खाण्याचे विचार सारखे येतात? खाण्याचं वेडच आहे? मग तुम्हाला 'या' 5 गोष्टी माहिती असायलाच हव्यात

फोटो स्रोत, Getty Images
हल्ली खवय्ये असणं, खायचं वेड असणं किंवा वारंवार खायचे विचार येणं हे अनेकांच्या बाबतीत दिसतं. बऱ्याच वेळा ही गोष्ट फक्त खवय्येगिरीपुरतीच मर्यादित नसते, तर त्याहीपलीकडे काहीतरी असतं. त्याला म्हणतात 'फूड नॉईझ'.
'फूड नॉईझ' हा शब्द तुम्ही कदाचित ऐकला असेल. अर्थात ही काही नवीन गोष्ट नाही.
2023 मध्ये या शब्दाची खूप चर्चा होण्यास सुरुवात झाली.
त्याच वर्षी वजन कमी करण्यासाठी ब्रिटनमध्ये 'जीएलपी-1' हे इंजेक्शन आलं होतं.
या इंजेक्शनबद्दल दावा करण्यात आला होता की, लोकांच्या डोक्यात खाण्याबद्दल सतत सुरू असलेले विचार आणि त्यासंदर्भात माजलेला गोंधळ, दूर करण्यास, शांत करण्यास हे इंजेक्शन उपयोगी ठरू शकतं.
यानंतर 'फूड नॉईझ' शब्दाची जोरदार चर्चा सुरू झाली. तसंच त्यावर गांभीर्यानं देखील बोललं जाऊ लागलं.
डॉ. शेरलट ऑर्ड, मनोवैज्ञानिक आणि डिसऑर्डर इटिंग स्पेशालिस्ट आहेत. त्या म्हणतात, "ऐतिहासिकदृष्ट्या 'फूड नॉईस'चा अर्थ आपण 'जेवणाची चिंता', 'भोजनाचं किंवा खाण्याचं वेड', 'इच्छा' किंवा 'असामान्य भोजनाशी जोडलेला विचार' यांच्याशी जोडत आलो आहोत."
त्या पुढे सांगतात, "याचा अर्थ म्हणजे - खाण्याबद्दल सतत विचार करणं."
म्हणजेच सतत हा विचार करणं की, आता काय खायचं आहे, काय खायचं नाही किंवा डायटिंगबद्दल विचार करणं. यात असाही विचार असू शकतो की कोणत्या पदार्थांना टाळायचं आहे किंवा आहाराबद्दल कडक शिस्त बाळगली पाहिजे.
डॉ. ऑर्ड म्हणतात, "माझ्या दृष्टीकोनातून या आहार संस्कृती आणि डायटिंगच्या प्रक्रियेशी सखोल संबंध आहे. यामुळे आपलं लक्ष वारंवार स्वत:चं पोषण करण्याकडे जातं. मग भलेही आपल्याला जेवणाची कोणतीही कमतरता नसली तरी असा विचार येतो."
1. जेवणाबद्दल विचार करणं ही, सामान्य बाब आहे की फूड नॉईझ?
जेवणाबद्दल, खाद्यपदार्थांबद्दल विचार करणं ही अगदी सामान्य बाब आहे. आपल्यापैकी बहुतांश लोक विचार करत असतात की आज रात्री जेवणात काय बनवायचं आहे.

फोटो स्रोत, Getty Images
डॉ. ऑर्ड म्हणतात, "फूड नॉईस सातत्यानं येणारा आणि अडथळा आणणारा असतो. जेव्हा आपल्याला भूक लागलेली नसते, तेव्हा देखील हा विचार डोक्यात येतो. कधी-कधी पोट भरलेलं असतानाही तो येतो. सर्वसाधारणपणे तो भावनिकदृष्ट्या खूप खोलवर रुजलेला असतो."
त्या म्हणतात, "तो अपराधीपणाची भावना, ध्यास किंवा खाण्याशी संबंधित विचारांमुळे देखील असू शकतो. आपल्या जीवनशैलीवर याचा परिणाम होतो. मात्र अन्नाबद्दलच्या सामान्य विचारांचा इतका परिणाम होत नाही."
2. फूड नॉईझची लक्षणं काय असतात?
डॉ. ऑर्ड म्हणतात, "ज्या माणसाला फूड नॉईझचा त्रास होत असतो, तो नेहमीच विचलित असतो. कामावर त्याचं लक्ष केंद्रीत होत नाही. आपल्या जवळच्या लोकांमध्ये असतानादेखील त्याचं मन इतरत्रच असतं."
असे लोक जेवणाच्या निवडीबद्दल गरजेपेक्षा अधिक विचार करू शकतात.
ते वारंवार स्वत:ला विचारतात, "मी हे खायला हवं का? हे खाल्ल्यावर मला वाईट वाटेल का? हे आरोग्यासाठी चांगलं आहे का? मी आणखी थोडंसं खायला हवं का?"
आपल्या आहाराशी संबंधित निर्णयांबद्दल त्यांना नेहमीच अपराधी वाटतं, लाज वाटते आणि चिंता वाटते. हे सर्व खाण्याच्या वेगळ्या सवयी आणि शरीराचा आकार, वजन याच्याशी जोडलेल्या विचारांशी संबंधित असतं.

