'मी अक्षरश: नरकातून आले आहे'; हमासच्या ताब्यातून सुटलेल्या इस्रायली महिलेचा अनुभव

"मी नरकातून आले आहे," हमासच्या ताब्यातून मुक्त झाल्यानंतर 85 वर्षीय इस्रायली नागरिक योचेव्हड लिफशिट्झ असं म्हणाल्या.

लिफशिट्झ आणि नुरीत कूपर या दोघींना दोन आठवडे ओलीस ठेवण्यात आलं होतं. त्यांना सोमवारी (23 ऑक्टोबर) संध्याकाळी हमासनं सोडून दिलं.

हमासच्या बंदुकधारींनीमाझंआणि माझ्या पतीचं अपहरण केलं आणि आम्हाला गाझामध्ये बनवण्यात आलेल्या बोगद्यांच्या जाळ्यात नेलं, असं लिफशिट्झ यांनी सांगितलं.

प्रवासादरम्यान त्यांना 'काठीने मारहाण करण्यात आली'. पण बहुतांश ओलिसांना चांगली वागणूक देण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं.

एका व्हीडिओमध्ये लिफशिट्झ या सुटकेपूर्वी हमासच्या बंदुकधारीशी हस्तांदोलन करताना दिसत आहेत.

गाझा आणि इजिप्तमधील रफाह क्रॉसिंगवर त्यांना आंतरराष्ट्रीय रेड क्रॉसकडे सुपूर्द करण्यात आलं.

लिफशिट्झ या बंदूकधाऱ्याला 'शालोम' म्हणताना दिसत आहे. शालोम हा हिब्रू शब्द असून त्याचा अर्थ ‘शांती’ असा होतो.

बोगद्यांचं जाळं

लिफशिट्झ आणि त्यांच्या पतीचं 7 ऑक्टोबर रोजी दक्षिण इस्रायलमधीलकिबुत्झमधून अपहरण करण्यात आलं होतं.

हमासने पहाटेच किबुत्झवर हल्ला करून खळबळ उडवून दिली. इथं दर चारपैकी एका व्यक्तीला एकतर आपला जीव गमवावा लागला किंवा त्याचं अपहरण करण्यात आलं. यामध्ये लहान मुलांचाही समावेश आहे.

सुटकेनंतर काही तासांनी तेल अवीवमधील रुग्णालयात पत्रकारांशी संवाद साधताना लिफशिट्झ यांनी अपहरणानंतर त्यांच्यासोबत काय काय घडलं हे सांगितलं.

गाझा येथे नेत असताना काठीनं मारहाण करण्यात आली, त्यामुळे जखमा झाल्या आणि श्वास घेण्यासही त्रास झाल्याचं त्यांनी सांगितलं.

आईसोबत नेमकं काय घडलं, हे लिफशिट्झ यांची मुलगी शेरॉन पत्रकारांना भाषांतर करुन सांगत होती.

85 वर्षीय लिफशिट्झ यांनी सांगितलं की, त्यांना काही किलोमीटर पायी चालायला सांगण्यात आलं होतं. ती जमीन खूप ओली होती.

शेरॉन म्हणाली की, तिच्या आईला गाझामध्ये बनवण्यात आलेल्या बोगद्यांच्या एका मोठ्या नेटवर्कमध्ये नेलं होते. ते कोळ्याच्या जाळ्यासारखं दिसत होतं.

ती म्हणाली, तिच्या आईसह 25 ओलिसांना बोगद्यात नेण्यात आलं. यानंतर वृद्ध लिफशिट्झ आणि किबुत्झमधील इतर पाच लोकांना वेगळ्या खोलीत नेण्यात आले.

हमासच्या चांगल्या वर्तणुकीचा दावा

लिफशिट्झ म्हणाल्या की, प्रत्येक खोलीत एक सुरक्षा रक्षक होता आणि लोकांना डॉक्टरची सुविधाही देण्यात आली होती. खोली स्वच्छ होती आणि झोपण्यासाठी जमिनीवर गाद्या टाकलेल्या होत्या.

गाझा येथे घेऊन जात असताना बाईक अपघातात जखमी झालेल्या दुसऱ्या एका ओलिसावर तिथं उपचार करण्यात आले.

