कुर्ला बस अपघात : बेस्टचं भवितव्य काय? मुंबईकरांची 'बेस्ट' बस अडचणीत का?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, अल्पेश करकरे
- Role, बीबीसी मराठीसाठी
बेस्ट बससेवा हा नागरिकांच्या दैनंदिन जीवनाचा भाग आहे. परंतु ही जीवनवाहिनी सध्या मरणासन्न अवस्थेत असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळतीये. मुंबईकरांची बेस्ट ही अनेक अडचणीत सध्या सापडलीय.
कुर्ल्यातील बेस्ट बसच्या अपघातानंतर बेस्ट बस चर्चेचा विषय ठरत आहे. बेस्ट बस सेवा ही प्रवाशांना अल्पदरात मुंबईच्या कानाकोपऱ्यात पोहोचवते.
मात्र गेल्या काही वर्षांपासून होणारे अपघात, खासगीकरण, कंत्राटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन आणि बेस्ट प्रशासनाची आर्थिक कोंडी या मुद्द्यांमुळे बेस्टचे भवितव्य हा चर्चेचा विषय ठरत आहे.
बेस्टच्या प्रशासनावर सातत्याने प्रवासी संघटनांकडून टीका होताना दिसते. या टीकेला उत्तर देताना बेस्टच्या व्यवस्थापकांनी सांगितले आहे की बेस्टचे व्यवस्थापन जास्तीत जास्त चांगले होण्याचा प्रयत्न केला जात आहे तसेच कर्मचाऱ्यांना सर्वोत्तम प्रशिक्षण देण्यासाठी बेस्ट व्यवस्थापन कटिबद्ध आहे.
मुंबई लोकल रेल्वेप्रमाणेच बेस्ट उपक्रमाची बस सेवा हीदेखील मुंबईकरांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे.
BEST कंपनीच्या ट्रामपासून सुरू झालेल्या सेवेपासून, दळणवळणाच्या क्षेत्रातील अनेक स्थित्यंतरं पाहिली. गेल्या 75 वर्षांपासून बेस्टचे व्यवस्थापन मुंबई महानगर पालिकेकडे आहे.
या काळात या सेवेने अनेक बदल पाहिले. मुंबईकरांच्या प्रवासाच्या बदललेल्या गरजा पाहिल्या आणि त्यानुसार स्वतःच्या सेवेतही अनेक बदल केले.
घोड्याने ओढणाऱ्या ट्रामपासून ते डिझेल-इलेक्ट्रिक हायब्रिड एसीबस ते प्रदूषणमुक्त इलेक्ट्रिक बसपर्यंत, इतर कोणत्याही वाहतूक संस्थेने दिल्या नसतील इतक्या विविध प्रकारच्या बसेस व तितक्याच प्रकारच्या वाहतूक सेवा बेस्टने मुंबईकरांना आजवर बेस्टने दिल्या आहेत.
मात्र आता याच बेस्टच्या भवितव्यावर आणि अपुऱ्या सोयीमुळे मुंबईकर चिंतेत आहेत.


9 ऑगस्ट रोजी कुर्ला पश्चिम परिसरामध्ये 332 नंबर या कुर्ल्याहून अंधेरीला जाणाऱ्या बेस्ट बसचा एक भीषण अपघात झाला. या अपघातात सात जणांचा मृत्यू तर 42 पेक्षा अधिक लोक जखमी आहेत. या घटनेनंतर बेस्ट प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहेत.
एरवी या बेस्टच्या सद्यस्थितीवर मुंबईकर चिंतेत आहेतच, त्यात या घटनेनंतर आता बेस्ट प्रशासनाच्या कारभारावर आणि बेस्ट बसच्या भवितव्याला घेऊन मुंबईकर आणि राजकीय पक्ष, बेस्ट संघटना चिंतेत आहेत.
'बेस्ट'चा इतिहास
बेस्ट ही मुंबईची दळणवळण व विद्युत सार्वजनिक सेवा पुरवठा कंपनी आहे. बेस्टचा जन्म इ.स. 1873 मध्ये ट्रामवे कंपनीच्या रूपात झाला.