फोटो स्रोत, Getty Images
कधी-कधी हा विचार व्यायामाशी देखील जोडला जातो. फिटनेसवर अधिक भर दिल्यावर किंवा जेवणाबद्दल आणि प्रशिक्षणाबद्दलचे नियम कठोर बनवले जातात, तेव्हा देखील हा विचार येतो. अशा परिस्थितीत देखील फूड नॉईझची लक्षणं दिसू शकतात.
3. वजन कमी करण्याची औषधं फूड नॉईझवर नियंत्रण कसं ठेवतात?
जनरल प्रॅक्टिशनर आणि 'फूड नॉईझ' या पुस्तकाचे लेखक डॉ. जॅक मॉस्ले म्हणतात की, वजन कमी करणाऱ्या औषधांचा दोन प्रकारे परिणाम होतो.
ते म्हणतात, "आपण कधी आणि किती जेवतो, हे दोन गोष्टींवर अवलंबून असतं. पहिली गोष्ट म्हणजे जेव्हा आपण तीन-चार तास काहीही खाल्लेलं नसतं, तेव्हा शरीराला भूक लागते. दुसरी गोष्ट म्हणजे जेवणाचा फक्त विचार जरी केला तरी आपल्याला आनंद मिळतो."

फोटो स्रोत, Getty Images
डॉ. मॉस्ले म्हणतात, "वजन कमी करणाऱ्या औषधांचा या दोन्ही गोष्टींवर परिणाम होतो. या औषधांमुळे शरीर आणि मन या दोन्ही पातळ्यांवर भूक कमी होते. त्याचबरोबर फक्त आनंदासाठी खायच्या वृत्तीलाही ती आळा घालतात."
ते सांगतात, "ही औषधं डोपामिनची सक्रियता कमी करतात. यामुळे खाण्याबद्दलचा उत्साह आणि आशा यासारख्या भावनांवर नियंत्रण ठेवलं जातं."
डॉ. मॉस्ले यासाठी एक उदाहरण देतात, "विचार करा की तुम्ही पेट्रोल पंपावर आहात आणि तिथे तुमच्या आवडीची मिठाई किंवा स्नॅक्स पाहिलं. मग तुम्ही ते विकत घेण्याचा विचार करता किंवा फास्ट फूडच्या वासानं तुमच्या मनात खाण्याची इच्छा निर्माण होते."
"मात्र जेव्हा तुम्ही ही औषधं घेता, तेव्हा अशा प्रकारची इच्छा निर्माण होण्याचं प्रमाण कमी होतं. किंवा थोड्या प्रमाणात खाल्ल्यानंच समाधान मिळतं."
4. वजन कमी करण्याचं औषध बंद केल्यावर काय होतं?
डॉ. मॉस्ले, वजन कमी करणाऱ्या इंजेक्शनची तुलना नॉईझ-कॅन्सलिंग हेडफोनशी करतात.
ते सांगतात, "हे घेतल्यानंतर तुम्ही दिवसभर 'फूड नॉईझचा त्रास न होता काम करू शकता."
संशोधनातून आढळलं आहे की लोकांनी या नव्या औषधांचा वापर करणं थांबवलं की वर्षभराच्या आतच त्यांनी कमी केलेल्या वजनाच्या जवळपास दोन तृतियांश वजन पुन्हा वाढतं. साधारण 20 महिन्यांमध्ये त्यांचं वजन आधीसारखंच होऊ शकतं.
त्यामुळेच मॉस्ले सांगतात की, जर तुम्ही वजन कमी करण्याची औषधं घेत असाल तर त्याचवेळेस तुम्ही, दीर्घकाळ अंमलात आणता येतील असे बदल तुमच्या जीवनशैलीत करा. आहाराच्या अशा सवयी लावा, ज्या औषधं न घेतादेखील कायम राहतील.
'फूड नॉईस'ची तीव्रता कमी करण्यासाठी, ऑर्ड आणि मॉस्ले काही व्यावहारिक मार्गदेखील सुचवतात.
डॉ. मॉस्ले म्हणतात, "दर आठवड्याला एकदा खाण्यापिण्याच्या आवश्यक वस्तूंची खरेदी करा. संपूर्ण आठवड्याभराच्या जेवणाचं नियोजन आधीच करून ठेवा. यामुळे तुम्ही जेव्हा तणावात असाल, तेव्हादेखील खाण्याच्या तुमच्या जुन्या सवयी टाळता येतील."

