औषधाच्या चिठ्ठीवरील डॉक्टरांचं अक्षर सामान्यांना समजत का नाही? 'हे' आहे कारण

पालकांकडून लेखन साहित्य कसं धरायचं हे आपण पहिल्यांदा शिकतो. त्याचा प्रभाव आपल्या लेखनावर म्हणजेच हस्ताक्षरावर पडतो.

फोटो स्रोत, Getty Images

हल्ली सोशल मीडियावर काही रिल्स आपल्याला पाहायला मिळतात, ज्यात एक मुलगा मेडिकलमध्ये गेल्यावर एका कागदावर पेन चालतो का नाही हे पाहण्यासाठी त्यावर उभ्या-आडव्या रेषा मारतो. त्यावेळी दुकानात असलेला दुसरा मुलगा तो कागद पाहून काही औषधं काढून ते कसं घ्यायचं हे समजावून सांगतो.

हे रिल्स विनोदाच्या उद्देशानं बनवले असले, तरी वास्तवात अनेकवेळा डॉक्टर जेव्हा रूग्णाला प्रिस्क्रिप्शन लिहून देतात, त्यावेळी त्या चिठ्ठीवरील अक्षर तुम्हा-आम्हा सामान्यांना समजत नाही, पण औषध दुकानदाराला ते लगेच कळतं.

गेल्या अनेक दशकांपासून यावर विनोदही केले जातात.

अनेक आरोग्य व्यावसायिकांनी लिहिलेली अक्षरं इतकी अस्पष्ट असतात की, कोणालाच समजत नाहीत.

ब्राझीलमध्ये तर अनेक राज्यांमध्ये यासाठी कायदे बनवले गेले आहेत. डॉक्टरांनी प्रिस्क्रिप्शन कॉम्प्युटरवर टाइप करून द्यावं किंवा किमान स्पष्ट, सुवाच्च आणि लिहिता, वाचता येईल अशा अक्षरात लिहिण्याचे निर्देशच दिले आहेत.

नवीन तंत्रज्ञानाचा वाढता प्रभाव

आपल्या हस्ताक्षराचा आकार काय सांगतो? आणि असं का होतं की काही लोकांची हस्ताक्षरशैली खूपच सुंदर असते, तर काही जणांना आपण लिहिलेलं दुसऱ्यांना वाचता येईल अशा पद्धतीनंही लिहिता येत नाही?

भारताच्या राष्ट्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण संस्थेच्या सामाजिक विज्ञान विभागातील प्राध्यापिका आणि मानववंशशास्त्रज्ञ मोनिका सैनी सांगतात की, हातानं लिहिण्यासाठी डोळे आणि आपल्या हालचालींवर नियंत्रण ठेवणाऱ्या क्षमतेमध्ये खूप समन्वय लागतो.

"मी म्हणेन की लेखन हे माणसानं विकसित केलेल्या सर्वात गुंतागुंतीच्या कौशल्यांपैकी एक आहे," असं 'बीबीसी वर्ल्ड सर्व्हिस'वरील क्राउडसायन्स रेडिओ कार्यक्रमात सहभागी झालेल्या सैनींनी सांगितलं.

प्रत्येक व्यक्तीची अक्षरं वेगळी आणि खास का असतात, यामागचे वेगवेगळे घटक समजून घेणं, हा सैनी यांच्या मुख्य अभ्यासाचा प्रमूख विषय आहे.

"लेखन हे साधनांवर आणि आपल्या हातांवर अवलंबून असतं. जेव्हा आपण हातांची गोष्ट करतो, तेव्हा आपण एका अत्यंत नाजूक गोष्टीबद्दल बोलतो.

पालकांकडून लेखन साहित्य कसं धरायचं हे आपण पहिल्यांदा शिकतो. त्याचा प्रभाव आपल्या लेखनावर म्हणजेच हस्ताक्षरावर पडतो.

फोटो स्रोत, Getty Images

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

हातात 27 हाडं असतात आणि ते 40 पेक्षा अधिक स्नायूंनी नियंत्रित केले जातात. यातील बहुतेक स्नायू हातात असतात आणि बोटांशी गुंतागुंतीच्या स्नायूंच्या जाळ्यांद्वारे जोडलेले असतात," असं सैनी स्पष्ट करतात.

