You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कर्जाचे हप्ते थकल्यावर बँकांचे वसुली एजंट्स मागे लागत असतील, तर ग्राहक म्हणून तुमचे अधिकार काय? जाणून घ्या
घरासाठी कर्ज घेणं, पर्सनल लोन घेणं किंवा क्रेडिट कार्डचा वापर या गोष्टी सर्रास सगळेच करतात. घर, गाडी, लग्न, शिक्षण किंवा इतर कोणत्या गरजांसाठी बँका किंवा वित्तीय संस्थांकडून वेगवेगळ्या प्रकारची कर्ज ठराविक व्याजाने दिली जातात. पण अनेकदा अनेक कारणांमुळे या कर्जाचे हप्ते फेडणं - EMI भरणं शक्य होत नाही.
काही कारणांमुळे पैशांची अडचण निर्माण होते, नोकरी अचानक गेली - व्यवसायात फटका बसला तर त्याचा परिणाम कर्जाचे हप्ते थकण्यात होतो.
काही वेळा बँका रिकव्हरी एजंट्स पाठतात. अशावेळी तुमच्याकडे कोणते अधिकार आहेत? कर्जवसुलीबद्दलचे रिझर्व्ह बँकेचे नियम काय आहेत?
कर्ज वसुली एजंट्स कोण असतात, त्यांचं काम काय असतं?
बँका आणि NBFCs म्हणजे नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनी कर्जवसुलीसाठी लोन रिकव्हरी एजंट्ची नियुक्ती करतात. कर्जाची परतफेड न करणाऱ्या ग्राहकांकडून म्हणजेच डिफॉल्टर्सकडून रक्कम वसूल करणं हे त्यांचं काम असतं.
पण या लोन रिकव्हरी एजंट्सनी ग्राहकांना धमकावणं, शिवीगाळ करणं किंवा अपमानास्पद वागवण्याचे आरोप अनेकदा झाले आहेत. अनेक ग्राहकांनी आपला छळ झाल्याच्या तक्रारी केल्या आहेत.
कर्ज वसुलीसाठी हे एजंट्स अनेकदा या कर्ज घेणाऱ्या व्यक्तीच्या नातलगांना, मित्रांनी किंवा ऑफिसच्या सहकाऱ्यांना फोन करतात. यामुळे कर्ज घेतलेल्या त्या व्यक्तीसाठी लाजिरवाणी परिस्थिती निर्माण होते.
कर्ज वसुली एजंट्ससाठीचे नियम काय?
ग्राहकांसोबत असं गैरवर्तन होऊ नये यासाठी रिझर्व्ह बँकेने याबद्दलच्या स्पष्ट सूचना प्रसिद्ध केलेल्या आहेत.
बँका आणि NBFC नी नियुक्त केलेल्या रिकव्हरी एजंट्सकडून ग्राहकांसोबत शारीरिक आणि मौखिक गैरव्यवहार केला जाणार नाही याची खबरदारी घेतली जावी, असं रिझर्व्ह बँकेने म्हटलंय.
रिकव्हरी एजंट्सनी प्रोफेशनली आणि नैतिक पद्धतींचा वापर करून काम करावं असं RBI चे नियम सांगतात. ग्राहकांना धमकावणं, त्यांचा अपमान करणं वा त्यांच्या प्रायव्हसीचं उल्लंघन करण्याची परवानगी एजंट्सना नाही.
ग्राहकांशी संपर्क साधताना या एजंट्सनी त्यांना आपली ओळख सांगणं बंधनकारक आहे. त्यांच्याकडे बँकेचं Authorisation Letter आणि ओळखपत्र असायला हवं. याशिवाय हे रिकव्हरी एजंट्स सकाळी 8 ते संध्याकाळी 7 या वेळेदरम्यानच ग्राहकांशी संपर्क साधू शकतात.
जर रिकव्हरी एजंट्सनी या नियमांचं पालन केलं नाही, तर ते रिझर्व्ह बँकेच्या गाईडलाईन्सचं उल्लंघन ठरेल.
