स्क्रिझोफेनीयाशी सामना करत ते तिघे एक कॅफे चालवतात

    • Author, प्राची कुलकर्णी
    • Role, बीबीसी मराठीसाठी
    • Reporting from, पुणे
ललित देशमुख
फोटो कॅप्शन, ललित देशमुख

स्क्रिझोफेनीया नावाचे जंगल

त्यात असते मोठी दंगल

मनाचे मनाशीच रणांगण

त्यात उडते मोठी तारांबळ

निराशेची असते खाई

डोई काढीती क्षणई क्षणई...

35 वर्षांच्या ललित देशमुखची ही कविता त्याचं गेल्या जवळपास 20 वर्षांपासून सुरु असलेलं मनाचं द्वंद्व दाखवतेय.

ललित दहावीत होता तेव्हा त्याला सलग तीन दिवस झोपच लागली नाही. त्याचे पालक त्याला घेऊन फॅमिली डॅाक्टरांकडे गेले.

त्यांनी दिलेल्या झोपेच्या इंजेक्शननेही फरक पडला नाही तेव्हा मात्र डॅाक्टरांनी त्याला शहरात हलवायला सांगितले.

शहरातल्या डॅाक्टरांकडे स्कॅन झाले. त्यातूनही निदान झाले नाही तेव्हा त्याला सायकॅट्रीस्टकडे पाठवण्यात आले. आणि त्यातून निदान झालं आणि कळालं की ललितला स्क्रिझोफेनीयाचा त्रास होत आहे.

“माझ्या मित्रांना लक्षात येत होतं की माझं काहीतरी बिनसलं आहे. तेव्हा मला शिक्षकांची खूप भिती वाटायची. मित्र सांगायचे की मी त्याच त्याच गोष्टी सतत बोलत होतो,” ललित सांगतो.

वडिलांची बदलीची नोकरी आणि ललितचा मानसिक आजार याचा परिणाम असा झाला की ललितचं बारावी पर्यंतचं शिक्षण पूर्ण झालं आणि त्यानंतर मात्र तो घराबाहेर पडणंच टाळायला लागला.

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

“घाबरण्याचं कारण म्हणजे मला आवाज ऐकू यायचे. भासांचा त्रास व्हायचा. काही किटक आपल्या अंगावर चालून येत आहेत असं. बाहेरच्यांशी मला नॉर्मल संवाद साधणं सुद्धा कठीण होतं. दुसरी गोष्ट म्हणजे त्यामुळे स्वतः मुळेच मी घुसमटत जाणार त्यामुळे मी मोकळा होऊ शकत नव्हतो. औषध गोळ्या घेऊनही भिती जात नव्हती.”

आज मात्र ललित नुसता एकट्याने प्रवास करायला शिकला नाहीये तर तो त्याच्या दोन मानसमित्रांसोबत एक कॅफे दिवसभर सांभाळतो आहे.

हे कॅफे आहे पुणे महानगरपालिकेजवळचं परिवर्तन संस्थेने सुरु केलेलं किमया कॅफे.

किमया कॅफे म्हणजे खरंतर छोटेखानी दुकानच पण बाहेर छानशा रचून ठेवलेल्या खुर्च्या आणि टेबल आणि आतमध्ये नीट रचून ठेवलेलं सामान आणि पदार्थ पाहून येणाऱ्या जाणाऱ्या कोणाचंही लक्ष कॅफेकडे सहज जातं.

मानसोपचार घेऊन रुग्ण बरा होतो. पण त्यानंतर त्यांचं समाजात पुनर्वसन मात्र होत नाही. नोकरी लागली तरी ती टिकवणं मानसिक रुग्णांना काहीसं अवघड जातं.

त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी परिवर्तन संस्थेनं मानसरंग या त्यांच्या उपक्रमाअंतर्गत सुरुवात केली.

त्यातूनच 2021मध्ये किमया कॅफेची सुरुवात झाली.

किमया कॅफे.
फोटो कॅप्शन, पुणे महानगरपालिकेजवळचं परिवर्तन संस्थेने सुरु केलेलं किमया कॅफे.

किमया चालवण्याची पूर्ण जबाबदारी आहे ती ललित सारख्याच मानसिक आजारातून बरे होणाऱ्या निलेश आणि शिल्पा यांच्यावर.

बीबीसी मराठीशी बोलताना ललित सांगतो "आम्ही सकाळी 8 वाजता कॅफेत येतो. आल्यावर चहा ठेवतो. पाठोपाठ गरम भजी आणि वडे तयार करतो. याचं प्रमाण सुद्धा आम्ही प्रयोगातूनच शिकलो आहोत. सुरुवातीला आम्ही एका गादी कारखान्याला चहा द्यायचो. घरी आपण 2-3 जणांचा चहा एकदम सहज करतो.

