'वासुकी' सापाचे 4.7 कोटी वर्ष जुने अवशेष मिळाल्याचा दावा, काय आहे प्रकरण?

फोटो स्रोत, X/@IndianTechGuide
- Author, टीम कलेक्टिव्ह न्यूजरुम
- Role, नवी दिल्ली
कच्छमध्ये पांढरोच्या जवळ लिग्नाइट खाणीतून जीवाश्म संशोधकांना काही अवशेष मिळाले आहेत. ते जीवाश्म किंवा अवशेष जगातील आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या सापाचे असल्याचं त्यावरून समोर येत आहे.
या अवशेषांवरून सापाची लांबी जवळपास 10 ते 15 मीटर असण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. हे अवशेष जवळपास 4.7 कोटी वर्ष जुने म्हणजेच प्रागैतिहासिक किंवा इतिहासपूर्व काळातील असल्याचा दावा करण्यात आला आहे.
आयआयटी रुडकीचे प्राध्यापक आणि संशोधक सुनील वाजपेयी आणि देबजित दत्ता यांनी हा शोध लावल्याचं हिंदुस्तान टाइम्सच्या बातमीमध्ये म्हटलं आहे. तसंच नेचर साइंटिफिक रिपोर्ट्स या पत्रिकेत शोधनिबंध प्रकाशित झाला आहे.
सापाच्या या शोधलेल्या प्रजातीचं नाव त्यांनी 'वासुकी इंडिकस' असं ठेवलं आहे. पौराणिक कथांचा विचार करता हे नाव भगवान शंकराशी संबंधित नागाच्या नावावरून ठेण्यात आलं आहे. नष्ट झालेल्या मॅड्ससोइडे समुहातील ही प्रजाती असल्याचं सांगण्यात आलं आहे.

फोटो स्रोत, X/@IndianTechGuide
संशोधनात आणखी काय आढळले?
रॉयल सोसाइटी ऑफ ओपन सायन्समध्ये 2018 मध्ये एक रिपोर्ट प्रकाशित करण्यात आला होता. त्यानुसार मॅड्ससोइडे हा पृथ्वीवर आढळणारा एक गोंडवाना भूतबकावरील साप आहे. सापाची ही प्रजाती क्रेटेशियस काळ (अंदाजे 6.6 से 10.5 कोटी वर्षांपूर्वी) आणि लेट प्लेस्टॉसीन काळ (अंदाजे0.12 कोटी वर्षांपूर्वी ) या दरम्यान अस्तित्व होती. सापांची उत्पत्ती आणि उत्क्रांती समजून घेण्यासाठी हा समूह महत्त्वाचा समजला जातो.
सापाचे मिळालेले हे अवशेष मॅड्ससोइडे समुहातील असून आकाराने सर्वात मोठे आहेत. ते सुमारे 4.7 कोटी वर्षांपूर्वी भारतात आढळत होते.
"मध्ययुगाच्या दरम्यान उष्णकटिबंधाच्या क्षेत्रात असलेल्या अत्यंत उच्च तापमानामुळं त्यांचा आकार एवढा मोठा असलण्याची शक्यता आहे," असं संशोधकांनी शोधनिबंधात म्हटलं आहे.
सापडलेल्या 27 वेगवेगळ्या अवशेषांवरून हा अत्यंत विशालकाय साप होता हे लक्षात आलं आहे. त्यांच्या कण्याची रुंदी 6.24 सेंमी ते 11.4 सेंमी पर्यंत आहे. तर त्यांचं शरीर लांब नळाच्या आकाराचं होतं.

फोटो स्रोत, Getty Images
हा साप अंदाजे 10.9 मीटर ते 15.2 मीटर लांब होता. दक्षिण पूर्व आशिया - इंडोनेशिया आणि फिलिपाईन्सचा रेटिक्युलेटेड पायथन हा सध्याचा पृथ्वीवरील सर्वात मोठा साप आहे. या सापाची लांबी 6.25 मीटर असते. पण अवशेष सापडलेला साप त्यापेक्षा मोठा आहे.
1912 मध्ये 'गिनिज वर्ल्ड रिकॉर्ड्स' मध्ये 10 मीटर लांबीच्या सापाची नोंदणी करण्यात आली होती. तर ग्रीन अॅनाकोंडाला सापाची सर्वात मोठी प्रजाती समजलं जात होतं. ग्रीन अॅनाकोंडाच्या मादीची लांबी सात मीटरपेक्षा जास्त असते.
हे साप शक्यतो उबदार वातावरणात राहतात. त्यावेळी ते पृथ्वीवर सरासरी 28 अंश सेल्सिअस तापमानात असायचं. त्यांचं सरासरी वजन 1000 किलो असण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
कसे मिळाले अवशेष?
या 'वासुकी इंडिकस' सांपाच्या अवशेषांचा सोध सर्वात आधी 2005 मध्ये आयआयटी रुडकीचे प्राध्यापक सुनील वाजपेयींनी लावला होता. त्यांना हे अवशेष कच्छच्या पांढरोमधील एका कोळसा खाणीत सापडले होते.
इतिहासपूर्व काळातील एखाद्या सामान्य मगरीचे हे अवशेष असावे असं त्यांना त्यावेळी वाटलं होतं. 2022 पर्यंत हे अवशेष त्यांच्या प्रयोगशाळेत पडून होते. पण देबजित दत्ता यांनी त्यांच्या प्रयोगशाळेत पुन्हा या अवशेषांवर संशोधनाचं काम सुरू केल्यानंतर त्यांना ही माहिती मिळाली.
त्यानंतर या दोघांना हे सामान्य मगरीचे अवशेष नसून दुसरं काहीतरी असल्याची जाणीव झाली.
"अवशेष 2005 मध्ये मिळाले होते. पण इतर अवशेषांवर काम करत असल्यानं हे काम मी बाजुला ठेवलं होतं. 2022 मध्ये आम्ही पुन्हा संशोधन सुरू केलं. आधी मला वाटलं की मगरीचे अवशेष आहेत. कारण त्याचा आकार मोठा आहे. पण नंतर आम्हाला हे सापाचे अवशेष असल्याची जाणीव झाली. नंतरच्या शोधावरून हा नाग प्रजातीतील सर्वात मोठा साप असल्याचं समोर आलं," असं टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना सुनील वाजपेयींनी म्हटलं.

फोटो स्रोत, Getty Images
वैज्ञानिकांच्या अंदाजानुसार वासुकीचा मोठा आकार पाहता हा साप मोठा शिकारी असू शकतो. शिकार पकडण्यासाठी तो आधुनिक अजगर आणि अॅनाकोंडाप्रमाणे विळखा घालून मारण्याची पद्धत वापरत असावा, असाही अंदाज वर्तवण्यात आला आहे.

फोटो स्रोत, Getty Images
त्याचवेळी संशोधकांनी याबाबत एक वेगळं मतही नोंदवलं आहे. शोधनिबंधाचे मुख्य लेखक देबजित दत्ता यांच्या मते, कदाचित हा साप तेवढा उग्र किंवा क्रूर स्वभावाचा नसूही शकतो. त्यावेळचं उच्च तापमान या सापाच्या विशालकाय शरिररचनेसाठी कारणीभूत असू शकतं, असं ते म्हणाले.
आतापर्यंतच्या शोधांनुसार हा सर्वात मोठा साप असल्याचं समोर आलं असून, अजूनही त्याबाबत संशोधन सुरू आहे.