आपल्या ट्राम गाड्यांना वीज पुरवता यावी म्हणून बेस्टने वाडी बंदर येथे नोव्हेंबर 1905 मध्ये औष्णिक वीज केंद्र स्थापन केले, त्यातूनच पुढे बेस्टवर मुंबईला वीजपुरवठा करण्याची जवाबदारी आली.
1926 पासून बेस्टने बस गाड्या चालवायला सुरुवात केली आणि 1947 मध्ये देश स्वतंत्र होण्याच्या एक आठवडा आधीच बेस्ट मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारीत आली. आणि आता महानगरपालिकेच्या अखत्यारीत असूनही, बेस्टचा स्वंतंत्र असा कारभार चालतो.
7 ऑगस्ट 1947 च्या दिवशी 'बेस्ट' मुंबई महानगरपालिकेत सामावून घेण्यात आली. कालांतराने बॉम्बेचे मुंबई झाले म्हणून "बॉम्बे इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्स्पोर्ट" च नाव बदलून "बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्स्पोर्ट" असे ठेवण्यात आले.
बेस्ट ही देशातील सर्वात मोठी शहर रस्ता वाहतूक कंपनी आहे. बेस्टचा आदर्श घेऊन देशातील अनेक शहरांनी स्थानिक बस सेवा सुरू केली. मात्र वाहतुकीबरोबरच वीज पुरवठा सेवा पुरवणारी बेस्ट ही एकमेव संस्था. मुंबई महापालिकेच्या वार्षिक अर्थसंकल्पाच्या बरोबरीने बेस्टचा वेगळा अर्थसंकल्प मांडला जातो.

फोटो स्रोत, Getty Images
बेस्ट बस सेवा ही मुंबईकरांच्या जीवनातील एक अविभाज्य भाग म्हणून गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत आहे. एखादी घटना घडली की या बेस्टची चर्चा होते. पण, बघता या सेवेने आता तब्बल शतकोत्तर सुवर्णमहोत्सवात प्रवेश केला आहे.
अशा प्रकारची ही देशातीलच नव्हे, तर आशिया खंडातीलही अनोखी सेवा आहे. मात्र गेल्या काही वर्षांपासून बेस्ट तोट्यात आहे. स्वमालकीच्या बसेस कमी झाल्यात, कंत्राटी पद्धतीने गाड्या घेतल्या जातायत.
त्यात होणारे अपघात त्यामुळे या बेस्ट प्रशासनाच्या व्यवहारामध्ये देखील अनेक बदल घडले आहेत. त्यामुळे ही बेस्ट सेवा गेल्या काही वर्षापासून अडचणीत सापडल्याचे चित्र पाहायला मिळते.
बेस्टचे प्रवासी कमी होण्यामागे काय कारण आहे?
बेस्टच्या दैनंदिन प्रवासी संख्येत गेल्या काही वर्षांपासून घट झाल्याचे आढळून आले आहे. बस ताफा कमी झाल्यामुळे, नवीन वातानुकूलित गाड्या ताफ्यात समाविष्ट होण्यास झालेला विलंब, आकाराने लहान गाड्या ही कारणे प्रशासनाकडून सांगितली जात आहेत.
तसेच मेट्रोचे जाळे वाढल्यामुळे प्रवासी घटल्याचेही म्हटले जात आहे. मात्र मेट्रो स्थानकांपासून पूरक अशा मार्गाची आखणी न करणे, गाड्यांची अपुरी संख्या यामुळे तासनतास प्रवाशांना उभे राहावे लागणे, लांब पल्ल्याचे बसमार्ग यादेखील नियोजनातील त्रुटी आहेत.

फोटो स्रोत, Getty Images
बेस्टचे प्रवासी कमी होण्यामागे काय कारण आहे याची माहिती सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र घाडगेंनी दिली.
घड्याळाच्या काट्यावर धावणाऱ्या मुंबईकरांना गाडीची सेवा वेळेवर देणेही बेस्टला जमलेले नाही, असं ते सांगतात.
