निर्मनुष्य बेट, पाम झाडाच्या पानांनी साकरलेलं 'हेल्प' आणि तिघांच्या सुटकेचा थरार

फोटो स्रोत, US Coast Guard
- Author, नदीन यूसिफ
- Role, बीबीसी न्यूज
अमेरिकेच्या तटरक्षक दलानं मायक्रोनेशियामधील एका बेटावरून तीन माणसांची सुटका केली आहे. या माणसांनी बेटावरील समुद्रकिनाऱ्यावर पाम झाडाच्या पानांचा वापर करून हेल्प (HELP) ही अक्षरं तयार केली होती. ते पाहिल्यानंतर तटरक्षक दलानं या माणसांचा जीव वाचवला आहे.
पाईकलॉट अटोल या निर्मनुष्य कोरल बेटांवरून परतत असताना हे तिघे बेपत्ता झाले होते. हे बेट ग्वामपासून 415 मैल अंतरावर आहे.
या बेटावरून माणसांना वाचवण्याची मागील चार वर्षात ही दुसरी वेळ आहे.
तटक्षक दलानं दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे की, वयाच्या चाळीशीत असणारे तीन अनुभवी नाविक पोलोवाट अटोल बेटांवर पिकनिकसाठी गेले होते. हे बेट मायक्रोनेशियाच्या स्वायत्त राज्याचा भाग आहे.
तटरक्षक दलानं या तीन जणांची नावं मात्र दिलेली नाहीत.
ईस्टर संडेला हे तिघेजण 115 मैल अंतरावरील पाईकलॉट अटोल बेटावर गेले होते. मोटर लावलेल्या एका 20 फूटी पारंपारिक छोट्या बोटीतून ते गेले होते, अशी माहिती तटरक्षक दलानं दिली आहे.
मात्र, ते तिघेही परत न आल्यामुळे त्यातील एकाच्या नातेवाईक महिलेनं ग्वाममधील तटरक्षक दलाच्या संयुक्त मदत उपकेंद्राला यासंदर्भात कळवलं होतं. तिनं तटरक्षक दलाला सांगितलं की हे तिघेही जण बेपत्ता आहे. त्यानंतर मग या तिघांचा शोध घेण्यासाठी मोहिम सुरू करण्यात आली.
तटरक्षक दलानं सुरुवातीला 78 हजार चौरस सागरी मैल परिसरात त्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली होती. त्यावेळी हवामान खराब होतं. मात्र सुदैवानं आकाशातून हेल्प (HELP)हे चिन्ह दिसल्यामुळे या तिघांचा शोध लागला होता.
या तिघांनी अडचणीत सापडल्यानंतरदेखील हिंमत सोडली नव्हती आणि धीरानं मार्ग काढण्याचा प्रयत्न करत होते.
त्यातून त्यांनी बेटावरील समुद्रकिनाऱ्यावर पाम झाडांच्या पानांचा वापर करून हेल्प (HELP)ही अक्षरं तयार केली. या चिन्हामुळंच त्यांचा जीव वाचला, असं लेफ्टनंट चेल्सी गार्सिया यांनी सांगितलं.
चेल्सीनच या शोध आणि बचाव मोहिमेचे नेतृत्व केलं होतं.
त्यांचं स्थान शोधण्यासाठी बचाव पथकाला योग्य माहिती मिळण्याच्या दृष्टीनं याप्रकारं चिन्ह तयार करण्याची बाब अत्यंत महत्त्वाची होती, असं चेल्सीनं सांगितलं.
या तिघांचं स्थान निश्चित झाल्यानंतर तटरक्षक दलाच्या कर्मचाऱ्यांनी आकाशातून या तिघांच्या मदतीसाठी अत्यावश्यक सामान आणि रेडिओ (वॉकी टॉकी) टाकला होता. तर त्याचवेळी अमेरिकेच्या तटरक्षक दलाची बोट त्या बेटाच्या दिशेने निघाली होती.
''त्यानंतर या तिघांनी रेडिओवरून ते चांगल्या स्थितीत असल्याचं आणि त्यांच्याकडे अन्नपदार्थ आणि पिण्याचं पाणी असल्याची माहिती कळवली होती,'' असं अमेरिकन तटरक्षक दलानं सांगितलं.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
तटरक्षक दलानं या तिघांची बोट देखील हस्तगत केली. त्या बोटीची नासधुस झाली होती आणि त्यामुळंच ती बंद पडली होती. त्यामुळंच त्यांना पोलोवाट इथं परतण्यासाठी मदतीची गरज होती.
31 मार्चला प्रवासासाठी निघालेल्या या नाविकांची त्या बेटावरून अखेर 9 एप्रिलला अधिकृतरित्या सुटका झाली होती.
ही बचाव मोहिम म्हणजे अमेरिका आणि मायक्रोनेशियाचे स्वायत्त राज्य आणि त्या परिसरात तैनात असलेले अमेरिकन नौदलाचे कर्मचारी यांच्यातील उत्तम ताळमेळाची एक उदाहरण असल्याचं अमेरिकन तटरक्षक दलानं म्हटलं आहे.
मायक्रोनेशिया हा पश्चिम पॅसिफिक महासागरात जवळपास 600 छोट्या बेटांचा टापू आहे. ही बेटं पॅसिफिक महासागरात दूरवर विखुरलेली आहेत.
''वाचवलेला प्रत्येक जीव आणि घरी परतलेला प्रत्येक नाविक ही दोन्ही देशातील उत्तम संबंध आणि परस्परपूरक आदर यांचा पुरावा आहे,'' असं तटरक्षक दलाच्या शोध आणि बचाव पथकात सहभागी असलेल्या ख्रिस्तिन अगिसोमर यांनी सांगितलं.
पाईकलॉट अटोल हे बेट जरी निर्मनुष्य असलं तरी शिकारी आणि मासेमार तिथं नेहमीच जात असतात. मागील काही वर्षांमध्ये तिथं बचाव मोहिमा राबवाव्या लागल्या आहेत.
2020 मध्ये तीन मायक्रोनेशियन नाविकांचा जीव वाचवण्यात आला होता. या तिघांनी एसओएस (SOS)हे आपत्कालीन मदतीचं चिन्ह समुद्रकिनाऱ्यावर तयार केल्यानंतर ऑस्ट्रेलियन सुरक्षा दलांनी त्यांची सुटका केली होती.