याचा अर्थ असा की, आपल्या हस्ताक्षरावर काही अंशी आपली शरीररचना आणि आपल्या पालकांकडून मिळालेल्या आनुवंशिक वैशिष्ट्यांचा प्रभाव असतो.

दुसऱ्या शब्दांत सांगायचं झालं तर, तुमची उंची, तुम्ही कसं बसता, वही किंवा कागदाचा कोन, तुमच्या हाताचा मजबूतपणा, तुम्ही उजव्या हातानं लिहिता की डावखुरे आहात हे सगळं तुमच्या लिहिण्याच्या अक्षरांच्या आणि शब्दांच्या आकारावर प्रभाव टाकतं.

पण इथे एक सांस्कृतिक प्रभावही आहे, ज्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. शेवटी, आपण लहानपणी घरात वडिलधाऱ्यांच्या मदतीनं पेन्सिल आणि पेन कसं धरायचं हे शिकतो.

त्यानंतर शाळा सुरू होते आणि शिक्षक व वर्गमित्र यांच्याकडून नवीन प्रभाव त्याच्यावर पडतो.

जसजशी वर्षे सरतात, आपली लिहिण्याची शैली बदलत जाते. आपल्यापैकी अनेकांचे दैनंदिन जीवनातील लेखनही कमी होते.

नंतर सवयीचा अभाव, रोजच्या धावपळीत भर पडल्याने आपण अक्षरं, शब्दं, वाक्यं, परिच्छेद लिहिताना कमी काळजी घेऊ लागतो.

नवीन तंत्रज्ञानाच्या भूमिकेकडे आपण दुर्लक्ष करू शकत नाही. आता आपण हातानं लिहिण्याऐवजी जास्त टायपिंग करतो किंवा टाइप करणं जास्त सोपं जातं.

हातानं लिहिणं हे मानवानं विकसित केलेल्या सर्वात प्रगत कौशल्यांपैकी एक असल्याचं तज्ज्ञ नमूद करतात.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, हातानं लिहिणं हे मानवानं विकसित केलेल्या सर्वात प्रगत कौशल्यांपैकी एक असल्याचं तज्ज्ञ नमूद करतात.

आपल्या संशोधनांपैकी एकामध्ये, सैनी यांना एखाद्या व्यक्तीच्या हस्ताक्षरामागील सर्वात महत्त्वाचे घटक कोणते आहेत, हे व्यवस्थित समजून घ्यायचं होतं.

यासाठी त्यांनी हवामान बदलांवरील एक सोपा मजकूर तयार केला आणि स्वयंसेवकांच्या एका गटाला त्यांच्या सवयीप्रमाणे स्वतःच्या हस्ताक्षरात तो मजकूर लिहिण्यास सांगितलं.

हस्तलिखित मिळाल्यावर, मानववंशशास्त्रज्ञांनी अक्षरांचा आकार, प्रत्येक चिन्हाचा आकार, शब्दांमधील अंतर आणि व्यक्ती सरळ ओळीचं कितपत पालन करते हे घटक तपासून पाहिले.

"प्रतिमा ओळखणाऱ्या (इमेज रेकग्निशन) सॉफ्टवेअर्सच्या मदतीनं, मी पूर्वी दिलेल्या नमुन्यांशी या हस्तलिखितांची तुलना करणं शक्य झालं," असं त्या सांगतात.

"जेव्हा पालक आपल्या अपत्याला लेखन कौशल्य शिकवतात, तेव्हा दोघांच्या हस्ताक्षरात काहीतरी साधर्म्य आढळण्याची शक्यता जास्त असते."

"पण एखाद्या व्यक्तीच्या हस्ताक्षरावर शालेय शिक्षणाचा कालावधी किंवा एखाद्या विशिष्ट शिक्षकाच्या शैलीचा देखील प्रभाव पडतो," असं संशोधक म्हणतात.

लिहिताना मेंदूची भूमिका महत्त्वाची

फ्रान्समधील एक्स-मार्सेली युनिव्हर्सिटीच्या न्यूरोसायंटिस्ट मेरिके लाँगकॅम्प या आपण कसं लिहू शकतो याचा अभ्यास करतात.

