You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
तुमच्या यशामागे नरेंद्र मोदींचा हात असल्याच्या प्रश्नावर उद्योगपती गौतम अदानी म्हणाले...
अदानी समुहाचे प्रमुख गौतम अदानी यांनी एका मुलाखतीत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलेल्या आरोपांबाबत आणि नरेंद्र मोदींसोबतच्या त्यांच्या 'मैत्री'बाबत वक्तव्य केलं आहे.
अदानी म्हणाले, "राहुल गांधी यांच्यामुळे लोकांना अदानी हे नाव माहिती झालं आहे."
त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत ते म्हणाले, “तुम्ही मोदीजींकडून कोणतीही वैयक्तिक मदत घेऊ शकत नाही. पण मोदींसोबतचा माझा अनुभव चांगला आहे.”
केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारला कोंडीत पकडण्यासाठी काँग्रेस नेते राहुल गांधी हे पंतप्रधानांच्या 'अदानी समूहा'सोबतच्या 'मैत्री'चा अनेक दिवसांपासून उल्लेख करत आहेत आणि त्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात टाकण्याचा प्रयत्न करत आहेत.
या आरोपांवर गौतम अदानी म्हणाले की, ते राहुल गांधींचा 'आदर' करतात आणि त्यांच्या वक्तव्याला 'राजकीय वक्तृत्व' मानतात.
'इंडिया टीव्ही' या खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत गौतम अदानी म्हणाले, "2014च्या निवडणुकीनंतर राहुलजींनी आमच्यावर केलेल्या सततच्या हल्ल्यांमुळे तुम्हाला अदानी कोण आहे हे जाणून घेण्याची संधी मिळाली. आणि म्हणूनच आज मी इथं स्टुडिओत मुलाखत देण्यासाठी उपस्थित आहे.”
याच मुलाखतीत, अदानी यांनी असंही सांगितलं की, 26 नोव्हेंबर 2011 रोजी मुंबईतील ताज हॉटेलवर अतिरेकी हल्ल्याच्या वेळी ते हॉटेलमध्ये उपस्थित होते आणि सुरक्षा दलांनी त्यांची सुटका केली होती.
आशियातील सर्वात श्रीमंत आणि जगातील तिसरे श्रीमंत गौतम अदानी यांनी एक साधा हिरा व्यापारी म्हणून व्यवसाय सुरू केला.
मात्र, आज त्यांची कंपनी बंदरे, विमानतळ, ऊर्जा, सौर ऊर्जा, कोळसा खाणी, सिमेंट, घरबांधणीपासून ते पेट्रोकेमिकल्सपर्यंतच्या क्षेत्रात व्यवसाय करत आहे.
केंद्र सरकारने देशातील गरिबांचा पैसा देशातील दोन मोठ्या उद्योग समूहांना (अदानी आणि अंबानी) दिल्याचा आरोप राहुल गांधींनी अनेकदा केला आहे.
राहुल गांधींच्या आरोपावर अदानी काय म्हणाले?
अनेक राज्यांतून फिरून 'भारत जोडो यात्रा' दिल्लीत पोहोचल्यावर राहुल गांधींनी लाल किल्ल्यावर पुन्हा एकदा 'केंद्रात मोदी नसून अंबानी-अदानींचे सरकार आहे', असा पुनरुच्चार केला.
या आरोपांवर गौतम अदानी यांना प्रश्न विचारण्यात आला तेव्हा ते म्हणाले, "राहुल गांधी हे काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत. मला वाटतं की एक व्यापारी म्हणून त्यांच्यावर भाष्य करणं माझ्यासाठी चांगलं नाही. ते एक आदरणीय नेते आहेत आणि त्यांनाही देशाची प्रगती हवी आहे, असं दिसतं."
अदानी म्हणाले, "राहुल यांचं वक्तव्य राजकीय आवेशातून येतं. पण, मी ते राजकीय वक्तृत्वापेक्षा जास्त समजत नाही."
गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये राहुल गांधी म्हणाले होते, "मोदी सरकारने सर्व बंदरे, सर्व विमानतळे, सर्व खाणकाम, भारतातील सर्व हरित ऊर्जा गौतम अदानींना दिली आहे."
सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या कर्जावर स्पष्टीकरण
अदानी समूहानं वेगवेगळ्या पायाभूत सुविधा प्रकल्पांमध्ये गुंतवलेला पैसा हे सार्वजनिक क्षेत्रातील बँकांकडून घेतलेलं कर्ज असल्याचा आरोपही राहुल गांधी करत आहेत.
गौतम अदानी यांच्यावर दोन लाख कोटी रुपयांचं कर्ज असून ते जनतेच्या पैशातून व्यवसाय वाढवत असल्याचाही सवाल त्यांना विचारण्यात आला. हे दावे चुकीचे असल्याचं यावेळी अदानी यांनी म्हटलं.
काँग्रेस आणि मोदींच्या नात्यावर काय म्हणाले?
काँग्रेसशासित राजस्थानमध्ये 68 हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीशी संबंधित प्रश्नावर गौतम अदानी म्हणाले की, गुंतवणुकीच्या बाबतीत राहुल गांधींनी 'स्तुती' केली होती.
ते म्हणाले, "राहुल गांधींचं धोरण विकासाच्या विरोधात नाही, असं माझं मत आहे. एक असतं राजकीय वक्तृत्व आणि दुसरं असते खरे आरोप. सत्य काय ते जनतेला ठरवू द्या."
अदानी समूहाच्या यशामागे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हात असल्याच्या प्रश्नावर अदानी म्हणाले की, अशी विधाने तेच करतात ज्यांना 'मोदींसोबत समस्या' आहे.
ते म्हणाले, "तुम्ही मोदींकडून कोणतीही वैयक्तिक मदत घेऊ शकत नाही. मोदी जवळपास 12 वर्षे गुजरातचे मुख्यमंत्री होते आणि मी अभिमानानं सांगू शकतो की मला त्यांच्यासोबत खूप चांगला अनुभव आला आहे."
सोशल मीडियावर प्रतिक्रिया
या मुलाखतीच्या संदर्भानं सोशल मीडियावर अनेकांनी अदानी यांच्यावर टीका केली आहे, तर अनेकांनी अदानी यांच्या 'सेन्स ऑफ ह्युमर'चं कौतुक केलं आहे.
भरत पांडे यांनी ट्विट केलं की, "अदानी यांनी काहीही शोध लावला नाही. बँकांचा पैसा आणि राजकीय शक्ती वापरून कंपन्या विकत घेतल्या आणि सार्वजनिक पैशानं कर्ज फेडलं."
आशिष पारीक यांनी लिहिलं की, "राहुल गांधींच्या आरोपांवर अदानी यांनी दिलेलं उत्तर आवडलं. या मुलाखतीत एक वेगळीच ऊर्जा पाहायला मिळाली."
पत्रकार रजत शर्मा यांना प्रत्युत्तर देताना राजू के गोगोई या ट्विटर वापरकर्त्यानं विचारलं की, "तुम्ही राहुल गांधी असंबद्ध का म्हणता?"
ट्विटर युजर अंजना यांनी लिहिलं की, “जेव्हा मोदी सोबत आहेत मग त्यांना राहुल गांधींची काय गरज आहे? मोदी त्यांच्यासाठी 18 तास काम करतात.”
“गौतम अदानींवर निशाणा साधण्याच्या राहुल गांधींच्या प्रश्नावर गौतम अदानी यांनी दिलेलं उत्तर किती मजेदार आणि मनोरंजक आहे”, अशी टिप्पणी आणखी एका ट्विटर युजरनं केली आहे.
ट्विटर यूजर सुजाता यांनी म्हटलं की, “राहुल गांधींवर टिप्पणी करताना गौतम अदानी म्हणाले की, मी केवळ त्यांच्यामुळेच इथं उपस्थित आहे. असा सकारात्मक दृष्टिकोन पाहून आनंद झाला.”
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)