“पण इथे प्रमाण जास्त होतं. त्यामुळे आम्ही प्रयोग करत गेलो. आम्हाला कळायचं आज आलं कमी पडलं. साखरेचं प्रमाण बिघडलं. त्यातून आम्ही बदल करत गेलो. मग आम्ही एक मोठा थर्मास आणला आणि त्यानुसार पाणी किती आणि चहा साखर किती याचं प्रमाण ठरुन गेलं.

सुरुवातीला थोडा गोंधळ झाला पण आता निलेश, ललित आणि शिल्पा हे तिघेही कॅफीची जबाबदारी अगदी सहजपणे सांभाळतात.

आता त्यांचे नेहमीचे हक्काचे ग्राहक सुद्धा झाले आहेत. अगदी पार्टी करण्यासाठी नेमाने येणारे लोकही किमयाची निवड करतात. काही शेतकरी खायला येतातच पण त्याबरोबरच शेतमाल सुद्धा प्रेमाने आणून देतात.

ललितच्या मते यातली सगळ्यांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याच्या आयुष्याला शिस्त लागली. वेळेवर उठण्यापासून तो औषधं घेण्यापर्यंत सगळंच यामुळे मार्गी लागलं.

शिवाय यातून होणारी कमाईही त्याच्या दृष्टीने महत्त्वाचीच. अर्थात यासाठी महत्त्वाची पायरी होती ती मानसरंग थेरपी. स्क्रिझोफेनीया असो की डिप्रेशन मानसिक रुग्ण सहसा बाहेर जाणं टाळायला लागतात.

हेच लक्षात घेऊन परिवर्तनने डे केअर सेंटर उभं केलं. डे केअर साठी येणारे सगळे आर्ट बेस्ड थेरपी किंवा इतर अॅक्टिव्हीटी करतात.

ललित

दर शुक्रवारी त्यांचे पालकही या उपक्रमांमध्ये सहभागी होतात. या सगळ्यातून बरे होणाऱ्यांना मग थोडा थोडा वेळ कॅफेमध्ये मदतीसाठी पाठवलं जातं.

त्यातून जे उभे राहतात त्यांना पुढे कॅफे किंवा इतर ठिकाणी नोकरीसाठी जाण्याची संधी मिळते.

परिवर्तनमध्ये काउन्सिलर म्हणून काम करणाऱ्या रेश्मा कचरे बीबीसी मराठीशी बोलताना म्हणाल्या "मानसिक आजारी रुग्णांसोबत काम करताना असं लक्षात आलं की त्यांचं आर्थिक सक्षमीकरण होईल तेव्हा समाजाचा दृष्टीकोन बदलेल.

मानसिक आजाराकडे बघण्याचा दृष्टीकोन कलंकित आहे पहिल्यापासून. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मनुष्य हा समाजशील प्राणी आहे.

समाजात राहूनच त्यांचं पुनर्वसन होऊ शकतं. समाज खऱ्या अर्थाने जेव्हा स्वीकारतो तेव्हाच त्या व्यक्तीचं पुनर्वसन होतं."

किमया

“आम्ही जेव्हा हे काम सुरु केलं तेव्हा हे लक्षात आलं की बरेच शिकलेले लोक आहेत. टीनेजमध्ये काही कारणाने त्रास झाला आहे. त्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी जॅाब प्लेसमेंट करायला लागलो. जॅाब सस्टेन करणं हे त्यांच्यासाठी चॅलेंजींग काम आहे. कुटुंबीयांशी बोलावं लागलं.

“फॉलो-अप घ्यावा लागतो. आपण नॅार्मल आहोत असं वाटणं तेव्हा त्यांच्यातल्या आत्मविश्वास आणि आनंद पाहून जाणवलं की मानसिक आजार बरे होऊ शकतात आणि हे लोक समाजाच्या मुख्य प्रवाहात येऊ शकतात. यातूनच किमया कॅफेची सुरुवात झाली.

आज किमयाच्या माध्यमातून दिवसाकाठी 1500-1600 रुपयांचा व्यवसाय होतो. होणारा एकूण खर्च पाहता ही कमाई तशी तुटपुंजी म्हणावी अशीच.

पण किमयाच्या माध्यमातून उभं राहणारं काम आणि त्यातून मानसमित्रांना होणारी मदत ही खूप मोठी आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)