You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
Loitering Munition म्हणजे काय? भारत - पाकिस्तानच्या ड्रोन्सची एवढी चर्चा का होत आहे?
- Author, अमृता दुर्वे
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
भारताने पाकिस्तानवर हल्ला करण्यासाठी इस्रायलच्या HAROP ड्रोन्सचा वापर केल्याचा आरोप पाकिस्तानने केलाय.
पाकिस्तानची ड्रोन्स आपण पाडल्याचं भारताने 8 मेच्या रात्री म्हटलं. यात एक महत्त्वाचा शब्द आहे, Loitering Munition. पण ते म्हणजे नेमके काय? शिवाय Kamikaze, HAROP, HARPY हे प्रकार काय आहेत?
याचीच माहिती आपण येथे घेणार आहोत.
त्यासाठी सगळ्यात आधी ड्रोन म्हणजे काय? ते पाहू. साध्या-सोप्या शब्दांत सांगायचं - तर उडणारा रोबो जो तुम्ही जमिनीवरून कंट्रोल करू शकता.
काही आधुनिक तंत्रज्ञान असणारी ड्रोन्स सॉफ्टवेअरच्या मदतीनेही उडवता येतात. यालाच Unmanned Armed Vehicle असं म्हटलं जातं कारण यात माणूस नसतो.
फोटोग्राफी, व्हीडिओग्राफी, शेतीवर औषधांची फवारणी, सामानाची डिलीव्हरी करण्यासाठी किंवा अगदी गंमत - खेळणं म्हणूनही ड्रोन्सचा वापर होतो.
सोबतच युद्धामध्ये माणसांचा जीव धोक्यात न घालता अचूक हल्ले करण्यासाठीही ड्रोन्सचा वापर होतोय.
इंम्पिरियल वॉर म्युझियमच्या वेबसाईटनुसार जगात पहिल्यांदा ही उड्डाण करणारी मनुष्यविरहित असलेली सशस्त्रं यंत्र कधी विकसित करण्यात आली होती, याचा विचार केला तर थेट पहिल्या महायुद्धादरम्यानच्या हालचाली समोर येतात.
ब्रिटन आणि अमेरिकेने 1917 - 18 साली अशी मानवरहित विमानं तयार केली. त्यांच्या टेस्ट फ्लाईट्स झाल्या, पण ती प्रत्यक्ष युद्धात कधीही वापरण्यात आली नाहीत.
भारत - पाकिस्तान संघर्षादरम्यान कोणत्या ड्रोन्सची चर्चा होतेय, ते पाहूयात.
यामध्ये एक शब्द वापरण्यात आला. Loitering Munition यातलं Loiter चा अर्थ होतोे रेंगाळणं आणि
Munition म्हणजे अस्त्रं, दारुगोळा.
थोडक्यात लॉयटरिंग म्युनिशन्स म्हणजे अशी ड्रोन्स जी त्यांच्या टार्गेटच्या जवळ हवेत तरंगत राहतात. या ड्रोन्सवर दारुगोळा असतो.
टार्गेट स्पष्ट टप्प्यात आलं की हे ड्रोन दारुगोळ्यासकट टार्गेटवर जाऊन धडकतं आणि स्फोट होतो. म्हणूनच या ड्रोन्सना सुसाईड ड्रोन्स असंही म्हटलं जातं. टेहळणी करण्यासाठीही यांचा वापर होतो.
एस्रायली एअरोस्पेस इंडस्ट्रिज ही इस्रायली कंपनी एअरोस्पेस आणि डिफेन्सशी संबंधित विविधं उपकरणं, यंत्रणा, विमानं आणि ड्रोन्स तयार करते. HAROP, HARPY, ROTEM ही सगळी या कंपनीने तयार केलेली ड्रोन्स आहेत.
ही ड्रोन्स जमिनीवरील अनमॅन्ड सर्फेस व्हेसरल्स, कमांड पोस्ट्स, सप्लाय डेपो, रणगाडे आणि एअर डिफेन्स सिस्टीम्स टार्गेट करू शकतात, असं ती तयार करणाऱ्या IAIच्या वेबसाईटवर म्हटलंय.
ट्रक्स किंवा युद्धनौकांवरून हे हॅरप ड्रोन लाँच केलं जातं. ते वेगवेगळ्या भूभागांमध्ये किंवा हवामानामध्ये वापरता येऊ शकतं.