कंत्राटी ड्रायव्हर यांना नोकरी जाण्याची भीती नसल्यानें भरघाव वेगाने गाड्या चालवणे, प्रवासी हात दाखवत असताना रिकामी बस प्रवाशांच्या देखत भरधाव घेऊन जाणारे वाहक, प्रवाशांना मिळणारी वागणूक हीदेखील प्रवासी कमी होण्याची अलिखित कारणे आहेत असं मुंबईतील सामाजिक कार्यकर्ते आणि माहिती अधिकार कार्यकर्ते जितेंद्र घाडगे सांगतात.
बेस्ट परिवहन विभाग तोट्यामागची गोष्ट
परिवहन आणि वीजपुरवठा असे दोन भाग असलेल्या बेस्ट उपक्रमाचा विद्युत विभाग नेहमीच फायद्यात असाया. त्या फायद्याच्या जोरावरच परिवहनचा गाडा हाकला जात होता. मात्र विद्युत विभागाचा नफा परिवहन विभागाकडे वळवता येणार नाही असे बंधन वीज नियामक आयोगाने घातल्यानंतर परिवहन विभागाची तूट गेल्या काही वर्षांत वाढतच गेली.
चालू आर्थिक वर्षात बेस्टचा वार्षिक तोटा दोन हजार कोटींपेक्षा अधिक गेला आहे. त्यामुळे बेस्टची एकूण संचित तूट 8,000 कोटींपेक्षा अधिक कोटींवर गेली आहे अशी माहिती ठाकरे गटाचे नेते सचिन पडवळ यांनी दिली.
बेस्टचा अर्थसंकल्प पालिकेत विलीन करण्याची फक्त घोषणा
बेस्टच्या या दुर्दशेची जशी आर्थिक कारणे आहेत तशीच ईतर ही कारणे आहेत. सार्वजनिक परिवहन सेवा ही कधीच फायद्यात नसते.
अन्य सगळ्या शहरांमध्ये परिवहन सेवा महापालिका देत असतात. मात्र मुंबई महापालिका बेस्टचा तोटा उचलण्यास तयार नाही.

फोटो स्रोत, Getty Images
बेस्टचा अर्थसंकल्प पालिकेच्या अर्थसंकल्पात विलीन करण्याची फक्त घोषणा झाली होती. त्याची अंमलबजावणी झाली नाही.
बेस्टने महसुलाचे नवीन पर्याय आणावे व स्वावलंबी व्हावे असा सल्ला पालिका प्रशासनाकडून बेस्ट उपक्रमाला वारंवार दिला जातो. मात्र त्यात काहीही फरक पडलेला नाही असं ही ठाकरे गटाचे माजी नगरसेवक सचिन पडवळ सांगतात.
पालिकेची जबाबदारी लोकांना सेवा देणे आहे
बेस्ट बस ताफा कायम ठेवण्यासाठीची धडपड, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची ग्रॅच्युईटी आणि अन्य देणी देण्यासाठीचे वाढलेले ओझे, खासगीकरणाची टांगती तलवार, 15 वर्षांत नऊ लाखापेक्षा अधिक प्रवाशांची झालेली घट यामुळे संकटात सापडलेल्या बेस्ट उपक्रमाच्या बस सेवेचे चाक अधिकाधिक खोलात रुतले आहे.

फोटो स्रोत, Getty Images
बेस्ट प्रशासनाला आर्थिक साहाय्य देण्यास आता पालिकेनेही हात आखडता घेतलाय. मात्र ही जबाबदारी टाळता येणार नाही. मुंबई महापालिकेने मूलभूत सोयी सुविधा या सर्वसामान्य मुंबईकरांना द्यायलाच हव्यात.
देशात कुठेही परिवहन सेवा ही फायद्यासाठी नसते ती लोकांच्या सेवेसाठी असते, त्यामुळे पाण्यावर ब्रिज बांधण्यापेक्षा सामान्य मुंबईकरांना ही सेवा व्यवस्थित द्या असे बेस्ट कामगार संघटनेचे अध्यक्ष सुहास सामंत म्हणतात.
बेस्टचे उत्पन्न कमी त्यामुळे खर्चाची हात मिळवणी अवघड
बेस्टच्या गाड्यांचा देखभाल खर्च आणि आस्थापना खर्च हा तिकिटातून व जाहिरातीतून मिळणाऱ्या उत्पन्नाच्या तिप्पट आहे.
