कमी पैशात 'करोडपती' बनण्याचं स्वप्न, कसं आहे क्रिकेट गेमिंग अ‍ॅप्सचं जग?

    • Author, सुमेधा पाल
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

धर्मेंदर गौतम दिल्लीत एका पार्किंग लॉटवर देखरेखीचं काम करतात. 17 मे ला इंडियन प्रीमियर लीग म्हणजे आयपीएल पुन्हा सुरू झाल्यानंतर ते खूपच आनंदी झाले. भारत आणि पाकिस्तानमधील वाढलेल्या तणावानंतर आयपीएलचे सामने स्थगित करण्यात आले होते.

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) ही जगातील सर्वाधिक लोकप्रिय आणि श्रीमंत फ्रँचायझी क्रिकेट स्पर्धा आहे.

मात्र धर्मेंदर गौतम यांना आयपीएल सुरू झाल्याचा आनंद होण्यामागे ते क्रिकेटप्रेमी आहेत हेच फक्त कारण नव्हतं. त्यांच्यासाठी दोन महिन्यांचा हा काळ पैसा कमावण्याचा आहे. फँटसी क्रिकेट अ‍ॅप्सच्या माध्यमातून पैसा कमावण्यासाठी ते आयपीएलची वाट पाहतात.

"खेळातील रोमांच आणि जिंकण्याची आशा, यामुळे मी हे करत राहतो," असं धर्मेंदर गौतम म्हणतात.

फँटसी गेमिंग अ‍ॅप्सवर युजर वास्तविक जीवनातील खेळाडूंचा म्हणजे आयपीएलमध्ये प्रत्यक्षात क्रिकेट खेळत असलेल्या खेळाडूंचा समावेश असलेल्या टीम तयार करतात.

हे खेळाडू प्रत्यक्षात मैदानावर सामने खेळत असताना जी कामगिरी करतात त्याआधारे या गेमिंग अ‍ॅप्समध्ये पॉईंट्स मिळवतात. जे युजर्सचे खेळाडू यात सर्वाधिक चांगली कामगिरी करतात म्हणजेच ज्या युजर्सचा स्कोअरबोर्ड चांगला असतो ते रोख बक्षिसं जिंकतात.

या गेमिंग अ‍ॅप्ससाठीचं प्रवेश शुल्क एक रुपयांपेक्षाही कमी असतं. मात्र युजर्सना यात लाखो रुपये कमावण्याची संधी असते.

साहजिकच धर्मेंदर गौतम यांच्याप्रमाणेच असंख्य भारतीयांसाठी फँटसी अ‍ॅप्स ही एक संधी आहे, ज्यात ते चांगली कमाई करू शकतात. शिवाय आवडता खेळ पाहत सहजपणे मोठी रक्कम कमावण्याची संधी यात असते.

भारतातील फँटसी क्रिकेटचा जोरदार विस्तार

भारतात क्रिकेट अत्यंत लोकप्रिय आहेत. लोकं क्रिकेटवेडे आहेत... असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. त्यामुळे फँटसी गेमिंग अ‍ॅप्ससाठी या उत्साही लोकांचा एक वर्ग आपोआपच उपलब्ध होता.

2010 च्या दशकाच्या मध्यापासून ते अखेरीस भारतात इंटरनेटच्या वापरात झपाट्यानं आणि मोठी वाढ झाली. दूरसंचार कंपन्यांमधील तीव्र स्पर्धेमुळे इंटरनेट सुविधा तुलनेनं कमी शुल्कात उपलब्ध होऊ लागली. त्यातूनच फँटसी गेमिंग उद्योगाला मोठ्या प्रमाणात चालना मिळाली.

तोपर्यंत सर्वसामान्य भारतीयांच्या हातात मोबाईल फोन, विशेषकरून स्मार्टफोन सहज दिसू लागला होता. त्यातच इंटरनेट सेवा व्यापक प्रमाणात उपलब्ध झाल्यामुळे एकीकडे मोबाईलच्या स्क्रीनवर खेळांचं प्रसारण दिसू लागलं तर दुसऱ्या बाजूला फँटसी अ‍ॅप्सदेखील आले.

केपीएमजी या अकाउंटिंगच्या क्षेत्रातील कंपनीच्या 2019 च्या अहवालात नमूद करण्यात आलं आहे की, 2016 मध्ये भारतातील ब्राँडबँड इंटरनेट वापरणाऱ्यांची संख्या 36.8 कोटी होती. 2018 मध्ये ती 56 कोटी झाली.

तसंच केपीएमजीला आढळून आलं की याच कालावधीत फँटसी गेमिंग ऑपरेटर्स म्हणजे फर्मची संख्या 10 वरून 70 वर पोहोचली.

