You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
10 लाख वर्षे जुन्या कवटीच्या शोधामुळे मानवी उत्क्रांतीबद्दलची आपली समज बदलू शकते, कशी? जाणून घ्या
- Author, पल्लब घोष
- Role, सायन्स प्रतिनिधी
चीनमध्ये सापडलेली 10 लाख वर्षे जुनी मानवी कवटी सांगते की, मानव जाती, म्हणजे होमो सेपियन्स, आपण आधी समजल्यापेक्षा किमान 5 लाख वर्षे आधी उदयास आले असावेत, असा दावा संशोधकांनी एका नव्या अभ्यासात केला आहे.
संशोधकांनुसार, ही कवटी सांगते की, नेअँडरथल्ससारख्या इतर जवळच्या मानव प्रजातींसोबत आपण जितकं पूर्वी समजत होतो, त्यापेक्षा खूप जास्त काळ एकत्र राहिलो आहोत.
या अभ्यासामुळे मानवी उत्क्रांतीबद्दलची आपली समज 'पूर्णपणे बदलते' आणि जर हे बरोबर ठरलं, तर हे आपल्या इतिहासाच्या सुरुवातीच्या महत्त्वाच्या भागाला नव्याने लिहिण्यासारखं ठरेल, असा दावा संशोधकांनी केला आहे.
परंतु, काही इतर तज्ज्ञांचं म्हणणं आहे की, मानव पृथ्वीवर कधी आले याबद्दल खूप वाद आहेत. अशात या नवीन अभ्यासाचे निष्कर्ष शक्यतापूर्ण आहेत, पण अद्याप निश्चित नाहीत.
हा शोध जगातील प्रमुख विज्ञान मासिक 'सायन्स'मध्ये प्रकाशित झाला. चीनमधील एका विद्यापीठातील तसेच यूकेच्या नॅचरल हिस्ट्री म्युझियममधील वैज्ञानिकांचा समावेश असलेल्या संशोधन टीमसाठी ही एक मोठी धक्का देणारी बातमी ठरली.
"सुरुवातीपासूनच, जेव्हा आम्हाला याचे परिणाम मिळाले, तेव्हा आम्हाला विश्वास बसला नाही. हे इतक्या वर्षांपूर्वी कसं घडू शकतं?" असं फुडान युनिव्हर्सिटीचे प्रा. झिजुन नी म्हणाले. ते या अभ्यासाचे सह-नेतृत्त्व करतात.
"परंतु, आम्ही हे परिणाम अनेक वेळा सातत्याने तपासले, सर्व मॉडेल्स आणि पद्धती वापरल्या आणि आता आम्हाला या परिणामांवर पूर्ण विश्वास आहे. खरं तर, आम्ही खूप उत्साहित झालो आहोत."
'प्रगत मानव उदयास येण्यापूर्वीची कवटी'
जेव्हा शास्त्रज्ञांना युन्क्सियन 2 नावाची ही कवटी सापडली, तेव्हा त्यांनी असं गृहीत धरलं की, ही आपल्या जुन्या पूर्वजांची प्रजाती, होमो इरेक्टस, या मोठ्या मेंदू असलेल्या पहिल्या मानवांची कवटी असावी. कारण ही कवटी सुमारे एक दशलक्ष वर्षे जुनी होती, म्हणजे अधिक प्रगत मानव उदयास येण्यापूर्वीची.
होमो इरेक्टस हळूहळू बदलून सुमारे 6 लाख वर्षांपूर्वी दोन वेगळ्या प्रजातींमध्ये विभागले गेले, नेअँडरथल्स आणि आपली प्रजाती, होमो सेपियन्स.
पण युन्क्सियन 2 च्या नवीन विश्लेषणानुसार, ज्याचं परीक्षण संशोधन टीमच्या बाहेरील तज्ज्ञांनी केलं आहे, त्यात असं दिसतं की ही कवटी होमो इरेक्टसची नाही.
आता असं मानलं जातं की, या कवट्या होमो लाँगीची आधीची आवृत्ती आहे, जी नेअँडरथल्स आणि होमो सेपियन्ससारख्या प्रगत स्तरावर होती.
आनुवांशिक पुरावे सांगतात की, ही प्रजाती इतरांसोबतच अस्तित्वात होती. त्यामुळे जर युन्क्सियन 10-20 लाख वर्षांपूर्वी पृथ्वीवर होती, तर संशोधकांच्या म्हणण्यानुसार, नेअँडरथल्स आणि आपली प्रजातीही कदाचित त्या काळातच अस्तित्वात होत्या.
नॅचरल हिस्ट्री म्युझियममधील प्रा. ख्रिस स्ट्रिंगर, हे या संशोधनाचं सह-नेतृत्व करतात. त्यांच्या म्हणण्यानुसार, हा धक्कादायक अभ्यास मोठा मेंदू असलेल्या मानवांच्या उत्क्रांतीचा कालक्रम किमान 5 लाख वर्षे मागे नेतो.
त्यांनी सांगितलं की, पृथ्वीवर कुठंतरी होमो सेपियन्सचे दशलक्ष वर्षे जुने अवशेष असतील, पण आम्हाला ते अद्याप सापडलेले नाहीत.
'जास्तीच्या पुराव्यांची गरज'
सुरुवातीच्या मानवी प्रजाती ओळखण्यासाठी आणि ते पृथ्वीवरून फिरताना काम करण्याचे दोन मार्ग आहेत. कवटीच्या आकाराचा अभ्यास करणं आणि त्याची आनुवंशिक माहिती तपासणं. युन्क्सियन 2 च्या बाबतीत दोन्ही पद्धती वापरल्या गेल्या आणि दोन्ही पद्धतीत एकसारखाच निकाल आला.