बसगाड्या भाड्याने घेऊन देखभाल खर्च कमी करणे आणि बसताफा वाढवून प्रवाशांना स्वस्तात उत्तम सेवा देणे हाच 'बेस्ट' उपाय असल्याचे काही वर्षांपूर्वी तत्कालीन आयुक्त अजोय मेहता यांनी सुचवले होते.
मात्र इंधनाचा खर्च, कामगारांचे पगार, निवृत्त कामगारांची देणी, बसगाड्यांची देखभाल, टाटा पॉवर कंपनीची देणी, बँकांकडून घेतलेल्या कर्जाचे हप्ते देताना उपक्रमाची खर्चाची हातमिळवणी करणे दिवसेंदिवस अवघड होऊ लागले असेही सामंत यांनी सांगितले.
स्व मालकीच्या आवश्यक बसेसच बेस्टकडे नाहीत
मुंबईकरांना चांगली सेवा द्यायची असेल तर बेस्ट उपक्रमाकडे स्वमालकीच्या किमान 3337 बसगाड्यांचा ताफा असणे अत्यावश्यक आहे. मात्र मुंबईकरांना अहोरात्र वाहतूक सेवा पुरवणाऱ्या बेस्ट उपक्रमाकडे सध्या स्वमालकीच्या केवळ 1061 (33 टक्के) बसगाड्या आहेत. त्यात 700 चांगल्या अवस्थेत तर इतर वाईट अवस्थेत शिल्लक आहेत.
इतर कंत्राट पद्धतीने कंपन्याच्या 2200 गाड्या आहेत. यात गेल्या वर्षभरात 34 गाड्या फक्त बेस्टने घेतल्यात. मात्र मुंबई महानगरपालिकेतर्फे नवीन 1200 बसगाड्यांचा ताफा असणे अत्यावश्यक आहे.
मागील पाच वर्षात 2160 बस या स्क्रॅप मध्ये काढण्यात आल्या. मुंबई महानगरपालिकेतर्फे नवीन बसगाड्यांची वेळेत खरेदी केली गेली याबाबतची माहिती अधिकार कार्यकर्ते जितेंद्र घाडगे यांना बेस्ट प्रशासनाने दिलीय.
2025 नंतर बेस्ट बस सेवा बंद पडण्याची शक्यता
सध्याच्या घडीला बेस्ट प्रशासनाकडे पुरेशा स्व-मालकीच्या गाड्या नाहीत. आहेत त्या सगळ्या कंत्राटी कंपन्यांच्या आहेत, त्यांची देखील स्थिती व्यवस्थित नाही.
वारंवार नवीन गाड्या आणि बेस्ट प्रशासनाची व्यवस्था सुधारावी यासाठी आम्ही पत्रव्यवहार करतोय. काल देखील व्यवस्थापकांना भेटलो आणि मागणी केली. महत्त्वाचं म्हणजे ही बेस्ट सेवा आहे. ते उत्पन्नाचं साधन नाही हे आपण लक्षात घ्यायला हवं.
जगभरात परिवहन सेवा ही तुटीमध्येच असते. त्यामुळे कोणत्या ना कोणत्या प्रशासनानं पैसे या उपक्रमाला द्यायलाच हवे. आज 32 लाख लोक हे दर दिवशी बेस्ट ने प्रवास करतात. पुरेशा गाड्यांची संख्या वाढली तर ही प्रवासी संख्या देखील वाढणार आहे असे बेस्ट बचाव समितीचे शशांक राव बीबीसी मराठीशी बोलताना म्हणाले.
सार्वजनिक वाहतूक वाचवण्यासाठी बेस्ट बचाव अभियान
आयुष्यमान संपलेल्या बसगाड्या स्क्रॅप झाल्यानंतर नवीन गाड्या खरेदी करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने बेस्ट उपक्रमाला निधी देणे बंधनकारक आहे. मात्र 2019 पासून महापलिकेतर्फे बेस्टला एकही नवा रूपया दिलेला नाही.
अशीच परिस्थिती कायम राहिली तर नजीकच्या काळात 31 मार्च, 2025 रोजी बेस्टकडे स्वमालकीच्या 775 गाड्या आणि नोव्हेंबर, 2025 रोजी केवळ 251 (8 टक्के) बसगाड्या शिल्लक राहतील.