2019 मध्ये, ड्रीम 11 अ‍ॅप हे 'युनिकॉर्न' दर्जा मिळवणारं पहिलं भारतीय फँटसी गेमिंग अ‍ॅप बनलं. कारण कंपनीचं बाजारमूल्य एक अब्ज डॉलरवर पोहोचलं. ज्या कंपन्या किंवा स्टार्टअपचं बाजारमूल्य एक अब्ज डॉलरचा टप्पा ओलांडतं त्यांना 'युनिकॉर्न' असं म्हटलं जातं.

2021 मध्ये मोबाईल प्रीमियर लीग (एमपीएल)चा आणि 2022 मध्ये गेम्स 24x7 या अ‍ॅपचादेखील युनिकॉर्नच्या या गटात समावेश झाला.

'सध्या भारतात फँटसी गेमिंग किंवा स्पोर्ट्स अ‍ॅप्सचे 22.5 कोटीहून अधिक युजर्स आहेत', असं फेडरेशन ऑफ इंडियन फँटसी स्पोर्ट्स अ‍ॅप्स इन इंडिया (एफआयएफएस) या स्व-नियामक संस्थेनं बीबीसीला सांगितलं. यासाठी त्यांनी डेलॉईटच्या सहकार्यानं केलेल्या अभ्यासातील आकडेवारीचा संदर्भ दिला.

एफआयएफएसच्या आकडेवारीनुसार, या गेमिंग अ‍ॅप्सच्या युजर्सना विविध खेळांमध्ये पैसे लावण्याची संधी असते. मात्र यातील 85 टक्के युजर क्रिकेटचीच निवड करतात.

सहज मिळणारा पैसा: आमिष आणि जोखीम

ही बाब तर स्पष्ट आहे की फँटसी गेमिंग अ‍ॅप्स लोकप्रिय आहेत, कारण यातून सहजपणे, चटकन भरपूर पैसा कमावण्याची संधी दिसते.

दिल्लीस्थित क्रीडा पत्रकार सिद्धांत अणे म्हणतात की, "गेमिंग अ‍ॅप्समधील खेळांची रचनाच अशा प्रकारे केली आहे की, यातून जिंकण्याची आशा निर्माण करून अधिकाधिक खेळाडूंना किंवा युजर्सना याकडे आकर्षित केलं जातं. भारतात गेमिंग अ‍ॅप्स प्रामुख्यानं क्रिकेट-केंद्रित आहेत."

"मात्र आता इतरही खेळांमध्ये त्यांचा विस्तार होतो आहे. चटकन अधिक पैसे कमावण्याचं आकर्षण हे त्याचं मुख्य कारण आहे."

उत्तर प्रदेशातील मिर्झापूरमधील स्थानिक न्यायालयात क्लर्क असलेल्या दयाराम यांच्यासारख्या उदाहरणांद्वारे सिद्धांत ज्या आकर्षणाबद्दल बोलत आहेत ते अधिक स्पष्ट होण्यास मदत होते.

एप्रिलमध्ये दयाराम यांना ड्रीम11 अ‍ॅपमध्ये आयपीएलमधील लखनौ सुपर जायंट्स आणि किंग्स इलेव्हन पंजाब यांच्यातील सामन्यात लीडरबोर्ड किंवा स्कोअरबोर्डवर पहिलं स्थान मिळाल्यानंतर त्यांनी बक्षिस म्हणून 3 कोटी रुपये जिंकले.

"मी दोन वर्षांपासून गेमिंग अ‍ॅप्सवर खेळतो आहे. मला पहिल्यांदाच इतकं मोठं बक्षिस मिळालं. मी खूप आनंदी आहे आणि इतकं मोठं बक्षिस मिळालं आहे यावर अजूनही माझा विश्वास बसत नाही," असं दयाराम यांनी बीबीसीला सांगितलं.

दयाराम पुढे म्हणाले की, त्यांच्या कुटुंबासाठी घर बांधण्याची त्यांची इच्छा आहे. "पुढे खेळत राहण्याची माझी इच्छा नाही. कारण यात तुम्ही पैसे हरू देखील शकता."

मात्र दयाराम यांचं उदाहरण हे नेहमीचं किंवा सामान्य नाही.

मोहम्मद रकिब दिल्लीत एक कंत्राटी कामगार आहेत. ते अनेकजणांना येणारा अनुभव सांगतात. "मी प्रत्येक आयपीएल सामन्यासाठी फँटसी टीम तयार करतो, मात्र मी कधीही बक्षिस जिंकलेलो नाही."

धर्मेंदर गौतम देखील मान्य करतात की, फँटसी गेमिंग अ‍ॅप्समध्ये जिंकण्याची शक्यता खूपच कमी असते आणि त्यामुळेच ते यात पैसे लावत राहतात.