त्यासाठी त्या रेसोनन्स मॅग्नेटिक रसायनशास्त्राची उपकरणं वापरतात. त्यामुळे लोक एखादी क्रिया करत असताना त्यांचा मेंदू रिअल टाइममध्ये नक्की कसं काम करतो ते पाहता येते.

अशाच एका अभ्यासामध्ये, स्वयंसेवकांना असा टॅब्लेट दिला गेला जो हाताने लिहिताना होणाऱ्या हालचाली नोंदवू शकतो.

लाँगकॅम्प यांच्या अहवालानुसार, लिहिताना मेंदूच्या विविध भागांची सक्रियता यात दिसली, जी एकत्रितपणे लेखनाच्या गुंतागुंतीच्या क्रियेला सक्षम बनवते.

टाइप करण्याऐवजी लिहायला शिकणाऱ्या मुलांच्या मेंदूचे भाग अधिक सक्रिय होतात असं दिसून येतं.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, टाइप करण्याऐवजी लिहायला शिकणाऱ्या मुलांच्या मेंदूचे भाग अधिक सक्रिय होतात असं दिसून येतं.

"कोर्टेक्स प्री-मोटर, कोर्टेक्स मोटर प्रायमरी आणि कोर्टेक्स पॅरिएटल अशा भागांचा हाताच्या हालचालींच्या नियोजन आणि नियंत्रणात सहभाग असतो," असं त्यांनी क्राऊडसायन्स कार्यक्रमात सांगितलं.

"मेंदूच्या तळभागातील रचना जसं की, फ्रंटल गायरस, जे भाषेच्या बाबतीत काम करतं आणि फ्युसिफॉर्म गायरस, जे लिहिलेल्या भाषेवर प्रक्रिया करतं, यांचाही यामध्ये प्रभाव असतो."

"येथे आणखी एक महत्त्वाची रचना म्हणजे सेरेबेलम, जी हालचालींचे समन्वय साधते आणि आपले हावभाव सुधारते," असं त्या पुढे म्हणतात.

न्यूरोसाइंटिस्ट सांगतात की, हस्ताक्षर मुख्यतः दोन इंद्रियांवर अवलंबून असतात, दृष्टी आणि प्रॉप्रियोसेप्शन (शरीरातील हालचालींची जाणीव).

"प्रॉप्रियोसेप्शन म्हणजे स्नायू, त्वचा आणि संपूर्ण शरीरातून येणारी माहिती घेतली जाते. आपण लिहित असताना ही माहिती मेंदूत एन्कोड केली जाते," असं त्या स्पष्ट करतात.

लिहिण्याचा आपल्या शिक्षणावर कसा प्रभाव पडतो?

या संदर्भात, तंत्रज्ञानाच्या विकासामुळे आपण माहिती समजून घेण्याच्या पद्धतीवर कसा परिणाम होतो, हे लक्षात घेणं मनोरंजक आहे.

खूप वर्षांपासून, हातानं लिहिणं म्हणजे नोंदी ठेवणं, अभ्यास करणं, लक्षात ठेवणं आणि नवीन गोष्टी शिकण्याचा एकमेव मार्ग होता.

पण हे वास्तव मागील काही वर्षांमध्ये संगणक, टॅब्लेट आणि स्मार्टफोनमुळे पूर्णपणे बदललं आहे.

आजकाल बरेच तरुण पेन्सिल, पेन आणि कागदाऐवजी कीबोर्ड आणि स्क्रीनवर लिहिणं शिकतात.

या बदलाचा शिक्षणावर काही परिणाम होतो का?

अमेरिकेतील इंडियाना विद्यापीठातील मानसशास्त्र आणि न्यूरोसायन्सच्या प्रोफेसर करिन हरमन जेम्स या प्रश्नाचं उत्तर शोधत आहेत.

आपले हात आणि आपण वस्तू कशा पकडतो आणि वापरतो हे मेंदूच्या विकासावर आणि आपल्या शिकण्याच्या पद्धतीवर कसा परिणाम करतात, याचा त्या अभ्यास करतात.

तज्ज्ञांच्या मते, फक्त एखादं अक्षर किंवा शब्द बघणं आणि तेच लिहिताना शरीराच्या हालचालींचा वापर करणं, या दोन्ही गोष्टींमध्ये मेंदूच्या कार्यप्रणालीत फरक असतो.

