You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
दक्षिणात्य सुपरस्टार मोहनलाल यांच्या 'एमपुराण' सिनेमाला का होतोय विरोध?
- Author, निकीता यादव
- Role, बीबीसी न्यूज, दिल्ली
दक्षिणात्य चित्रपटांमधील सुपरस्टार मोहनलाल यांचा नवा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला असून त्यावर हिंदूत्वद्यांनी आक्षेप नोंदवला आहे.
चित्रपटावरुन सुरु असलेल्या गदारोळावर सुपरस्टार मोहनलाल यांनी खंत व्यक्त केली असून चित्रपटातून काही दृश्य काढून टाकण्यात येतील, असंही सांगितलं आहे.
मल्याळम चित्रपट 'एल 2 एमपुराण' गेल्या गुरुवारी प्रदर्शित झाला असून सध्या बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करत आहे. पण, या चित्रपटाला हिंदू संघटनांनी विरोध दर्शवला असून यामध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांचाही समावेश आहे.
या चित्रपटात 2002 साली गुजरातमध्ये झालेल्या मुस्लीम विरोधी हिंसाचाराचा संदर्भ देण्यात आला आहे. यासह आणखीही काही दृश्यांवर हिंदू संघटनांनी आक्षेप घेतला आहे.
मोहनलाल काय म्हणाले?
अभिनेता मोहनलाल यांनी फेसबुकवर पोस्ट शेअर केली असून त्यात त्यांनी म्हटलं आहे की, "माझा कोणताही चित्रपट कोणत्याही राजकीय चळवळी, विचारधारा किंवा धार्मिक गटाबाबत शत्रूभाव बाळगणारा नसावा, याची खात्री करणं ही एक कलाकार म्हणून माझी जबाबदारी आहे."
"मला प्रिय असलेल्या लोकांना झालेल्या दुःखाबद्दल मी आणि माझी 'एमपुराण'ची टीम मनापासून खंत व्यक्त करते. काही दृश्य चित्रपटातून काढून टाकण्याचा निर्णय आम्ही एकत्रितपणे घेतला आहे."
मोहनलाल केरळमधला प्रसिद्ध कलावंत आहेत. या वादामुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली असून केरळ राज्यातील भाजपनं चित्रपट निर्मात्यांवर दबाव आणल्याचा आरोप विरोधी पक्ष काँग्रेस आणि सत्ताधारी डाव्या पक्षांनी केला आहे.
यानंतर भाजपकडूनही प्रतिक्रिया देण्यात आली आहे. त्यांनी म्हटलंय की पक्षानं चित्रपटाविरोधात कोणतीही जाहीर मोहीम सुरू केलेली नाही. तसेच लोकांना त्यांचं मत सोशल मीडियावर व्यक्त करण्याचा अधिकार आहे.
एमपुराण चित्रपटाची कथा काय आहे?
'एल 2 : एमपुराण' हा 2019 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'लुसिफर' या राजकीय थ्रिलरचा सिक्वेल आहे. त्या चित्रपटामध्ये मोहनलाल यांनी स्टीफन नेदुमपल्लीची भूमिका साकारली होती.
लुसिफरचे दिग्दर्शन मल्याळम स्टार पृथ्वीराज यांनी केले होते. हा चित्रपट खूप यशस्वी ठरला आणि चित्रपट समीक्षकांनी देखील कौतुक केलं होतं. त्यामुळे 'एल 2 एमपुराण' या चित्रपटाकडून आणखी खूप अपेक्षा होत्या.
भ्रष्ट आणि दुष्ट लोकांच्या हाती गेलेल्या केरळच्या राजकारणाचा तारणहार म्हणून मोहनलाल यांचं पात्र या चित्रपटामध्ये पुनरागमन करताना दिसतं. प्रदर्शनापूर्वी हा चित्रपट बजेट आणि चित्रपटातील कलाकारांनी केलेल्या प्रमोशनमुळे चर्चेत होता.
एका अंदाजानुसार, या चित्रपटानं पहिल्याच आठवड्यात 150 कोटी कमावले. मात्र, चित्रपट समीक्षकांकडून या चित्रपटाबद्दल संमिश्र प्रतिक्रिया आल्या.
चित्रपटाच्या कथानकामध्ये त्रुटी असल्याचं 'हिंदूस्थान टाइम्स'ने म्हटलंय, तर 'इंडियन एक्सप्रेस'नं मोहनलाल यांच्या कामाचं कौतुक केलंय. पण, ज्यामुळे 'लुसिफर' हा चित्रपट हिट ठरला ती भावनिकता आणि नाट्यमयता 'एमपुराण' या चित्रपटात दिसत नसल्याचं 'इंडियन एक्सप्रेस'चं म्हणणं आहे.
'एमपुराण' चित्रपटातल्या कोणत्या दृश्यांवरून वाद?
'एल 2 : एमपुराण' या चित्रपटाची सुरुवात भारतातील एके ठिकाणी झालेल्या दंगलीत अनाथ झालेल्या झैद मसूदच्या गोष्टीपासून होते.