पण केम्ब्रिज युनिव्हर्सिटीतील उत्क्रांतीवादी जनुकशास्त्रज्ञ डॉ. ऍल्विन स्कॅली आणि इतर काही संशोधक म्हणतात की, या दोन्ही पद्धतींमध्ये बऱ्याच अनिश्चितता आहेत.
"कालावधीचे अंदाज लावताना खूप सावधगिरी बाळगावी लागते, कारण ते करणं खूप कठीण आहे, मग तुम्ही आनुवंशिक पुरावे पाहत असाल किंवा जीवाश्म पुरावे," असं डॉ. स्कॅली म्हणाले.
"सर्वात जास्त आनुवंशिक माहिती वापरूनही, या प्रजाती एकत्र कधी राहिल्या याचा अंदाज 1 लाख वर्षांपेक्षा जास्त अचूकपणे लावणं फार कठीण आहे."
त्यांनी असंही सांगितलं की, प्रा. नी आणि स्ट्रिंगर यांच्या निष्कर्षांचे अंदाज शक्यतो योग्य वाटतात, पण हे आणखी निश्चित नाही आणि खात्री करण्यासाठी अधिक पुराव्यांची गरज आहे.
"हे संपूर्ण चित्र अजून आमच्यासाठी स्पष्ट नाही. त्यामुळे जर या संशोधनाचे निष्कर्ष इतर अभ्यासांनी, विशेषतः काही आनुवंशिक डेटानं समर्थन दिलं तर मला वाटतं की, आपल्याला या निष्कर्षांबद्दल अधिक आत्मविश्वास वाटू लागेल," असं त्यांनी बीबीसी न्यूजला सांगितलं.
आफ्रिकेत होमो सेपियन्सच्या सुरुवातीच्या पुराव्यांचा अंदाज सुमारे 3 लाख वर्षांपूर्वीचा आहे. त्यामुळे असं म्हणण्याचा मोह होतो की, आपली प्रजाती कदाचित सर्वात प्रथम आशियात विकसित झाली असावी.
पण प्रा. स्ट्रिंगर यांच्या मते, सध्या खात्री करण्यासाठी पुरेसे पुरावे नाहीत. कारण आफ्रिका आणि युरोपमध्येही 10 लाख वर्षांपूर्वीचे मानवी जीवाश्म आहेत. त्यांचा या अभ्यासात समावेश करणं आवश्यक आहे.
"काही आनुवंशिक पुरावे आहेत सूचित करतात की, आपली प्रजाती कदाचित थोडं आधी उदयास आली असावी आणि आपल्या वंशासोबत मिसळली असावी, पण हे अजून सिद्ध झालेलं नाही," असं त्यांनी बीबीसी न्यूजला सांगितलं.
'तीन मानवी प्रजाती 8 लाख वर्षे एकत्र राहिल्या...'
हा आधीचा कालक्रम सांगतो की, तीन मानवी प्रजाती पृथ्वीवर सुमारे 8 लाख वर्षे एकत्र राहिल्या. हा काळ पूर्वीच्या आपल्या माहितीपेक्षा खूप जास्त आहे आणि त्या काळात त्या कदाचित एकमेकांशी संपर्क साधत किंवा त्यांचं प्रजनन होत असावं.
"ही पूर्वीच्या उदयाची वेळ त्या अनेक मानवांचे जीवाश्म समजून घेण्यास मदत करते, जे 8 लाख ते 1 लाख वर्षांपूर्वीचे आहेत आणि जे शास्त्रज्ञांना मानवी वंशावळीत कुठं बसवायचं ते ठरवायला कठीण जात होतं, ज्याला 'गोंधळाची स्थिती' असंही म्हणतात."
"पण होमो सेपियन्स, होमो लाँगी आणि नेअँडरथल्सचा सुरूवातीचा उदय हा प्रश्न सोडवतो. प्रा. नी यांच्या मते, आता कठीण वर्गीकृत होणारी जीवाश्म कवटी 'मोठ्या तीन' प्रजातींपैकी कोणत्यातरी उपगटात किंवा त्यांच्या जुन्या पूर्वजांमध्ये, जसं की आशियाई होमो इरेक्टस आणि हायडेलबर्गेन्सिसमध्ये समावेश करता येऊ शकतात."
"मानवी उत्क्रांती ही एक झाडासारखी आहे," असं त्यांनी सांगितलं. "या झाडाच्या अनेक शाखा होत्या, त्यापैकी तीन मुख्य शाखा जवळच्या नात्यात होत्या, आणि त्या एकमेकांशी कदाचित मिसळल्या देखील. त्या जवळजवळ 10 लाख वर्षे एकत्र राहिल्या. त्यामुळे हा परिणाम खूप आश्चर्यकारक आहे."
ही कवटी हुबेई प्रांतातून दोन इतर कवट्यांसोबत शोधली गेली. पण ती खराब आणि दबलेली होती, ज्यामुळे युन्क्सियन 2 ला चुकीने होमो इरेक्टस म्हणून वर्गीकृत केलं गेलं होतं.
मूळ आकार परत आणण्यासाठी, प्रा. नी यांच्या टीमने कवटी स्कॅन केली, कॉम्प्युटरच्या मदतीने त्यांना दुरुस्त केलं आणि नंतर 3D प्रिंटरवर त्या कवटींची प्रतिकृती तयार केली.
त्या कवट्यांना पाहताच शास्त्रज्ञांना त्यांचं एक वेगळं, अधिक प्रगत गट म्हणून मानवी समूहात वर्गीकरण करता आलं.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)