"आपले हात वस्तूंशी कसं वागतात, यामुळे मेंदूमधील हालचालींशी संबंधित भाग कसे सक्रिय होतात, हे मला समजून घ्यायचं होतं," असं त्या क्राऊडसायन्सला सांगतात.

एका प्रयोगात, जेम्स यांनी अशा चार वर्षांच्या मुलांना सहभागी करून घेतलं, ज्यांना अजून लिहिता येत नव्हतं.

अलीकडील संशोधनानुसार, कॉम्प्युटरवर टाइप करण्यापेक्षा हातानं लिहिल्यामुळं शिकणं सोपं होतं.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, अलीकडील संशोधनानुसार, कॉम्प्युटरवर टाइप करण्यापेक्षा हातानं लिहिल्यामुळं शिकणं सोपं होतं.

प्रयोगशाळेत या लहान मुलांना तीनपैकी एक गोष्ट शिकवली गेली. एखाद्या अक्षराचा आकार पूर्ण करणं म्हणजेच अक्षर कसं तयार करायचं, कीबोर्डवर अक्षर टाइप करणं किंवा अक्षर लिहिणं.

जेव्हा सर्व मुलांनी कृतीचा पहिला भाग पूर्ण केला, तेव्हा त्यांच्या मेंदूची एमआरआय (रेझोनन्स मॅग्नेटिक इमेजिंग) चाचणी केली गेली.

"आम्ही मुलांना वेगवेगळी अक्षरं दाखवली. ज्यावेळी त्यांचा मेंदू स्कॅन केला जात होता, त्या वेळी त्यांना फक्त लॅबमध्ये शिकवलेली अक्षरं पाहायची होती," असं जेम्स यांनी सांगितलं.

"आम्ही पाहिलं की, ज्या मुलांनी हस्तलेखनाद्वारे अक्षरं शिकली होती, त्यांच्यामध्ये मेंदूच्या त्या भागांमध्ये सक्रियता दिसली, जी या कौशल्यांशी संबंधित आहेत.

पण जी मुलं फक्त स्ट्रोक (रेघा) पूर्ण करत होती किंवा अक्षरं टाईप करत होती, त्यांच्यामध्ये ही सक्रियता दिसून आली नाही," असं त्यांची तुलना करताना त्यांनी सांगितलं.

पण कॅलिग्राफी आणि शिक्षण यांच्यातला संबंध एवढ्यावरच थांबत नाही.

आपल्या अक्षरांच्या आकारावर अनुवांशिकता आणि संस्कृती यासारख्या घटकांचा प्रभाव असतो.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, आपल्या अक्षरांच्या आकारावर अनुवांशिकता आणि संस्कृती यासारख्या घटकांचा प्रभाव असतो.

एका दुसऱ्या अभ्यासात, जेम्स यांनी विद्यापीठात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा अभ्यास केला.

ज्या विषयाबद्दल त्यांना काहीच माहिती नाही अशा विषयावरील वर्गात भाग घेणं हे त्यांचं कार्य होतं. त्यानंतर, प्राध्यापकांनी काय शिकवलं, त्याची नोंद त्यांनी कशाप्रकारे केली याबद्दल त्यांनी एक प्रश्नावली भरायची होती.

दुसऱ्या दिवशी, सर्व स्वयंसेवकांची परीक्षा झाली, जी आधी शिकवलेल्या विषयावर आधारित होती.

"आम्ही हाताने नोंदी घेतलेल्या, संगणकावर टाइप केलेल्या आणि टॅब्लेटवर लिहिलेल्या विद्यार्थ्यांच्या निकालांची एकमेकांशी तुलना केली," असं संशोधक म्हणाले.

न्यूरोसायंटिस्टनी स्पष्ट केलं की, अमेरिकेतील विद्यापीठांमध्ये प्राध्यापक विद्यार्थ्यांसोबत स्लाइड्स शेअर करणं ही सामान्य बाब आहे.

काही विद्यार्थ्यांनी टॅब्लेटवर ती फाइल उघडून डिजिटल पेनच्या मदतीने स्लाइड्सवरच हाताने नोंदी करण्याची सवय लावून घेतली.