ते म्हणतात, "यातील रोमांच आणि आशा खूपच उत्साहवर्धक आहे. यात जिंकल्याशिवायदेखील प्रत्येक वेळेस हीच भावना असते की कदाचित पुढच्या वेळेस तुम्ही जिंकाल. मला कदाचित 3 कोटी रुपये जिंकता येणार नाहीत, मात्र आम्ही लोकांना 300 रुपये किंवा 500 रुपये जिंकताना पाहिलं आहे."

रकिब आणि गौतम यांच्या उदाहरणातून फँटसी गेमिंग अ‍ॅप्सच्या वापरासंदर्भात समाजशास्त्रीय पैलूवर प्रकाश पडतो. तो असा की अल्प उत्पन्न गटातील अनेक भारतीय याकडे नशीब बदलण्याचा किंवा श्रीमंत होण्याचा एक शॉर्टकट म्हणून पाहतात.

वर उल्लेख केलेल्या केपीएमजीच्या अहवालात म्हटलं आहे की अभ्यासादरम्यान प्रश्न विचारण्यात आलेले 40 टक्के लोक ज्यांचं वार्षिक उत्पन्न 3 लाख रुपयांपेक्षा कमी आहे, ते आठवड्यातून पाचपेक्षा अधिक वेळा फँटसी स्पोर्टस खेळतात.

ज्या लोकांचं वार्षिक उत्पन्न 10 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे या श्रेणीतील प्रश्न विचारण्यात आलेल्या लोकांपैकी फक्त 12 टक्के लोक याचप्रकारे फँटसी स्पोर्ट्स खेळतात.

अधिक महत्त्वाची बाब म्हणजे, ज्या लोकांचं वार्षिक उत्पन्न 3 लाख रुपयांपेक्षा कमी आहे, त्यातील 39 टक्के लोकांनी सांगितलं की "पैसे जिंकण्याची संधी" हीच फँटसी स्पोर्ट्स खेळण्यामागची त्यांची प्रेरणा आहे. तर 10 लाख रुपयांपेक्षा अधिक वार्षिक उत्पन्न असणाऱ्या 25 टक्के जणांनी हीच प्रेरणा असल्याचं सांगितलं.

या फँटसी गेमिंग अ‍ॅप्सच्या माध्यमातून पैसे मिळवण्याच्या इच्छेचे अनेकदा दु:खद परिणाम होतात. फँटसी गेमिंगमध्ये पैसे गमावल्यामुळे आत्महत्या केल्याची अनेक उदाहरणं समोर आली आहेत.

अगदी अलीकडेच म्हणजे मार्च महिन्यात बिहारमधील 38 वर्षांच्या व्यक्तीनं फँटसी गेमिंगमध्ये 2 कोटी रुपये गमावल्यानंतर आत्महत्या केली. घटनास्थळी सापडलेल्या एका चिठ्ठीत त्या व्यक्तीनं कोरोनाच्या संकटकाळात सुरू झालेल्या फँटसी क्रिकेटच्या व्यसनाला याचा दोष दिला आहे.

डॉ. मनोज कुमार शर्मा सर्व्हिस फॉर हेल्दी युज ऑफ टेक्नॉलॉजीचे प्रमुख आहेत. तंत्रज्ञानाशी संबंधित समस्यांना समर्पित असलेलं हे मानसिक आरोग्य क्लिनिक आहे. ते म्हणाले की कोरोनाच्या संकटानंतर फँटसी स्पोर्टसचा वापर वाढला आहे.

"यात आपल्या नियंत्रणाखाली सर्वकाही असल्याचा एक भ्रम आहे. लोकांना वाटतं की ते यातून पैसे जिंकू शकतात. मात्र वारंवार पैसे गमावल्यामुळे मन:स्थिती बिघडू शकते," असं डॉ. शर्मा म्हणतात.

गेमिंग अ‍ॅप्सच्या वापरातून होणाऱ्या आत्महत्यांमुळे किमान दोन राज्य सरकारांना कारवाई करावी लागली आहे. 2022 मध्ये तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांनी, या प्रकरणात लक्ष देण्यासाठी करण्यासाठी विशेष चौकशी सुरू करत असल्याचं जाहीर केलं.

त्याच वर्षी मध्य प्रदेशचे गृह मंत्री नरोत्तम मिश्रा म्हणाले होते की ऑनलाईन गेमिंगचं नियमन करण्यासाठी त्यांचं सरकार कायदा करणार आहे.

तज्ज्ञांना वाटतं की फँटसी गेमिंगवर योग्य प्रकारच्या नियमनाचा अभाव असल्यामुळे त्यातील जोखीम वाढते आहे.

