पुणे बोपदेव घाट बलात्कार प्रकरणी एक आरोपी ताब्यात, इतर दोघांचा शोध सुरू

    • Author, प्राची कुलकर्णी
    • Role, बीबीसी मराठीसाठी
    • Reporting from, पुणे

पुण्यातील बोपदेव घाटात 3 ऑक्टोबर 2024 रोजी 21 वर्षीय तरुणीवर तिघांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली.

या प्रकरणात एका आरोपीला ताब्यात घेण्यात आलं असून, इतर दोन आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती पुण्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली. तसंच, फरार आरोपींनाही लवकरच ताब्यात घेतलं जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

या घटनेतील तीन आरोपींच्या शोधात गुन्हे शाखा आणि इतर 700 पोलिस कर्मचारी, अधिकारी काम करत होते. आरोपी पोलिसांना गुंगारा देत होते. एआय स्केच तसेच सीसीटीव्ही फुटेजची मदत आरोपींना शोधण्यात उपयोगी ठरली. त्यातील एकाजणाला ताब्यात घेतले असून इतर दोघंही लवकरच सापडतील, असंही अमितेश कुमार यांनी सांगितलं.

यापूर्वी पुण्याचे पोलीस सहआयुक्त रंजन कुमार शर्मा यांनी सांगितलं होतं की, "पोलिसांकडे या घटनेची तक्रार शुक्रवारी (4 ऑक्टोबर) सकाळी 5 वाजेच्या सुमारास नोंदवण्यात आली. पुणे पोलिसांकडून या गुन्ह्याचा तपास सुरु आहे."

विरोधकांची राज्य सरकारवर खरमरीत टीका

माध्यमांशी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे प्रमुख शरद पवार म्हणाले की महिलांवरील अत्याचाराच्या वाढत्या घटनांमुळे लोकांमध्ये संताप आहे.

शरद पवार म्हणाले, "सरकारनं महिलांना मदत करण्यासाठी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. महिलांना यातून फायदा मिळतो आहे. एका बाजूला लाडकी बहीण योजना आहे आणि दुसरीकडे महिलांवरील अत्याचाराच्या घटना घडत आहेत. एका बाजूला लाडकी बहीण योजनेद्वारे महिलांना आर्थिक मदत करण्याचा प्रयत्न आहे तर दुसऱ्या बाजूला महिलांवरील अत्याचाराच्या वाढत्या घटनांमुळे लोकांमध्ये प्रचंड संताप आहे."

या घटनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)च्या कार्यकारी अध्यक्षा सुप्रिया सुळे यांनी पुण्यातील आणि राज्यातील महिलांच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. त्या म्हणाल्या की ही अतिशय संतापजनक घटना आहे.

एएनआयनं माहिती दिली आहे की सुप्रिया सुळे यांनी अशा प्रकारच्या घटना रोखण्यासाठी राज्याचा गृहविभाग कोणतीही पावलं उचलत नसल्याची टीका केली आहे.

एक्स या सोशल मीडिया व्यासपीठावरील पोस्टमध्ये सुप्रिया सुळे यांनी लिहिलं आहे,

"हे खूपच संतापजनक आहे! पुण्यात चाललंय तरी काय? पुण्यात बोपदेव घाटात एका तरुणीवर बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. पुण्यात आणि राज्यभरात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये सातत्यानं वाढ होते आहे. राज्याचे गृहखातं या घटना रोखण्यासाठी काहीही करत नसल्याचं दिसतं आहे. दुर्दैवानं असं म्हणावं लागतं आहे की महाराष्ट्र महिलांसाठी सुरक्षित नाही. बोपदेव घाटातील घटनेतील आरोपींना सरकारनं अटक करून त्यांच्याविरोधात कडक कारवाई केली पाहिजे."

राज्यातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर झाला असून त्यासाठी गृहमंत्री जबाबदार आहेत. म्हणून राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा दिला पाहिजे अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

दरम्यान, पोलिसांनी दोन फरार संशयितांचे स्केच जारी केले असून शोध पथकांची स्थापना केली आहे. त्यानुसार संशयितांचा तपास केला जाईल असे पोलिसांनी सांगितले आहे.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)