You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
ऑपरेशन सिंदूरविरोधी पोस्ट, मैत्रिणीला भेटायला नागपुरात आलेल्या मुक्त पत्रकाराला अटक
- Author, भाग्यश्री राऊत
- Role, बीबीसी मराठीसाठी
भारतीय सैन्यानं ऑपरेशन सिंदूर राबवून पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर कारवाई केल्याचं म्हटलं आहे. हे ऑपरेशन करणाऱ्या भारतीय सैन्याविरोधात सोशल मीडियावर पोस्ट टाकणाऱ्या केरळच्या एका मुक्त पत्रकाराला नागपुरात अटक करण्यात आली आहे.
देशविरोधी कारवाई केल्याचा आरोप त्यांच्यावर असून त्यांना 13 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यांच्यावर इतरही आरोप आहेत.
नागपुरातील लकडगंज पोलिसांनी एका हॉटेलमधून त्यांना अटक केली. त्यांनी सोशल मीडियावर काही पोस्ट करण्याशिवाय त्यांच्यावर इतरही काही आरोप होते. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रेजाज एम. शिबा सिदीक असं या 26 वर्षीय मुक्त पत्रकाराचं नाव आहे.
ते केरळमधल्या एडापल्लीचे रहिवासी आहेत. तसंच डेमोक्रेटीक स्टुडंट असोसिएशनचे सदस्यही आहेत. "मकतूब मीडिया" या केरळमधील न्यूज वेबसाईटसाठी ते लिहितात.
तो काही दिवसांपूर्वी दिल्लीतील एका परिषदेत सहभागी होण्यासाठी ते गेले होते. त्यानंतर केरळला जायला निघाले. पण, त्याआधी मैत्रिणीला भेटायला नागपुरात आले होते.
गेल्या तीन दिवसांपासून ते नागपुरात मारवाडी चौकातील एका हॉटेलमध्ये राहत होते.
गुरुवारी 8 मे रोजी मैत्रिणीसोबत याच हॉटेलमध्ये असताना पोलिसांनी त्यांना अटक केली. यावेळी पोलिसांनी त्यांच्या मैत्रिणीलाही ताब्यात घेतलं होतं.
पण, नंतर तिला सोडून देण्यात आलं. ती बिहारची रहिवासी असून नागपुरातल्या एका प्रसिद्ध कॉलेजमध्ये शिकते. दोघांची इंस्टाग्रामवर दीड महिन्यांपूर्वी ओळख झाली होती. त्यानंतर तिला भेटण्यासाठी ते नागपुरात आले होते.
लष्कराबाबत आक्षेपार्ह पोस्ट?
भारतीय सैन्यानं 7 मे रोजी ऑपरेशन सिंदूरअंतर्गत पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर कारवाई केल्याचं सांगितलं.
रेजाजने त्याविरोधात इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर केली होती. एका लहान मुलीचा फोटो शेअर करत त्यानं पोस्ट लिहिली होती.
यात भारतीय लष्कराबाबत आक्षेपार्ह भाषा वापरण्यात आली होती, अशी माहिती एफआयआरमधून समोर आली आहे.
तसंच त्यांनी इतरही काही पोस्ट केल्या होत्या. त्यापैकी एका पोस्टमध्ये छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांच्याविरोधातील ऑपरेशनच्या विरोधात पोस्ट लिहिल्याचीही माहिती पोलीस सूत्रांनी दिली.
तसंच हातात दोन बंदुका घेतलेली एक पोस्टही त्यांनी इंस्टाग्रामवर टाकली होती, असंही पोलीस सूत्रांनी सांगितलं.
या सोशल मीडिया पोस्टबाबत समजल्यानंतर गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक कमलाकर गड्डीमे यांनी लकडगंज पोलिसांत तक्रार दाखल केली.
त्यानंतर पोलिसांनी त्याला हॉटेलमधून अटक केली.
माओवादी विचारांवर आधारित पुस्तके
पोलिसांनी हॉटेलच्या खोलीतून काही साहित्यही देखील जप्त केलं आहे.
यामध्ये बंदी घातलेल्या मावोवादी संघटनेच्या विचारांवर आधारित तीन पुस्तके असून नक्षलवाद्यांच्या समर्थनार्थ असणारे काही पॅम्लेटही जप्त केल्याचं सांगण्यात आलं आहे.
यावरून लकडगंज पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम 149 अंतर्गत भारत सरकारविरोधात युद्ध पुकारण्याच्या उद्देशानं शस्त्रं गोळा करण्याबाबतचा गुन्हा त्यांच्यावर दाखल केला आहे. तसंच 192 (दंगल घडवण्याच्या उद्देशानं चिथावणी देणे), कलम 351 आणि कलम 353 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आम्ही रेजाजचं सोशल मीडिया अकाऊंट तपासण्याचा प्रयत्न केला, पण ते अकाऊंट सध्या बंद करण्यात आलं आहे.
एफआयआरनुसार, पोलिसांनी त्याच्या खोलीची झडती घेतली असता त्याच्या बॅगमध्ये 3 पुस्तकं मिळाली.
एक पुस्तक जी. एन. साईबाबांशी संबंधित आहे, तर दुसरं पुस्तक लेनिनशी संबंधित आहे.
'ओन्ली पीपल मेक देअर ओन हिस्ट्री इंट्रोडक्शन बाय एजाज अहमद' हे तिसरं पुस्तक मिळालं. तसेच इंग्रजीमधील एक पत्रक आढळून असून त्यात नाझरिया जर्नलचा उल्लेख आहे, अशी माहिती समोर आली.
एक बुकलेटही असून त्यात छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांविरोधात जी कारवाई सुरू आहे त्याविषयी लिहिलं आहे. तसेच भारत सरकार आणि CPI माओवादी यांच्यामध्ये युद्धबंदीची चर्चा घडवून आणणार असल्याचे म्हटले आहे.
हे पत्रक छापण्यासाठी 20 ते 25 हजार जमा करायचे असून दिल्ली ते बस्तर पर्यंत सर्व संघटना, स्टडी सर्कल्समध्ये पोहचवायचे आहेत, असं या FIR मध्ये म्हटलेले आहे.
दोन्ही हातांमध्ये बंदूक घेऊन फोटो पोस्ट केले असून जो शर्ट परिधान करून हे फोटो काढले होते ते शर्टही जप्त करण्यात आला आहे.
केंद्र शासनाच्या विरोधात युद्ध सदृश्य स्थिती निर्माण करण्यासाठी शस्त्र गोळा केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
रेजाज याला कोर्टात हजर केले असता पोलिसांनी 14 दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती. पण आरोपीच्या वकिलांनी एखाद्या ऑपरेशनवर प्रश्न उपस्थित करणे हा गुन्हा नाही असा युक्तिवाद केला.
त्यानंतर भारतीय लष्कराविरोधात केलेली पोस्ट आणि दिल्लीमध्ये फ्रंटल ऑर्गनायझेशनी आयोजित केलेल्या परिषदेत वक्ता म्हणून गेल्यानं, त्यांना 13 मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावल्याची माहिती आरोपीचे वकील संदीप नंदेश्वर यांनी दिली.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)