मग हे रिकव्हरी एजंट्स तुमच्या घरी किंवा ऑफिसला येऊ शकतात का, तर हो. त्यांना तुमच्या घरी वा ऑफिसला यायची परवानगी आहे. पण काही अटींवर. RBI च्या नियमांनुसार यासाठी एजंट्सना आधी ग्राहकांशी, कर्ज घेतलेल्या त्या व्यक्तीशी बोलून भेटीची वेळ ठरवावी लागेल आणि तेव्हाच ते येऊ शकतात.
तुमच्या परवानगीशिवाय लोन रिकव्हरी एजंट्स तुमच्या घरी वा ऑफिसला येऊ शकत नाहीत. कर्ज घेतलेल्या व्यक्तीशी सन्मानाने बोलणं त्यांच्यासाठी बंधनकारक आहे. जर त्यांनी धमकी दिली, शिवीगाळ केली किंवा इतर कोणत्या प्रकारे गैरवर्तन केलं, तर ते बेकायदेशीर आहे.
कर्ज फेडू न शकलेल्या व्यक्तीलाही अधिकार असतात?
या सगळ्या परिस्थितीत कर्ज घेतलेल्या पण काही कारणांनी फेडू न शकलेल्या व्यक्तीला काही अधिकार असतात का? तर हो. याबद्दलही RBI ने काही गोष्टी स्पष्ट केल्यायत.
सगळ्यात आधी - प्रायव्हसी. रिकव्हरी एजंट्स तुमच्या कर्जाबद्दलची माहिती जगजाहीर करू शकत नाहीत. तुमचं किती रकमेचं देणं आहे याबद्दल ते तुमच्या नातेवाईकांना, मित्रांना, शेजाऱ्यांना वा सहकाऱ्यांना सांगू शकत नाहीत. त्यांनी असं करणं हे तुमच्या प्रायव्हसीचं उल्लंघन असेल.
सन्मानाने वागवलं जाणं हा कर्ज घेणाऱ्या व्यक्तीचा अधिकार आहे. एजंटसनी या ग्राहकाशी आदरपूर्वक वागणं अपेक्षित आहे. धमक्या, अपशब्द वापरणं वा हिंसा करता येणार नाही. जर कुणी एजंटनी असं केलं, तर तुम्ही त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करू शकता.
पारदर्शक व्यवहाराचा अधिकार. तुम्हाला तुमच्या कर्जाची पूर्ण माहिती म्हणजे किती परतफेड बाकी आहे, व्याजदर आणि अतिरिक्त शुल्क याबद्दल जाणून घेण्याचा अधिकार आहे. बँकेला ही तपशीलवार माहिती तुम्हाला द्यावीच लागेल.
तक्रार दाखल करण्याचा अधिकार - रिकव्हरी एजंट्सकडून RBI च्या नियमांचं पालन होत नसल्याचं तुम्हाला वाटत असेल, तर तुम्ही बँकेत तक्रार दाखल करू शकता. समजा बँकेने कोणतीही कारवाई केली नाही तर तुम्ही रिझर्व्ह बँकेच्या बँकिंग लोकपालाशी संपर्क करू शकता.
एखाद्या एजंटनी तुमच्यासोबत गैरव्यवहार केला तर काय करायचं...तर अशावेळी घाबरून जाण्याची गरज नाही. स्वतःसाठी तुम्ही काही पावलं उचलू शकता. सगळ्यात आधी - सगळ्या संभाषणाचा रेकॉर्ड ठेवा. जर तुम्हाला एजंट फोनवरून धमकी देत असेल, तर कॉल रेकॉर्ड करा. जर ते तुमच्या घरी आले तर त्यांचं ओळखपत्र आणि ऑथोरायझेशन लेटर तपासा.
तर तुम्हाला एजंट्स त्रास देत असल्यासारखं वाटत असेल तर लगेच बँकेच्या नोडल ऑफिसर्ससोबत संपर्क साधा आणि तुमची तक्रार लेखी स्वरूपात दाखल करू शकता.
बँक आणि त्यांच्या रिकव्हरी एजंट्सनी नियमांचं उल्लंघन केलं तर रिझर्व्ह बँक त्यांच्यावर कठोर कारवाई करू शकते. RBI कडे ते अधिकार आहेत. या बँका आणि त्यांच्या एजंट्सना दंड लागू शकतो किंवा एखाद्या भागात वसुली करण्यावर त्यांच्यावर बंदी येऊ शकते.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)