फँटसी स्पोर्टसच्या नियमनाबाबत अजूनही अस्पष्टता

गेल्या काही वर्षांमध्ये फँटसी स्पोर्टसच्या नियमनाच्या प्रश्नावरून वादविवाद सुरू झआले आहेत. ओडिशा, आसाम, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या किमान चार राज्यांनी जुगारविरोधी कायद्याअंतर्गत फँटसी गेमिंग अ‍ॅप्सवर बंदी घातली आहे.

मात्र फॅंटसी स्पोर्ट्स हे कौशल्यानं खेळायची गोष्ट आहे की त्यात संधीचा किंवा योगायोगाचा संबंध आहे, या वादामुळे या बंदीला अडचणी येत आहेत. कौशल्यानं खेळण्याच्या खेळात व्यूहरचनात्मक निर्णय घेणं, प्रतिभा आणि ज्ञानाचा समावेश असतो. त्याउलट योगायोग किंवा निव्वळ संधी मिळण्याची गोष्ट असल्याचं त्याचा पूर्णपणे नशीबाशी संबंध येतो.

जय सायता एक तंत्रज्ञान आणि गेमिंगशी संबंधित वकील आहेत.

ते म्हणतात, "अनेक उच्च न्यायालयांनी निकाल दिला आहे की ज्यात म्हटलं आहे की फँटसी स्पोर्ट्स हे कौशल्यानं खेळण्याचे खेळ म्हणून पात्र ठरतात आणि जुगारविरोधी कायद्याच्या कक्षेबाहेर आहेत."

"सर्वोच्च न्यायालयानं देखील यातील काही निकाल कायम ठेवले आहेत. त्यामुळे राज्य सरकार आणि केंद्र सरकार या अॅप्सवर पूर्णपणे बंदी घालू शकत नाहीत."

कर्नाटक आणि तामिळनाडू या दोन राज्यांनी या युक्तिवादाचा आधार घेत राज्य सरकारांनी फँटसी गेमिंगवर घातलेल्या बंदी काढल्या आहेत.

फँटसी गेमिंग अ‍ॅप्सचा वापर रोखण्यासाठी, केंद्र सरकारनं 2023 मध्ये फँटसी स्पोर्ट्स अ‍ॅप्समधून जिंकण्यात येणाऱ्या बक्षिसांवर 28 टक्के जीएसटी कर लावला. कराचं हे प्रमाण मद्य आणि तंबाखू उत्पादनांवर असलेल्या कराइतकंच आहे.

मात्र सर्वोच्च न्यायालयात या निर्णयाला देखील आव्हान देण्यात आलं आहे. याचिकाकर्त्यांनी, यात गेमिंग कंपन्यांचाही समावेश आहे, युक्तिवाद केला आहे की या प्रकारे कर लावणं हे भारतीय राज्यघटनेच्या कलम 14 (कायद्यासमोरील समानता) आणि कलम 19(1) (जी) (कोणताही व्यवसाय करण्याचं स्वातंत्र्य) चं उल्लंघन आहे.

2023 मध्ये केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्रालयानं ऑनलाईन गेमिंग उद्योगासाठी राष्ट्रीय नियामक चौकट किंवा आराखडा अधिसूचित केला. मात्र या चौकटीअंतर्गत स्थापन करण्यात येणाऱ्या स्व-नियामक संस्थांची अद्याप अंमलबजावणी झालेली नाही.

एफआयएफएसनं बीबीसीला सांगितलं की फँटसी गेमिंग अ‍ॅप्सनं "सक्षम जबाबदार गेमिंग उपाय" आणण्यासाठी पावलं उचलली आहेत. या पावलांमुळे युजर्सना हे अ‍ॅप्स वापरताना "त्यांच्या आर्थिक मर्यादा आणि वेळेच्या मर्यादा निश्चित करण्यासारखे महत्त्वाचे निर्णय घेणं शक्य होतं" असं एफआयएफएसनं म्हटलं आहे.

एफआयएफएसनं असाही दावा केला आहे की, फँटसी स्पोर्ट उद्योग भारताच्या अर्थव्यवस्थेत महत्त्वाचं योगदान देतो आहे.

फँटसी गेमिंग अ‍ॅप्सबद्दल वादविवाद सुरू असतानाच, हे अ‍ॅप्स वापरणारे युजर्स मात्र दररोज त्यात पैसे लावत आहेत. धर्मेंदर गौतम म्हणतात त्याप्रमाणे त्यांच्यासारख्या अनेकांसाठी हे गेमिंग अ‍ॅप्स म्हणजे एक "नशा" किंवा "व्यसन" झालं आहे.

धर्मेंदर गौतम म्हणतात, "माझ्या आजूबाजूचा प्रत्येकजण खेळतो म्हणून मीदेखील खेळतो. आम्हा सर्वांना हीच आशा आहे की आपण जिंकू शकतो. त्यामुळे हे सोडणं कठीण आहे."

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.