ठराविक भागातल्या टार्गेटपर्यंत पोचून, ते नेमकं हेरून हॅरप हल्ल्याची दिशा ठरवतं. नंतर डाईव्ह करत हा हल्ला करतं.
मिशन कंट्रोल म्हणजे जमिनीवर असणारी यंत्रणा या सगळ्या प्रक्रियेवर नजर ठेवून असते. गरज पडल्यास हा हल्ला थांबवता किंवा रद्द केला जाऊ शकतो. हॅरप ड्रोन तब्बल 9 तास हवेत राहू शकतं.
याच इस्रायली एअरोस्पेस कंपनीने 1980च्या दशकात HARPY विकसित केलं होतं. यांचंच प्रचलित नाव - Kamikaze
Kamikaze या जपानी शब्दाचा अर्थ दैवी वारे. जपानवर हल्ला करायला येणारं मंगोल सैन्य या कामिकाझे वादळामुळे गायब झालं, अशी कथा सांगितली जाते.
दुसऱ्या महायुद्धात आपली लढाऊ विमानं शत्रूच्या बोटींवर आदळवणाऱ्या सुसाईड पायलट्सना कामिकाझे म्हटलं गेलं.
तर हार्पी या शब्दाला ग्रीक संदर्भ आहे. याचा अर्थ होतो बाईचं डोकं असणारा आणि पक्ष्यांसारखे पंख - पंजे असणारा राक्षस
HARPY चाच विकास करून पुढे HAROP ड्रोन्स तयार करण्यात आली. हार्पीमध्ये Radio Frequency (RF) seeker होता. तर हॅरपमध्ये electro-optical sensor आहे.
ही हार्पी ड्रोन्सही 9 तासांपर्यंतच मिशन पार पाडू शकतात, जमीन वा युद्धनौकांवरून लाँच केली जाऊ शकतात आणि कोणत्याही प्रकारच्या हवामानात वापरता येऊ शकतात. वेगवेगळे देश वेगवेगळी ड्रोन्स वापरतात.
- रशियाकडे लॅन्सेट-3 ड्रोन्स आहेत.
- अमेरिकेकडे स्विचब्लेड ड्रोन्स आहेत. त्यांनी हेलहाऊंड S3 या ड्रोनचीही नुकतीच चाचणी घेतली जे 3D प्रिंटेड आहे.
- युक्रेनकडे RAM II systems ड्रोन्स आहेत.
- इस्रायलकडे Harop ड्रोन्स आहेत.
- तुर्कीकडे Bayraktar TB2 ड्रोन्स आहेत.
- तर इराणकडे Shahed-136 ड्रोन्स आहेत.
- भारताच्या ताफ्यात हॅरपसोबतच स्कायस्ट्रायकर, नागास्त्र - 1, एएलएस-50 ही ड्रोन्सही आहेत.
भारतात तयार झालेली ड्रोन्स अर्थातच भारताला स्वस्त पडतात. तर रशिया आणि इराणच्या ड्रोन्सच्या तुलनेत इस्रायलची ड्रोन्स महाग आहेत.
मग या ड्रोन्समुळे युद्धाचं स्वरूप कसं बदललंय? पूर्वी युद्धात रणगाडे, लढाऊ विमानांचा वापर जास्त व्हायचा. आता ड्रोन्स वापरल्याने माणसांचा जीव धोक्यात घालावा लागत नाही. दूरूनही एखाद्या टार्गेटवर हल्ला करता येतो.
शिवाय रणगाड्याच्या आणि मिसाईल्सच्या तुलनेत ड्रोन्स स्वस्त असतात. कमी किंमतीचं ड्रोन महागडं धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वाचं टार्गेट उद्ध्वस्त करू शकतं.
पण भविष्यामध्ये ही ड्रोन्स एकेकटीच वापरली जातील, असंही नाही. ड्रोन स्वॅर्म म्हणजे ड्रोन्सचा थवा तयार करून तो AI च्या मदतीने कसा वापरता येईल याचं एक प्रात्यक्षिक भारतीय सैन्याने 2021 मध्ये दाखवलं होतं. यामध्ये तब्बल 75 ड्रोन्स होती.
AI चा वापर करून ड्रोन्सद्वारे अधिक स्पष्टपणे - अचूकपणे टार्गेट कसं टिपता येईल याबद्दलचं संशोधन सध्या केलं जातं आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)