राजकोट : मॉलच्या गेम झोनमधील आगीत 27 जणांचा मृत्यू, एक बेपत्ता, मृतांमध्ये लहानग्यांचा समावेश

राजकोट आग

फोटो स्रोत, BBC / BIPIN TANKARIA

गुजरातच्या राजकोटमधील मॉलमध्ये आगीची भीषण घटना घडली. मॉलमधील गेम झोनमध्ये लागलेल्या या आगीत मृत्यू झालेल्यांचा आकडा 27 वर पोहोचला आहे.

राजकोटमधील नाना मावा रोडवर हा मॉल असून, तिथे गेम झोन आहे. या गेम झोनमध्ये लहान मुलं होती. त्यामुळे या आगीतील मृतांमध्ये लहान मुलांचा अधिक समावेश आहे, अशी माहिती बीबीसींच्या सहयोगीने दिली आहे.

राजकोटच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेच्या दोन तासांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं.

मात्र, या घटनेतील मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येतेय.

पोलीस आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांनी काय म्हटलं?

राजकोटचे पोलीस आयुक्त राजू भार्गव यांनी शनिवारी एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना, या दुर्घटनेत 20 जणांचा मृत्यू झाल्याच्या माहितीला दुजोरा दिला. त्यानंतर रात्रीतून हा आकडा 27 वर पोहोचला.

राजू भार्गव म्हणाले की, "आतापर्यंत 20 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. युवराज सिंग सोलंकी हा या गेमझोनचा मालक आहे. आम्ही या प्रकरणी मृत्यू आणि निष्काळजीपणाचा गुन्हा नोंदवू. बचावकार्य पूर्ण झाल्यानंतर पुढील तपास करू."

तर राजकोटचे जिल्हाधिकारी प्रभाव जोशी यांनी एएनआयशी बोलताना म्हटलं की, "आम्हाला संध्याकाळी साडेचार वाजण्याच्या सुमार या दुर्घटनेची माहिती मिळाली. गेमिंग झोनमधील बांधकाम पूर्णपणे कोसळलं आहे. दोन तासांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं. आता मलबा काढण्याचं काम सुरू आहे. आम्ही सातत्यानं मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात आहोत."

जखमी आणि मृतांच्या नातेवाईकांना मदत जाहीर

गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल आणि एक्सवर (पूर्वीचे ट्विटर) पोस्ट करून मृतांच्या नातेवाईकांना नुकसानभरपाईची घोषणा केली आहे.

भूपेंद्र पटेल म्हणाले की, "राजकोटमधील आगीची दुर्दैवी घटना हृदय पिळवटून टाकणारी आहे. या दुर्घटनेत प्राण गमावलेल्या लोकांप्रती आणि त्यांच्या कुटुंबीयांप्रती मी मनःपूर्वक शोक व्यक्त करतो. जखमी लवकरात लवकर बरे व्हावेत यासाठी मी देवाकडे प्रार्थना करतो. राज्य सरकार मृतांच्या कुटुंबीयांना 4 लाख रुपयांची मदत आणि जखमींना 50 हजार रुपयांची मदत करेल."

तसंच, जखमींवर तातडीने उपचार करण्यासाठी व्यवस्था उभारण्याचे आदेश दिल्याची माहितीही भूपेंद्र पटेल यांनी एक्सवरून दिली.

राजकोट

गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणींनीही सोशल मीडियावर सोशल पोस्ट लिहित म्हटलं की, "लहान मुले, काही पालक आणि कर्मचाऱ्यांचा दुःखद मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे. यामुळे खूप दुःख झालं. ईश्वर सर्वांना हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो. आगीत प्राण गमावलेल्या सर्वांप्रती माझ्या संवेदना आणि सहानुभूती आहे."

तर गुजरात भाजपचे प्रदेशाध्यक्ष सी. आर. पाटील यांनी एक्स पोस्टमध्ये लिहिलं की, ''मी, सर्व आमदार, अधिकारी आणि कार्यकर्त्यांना आवाहन करतो की, घटनास्थळी जाऊन शक्य ती मदत करा. त्यांनी एक टीम बनवून स्थानिक हॉस्पिटल आणि घटनास्थळी मदतकार्यात सहभागी व्हावं. ही घटना अत्यंत दुःखद आहे."

पंतप्रधान आणि राष्ट्रपतींकडूनही दु:ख व्यक्त

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही राजकोट दुर्घटनेबाबत प्रतिक्रिया दिली आहे.

एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये त्यांनी लिहिलं की, "राजकोटमध्ये लागलेल्या आगीच्या दुर्घटनेमुळे मी अत्यंत व्यथित झालो आहे. या अपघातात ज्यांनी आपले प्रियजन गमावले आहेत, त्यांच्यासोबत माझ्या संवेदना आहेत. जखमींसाठी मी प्रार्थना करतो. स्थानिक प्रशासन बाधितांना सर्वतोपरी मदत करण्यासाठी प्रयत्नशील आहे."

राजकोट आग

फोटो स्रोत, X/Narendra Modi

मोदींनी पुढे लिहिलं की, "थोड्याच वेळापूर्वी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्रभाई पटेल यांच्याशी मी बोललो. त्यांनी मला या आगीला बळी पडलेल्यांना शक्य ती सर्व मदत उपलब्ध करून देण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांबद्दल सांगितले."

तर भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी एक्सवर लिहिलंय की, "गुजरातमधील राजकोट येथील गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीच्या दुर्घटनेत झालेल्या जीवितहानीबद्दल मला खूप दुःख झालं आहे. ज्या कुटुंबांनी लहान मुलांसह आपले जवळचे आणि प्रियजन गमावले आहेत त्यांच्यासाठी माझ्या संवेदना आहेत. जे या आगीतून बचावले आहेत त्यांनी लवकरात लवकर बरं व्हावं यासाठी मी देवाला प्रार्थना करतो."