"आमच्या अभ्यासात, ज्यांनी टॅब्लेटवर लिहिलं आणि स्क्रीनवर हातानं लिहिलं, त्यांनी चाचण्यांमध्ये चांगली कामगिरी केली," असं त्यांनी सांगितलं.

"विद्यार्थ्यांकडे मूळ स्लाइड्सचा मजकूर तर होताच, पण त्यावर ते स्वतःच्या हाताने थेट नोट्सही लिहू शकत होते, त्यामुळे कदाचित हे घडलं असेल."

"पण कागद आणि पेनाने लिहिणं देखील फायदेशीर ठरलं. ज्यांनी ही पद्धत वापरली त्यांनी संगणकावर टाइप करणाऱ्यांपेक्षा चांगली कामगिरी केली," असं तज्ज्ञ म्हणतात.

सोप्या शब्दांत सांगायचं तर, सध्याच्या संशोधनानुसार तुम्हाला एखादी गोष्ट खरंच शिकायची असेल, तर सर्वात उत्तम मार्ग म्हणजे ती हाताने लिहिणं, मग ते कागदावर असो की टॅब्लेटवर.

तुमचे हस्ताक्षर सुधारणं शक्य आहे का?

परंतु, ही सारी चर्चा आता आपल्याला या लेखाच्या सुरुवातीच्या प्रश्नाकडे आणते: अशा अस्पष्ट अक्षरांच्या लेखकांचे हस्ताक्षर सुधारून ते अधिक चांगले, समजू शकणारे होऊ शकतात का?

क्राउडसायन्स कार्यक्रमात, युनायटेड किंगडममधील लंडनच्या कॅलिग्राफी प्रशिक्षिका चेरेल एव्हरी यांनी काही उपयुक्त अशा टिप्स शेअर केल्या आहेत.

त्यांचा पहिला सल्ला म्हणजे 'हळूहळू लिहा'. अनेकदा आपण खूप घाईत लिहितो आणि त्यामुळे अक्षरं व शब्दांची योग्य रचना याकडे लक्ष द्यायला विसरतो.

सोप्या शब्दांत सांगायचं तर, सध्याच्या संशोधनानुसार तुम्हाला एखादी गोष्ट खरंच शिकायची असेल, तर सर्वात उत्तम मार्ग म्हणजे ती हाताने लिहिणं, मग ते कागदावर असो की टॅब्लेटवर.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, सोप्या शब्दांत सांगायचं तर, सध्याच्या संशोधनानुसार तुम्हाला एखादी गोष्ट खरंच शिकायची असेल, तर सर्वात उत्तम मार्ग म्हणजे ती हाताने लिहिणं, मग ते कागदावर असो की टॅब्लेटवर.

एव्हरी असंही सांगतात की, प्रत्येक व्यक्तीची लिहिण्याची शैली समजून घेणं आवश्यक आहे. ज्यामुळे योग्य लेखन साहित्य, पेन/पेन्सिल कसं धरावं, योग्य शारीरिक स्थिती आणि कागदाचा प्रकार यांसारख्या गोष्टी ठरवता येतात.

त्यांच्या म्हणण्यानुसार, नियमित सरावामुळे नक्कीच हस्ताक्षर सुधारू शकतं.

"एकच ट्रेनिंग सेशन महत्त्वाचे बदल घडवून आणण्यासाठी पुरेसं नाही," असं त्या म्हणतात.

पण थोड्या चिकाटीने, 'मस्क्युलर मेमरी' (स्नायू स्मृती) तयार करता येते, ज्यामुळे नवीन लेखनशैली विकसित होते.

"सुरुवातीला, हा एक जाणीवपूर्वक केलेला प्रयत्न असतो. पण हळूहळू, ती एक सवय बनते आणि आता तुम्ही या नवीन लेखन पद्धतीबद्दल विचारही करत नाही," असं त्या खात्रीपूर्वक सांगतात.

शेवटी, एव्हरी म्हणतात की, हस्ताक्षर आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. कारण त्यातून आपलं व्यक्तिमत्त्व दिसून येतं.

"जणू काही आपण आपल्या व्यक्तिमत्त्वाचा काही भाग त्या पानावर सोडून देतो."

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)