फोटो स्रोत, Getty Images
डॉ. ऑर्ड सल्ला देतात की, "दर काही तासांनी नियमित स्वरुपाचा आणि संतुलित आहार घ्यावा. यामुळे हार्मोनची पातळी स्थिर राहते. जेवणात कार्बोहायड्रेट, प्रथिनं आणि चरबीचं प्रमाण संतुलित असलं पाहिजे. यामुळे भूक नियंत्रणात राहते. यासाठी कधीही जेवण सोडू नका."
त्या पुढे असंही सांगतात की मेडिटरेनियन शैलीतील (भूमध्य सागरी) जेवण केल्यास त्यामुळे फूड नॉईझ नियंत्रणात ठेवण्यास मदत होऊ शकते. कारण त्या प्रकारच्या जेवणात प्रथिनं, आरोग्यदायी चरबी, फायबर आणि कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट भरपूर प्रमाणात असतात.
डॉ. मॉस्ले म्हणतात, "इच्छाशक्तीला नेहमीच गरजेपेक्षा जास्त महत्त्वं दिलं जातं. म्हणजेच स्वत:वर नियंत्रण ठेवण्यास सांगितलं जातं. मात्र आपण जेव्हा अन्नपदार्थ पाहतो, तेव्हा ते खाण्याची इच्छा होणं स्वाभाविक आहे."
"त्यामुळेच ज्या पदार्थांची सवय जडू शकते असे पदार्थ तुम्ही स्वयंपाकघरातून हटवले पाहिजेत आणि त्यांच्या जागी आरोग्यदायी पदार्थ ठेवावेत."
अर्थात तुम्ही कधीतरी एखादं हाय-कॅलरी चीज, चॉकलेट बार खाल्ला, तर स्वत:ला दोष देऊ नका. ते खाल्लं म्हणजे फूड नॉईझवर नियंत्रण ठेवण्यात तुम्हाला अपयश आलं असं अजिबात नाही.

फोटो स्रोत, Getty Images
डॉ. ऑर्ड म्हणतात, "जेवणासंदर्भात खूप जास्त बंधनं असता कामा नये. 'हे अन्न चांगलं आहे', 'हे वाईट आहे', किंवा 'हे खाऊ नये' यासारख्या विचारांमुळे, फूड नॉईझ तितकाच वाढतो जितका तो असं अन्न खाल्ल्यामुळे वाढतो."
"ज्यावेळेस आपला मेंदू एखाद्या गोष्टीला व्यर्ज्य मानतो, तेव्हा तो त्याकडे धोका म्हणूनच पाहतो आणि त्या गोष्टीकडेच वारंवार लक्ष जातं."
त्या असंही सांगतात की जेवणाबद्दल आपण कोणत्या प्रकारची भाषा वापरतो, त्याकडे देखील लक्ष देणं आवश्यक आहे. उदाहरणार्थ, 'हे अन्न आरोग्यदायी नाही', 'मी स्नॅक्स खायला नको' यासारखे विचार लक्षात घेऊन त्यांना दूर सारण्याची आवश्यकता आहे.
अशा विचारांमुळे खाण्यावर अधिक बंधनं येतात आणि परिणामी फूड नॉईझ आणखी वाढतो.
डॉ. मॉस्ले म्हणतात, "तणावामुळे फूड नॉईझ वाढतो. खाण्याचं क्रेव्हिंग्स आणि अधिक खाण्याची प्रवृत्तीदेखील त्यामुळे वाढू शकते. त्यामुळे असे मार्ग शोधा ज्यामुळे तणाव कमी होईल."
"मात्र जेवण करणं किंवा खाद्यपदार्थ खाणं हा त्यासाठीचा मार्ग नसावा. ते व्यायामातून साध्य होऊ शकतं. ध्यान किंवा एखाद्या छंदानं देखील केलं जाऊ शकतं. यामुळे मोठा फरक पडू शकतो."
5. तुम्हीसुद्धा फूड नॉईझला घाबरता का?
डॉ. ऑर्ड म्हणतात, "फूड नॉईझचा अनुभव येणं म्हणजे तुमच्यामध्ये एखादी उणीव आहे असं नाही. तसंच तो कायमस्वरूपी देखील राहत नाही."
त्या म्हणतात, "फूड नॉईझमधून दिसतं की तुमचा मेंदू तेच करतो आहे, ज्यासाठी तो निर्माण झाला आहे - म्हणजेच तुम्हाला सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न करणं."
"जेव्हा मेंदूला वाटतं की अन्नाची कमतरता होऊ शकते, किंवा अन्नाद्वारे तणाव कमी करण्याचा प्रयत्न मेंदू करतो, तेव्हा आपला मेंदू आपलं लक्ष जेवणाकडे वळवण्याचा प्रयत्न करतो."
डॉ. ऑर्ड यांना वाटतं की फूड नॉईझवर मात करणं म्हणजे अन्नाबरोबरचं आपलं नातं नव्यानं समजून घेणं.
त्यासाठी तुम्ही तुमच्या भावनिक गरजा समजून घेतल्या पाहिजेत, तसंच असे मार्ग अंमलात आणले पाहिजेत जे फक्त खाण्यावरच अवलंबून नसतील तर इतर मार्गांनी देखील तुमचं मानसिक आणि शारीरिक पोषण करू शकतील.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)