याचाच अर्थ डिसेंबर, 2025 नंतर बेस्टची बससेवा मुंबईकर जनतेला मिळणार नाही असे बेस्ट बचाव समितीचे शशांक राव यांनी बीबीसी मराठीशी बोलताना म्हटले आहे.
मुंबईची जीवन वाहिनी वाचवण्यासाठी "बेस्ट बचाओ" अभियान आम्ही सुरू केलेले आहे. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे पोहोचून प्रशासनाने याची दखल घ्यावी यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत असं देखील शशांक राव यांनी म्हटले आहे.

फोटो स्रोत, Sharad Badhe/BBC
बेस्टला भाडेतत्त्वावरील बसगाड्यांमुळे संकटांना सामोरे जावे लागत आहे
कमी झालेले उत्पन्न आणि वाढलेला खर्च, तिजोरीतील खडखडाट, दैनंदिन खर्च भागवताना करावी लागणारी तारेवरची कसरत आणि कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेवर देण्यासाठी करावी लागणारी धावपळ अशी विचित्र अवस्था बेस्ट उपक्रमाची झाली आहे.
एकूणच आर्थिक गणित बिघडल्याने बेस्ट उपक्रमाने स्वमालकीऐवजी भाडेतत्त्वावर बसगाड्या घेण्याचा सपाटा लावला आहे. देखभाल, दुरुस्तीअभावी अधूनमधून बंद पडणाऱ्या भाडेतत्त्वावरील बसगाड्या, कंत्राटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन आदी विविध कारणांमुळे प्रवाशांना फटका बसत आहे.
तर दुसरीकडे बेस्टला भाडेतत्त्वावरील बसगाड्यांमुळे संकटांना सामोरे जावे लागत आहे.
बेस्टमध्ये या कंत्राटी कर्मचाऱ्यांना का घेतले जाते?-प्रभू
कुर्ला अपघातासाठी कारणीभूत असलेला बसचालक संजय मोरे हा कंत्राटी तत्त्वावर काम करत होता. बेस्टमधील या कंत्राटी कंपनीवर राजकीय वरदहस्त असल्यामुळे बेस्टच्या अधिकाऱ्यांनाही काहीही करणे शक्य नसल्याचा गंभीर आरोप ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभू यांनी केला.
बेस्ट प्रशासन सामान्य लोकांच्या जीवाशी खेळत आहे. ज्या कंपनीला बेस्टकडून कंत्राट देण्यात आले आहे, त्यांचे स्वत:चे ऑफिसही मुंबईत नाही. ते एका कंटेनरमध्ये बसतात. कालच्या अपघातामधील जो चालक नियुक्त करण्यात आला होता, त्याच्यावर बेस्ट प्रशासनाचे कोणतेही नियंत्रण नाही.

फोटो स्रोत, Sharad Badhe/BBC
बेस्टच्या अधिकाऱ्यांना या कंपनीला जाब विचारायचा असेल तर हैदराबादला फोन करावा लागतो. तिकडेही कोणीही उत्तर द्यायला तयार नाही.
मग बेस्टमध्ये या कंत्राटदाराच्या कर्मचाऱ्यांना का घेतले जाते? हैदराबादच्या या कंपनीवर कोणाचा राजकीय वरदहस्त आहे, ज्याच्यामुळे बेस्टमध्ये ही कंपनी चालते, असा सवाल माध्यमांशी संवाद साधताना आमदार सुनील प्रभू यांनी उपस्थित केलाय.
या निर्णयाचा पुनर्विचार करण्याची आवश्यकता
तर कुर्ला येथील अपघातानंतर भाजपचे माजी नगरसेवक आणि नेते प्रभाकर शिंदे यांनी सांगितले की बेस्टमध्ये भाडे करार तत्त्वावर बसेस घेण्याचे कंत्राट वर्ष 2018 ते 2021 या काळात तत्कालीन सत्ताधारी ठाकरे गटाच्या सेनेच्या नेतृत्वात आणि आदित्य ठाकरे यांच्या आदेशानुसार देण्यात आले होते.