“आम्ही आजारी पडू नये याची ते काळजी करत होत.दर दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी एक डॉक्टर दिला जात होता," लिफशिट्झ यांनी म्हटलं.

त्यांना आवश्यक औषधेही पुरवण्यात आली आणि तिथं बंदीवान महिलांच्या स्वच्छतेची काळजी घेण्यासाठी महिलाही होत्या.

शेरॉननं सांगितलं की, हमासच्या रक्षकांसाठी जे अन्न होतं, तेच जेवण तिच्या आईला देण्यात आलं. त्यात पाव, चीझ याचा समावेश होता.

तुम्ही बंदुकधारीशी हस्तांदोलन का केले, असा प्रश्न एका पत्रकारानं लिफशिट्झ यांना विचारला तेव्हा त्या म्हणाल्या की, “अपहरणकर्त्यांनी त्याच्याशी चांगलं वर्तन ठेवलं आणि आणि इतर ओलीस चांगल्या स्थितीत आहेत.”

हमासचा तो हल्ला

लिफशिट्झ आणि नूरित कूपर यांच्या सुटकेच्या काही तास आधी, इस्रायली सैन्याने इस्रायलवरील दोन आठवड्यांच्या क्रूर हल्ल्याची जगाला आठवण करून देण्यासाठी हमासच्या बॉडी कॅमेऱ्यातून घेतलेले कच्चे फुटेज पत्रकारांना दाखवले.

या व्हीडिओमध्ये हमासचे बंदूकधारी रस्त्यावरून चालणाऱ्या नागरिकांवर गोळीबार करताना आनंदानं ओरडताना दिसत आहेत. नंतर ते किबुत्झिममध्ये लोकांच्या घरात घुसून मुलं आणि त्यांच्या पालकांची हत्या करत होते.

या हल्ल्यात 1400 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला, ज्यात बहुतांश सामान्य नागरिक होते.

लिफशिट्झ आणि त्यांचे 83 वर्षीय पती ओडेड हे सुप्रसिद्ध शांतता कार्यकर्ते आहेत. त्यांच्या कुटुंबीयांचं म्हणणं आहे की, या दोघांनी गाझामधील आजारी लोकांना इस्रायलमधील रुग्णालयात आणण्यास मदत केली होती.

त्यांची मुलगी शेरॉनने बीबीसीला सांगितलं की, ओडेड हे पत्रकार असून ते अनेक दशकांपासून शांतता राखण्यासाठी आणि पॅलेस्टिनी अधिकारांसाठी काम करत आहेत.

नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्ट्सच्या मते, ओडेड हे ‘अल हमिश्मार’ वृत्तपत्रासाठी काम करत होते आणि 1982 मध्ये बेरूतमधील पॅलेस्टिनी निर्वासित शिबिरात झालेल्या हत्याकांडाची बातमी देणाऱ्या पहिल्या पत्रकारांपैकी ते एक होते.

शेरॉन सांगते, “ते अरबी चांगले बोलू शकतात. ते गाझामधील अनेक लोकांना ओळखत होते."

आता काय परिस्थिती आहे?

आतापर्यंत हमासने एकूण चार ओलिसांची सुटका केली आहे. यामध्ये अमेरिकन-इस्रायली आई-मुलगी ज्युडिथ आणि नताली रानन यांचा समावेश आहे. त्यांची शुक्रवारी सुटका करण्यात आली.

हमासने अद्याप 200 लोकांना ओलीस ठेवलं असल्याचं इस्रायलचं म्हणणं आहे. सोमवारी रात्री सुटका करण्यात आलेल्या नुरीत कूपरचा पतीही या ओलिसांमध्ये असल्याचं समजत आहे.

दरम्यान, हमास शासित आरोग्य मंत्रालयाने माहिती दिली आहे की, 7 ऑक्टोबरपासून गाझामध्ये 5,791 लोकांचा मृत्यू झाला आहे आणि गेल्या 24 तासांत 700 लोकांचा मृत्यू झाला आहे.

त्याचवेळी इस्रायलनं गाझामधील 400 हून अधिक ठिकाणांवर हल्ला केल्याचं म्हटलं आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)