. अनिता यांनी रमाकांत यांचे पेपरमध्ये आलेले कटिंग्स जपून ठेवले होते. त्याचा सुद्धा उपयोग त्यांचे व्यक्तिमत्त्व समजून घेण्यासाठी झाला."

"त्यांच्यात संयम खूप होता. ते कधीही रागावून जात नसत. ते गुन्हेगाराकडून जेव्हा माहिती काढून घेत तेव्हा ते आपुलकीने वागवत. एखाद्या संंशयिताला किंवा आरोपीला निमुळते करायचे, त्याच्या कलाने गोष्टी घ्यायच्या आणि त्याच्याकडून सर्व गोष्टी काढून घ्यायच्या ही कला त्यांच्यात होती. त्यांनी कधीही थर्ड डिग्री वापरली नाही. इतकंच काय त्यांनी कधी कुणाला थोबाडीत देखील मारली असे ऐकण्यात आले नाही," असे आशुतोष गोवारीकर सांगतात.

रमाकांत कुलकर्णी हे 'टीम प्लेअर' होते असं आशुतोष सांगतात. "त्यांच्यात मीपणा नव्हता, त्यांच्या सहकाऱ्यांना कामाचे वाटप करायचे. त्यांच्या सहकाऱ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करायचे यातून सर्व जण आपली उत्तम कामगिरी द्यायचे."

मुंबई पोलिसांना रमाकांत कुलकर्णींच्या अनुभवाचा असा मिळाला फायदा

रमाकांत कुलकर्णी यांच्यातील नेतृत्वगुण हे वाखाणण्याजोगे होते, असं मुंबई पोलिसांचे इतिहासकार दीपक राव देखील सांगतात.

दीपक राव यांनी बीबीसी मराठीला सांगितले की, "रमाकांत कुलकर्णी यांनी मुंबई प्रांतातील अनेक महत्त्वाच्या केसेस हाताळल्या. त्यांच्यासोबत उत्तम टीम्स होत्या. वाकटकर, पेंडसे यांच्यासारखे अधिकारी होती. या सर्वांना आपल्या तपासासाठी हव्या त्या गोष्टी देण्याचे आणि त्यांना उत्साहित करण्याचे काम कुलकर्णी यांनी केले. त्यांचा देवावर खूप विश्वास होता. रिटायर झाल्यानंतर आपल्या गावी जाऊन देवाच्या भक्तीत ते रमले."

रमाकांत कुलकर्णी यांनी त्यांच्या कारकीर्दीत अनेक महत्त्वाच्या केसेस हाताळल्या. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येचा तपास देखील त्यांनी केला होता.

पोलीस महासंचालक झाल्यावर आपल्या तपासातील अनुभव सर्व पोलीस दलाला मिळावा यासाठी प्रशिक्षण देणे, राज्यातील फॉरेन्सिक तपास यंत्रणा बळकट करणे, पोलिसांना तपासाच्या दृष्टीने योग्य सोयीसुविधा मिळणे यावर त्यांनी काम केले.

रमाकांत यांच्या कन्या अनिता कुलकर्णी-भोगले यांनी द पायोनियरला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते की 1990 ला निवृत्त झाले. तेव्हा ते पोलीस महासंचालक (DGP) होते. झाल्यानंतर त्यांनी संगीताचा छंद जोपासला. ते तबला आणि सितार वाजवत असत.

23 मार्च 2005 रोजी रमाकांत कुलकर्णी यांचे निधन झाले.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)