त्यावेळी भाजपाने सदर पस्तावाबाबत प्रश्न उपस्थित केले होते. आता वाढणाऱ्या अपघातामुळे आणि झालेल्या जीवितहानीमुळे सदर बाबीचा पुनर्विचार करण्याची आवश्यकता आहे. तरी बेस्ट महाव्यवस्थापक म्हणून आपण याबाबत तातडीने योग्य तो निर्णय घ्यावा असे पत्र शिंदे यांनी महाव्यवस्थापकांना देत मागणी केलीय.
या कंत्राटी कंपन्या बस चालवतात...
बेस्ट प्रशासनात सध्या अनेक कंत्राटी कंपन्यांमार्फत बसेस चालवण्यात येत आहेत.हंसा कंपनी, डागा कंपनी, वोल्ट्रा कंपनी, येमटी कंपनी या कंपन्यांमार्फत सध्या बेस्टच्या विविध बस या चालवल्या जात आहेत.
बस या देखील या कंपनीच्या मालकीच्या आणि काही कर्मचारी कंत्राटी पद्धतीने या कंपन्यांनी भरलेले आहेत. कर्मचाऱ्यांना कामावर ठेवण्यापूर्वी या कंपन्यांकडून प्रशिक्षण दिलं जातं.

फोटो स्रोत, Sharad Badhe/BBC
अनेकदा पगारवाढ आणि इतर सोयी सुविधांसाठी या कंपन्यांचे कर्मचारी हे आंदोलन मुंबईत करतात. या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाशी बेस्ट प्रशासन आमचा संबंध नसल्याचे वारंवार नेहमी सांगत असतात.
अधिकाधिक बस कशा वाढवता येईल यासाठी आमचा प्रयत्न - बेस्ट व्यवस्थापक
बेस्ट बाबत होणाऱ्या वादांवर आणि आरोपांबाबतची बाजू बीबीसीने BEST च्या व्यवस्थापनाकडून जाणून घेतली.
बेस्ट व्यवस्थापक अनिल दिग्गीकर सांगतात, "बेस्ट बस वाढवण्याच्या दृष्टीने संघटना व बेस्ट प्रशासन यांच्यात करार झाला आहे. त्यामुळे अधिकाधिक बस कशा वाढवता येईल यासाठी आमचा प्रयत्न सुरू आहे.
"महापालिका प्रशासन व राज्य सरकार यांच्या सहकाऱ्यांने हे लवकरात लवकर होईल यासाठी आणि सध्या कंत्राटी पद्धतीने गाड्या आहेत त्यांच्या ड्रायव्हरला आणखी चांगला प्रशिक्षण देण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत.
"कंत्राटी पद्धतीने ज्या कंपन्यांच्या गाड्या आहेत त्यांच्यासोबत बैठक लावण्यात आलेली आहे आणि ज्या काही त्रुटी आहेत त्याचा उहापोह करण्यात येईल", अशी माहिती बेस्ट व्यवस्थापक अनिल दिग्गीकर यांनी दिली.
'बेस्ट बस सेवा ही सेवा आहे'
मुंबईची लोकसंख्या ही झपाट्याने वाढत आहे. त्यात बेस्ट बस सेवा ही त्यामानाने अपुरी आहे. या बेस्ट बसच खाजगीकरण न करता, सध्या बेस्टची सेवा हे पूर्णपणे महापालिकेने पूर्वीप्रमाणे चालवावी अशी मागणी कुर्ल्याच्या अपघातानंतर आता मुंबईत होऊ लागली आहे.
कोणत्याही प्रकारची कंत्राटी पद्धतीने कंपन्यांची नेमणूक न करता सरळ सेवा ही मुंबईकरांना द्यावी. यामध्ये स्वतःच्या मालकीच्या बसेस, स्वतःचे कर्मचारी, महापालिकेने आर्थिक मदत बेस्ट प्रशासनाला करावी अशी मागणी सर्व बेस्ट कर्मचारी आणि प्रवासी संघटनांनी देखील केली आहे. त्यामुळे मुंबईकरांची जीवनवाहिनी असलेल्या
बेस्ट बस सेवाच भवितव्य हे पूर्णपणे आगामी काळात मुंबई महापालिका आणि राज्य सरकार काय निर्णय घेत यावर अवलंबून आहे.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.