दिग्दर्शक पृथ्वीराज यांनी ही व्यक्तिरेखा साकारलेली आहे. यामधील काही दृश्यं ही 2002 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्री असताना गुजरातमध्ये झालेल्या हिंसाचारासोबत मिळती-जुळती आहेत.
यामध्ये हिंदूंनी हिंसाचारात मुस्लिमांविरुद्ध हिंसक गुन्हे केल्याचं ग्राफिक दृश्यांमधून दिसतंय. याच हिंसाचारात सहभागी असलेली एक व्यक्ती नंतर अधिक शक्तीशाली झाली, असंही या चित्रपटात दाखवण्यात आलं आहे.
त्यामुळे या दृश्यांवर हिंदूत्ववाद्यांकडून आक्षेप घेण्यात आला आहे.
भाजपचे केरळचे प्रदेशाध्यक्ष राजीव चंद्रशेखर म्हणाले की. "चित्रपट प्रदर्शित होण्याआधी आम्ही शुभेच्छा दिल्या होत्या. पण, आता माहित झालं की या चित्रपटात असे विषय आहेत ज्यामुळे मोहनलाल यांच्या चाहत्यांना आणि इतर प्रेक्षकांना अस्वस्थ केलं आहे. मी हा चित्रपट बघणार नाही."
ते पुढे म्हणतात, "एका चित्रपटाला चित्रपटासारखंच बघितलं पाहिजे. एक इतिहास म्हणून त्याकडे बघू नये. तसेच सत्याचा विपर्यास करून चित्रपट तयार करण्याचा प्रयत्न होणार असेल तर तो चित्रपट नक्की फ्लॉप ठरणार."
केरळ भाजपचे काही नेते चंद्रशेखर यांच्या मताशी सहमत आहेत. पण, काही नेत्यांनी फिल्म निर्मात्यांवर टीका केली आहे. देशविरोधी थीम चित्रपटात समाविष्ट केल्याचा आरोप त्यांनी निर्मात्यांवर केला आहे.
"विचलित करणारी आणि फूट पाडणारी कथा" असं वर्णन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुखपत्र असलेल्या 'ऑर्गनायझर विकली' या नियतकालिकात करण्यात आलं आहे. हा चित्रपट वाईट असल्याचं म्हटलंय.
तसेच, सोशल मीडियावर काही युजर्सनी या चित्रपटावर बहिष्कार टाकण्याचं आवाहन केलंय. परंतु, आतापर्यंत या चित्रपटाविरोधात कुठलंही मोठं ऑनलाइन कॅम्पेन किंवा आंदोलन झालेलं नाही.
चित्रपटात कोणकोणते बदल होऊ शकतात?
एमपुराण चित्रपटाच्या कुठल्याही दृश्यांमुळे कुणी दुखावलं असेल तर त्यात बदल केला जाईल, असं चित्रपटाच्या निर्मात्यांपैकी एक असलेल्या गोकुलम गोपालन यांनी गेल्या आठवड्यात सांगितलं होतं.
याआधी मोहनलाल यांनी सुद्धा फेसबुक पोस्ट करून चित्रपटातील काही दृश्य काढून टाकू असं म्हटलं होतं. दिग्ददर्शक पृथ्वीराज यांनी फेसबुकवर ही पोस्ट शेअर केली पण त्यावर कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
काही रिपोर्टनुसार, चित्रपट कमीत कमी 17 ठिकाणी कापला जाऊ शकतो. तसेच काही लोकांचं असंही म्हणणं आहे की चित्रपटातील तीन मिनिटांची लांब दृश्यं काढली जातील आणि काही डायलॉग सुद्धा म्यूट केले जातील.
या चित्रपटाला सेन्सॉर बोर्डानं मंजुरी दिली होती. पण चित्रपटातील काही दृश्य काढल्यानंतर चित्रपट पुन्हा सेन्सॉर बोर्डाकडे पाठवण्याचा पर्याय निर्मात्यांकडे आहे. पण, या चित्रपटाला केरळमधील सत्ताधारी पक्ष असलेल्या कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया आणि विरोधी पक्ष काँग्रेसकडून समर्थन मिळताना दिसतंय.
या दोन्ही पक्षांना केरळमध्ये जनाधार आहे. सोबतच भाजप इथं स्वतःचा जनाधार वाढवण्याचा प्रयत्न करत आहे.
मुख्यमंत्री पिनरायी विजयन म्हणाले की "एमपुराण चित्रपट आणि त्याच्या निर्मात्यांविरुद्ध जातीय द्वेषाची मोहीम त्रासदायक आहे. भीती आणि धमक्यांच्या माध्यमातून अभिव्यक्ती स्वातंत्र्याला कमकुवत करणं, हा लोकशाहीवरील हल्ला आहे."
काँग्रेसचे नेते व्ही. डी. सतीसन् म्हणाले की "सिनेमा हे कलाकारांचे काम आहे. सोशल मीडियावर धमक्या देऊन, त्यांना अपमानित करून एखाद्या कृतीतील कंटेट बदलणं, हे म्हणजे काही जिंकणं नव्हे."
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)